साहित्य : २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर, १/२ टे. स्पून. काश्मिरी मिरची पावडर, १ टी. स्पून गरम मसाला, पाणी (कोथिंबीर पाहिजे असल्यास) फोडणीसाठी मोहर, हिंग, कढीपत्ता, चवीपुरती साखर.

कृती : आठळ्यांचे तुकडे करून साल काढून उकडून घ्याव्या. चवळी रात्रभर भिजवून उकडून घ्यावी. कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्यावे. लसूण पेस्ट करावी. चिंचेचा कोळ काढावा.

प्रथम पॅन घेऊन गरम झाल्यावर तेल घालावे. त्यात फोडणीचे साहित्य घालून त्यावर लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, धनेजिरे पावडर घालून चांगले परतावे. त्यावर मीठ, चिंचकोळ, काश्मिरी मिरची पावडर, गरम मसाला, साखर घालून ढवळून घ्यावे. त्यावर आठळ्या व चवळी घालावी. थोडे पाणी घालावे. झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यावी. पाच मिनिटे मंद गॅसवर ठेवून
गॅस बंद करावा. फुलके, भाकरी, नान तसेच दोन पावांच्या मधे भरूनही खाऊ शकतो.

लज्जतदार पनीर

साहित्य : २५० ग्रॅ. पनीर, २५० ग्रॅ. टोमॅटो, ५० ग्रॅ. लोणी, ५० ग्रॅ. क्रीम, ५० ग्रॅम दही,  २५ ग्रॅ. काजू, १ टे. स्पून लाल मिरची पावडर, १/२ चमचा काळी मिरी पावडर, १/२ टी. स्पून जिरे पावडर, १/४ टी. स्पून लवंग पावडर, १/२ वाटी दूध, १ टे. स्पून कॉर्न फ्लोअर, चवीनुसार मीठ.

कृती : पनीरचे तुकडे साधारण १ इंच आकाराचे करा. टोमॅटो कापून मिक्सरमधून वाटून घ्या. दही घुसळून घ्या. काजूची पेस्ट करा. एका कढईत लोणी घेऊन त्यात टोमॅटो प्युरी घालून वाफ येईपर्यंत शिजवा. त्यात मीठ, लवंग, काळी मिरी पावडर, लाल
मिरची पावडर, दही, जिरे पावडर, घालून दोन-तीन मिनिटे शिजवा. त्यात दूध मिसळलेले कॉर्नफ्लोअर घाला. मिक्स करा. नंतर पनीरचे तुकडे, काजू, पेस्ट क्रीम घालून थोडा वेळ शिजवा. बाऊलमध्ये काढा. क्रीम घालून सजवा. गरम गरम वाढा.

ओट्सचे पौष्टिक लाडू

साहित्य : २०० ग्रॅ. ओट्स पावडर, २०० ग्रॅॅ. पिठीसाखर, २०० ग्रॅ. किंवा आवश्यकतेप्रमाणे साजूक तूप, १ टी. स्पून वेलची पावडर, बदाम, काजू, पिस्ता यांचा चुरा २ टे. स्पून

कृती : ओट्स पावडर भाजून घ्यावी. त्यात तूप, वेलची पावडर, ड्रायफ्रूट चुरा घालून चांगले मिक्स करावे. सर्वात शेवटी पिठीसाखर घालावी आणि लाडू वळावे. हे लाडू दुधात मिक्स करून खाऊ शकतो किंवा तसेचही खाऊ शकतो. दुधाबरोबर खाल्ल्यास पौष्टिकता वाढते.

ओव्याच्या पानांची चटणी

साहित्य : १ वाटी ओव्याची पाने, २ टे. स्पून चण्याच्या डाळ्या, ७-८ कढीपत्त्याची पाने, १ टी. स्पून जिरे, २-३ सुक्या लाल मिरच्या, मीठ, साखर, थोडीशी चिंच. १ टी. स्पून लिंबाचा रस, तेल तळण्यासाठी.

कृती : ओव्याची पाने, कढीपत्त्याची पाने तळून घ्यावी. डाळ्या भाजून घ्याव्या. हे सगळे साहित्य (मिक्सरमध्ये घेऊन) व बाकीचे सगळे साहित्य मिक्सरमध्ये घेऊन बारीक करावे. ही चटणी खूप चविष्ट लागते. आणि पंधरा दिवस टिकते.

लेखा तोरसकर – response.lokprabha@expressindia.com