अंजली श्रोत्रिय यांच्या ललित लेखनाने ‘जगू आनंदे’ अशीच किमया केली आहे. रोझोटो गावाच्या उदाहरणातून समूहजीवन पद्धतीमधील सुरक्षितता आरोग्याबरोबरच आनंद कसा निर्माण करते. याउलट मायस्पेस, प्रायव्हसीचा अतिहव्यास विनाशाकडे कसा घेऊन चालला आहे हे मनाला पटते. आपलं सगळं जगणं मनावर अवलंबून असतं हे पटवून देणारा बाऊबीचा आदर्श मनाला बंदिस्त करतो. कुलुपाची किल्ली  देऊन जातो. ‘शाळा सुटली पाटी फुटली’ या बालगीताच्या शब्दात दडलेले कितीतरी अव्यक्त अर्थ आनंदाचं सर्टिफिकेट बहाल करतात. आणि आनंद ० किमीवर आपण पोहोचतो. वर्ष आज संपतय, ही सदरंही संपतील. पण भूक अजून भागलेली नाही, त्यासाठी हा पत्रप्रपंच.

सुचित्रा साठे, ठाणे

 

सदरे संपण्याची चुटपूट

बघता बघता  २०१६ या वर्षांचा आजचा शेवटचा दिवस आलाही. या वर्षांच्या जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली मनोरंजक, ज्ञानवर्धक सदरे आता एक एक करून समाप्त होत आहेत. नव्या वर्षांत नवी सदरे सुरू होतीलच, पण त्या आधी चालू वर्षांतील सदरांबद्दल थोडेसे. तशी सर्वच सदरे वाचनीय आहेत. रती भोसेकर यांचे ‘शिकू आनंदे’, अंजली श्रोत्रिय यांचे ‘जगू आनंदे’, रेणू गावस्कर यांचे ‘आम्ही असू लाडके’ आणखीही बरीच सदरे. शिवाय ‘मनातले कागदावर’ हे वाचक-लेखकांचे सदरही तितकेच वाचनीय. उत्तरेकडची ‘अत्तराची कुपी’ तिचा दरवळणारा सुगंध मागे ठेवून जाणार याचीही चुटपूट वाचकांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे निलेश यांनी विषयाला अनुरूप अशी प्रत्येक लेखात काढलेली चित्रे. ही कुणाही वाचकाच्या कायम लक्षात राहतील.

सुधीर देवरुखकर

 

पुरुषांचे एकटेपण त्रासदायक

‘शिशिरातला वसंत’ मृणालिनी चितळे सदरातील ‘कांचनसंध्या’ हा १७ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला लेख आवडला. शास्त्रज्ञांनी कितीही शोध लावले तरी दोघांपैकी कोण अगोदर जाणार हे खरंच कुणीही सांगू शकत नाही. पण हे जितके स्त्रियांना कळते तितके पुरुषांना का कळत नाही. मुले जर मोठ्ठी होऊन लग्न झालेली असतील तर त्यावेळी त्या पुरुषांचे एकटेपण खूप त्रासदायक असते. त्यात ती व्यक्ती जर तरुणपणी स्वत:च्या अहंकारात वागत असेल तर एकटे राहिल्यावर त्यांची अवस्था ‘ ना घरका  ना घाट का’ अशी होते. स्त्रियांमध्ये सहन करण्याची ताकद खूप असते. तितकी काही पुरुषांमध्ये का नसते? पण या लेखातले बाबाजींसारखे सर्व पुरुष वागू लागले तर कुटुंबातील कितीतरी भांडणं, कलह कमी होतील. मात्र आज बाबाजींसारखे पुरुष आढळणं कठीण.

‘मनातलं कागदावर’ सदरातील भा. ल. महाबळ यांच्या ‘उतारा’ हा १७ डिसेंबरलाच प्रसिद्ध झालेला लेख खूप आवडला. ‘आई व बायकोच्या भांडणात न पडता सरळ मैदानच सोडायचं, घराबाहेर पडायचं हा उतारा मोकाशींना कळला’ हे वाक्य खूप आवडले. मित्र असावे तर असे! भांडण न लावता त्यावर काढलेला तोडगा उत्तम.

लेख वाचून मित्रांनी काढलेले अंदाज वाचून खूप हसू आले. मनाची मरगळ, थकवा नाहीसा झाला. ‘मन वढाय वढाय’ यातील ‘आयुष्यात सुई बनून राहा, कात्री बनून नको, कारण सुई जोडण्याचे काम करते आणि कात्री कापण्याचे’ हे वाक्य उद्बोधक वाटले.

