महिला दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांत यशस्वी महिलांनी त्यांच्या यशोगाथा सांगितल्या आणि ते यश मिळवण्यासाठी त्यांनी कसा संघर्ष केला, किती मेहनत केली तेही विस्ताराने सांगितलं. काहींनी तर असंही म्हटलं की वर्षांतला एक दिवस असा सणासारखा साजरा करून काही होणार नाही. वर्षभर सतर्क, सजग राहणं आणि आपल्या विकासाच्या-प्रगतीच्या वाटेवर अथक चालत राहणं जास्त महत्त्वाचं. या प्रत्येकीच्या निवेदनात एक वाक्य हमखास होतं की मला घरच्यांचा पाठिंबा मिळाला म्हणून मी हे यश, स्थान, अधिकार मिळवू शकले. पण हा पाठिंबा नेमका कशा प्रकारचा होता आणि तो मिळवण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं हे मात्र कुणीच सांगितलं नाही.

चाकोरीबाहेरचं काम करणाऱ्या माणसाला – स्त्री असो वा पुरुष – कितीतरी पातळ्यांवर आपल्या माणसांचा पाठिंबा मिळणं गरजेचं असतं. कधी पैसा, कधी काही विशिष्ट माणसांच्या ओळखी, कधी घरातल्या विविध जबाबदाऱ्यांतून मोकळीक, तर कधी विशिष्ट शिक्षण-व्यवसाय यासाठी घरच्यांनी आक्षेप न घेणंसुद्धा. या सगळ्यासाठी त्यांना स्वत:ला काही ना काही तडजोडी कराव्या लागत असतीलच. बायकांकडे बघण्याच्या विशिष्ट पारंपरिक दृष्टिकोनामुळे त्यांना जास्तच. त्या तडजोडी कोणत्या आणि त्यासाठी नेमके कोणते निकष त्यांनी लावले हे सहसा कुणी सांगत नाही. एका तरुणीचा अनुभव एकदा वाचला होता. अतिशय प्रतिष्ठेच्या एका शिष्यवृत्तीसाठी तिने खूप प्रयत्न केले होते. आणि अखेर ती शिष्यवृत्ती जेव्हा तिला मिळाली तेव्हा तिचं बाळ तीन महिन्यांचं होतं. बाळासाठी संधी सोडावी तर पुन्हा ती कधी मिळेल-मिळेल तरी की नाही याची कोणतीही खात्री नव्हती. आणि आत्ता चालून आलेली संधी सोडून पुढे आयुष्यभर खंत करीत राहायचं. तिने सासूबाईंना साकडं घातलं. त्यांनी दोन र्वष बाळाची जबाबदारी घेण्याची ग्वाही दिली तेव्हा ती दोन वर्षांसाठी परदेशात निघून गेली. अभ्यास पूर्ण करून परत आली तेव्हा तिचं बाळ तिला ओळखेना. तिने धीर धरला. यथावकाश सगळं सुरळीत झालं. बाळाला सासूजवळ सोपवून, तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, बाळ काही काळ आपल्याला ओळखणार नाही हे स्वीकारून तिने तडजोड केली. त्या तडजोडीच्या बदल्यात सासूचा भक्कम पाठिंबा मिळवला आणि आपलं ईप्सित साध्य केलं.

अशी काहीतरी किंमत दिल्याशिवाय पाठिंबा मिळत नाही हे सत्य पचवण्याची ताकद आजकालच्या किती मुलींमध्ये आहे? ही किंमत कधी बंधन स्वीकारण्याची असेल, कधी आणखी कसली. एका घरात राहणाऱ्या चार माणसांनी एकमेकांसाठी काही ना काही करणं, स्वीकारणं ओघानेच येतं. पण मी काम करते, पैसे मिळवते तर चार पैसे जास्त खर्च करून मोलाच्या माणसांकडून काम करून घेईन, पण घरच्या माणसांची मदत मिळावी यासाठी कोणत्याही बंधनाला सामोरी जाणार नाही. असा काहीसा आढय़ताखोर दृष्टिकोन बहुतांश मुलींचा आढळतो. दोन पिढय़ांच्या विचारात, जीवनशैलीत असणारं अंतर दिवसेंदिवस वाढतंय. त्यातून नाराजी, वाद निर्माण होणंही अटळ. पण आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचं काय? माझ्या आवडीचं शिक्षण घेणं, मनाजोगं काम करणं, घरासाठी पैसे मिळवणं, मी घरात नसताना घराची/बाळाची नीट देखरेख होणं की माझी लाइफस्टाइल सांभाळणं असा विचार फार थोडय़ा मुली करताना दिसतात. घरासाठी, मुलांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायची तयारी असते, पण तेच पैसे आपल्या आणि मुलांच्या भविष्यासाठी राखून-गुंतवून ठेवावे, थोडी तडजोड करावी, मुलांना घरच्या वडिलधाऱ्यांचा आधार मिळावा हे त्यांना सुचत नाही, कोणी सांगितलं तरी पटत नाही. मग त्यासाठी स्वत:च्या जिवाची कितीही घालमेल-तडफड झाली, प्रसंगी मुलांची थोडी शारीरिक आणि मानसिक आबाळ झाली तरी सुपरवुमन होण्याच्या प्रयत्नांना खीळ घालायची तयारी त्या दाखवत नाहीत. घराला लॉजिंग-बोर्डिगची कळा आली तरी स्वतंत्र राहण्याचा अट्टहास सोडवत नाही. पण अडचणीच्या वेळी घरच्यांच्या मदतीची अपेक्षा मात्र असते. ती नाही मिळाली तर ते गावभर सांगत फिरण्याचा सोसही असतो. पण मदत मिळवण्यासाठी, पाठिंबा मिळवण्यासाठी आपण काय सोडायला तयार आहोत ते बघायची तयारी नसते.

यशस्वी स्त्रियांनी आपली यशोगाथा तरुण, अननुभवी मुलींना सांगताना आपण कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर काय आणि कोणत्या तडजोडी केल्या हेही आवर्जून सांगायला हवं. नाहीतर त्यांना पाठिंबा मिळाला म्हणून त्या पुढे जाऊ  शकल्या. आम्हाला कुणाचा पाठिंबा नाही, कुणाची मदत नाही म्हणून आम्ही मागे राहिलो असे आत्मघातकी कढ काढत स्वत:ला गोंजारत बसण्याची त्यांना सवय लागेल.
राधा मराठे – response.lokprabha@expressindia.com