आरती कदम यांचा १ ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक  दिनानिमित्त लिहिलेला प्रदीर्घ लेख अभ्यासपूर्ण होता. या निमित्ताने वृद्धांना मी सांगू इच्छितो की वय वाढणे हा निसर्गक्रम आहे म्हणून आपण स्वत:ला ‘आता आपण म्हातारे झालो’ असे म्हणू नका. ज्येष्ठत्व व म्हातारपण यांतील फरक पाहा. आमच्या विद्या विकास मंडळ, विद्यालय, अंधेरी शाळेतील शिक्षक वसंत विश्वनाथ साने सर वय वष्रे फक्त ब्याण्णव्व, आम्हा विद्यार्थ्यांना (आम्ही सगळे सत्तरी पार केलेले विद्यार्थी) संबोधित करताना म्हणाले, ‘‘म्हातारपण इतरांचा आधार शोधीत असते तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. म्हातारपण लपवावेसे वाटते तर ज्येष्ठत्व दाखवावेसे वाटते. म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असते तर ज्येष्ठत्व अनुभवसंपन्न, विनम्र व संयमी असते. विचारले तरच ज्येष्ठ व्यक्ती सल्ला देते, सुचविते. म्हातारपण जीवनाच्या संध्याछायेत मरणाची वाट पाहत  दिवस काढते तर ज्येष्ठत्व संध्याछायेत उष:कालाची वाट पाहत बालांच्या क्रीडा, तरुणांचे दीपवणारे कर्तृत्व कौतुकाने पाहत आनंदाने, समाधानाने जीवन जगते. म्हणूनच ज्येष्ठांनो, मानाने, आनंदाने, समाधानाने जगा. तुमचा अनुभव व ज्ञान सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबाला  आणि समाजाला द्या. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी कपाळावर (नापसंतीच्या आठय़ा) स्पीड ब्रेकर्स पडू देऊ नका. मितभाषी व्हा. जीवन आनंदी व सुंदर आहे. जगाबरोबर जगण्याचा प्रयत्न करीत राहा. आपली दु:खे उगाळीत बसू नका.’’ साने सरांचे हे विचार आणि या वयात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हा ‘विद्यार्थाना’ सतत प्रेरणादायी ठरला आहे. ज्येष्ठ नागरिकांनो पाहा, तुम्हालाही जमेल.

– प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

 

भावनिक गुंता कमी ठेवावा

१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेला आणि आरती कदम यांनी लिहिलेल्या ‘शेवटाची परिपक्व सुरुवात’ या लेखात वृद्धांची व्यथा योग्य रीतीने मांडली आहे. पिढीतले अंतर, मर्यादित कुटुंब, पैशाच्या मागे लागलेली आजची पिढी ही आणि अशी बरीच कारणे वृद्धांच्या समस्येची होऊन बसली आहेत. त्यामुळे आधीपासूनच स्वत:च्या व जोडीदाराच्या भविष्याची तरतूद करून ठेवावी. वेळेवर इच्छापत्र करून ठेवावे. मुख्य करून स्त्रियांनी मुलांच्या बाबतीत भावनिक गुंता कमी ठेवावा जेणेकरून त्याचा नंतर त्रास होणार नाही.  मुळात वृद्धत्व काही अचानक येत नाही त्यामुळे प्रत्येकाने पुढे कोणत्या कारणाने वितुष्ट किंवा नात्यात कटुता येऊ  शकते याचा सारासार विचार करावा. असे काही झाल्यास कायद्याची मदत किंवा मित्र परिवार नातेवाईक यांची मदत कशी घेता येईल हे पाहावे. सगळीच मुले काही वाईट नसतात पण काही ना काही कारणाने नात्यामध्ये दरी निर्माण होऊ  शकते. मला तर असे वाटते की, एकदा का मुलांच्या जबाबदारीतून मुक्त झालो की अलगदपणे आपणच अंग काढून घ्यावे. काहींची मुले परदेशी असतात, काहींची बाहेरगावी असतात, काहींना मुली असल्यामुळे त्या आपापल्या संसारात गर्क असतात. या अशा अनेक कारणांमुळे वृद्ध एकाकी होतात. हे होऊ  नये म्हणून नात्यातल्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी शक्य असल्यास एकत्र राहावे. म्हणजे बहीण, भावंडे, नणंद, जावा वगैरे. याचा फायदा असा की, एकमेकांचे स्वभाव, आर्थिक परिस्थिती याची माहिती असते. एकमेकांना आधार देत सर्व राहू शकतात. साधारण एकाच वयोगटातील असल्यामुळे विचारात फारशी मतभिन्नता नसते. एकत्र राहिल्यामुळे आर्थिक भारपण कमी होऊ  शकतो. शिवाय आपली मुलेपण काळजीमुक्त होऊ  शकतील. आता स्वयंपाक किंवा इतर कामासाठी मदतनीस सहज मिळू शकतात. मला वाटते हा पर्याय पण शेवटाची परिपक्व सुरुवात होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. शेवटी आपली अखेर सुसह्य़ कशी होईल याचा विचार आपणच करायला पाहिजे नाही का!

