साहित्य : छोटी भेंडी, बेसन, धने-जिरे पावडर, हळद, मिरची पूड, मीठ, खाण्याचा सोडा, तीळ, िलबाचा रस.

कृती : प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन मधोमध चिरून घ्यावी आणि गॅसवर एका तव्यामध्ये तेल तापत ठेवावे, नंतर बेसनमध्ये वरील सर्व साहित्य घालून भजीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे, ते पीठ चिरलेल्या भेंडीच्या मधोमध भरून भेंडी तव्यावर ठेवून एका मिनिटासाठी झाकण ठेवावे. एका बाजूने भेंडी कुरकुरीत झाली की परतावी आणि दुसऱ्या बाजूने कुरकुरीत करून घ्यावी. सव्‍‌र्ह करताना वर कोथिंबीर टाकून शेजारी कांदा द्यावा. पिठात िलबाचा रस घातल्याने भेंडी तेल जास्त शोषून घेत नाही.

रंगीत मोदक

साहित्य : २ वाटी मोदक पीठ, दोन वाटी गूळ, २ वाटी किसलेले ओले खोबरे, आवडते खाण्याचे रंग, खसखस, वेलची पूड, जायफळ पूड, तूप, हळदीची पाने.

कृती : एका भांडय़ात उकडीकरिता पाणी उकळत ठेवावे, पाण्याचे आणि पिठाचे तीन सामान भाग करावेत. दोन भागांमध्ये वेगळे वेगळे रंग टाकावे. पाण्याला उकळी आली की त्या प्रत्येक भागात मोदकाचे पीठ घालून २ मिनिटे झाकून ठेवावे. उकड भागवून घ्यावी. उकड करत असतानाच दुसऱ्या बाजूला भांडय़ात थोडेसे तूप तापवून त्यात खसखस घालावा. त्यानंतर गूळ-खोबरे घालून गूळ खोबऱ्यात पूर्ण मिक्स होईपर्यंत परतावा. वेलची जायफळ पूड घालून गॅस बंद करावा.

दोन रंगीत आणि एक शुभ्र गोळे काढून घ्यावे. हातावर एकाच्या बाजूला एक ठेवून त्याचा एक गोळा बनवावा. मोदकासाठी पारी करून घ्यावी. त्यात सारण भरून, परीला अगदी जवळजवळ घडय़ा पाडून त्या सर्व एकत्र वरच्या बाजूला आणून पारी बंद करावी.

मोदक पात्रात पाणी उकळत ठेवावे. चाळणीत हळदीची पाने मांडून त्यावर मोदक ठेवून ते उकडत ठेवावे. पंधरा-वीस मिनिटांनंतर गॅस बंद करून हलकेच पाण्याच्या हाताने मोदक तपासावा, उकड हाताला चिकटली नाही तर समजावे की मोदक तयार आहे.

पापडाची भाजी

साहित्य :
४-५ उडदाचे पापड, जिरे, कांदा, टोमॅटो, हळद, मिरची पूड, मीठ.

कृती : प्रथम पापड मध्यम आचेवर कोरडे भाजून घ्यावे. एका भांडय़ात तेल तापवून त्यात जिऱ्याची फोडणी देऊन त्यात कांदा आणि टोमॅटो २ मिनिटे परतावे. त्यात हळद, मिरची पूड घालून पापड चुरडून घालावा आणि २ मिनिटे वाफ आणावी. चवीपुरते मीठ घालून कोिथबिरीने सजवावे. पापड नीट भाजला जायला हवा नाहीतर भाजी चिकट होते. चपाती कडक करून त्यात ही भाजी घालून वर चीज भुरभुरवले तरी छान घरगुती फ्रँकी तयार होते.
स्नेहा सावंत – response.lokprabha@expressindia.com