माणसापरीस मेंढरं बरी

२० ऑगस्टच्या पुरवणीतील मधुगंधा कुलकर्णी यांचा ‘अदृश्य भिंती’ हा माणूस आणि श्वान यांच्यातील तौलनिक लेख अतिशय छान होता, अगदी समयोचित वाटला. लेखात दिलेली उदाहरणं तसेच वृत्तपत्रांत वाचलेल्या बातम्यांमधून माणसाने आपलं अमानवीय रूपच दाखवलय. खरं तर कुठलाही प्राणी आपणहून कधीच माणसाच्या वाटय़ाला जात नाही. क्वचित अपवाद असू शकतो, बऱ्याच वेळा रस्त्यावरून जाताना लहान-लहान मुलंदेखील उगीचंच कुत्र्यांची छेड छाड करताना, दगड मारताना दिसतात. मग अशा वेळी जर स्वसंरक्षाणार्थ एखादा कुत्रा अंगावर धावून गेलाच तर वृत्तपत्रात बातम्या येतातच ‘कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला’सारख्या.
आमच्याकडेही सात वर्षांपूर्वी आमचा ‘स्नोई’ येईपर्यंत कुत्रा वा इतर कुठल्या प्राण्याविषयी मला फार लोभ नव्हता, पण हा आला आणि त्यानं जीवच लावला. त्याच्या सान्निध्यात राहून हळूहळू त्यांचं भावविश्व उलगडू लागलं आणि लक्षात यायला लागलं यांच्या भावनिक जाणिवा, गरजा अगदी आपल्यासारख्याच असतात. एखादी गोष्ट मिळाली नाही की चिडणं, रुसणं पण प्रेम मात्र अगदी निरपेक्षच करतात. आपण हे समजून घेण्यात खूप कमी पडतो. या संदर्भातील माझा अनुभव सांगायला आवडेल; मागच्या वर्षीचीच गोष्ट, रस्त्यावरचीच पण बऱ्याच वेळा आमच्याच इमारतीमध्ये ही कुत्री मुक्कामाला असायची. ऐन पावसाळ्यात इमारतीबाहेरच्या गटाराजवळ ही बाळंत झाली, त्यादिवशी पावसाचा जोर होता, गटार पाण्याने तुडुंब वाहू लागलं होतं आणि तिची इतर पिल्लं वाहून गेली फक्त एकच राहिलं होतं. कसंबसं मग वॉचमनने त्या दोघांना बिल्डिंगमध्ये सुरक्षित जागी ठिकाणी ठेवलं. पिल्लू दोन महिन्यांचं झालं आणि इमारतीभर बागडू लागलं. सर्व रहिवाशांना काही अपवाद वगळता, त्याचा त्रास व्हायला सुरुवात झाली. नाही म्हणायला काही जण त्याला खाऊ-पिऊ घालत होते. माझी मुलगी तिला रोज घरी आणायची, तिचं खाणं-पाणी बघायची. अधूनमधून अंघोळ घालणं वैगेरे करत असे पण अगोदरच एक कुत्रं असल्यामुळे आणखीन एकाला घरी कायमचं सांभाळणं शक्य नव्हतं. माणसांच्या प्रेमाला आसुसलेलं ते पिल्लू सतत कोणाच्या ना कोणाच्या पायात यायचं. दात येत असल्यामुळे काही तरी चावत बसायचं पण हे समजून कोण घेणार? शेवटी एक दिवस कुणी तरी त्याला गाडीत घालून कुठे तरी सोडून आले. कुठे ते कळलंच नाही अन् इकडे त्याची आई त्या पिल्लाच्या आठवणीनं कासावीस होऊन आठ दिवसांच्या आत गेली. माझी मुलगी सोसायटीवाल्यांशी भांडून आली पण काही उपयोग झाला नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की सांभाळणारा वॉचमन होता आणि कुत्र्याला फेकून देणारे स्वत:ला सुशिक्षित, उच्चभ्रू वर्गातले समजणारे होते. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की ‘माणसापरीस मेंढरं बरी.’
– वीणा गुणे, बोरिवली

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

सहसर्जनात ‘इंटरप्रिटर’ कोण, सर्जनशील कोण?