– क्षमा एरंडे, पुणे

 

मदतीसाठीचे संदेशपत्र

आरती कदम यांनी लिहिलेल्या ‘शेवटाची परिपक्व  सुरुवात’ हा ज्येष्ठांसाठीचा लेख परिपक्व तर आहेच पण तो सर्वार्थाने परिपूर्णही आहे. घरोघरी संग्रही ठेवावा असाच आहे. आपल्याला मदतीसाठी पाठवलेले ते एक संदेशपत्र आहे असे अनेक वाचकांना वाटेल. त्यातून तरुण आणि वृद्ध दोघेही सकारात्मक विचार करू शकले तर नक्कीच सामाजिक व कौटुंबिक प्रश्न सुटतील आणि पुढच्या पिढीलाही आदर्श कुटुंब घडवता येईल. लेखातील उदाहरणे तर बोलकी व वास्तववादी आहेच पण त्यातील सुरुवात व शेवटची भाषा अत्यंत हृदयस्पर्शी व परिपूर्णतेचा सर्वागाने विचार करून मनापासून लिहिली गेली आहेत. समाजाला वास्तवतेचे भान या लेखाने मिळेल यात शंका नाही. ‘हरवले ते गवसले’ असे ज्येष्ठांना वाटल्याशिवाय राहणार नाही. एका महत्त्वाच्या विषयाला अनुसरून त्या दिवसाचे महत्त्व सांगून लेखिकेने वाचकांना वेगळ्या माहितीचा दृष्टिकोन दिला.

– शामल वेचलेकर

 

तडजोड हवीच

‘शेवटाची परिपक्व सुरुवात’ हा लेख फार आवडला आणि सर्वार्थाने पटला. विषय निवडीबद्दल आणि सांगोपांग सुसूत्र विचार मांडणीसाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! माझं लग्न होऊन साडेचार र्वष झाली. ३ वर्षांच्या मुलासह मी व माझे पती सासू-सासऱ्यांपासून विभक्त झालो. विभक्त राहण्याचे कारण बऱ्याच वेळा हेच समजले जाते की, सुनेच्या बंडखोर वागणुकीमुळे सासू-सासऱ्यांनी मनावर दगड ठेवून मान्य केलेली सोय. परंतु आमच्या बाबतीत, आम्हा दोघांनाही कधीच विभक्त राहायचे नव्हते. प्रस्तुत लेखा प्रमाणे सासू-सासऱ्यांची घरावरही स्वामित्व भावना, तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे सतत खटके उडत राहिले आणि एके दिवशी याची परिणती म्हणून सासू-सासऱ्यांनीच आम्ही वेगळे व्हावे असे फर्मान काढले. आता मात्र त्यांना एकटेपणा जाणवतो.

सांगण्याचे तात्पर्य हे की, प्रत्येक वेळेस वृद्धांच्या एकटेपणाला त्यांची वेगळ्या पिढीतील मुलेच जबाबदार असतात असे नाही. त्यांनीच दिलेल्या शिकवणुकीतून, रुजवलेल्या संस्कारातून तयार झालेली पुढची पिढी त्यांच्या सोबत राहण्यास उत्सुक असू शकते. ज्याप्रमाणे कुठल्याही नात्यात तडजोड अनिवार्य असते, तीच तडजोड सासू-सासरे व मुलगा-सून यांच्यातही झाली तर निम्मे वृद्ध एकाकीपणामधून दूर राहून कुटुंबासमवेत वेळ घालवून शेवटाची परिपक्व सुरुवात करू शकतात.

माझ्यासारख्या  बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या नोकरी करतात आणि तरीही त्यांना एकत्र कुटुंबामध्ये सगळे जण हवे आहेत. पण जोपर्यंत सून म्हणजे घरकाम करणारी मशीन हे समीकरण बदलत नाही तोपर्यंत आमच्यासारख्या मुली काहीही करू शकत नाहीत.

– पीयूषा अ. 

