१४ जानेवारीच्या अंकात धनश्री लेले यांनी, कलेतले यश हे अनुकरणाने नव्हे तर कलावंताच्या कलेतल्या ‘स्व’त्वनेच टिकते, ‘स्व’त्व म्हणजे अहंकार नव्हे तर परिस्थिती, जडणघडण, अनुभव यातून घडलेले वेगळेपण असणारे व्यक्तित्व! स्वत:ला ओळखण्याची क्षमता, अस्तित्वाची जाणीव म्हणजे ‘स्व’त्व. कलेत किंवा जगण्यात ‘स्व’त्व विसर्जित करता येत नाही तर ते कलेत जागे ठेवावे लागते, हे सहजसुंदर विचार ‘स्व’त्व मधून मांडले आहेत. सुरेश देशपांडे यांनी ‘खुर्ची’ कथा अतिशय बारकाव्यानिशी रेखाटली आहे. ‘घड(व)लेले पदार्थ’ राजीव वैद्य यांनी ‘हाय काय आन नाय काय’ या लेखात मस्त खुसखुशीत शब्दात आपले पाककौशल्य सादर केले आहे तर ‘कार्यकर्त्यांच्या नजरेतून’ यात वसुधा सरदार यांनी ‘‘धा’ रुपयं गोळा करून बाया आता माडय़ा बांदनार’ ही पुरुषी मानसिकता व गरिबीचं दुखणं आपल्या अनुभवातून छान मांडले आहे.

मुलींकडून कुस्तीमध्ये ऑलिम्पिकची अपेक्षा करणाऱ्या पण त्यांना आखाडय़ात प्रवेश नाकारणाऱ्या महाराष्ट्रीयांची मानसिकता प्रसाद लाड यांनी ‘आखाडय़ातल्या मुली’ यात तर आनंदाच्या शोधासाठी नाना लटपटी खटपटी करणाऱ्यांच्या व मायावी, क्षणिक आणि परिस्थिती बदलूनही न बदलणाऱ्या शाश्वत आनंदाची व्याख्या ‘आनंदाचा शोध’मध्ये सुहास पेठे यांनी छान मांडली आहे. सर्वार्थाने जोडीदार- निमा पाटील व इतरही लेख वाचनीय, मननीय वाटले.

– मुरलीधर हरिश्चंद्र धंबा, डोंबिवली (प.)

समृद्ध पालकत्व

नव वर्षांगणिक ‘लोकसत्ता’च्या आम्हा वाचकांना नवीन सदरे वाचायला मिळतात. ७ जानेवारीच्या अंकात ‘पालकत्वाचं नवं क्षितिज’ या लेखामधून लेखिका संगीता बनगीनवार यांनी पालकत्वाचा प्रगल्भ आयाम उत्तमरीत्या समजावून सांगितला. निसर्गातील उदाहरणासह पालकत्वाची केलेली तुलना यातून अनुभवास मिळते. अशा वाचनातून पालकत्व अधिक समृद्ध होताना दिसते.

– शकील बागवान, अहमदनगर</strong>