‘सहसर्जनाचा डोळस सोहळा’ हा चंद्रकांत कुलकर्णी (२६ ऑगस्ट) यांचा लेख आवडला. सहसर्जनाचा सोहळा कसा संपन्न होतो याचे लेखातील वर्णन मात्र काहीसे अपूर्ण वाटते. नाटककार हाच फक्त सर्जनशील कलावंत असतो आणि दिग्दर्शकासह इतर रंगकर्मी फक्त ‘इंटरप्रिटर्स’ असतात या समजाचा प्रतिवाद करताना, दिग्दर्शक हा फक्त (नाटककाराचे संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा) ‘पोस्टमन’ कसा नसतो याची विस्तृत मांडणी लेखात आहे. परंतु इतरही कोणीच पोस्टमन कसे नसतात याचे विश्लेषण विस्तृतपणे करायला हवे होते असे वाटले. लेखात म्हटल्याप्रमाणे एका विशिष्ट मर्यादेनंतर नाटककाराचे बोट सोडून दिग्दर्शकाला पुढचा प्रवास एकटय़ानेच करावा लागतो हे खरे आहे. परंतु त्याचप्रमाणे एका मर्यादेनंतर दिग्दर्शकाचे बोट सोडून रंगमंचावरील नटाला त्याचा/तिचा अभिनयाचा प्रवासही असाच एकटय़ाने करावा लागतो (दिग्दर्शकाने पोहायचे कसे हे कितीही बारकाईने सांगितले तरी नटांना स्वत:च पाण्यात पोहावे लागते.). इतकेच काय, पण त्या अभिनयाच्या अनुभूतीला आपल्या अनुभवविश्वाची जोड देत (लेखात म्हटल्याप्रमाणे ‘अंधारात एकाग्रतेने दबा धरून बसून’) स्वत:मध्ये उतरवून घेणे हाही एकापरीने नाटय़रसिकांचा त्या सहसर्जनाच्या सोहळ्यातील खारीचा वाटाच असतो. स्टुडिओमध्ये किंवा रिकाम्या नाटय़गृहात केलेला प्रयोग आणि नाटय़रसिकांनी भरलेल्या नाटय़गृहात केलेला प्रयोग यात जमीनअस्मानाचे अंतर पडते ते याच खारीच्या वाटय़ामुळे. नाटककाराने अनुभवलेला भवताल दिग्दर्शकाप्रमाणेच नटांनी आणि रसिकांनीही अनुभवलेला असतो आणि स्वत:च्या सर्जनशीलतेनुसार काही मतांची/ आडाख्यांची निर्मिती मनात केलेली असते. त्याची ‘फ्रिक्वेन्सी’ जेव्हा नाटकाबरोबर जुळून येते तेव्हा ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचून सहसर्जनाचा सोहळा संपन्न होतो
या सगळ्याकडे विरुद्ध दिशेने पाहिले तर मुळात नाटककार हाच त्याने अनुभवलेल्या परिस्थितीचा फक्त एक संवेदनशील ‘इंटरप्रिटर’ असतो असेही म्हणता येईल (‘वाडा’ हेसुद्धा नाटककाराने केलेले ३०-४० वर्षांच्या काळाचे इंटरप्रिटेशन/अर्थघटन आहे). त्याचेच अर्थघटन पुढे दिग्दर्शक, नट आणि प्रेक्षक आपापल्यापरीने करत असतात. त्यामुळे एकापरीने सारेच अर्थघटन करणारे इंटरप्रिटर ठरतात असे वाटते. उत्कृष्ट कलाकृतीच्या निर्मिती आणि रसग्रहणाच्या प्रक्रियेत कोण सर्जनशील आणि कोण अर्थघटन करणारे हे सांगणे कठीण आहे. नाटककारापासून ते नाटय़रसिकांपर्यंत सारे त्या जिवंत सोहळ्यातील सहप्रवासी आहेत इतकेच म्हणता येईल.
– विनीता दीक्षित, ठाणे</p>

प्रेक्षकाचे भान अधिक महत्त्वाचे
चंद्रकांत कुलकर्णी यांनी लिहिलेला ‘सहसर्जनाचा डोळस सोहळा’, हा लेख वाचला. ‘वाडा’,‘ मग्न’ आणि आषाढबार या नाटकांवरील नाटककार ते अंधारातून समीक्षण करणाऱ्या रसिक प्रेक्षकाचे व्यक्त झालेले भान मला अधिक महत्त्वाचे वाटते. नाटककाराचे बोट सोडून दिग्दर्शकाला एकटय़ाला करावा लागणारा प्रवास ही स्वतंत्र निर्मिती तर आहेच याशिवाय नवे शिवधनुष्य पेलणे आहे. नाटय़ क्षेत्राला व रसिकांना आपले विचार मोलाचे आहेत.
– विष्णू बोरकर, अहमदनगर<br />‘अदृश्य भिंती’ खूपच भावला
‘अदृश्य भिंती’ हा मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख खूपच भावला. खरंच काही वेळा आपण फारच निष्ठुरपणे वागत असतो. आपल्याशिवाय दुसरा कुठलाच विचार डोक्यात येत नाही. आपल्या वाटय़ाला आलं तेवढंच खरं म्हणण्याची सवय पडली आहे. एखादा त्रास वाटला की तो दूर झालाच पाहिजे त्यापासून सुटका झालीच पाहिजे असे आपल्याला वाटते.
– प्रकाश चौगुले, कोल्हापूर</p>