 

 काळाने घेतलेला सूड

खरे तर मला हा लेख वाचून, मथळा काहीसा चुकीचा वाटतो. परिपक्व सुरुवात कुठे आहे? लेख एकूणच भारतीय समाजव्यवस्थेचा काळाने घेतलेला सूड स्पष्ट करतो. ‘आध्यात्मिक’ भारत देशात, एकीकडे लोक भगवतगीतेचा वारंवार उल्लेख करून ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।’ हे वचन सांगत असतात. पण त्याच वेळी आपणच जन्माला घातलेल्या अपत्यांमध्ये दुजाभाव करतात. मुलग्यांकडे गुंतवणूक म्हणून पाहतात आणि मुलीकडे बोजा म्हणून पाहतात. हा अनसíगकपणा इतके दिवस खपून गेला, पण आता वृद्धांकडे त्यांचे ‘कौतुकाचे’ मुलगे करत असलेले दुर्लक्ष पाहून हा उशिरा का होईना, काळाने उगवलेला सूड आहे हे स्पष्ट होते.

आम्ही तीन बहिणी आमच्या आई-बापांकडून कायमच ऐकत आलो आहोत, आम्हाला मुलीच झाल्या. आमच्या म्हातारपणी आमच्याकडे कोण पाहणार? आणि दुसरे आईचे आवडते वाक्य म्हणजे ‘मॅट्रिक झाल्यावर एकेकीची लग्न आटपून टाकली की आम्ही मोकळे झालो.’ आम्हा  मुलींना आमची आई आमचा करत असलेला दु:स्वास कळत असे. पण तो सहन करण्याशिवाय आमच्या हातात काहीही नव्हते. त्या काळात ज्या बायकांना मुलगे असत त्या आयुष्यात मोठा विजय संपादन केला आहे या तोऱ्यात असत.

आमचे जन्मदाते आमच्याबरोबर अन्यायाने वागले असूनही जेंव्हा माझ्या बहिणींच्या लग्नाचे वय झाले तेंव्हा त्या एक आत्मसन्मानाची बाब म्हणून येणाऱ्या स्थळांना स्पष्ट सांगत असे की, आम्ही नोकरी सोडणार नाही, आमच्या जन्मदात्यांच्या वृद्धपणी त्यांच्याकडे लक्ष देणार. अर्थातच त्या काळी मुलाकडचे लोक हे ऐकायच्या मन:स्थितीत नसायचे. परिणामत: आम्ही तिघीही अविवाहित राहिलो. पुढे आई-वडील वृद्धापकाळाने आजारी पडले आणि १९८४ ते १९९७ पर्यंत आम्ही त्यांची सेवा केली. तेव्हा आमची आíथक स्थिती नाजूक असल्याने नोकर ठेवणे परवडणारे नव्हते. पण इतके सगळे करूनही आई बोलायची की, मला मुलगा असता तर माझी सेवा सुनेने केली असती. थोडक्यात, अगदी मृत्यूनंतर स्मशानात पोहोचेपर्यंत आमच्या आई-बापांचे मुलगा नसण्याने काहीही अडले नाही. आम्ही तिघीही स्मशानापर्यंत त्यांच्याबरोबर होतो.

आपल्याकडे प्रत्येक बाबतीत, फायदा-तोटा पाहायची पद्धत आहे. विवाहासारख्या बाबतीतही आपण अर्थकारण आणतो. अर्थकारणाबरोबरच सुनेला (आणि बायकोला) चांगली गुलाम करण्याची तयारी करतो. मागच्या पिढीपर्यंत ते चालले. आता मुली हे सहन करत नाहीत. त्यांनी ते सहन करूही नये.

– स्मिता पटवर्धन, सांगली</strong>

 

समन्वयाचा अभाव

‘शेवटची परिपक्व सुरुवात’ हा ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शक असा माहितीपूर्ण लेख आवडला. ज्येष्ठ नागरिकांच्या आपल्या देशातील सद्य:स्थितीचे वास्तवाधारित आर्थिक, मानसिक, भावनिक व सामाजिक चित्रण प्रभावीपणे केले आहे. कुटुंबातील प्रत्येक जण बऱ्याचदा आपल्या जागेवर बरोबर असतो. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांच्या अनेक बाजू विचारात घेऊन समन्वयाच्या अभावामुळे कुटुंबातील सर्वच घटकांची घुसमटत होते याची मांडणी उदाहरणे घेऊन केली आहे. कायद्याने समस्या बऱ्याचदा गंभीर बनतात. दोन पिढय़ांमधील एकमेकांकडून अपेक्षांचा संघर्ष काळानुसार वाढत चालला आहे. त्यामुळे सात लाख खटले विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. आपले मानसिक, भावनिक प्रश्न न्यायालये सोडवणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी समन्वय साधणारे काही उपाय सुचविल्याने या समस्येची सोडवणूक जरी झाली नाही तरी तीव्रता कमी होऊ  शकेल असे वाटते.

– प्रा. विष्णू बोरकर, अहमदनगर</strong>