गुलाबी रंग निखळ प्रेमाचे प्रतीक आहे म्हणून विशिष्ट दिवसांसाठी हा पदार्थ आपल्या प्रियजनांना जरूर खिलवावा. मनमोहक ठरेल.
साहित्य : २ वाटय़ा तांदूळ, १ कांदा, ४-५ लसूण पाकळ्या, ३-४ लाल टोमॅटो, १ लाल सुकी मिरची, २ तेजपत्ता पाने, २ लवंग, जिरे, हिंग, मीठ, धनाजिरा पावडर १ चमचा, बडीशेप पावडर १/२ चमचा, तूप.
सजावटीसाठी- टोमॅटोचे गोल काप, तळलेले काजू, लाल छोटे कांदे अथवा तळलेल्या कांद्याच्या गोल रिंग.
कृती : लाल टोमॅटोची प्युरी करावी. काजू तळून घ्यावेत. एका पॅनमध्ये तूप घालावे. त्यात तमालपत्रे, लवंग, सुकी मिरची, कांदा लसूण गुलाबी रंगावर परतावे. मग त्यात जिरे, हिंग, धनाजिरा पावडर, बडीशेप पावडर घालावी. मीठ घालावे. २ वाटय़ा शिजवलेला मोकळा भात घालावा. सर्व व्यवस्थित कालवावे, पॅनवर झाकण ठेवावे व दणदणीत वाफ आणावी.
वरील सजावटीचे साहित्य वापरून गरमागरम पुलाव सव्‍‌र्ह करावा. सोबत तळलेली सांडगी मिरची व पोह्य़ाचा पापड द्यावा.
टीप : टोमॅटो शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. उकडून किसलेले बीट, जांभळा कोबीचा कीस व गाजराचा कीस घालूनही हा पुलाव होईल, एक आकर्षक वेगळ्या रंगाची छटा येईल व पौष्टिकताही येईल.

अननस सूप कम करी
साहित्य : अननसाचे तुकडे, संत्र्याचा रस १ चमचा, खवलेला नारळ, काजू तुकडे, आल्याचे तुकडे, जिरेपूड, मीठ, किंचित साखर, तूप, लाल मिरच्या, कढीपत्ता. काळ्या मनुका, सजावटीसाठी – अननसाचे गोल काप व चिली फ्लेक्स.
कृती : अननसाचे बारीक तुकडे वाफवून घ्यावे. त्याचा लगदा करावा. नारळ चव, आले, काजू तुकडे यांचे वाटण करावे. एका पॅनमध्ये थोडे तूप घालून जिरे, २ लाल मिरच्या बारीक चिरून, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात अननसाचा लगदा, नारळाचे वाटण व जिरेपूड, मीठ घालावे. उकळी आणावी. लाल मिरच्यांचे तुकडे सव्‍‌र्ह करताना काढून टाकावे. संत्र्याचा रस घालावा. रंग छान येतो व चवही छान लागते. काळ्या मनुकाही घालाव्या व सव्‍‌र्ह करावे.
टीप – हे सूप म्हणूनही प्यावे अथवा पुलावाबरोबर करी म्हणूनही खावी. आंबट, गोड, तिखट या तीनही चवींचा आस्वाद घेता येतो.

अननसातील पाचक रसामुळे खालेल्या अन्नाचे पूर्ण पचन होते. रक्तवर्धक आहे. तोंडाला रुची येते.