नवी उमेद मिळाली
उत्तराताईंचा ‘आनंदाचा खळखळता झरा’ हा लेख वाचला. फार छान लिहिला आहे. अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या आशाताई माझ्या पण आदर्श आहेत. अतिशय गोड गळा, प्रत्येक गाण्याला न्याय देणं आणि सगळ्यात मला काय आवडतं सांगू वयाच्या ८३व्या वर्षीही नवीन नवीन गोष्टी शिकण्याची उमेद, आयुष्यातील चढ-उताराचा गाण्यावर तर परिणाम होऊ दिला नाहीच पण आयुष्यात एखाद्या तपस्वीप्रमाणे जगतात. आशाताई, अमिताभजी, रतन टाटा हे माझे आदर्श आहेत ज्यांनी आपल्या वयाला धाब्यावर बसवून जीवनाचं चैतन्य आपल्या हातात घेतलं आहे. अजून नवीन नवीन शिखरं त्यांना खुणावतात आणि त्या दिशेने एखाद्या तरुणाला लाजवील अशी वाटचाल करतात.
– अर्चना कुलकर्णी, बदलापूर

..पुनर्विचार व्हावा
‘शिकू आनंदे’ या सदरातील २० ऑगस्टला प्रसिद्ध झालेला ‘मुलांच्या चित्रांची जादूई दुनिया’ हा लेख वाचला. ‘चित्र काढणं (दिलेली ठोकळेबाज चित्र रंगवणं नाही) हेही मुलांना आनंदी करणारं माध्यम आहे’ आणि ‘म्हणजेच जेव्हा मुलांना मनासारखं वागायला आणि करायला मिळतं तेव्हा ती शिकतात असं म्हणता येईल.’ ही निरीक्षणं विचार करावयाला लावतात.
हा दृष्टिकोन रचनावादी शिक्षणाशी सुसंगतच आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कृती करून मूल अधिक चांगलं शिकतं, कारण ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेत स्वत:चा क्रियाशीलरीत्या सहभाग असतो. ‘देअर्स नॉट टू मेक रिप्लाय, देअर्स नॉट टू रीझन व्हाय’ असं ‘शिस्त’बद्ध, पठडीबद्ध, ‘ठोकळेबाज’ आणि मुर्दाड मन बनविण्याला रचनावादी शिक्षणाचा विरोध आहे. ‘थ्री इडियट्स’ सिनेमातील ‘शेर भी सिखाया हुवा काम करता है, उसे ‘वेल ट्रेन्ड’ कहते है, ‘वेल एज्युकेटेड’ नही’ हा संवाद हाच विचार मांडतो. शिक्षण म्हणजे वेळापत्रक, शिस्त आणि बंधनं तसंच ‘मनासारखं वागायला आणि करायला’ मिळतच नाही याचं प्रतीक बनलं तर ‘तळे साचून सुट्टी मिळेल काय? आठवडय़ातनं रविवार येतील का रे तीनदा?’ असे विचार येणं साहजिक आहे. त्यामुळे विवेकवादी मूल्यनिर्मिती करताना शिस्त आणि ढील याचं योग्य संतुलन ठेवलं जाणं आवश्यक आहे.
सत्ताधीशांच्या विचारांना आणि हितसंबंधांना गैरसोयीच्या होणाऱ्यांबाबत असहिष्णुता दाखविणारी फौज उभी करणे ही सत्ताधीशांची प्राथमिकता असणार हे उघड आहे. जेएनयू आणि इतरत्र होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनांमागील ‘बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे, उडवुनि देऊनि जुलुमाचे या करू पाहा तुकडे तुकडे!’ इत्यादी आवेशाने ‘शिस्तीचा बडगा’ झुगारून देण्याची वृत्ती आणि विद्यार्थ्यांना नियमांच्या कोंडवाडय़ात कोंबण्याचे सत्ताधीशांचे प्रयत्न या संघर्षांचा ज्ञानरचनावादी शिक्षणाच्या सूत्रांच्या अनुषंगाने पुनर्विचार व्हावा.
– राजीव जोशी

योग्य समुपदेशन
६ ऑगस्टच्या पुरवणीमधील नीलिमा किराणे यांचा ‘भावनिक संतुलन’ हा लेख खूपच आवडला. सद्य:स्थितीत खरोखरच एकमेकांच्या भावनांची कदर केली जात नाही. त्याला परिस्थितीही तशीच आहे. या लेखामधून लेखिकेने खूप छान समुपदेशन केले आहे. एकमेकांचा आदर करणं, भावना समजून घेणं गरजेचं आहे, असं वाटतं.
प्रज्ञा घोडके, पुणे