भारती धुरी, मुंबई

 

नात्यातील दरी रुंदावतेय

१७ डिसेंबरच्या पुरवणीमधील ‘कायद्याचं सामाजिक भान’ हा जाई वैद्य यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला, ज्यामध्ये आजच्या समाजाचे व दोन पिढय़ांतील मानसिक जडणघडणीतील द्वंद्वाचे यथार्थ वर्णन केले आहे. आजच्या आपल्या दोन पिढय़ांची म्हणजे उतारवयाकडे झुकलेल्या आणि त्यांच्या लग्न झालेल्या मुलांची मानसिक अवस्था ना धड पूर्णपणे आधुनिक आणि ना पूर्णपणे जुन्या विचारसरणीला सोडून दिलेली अशी द्विधा झालेली आहे. आजच्या आपल्या समाजात एकत्र कुटुंबपद्धती जरी पूर्णपणे लोप पावलेली असली तरी, मागची पिढी त्याच कुटुंबपद्धतीत वाढलेली असल्यामुळे अजून त्यांच्यावर त्या पद्धतीचे संस्कार आहेत. त्यामुळे मुलांना आपली मालमत्ता समजून त्यांच्यावर आपलाच पहिला हक्क आहे आणि वडीलधारे म्हणून त्यांना मुलेबाळे झाली तरी त्यांनी आपल्या पंखाखाली राहावे, आपल्याला न विचारता कोणताही निर्णय घेऊ  नये अशी त्यांची सुप्त इच्छा असते. दुसरीकडे त्यांची मुले ज्यांच्यावर लहानपणापासून जास्तीत जास्त एखादे भावंड असल्यामुळे स्वतंत्र जीवनपद्धतीचे आणि बाहेरील मुक्त वातावरणाचे संस्कार झाल्यामुळे वडिलांचे जे काही आहे ते सर्व माझेच आहे अशी ठाम समजूत झालेली असते, जोडीला, पूर्वी एकत्र कुटुंबात फक्त सख्ख्याच नव्हे तर, चुलत भावंडांबरोबरही प्रत्येक गोष्ट वाटून घ्यायची जी सवय मुलांना लहानपणापासून लागायची तिचाही पूर्णपणे अभाव असल्यामुळे तसेच वडिलांबरोबर काका, आजोबा, यांचा प्रेमळ धाक असल्यामुळे मुले बेदरकार व मनाला वाटेल तशी वागत नसत. आपले आई-वडील, काका-काकी जसे आपल्या आई-वडिलांना म्हणजेच आपल्या आजी-आजोबांना सांभाळतात तसेच आपणही आपल्या आई-वडिलांना सांभाळले पाहिजे याचे संस्कार आपोआपच पूर्वीच्या काळी मुलांवर होत असत. या सर्व संस्कारांचा अभाव याचा परिपाक म्हणजे न्यायालयाला नुकताच द्यावा लागलेला ‘वडिलांच्या घरात त्यांच्या इच्छेविरुद्ध राहण्याचा मुलाला अधिकार नाही’ हा निकाल होय! खेदाची गोष्ट म्हणजे हे चित्र आता सार्वत्रिक होऊ  लागले आहे. आई-वडील आणि मुले या अगदी रक्ताच्या आणि अगदी घनिष्ठ समजल्या जाणाऱ्या नात्यातील दरी रुंदावत चालली आहे.

उज्ज्वला सूर्यवंशी, ठाणे 

 

..म्हणजे मराठी नाटय़सृष्टीचा इतिहास

जयंत सावरकरांची (१७ डिसेंबरच्या पुरवणीतील) प्रदीर्घ मुलाखत मनाला भावून गेली. त्यांचा नाटय़प्रवास खरोखरीच अचंबित करणारा आहे. जयंतराव आजही स्वत:ला नाटय़सृष्टीतला वारकरी समजतात, यातच त्यांचे मोठेपण दडले आहे. वारीच्या प्रवासात चालता चालता त्यांचे जीवन समृद्ध झाले. एकेकाळचा बॅकस्टेज कलाकार नंतर आयत्या वेळचा कलाकार आता ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार कधी झाले हे आम्हा नाटय़ रसिकांनादेखील कळले नाही. त्यांची ‘एकच प्याला’मधला तळीराम आमची पिढी कधीच विसरू शकणार नाही. विष्णुदास भावे पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार आणि आता मानाचे ९७ व्या संमेलनाचे अध्यक्षपद ही चढती भाजणी म्हणजे त्यांच्या कलागुणांचा सन्मानच होय. त्यांचे ‘मी एक छोटा माणूस’ म्हणजे मराठी नाटय़सृष्टीचा इतिहास म्हणावा लागेल.

प्रफुल्लचंद्र पुरंदरे, मुंबई

 

वास्तवदर्शी व्यक्तिचित्रण

१० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेले ‘एकला चलो रे’ या सदरात वासंती वर्तक यांनी लिहिलेले ‘मानिनी आजाबाय’ हे वास्तविक रेखाचित्र वाचले. वाचल्यावर त्यांचं चित्रण डोळ्यांसमोर तसंच उभं राहातं. वस्तुस्थिती अगदी जवळची वाटते. मन संवेदनशील होतं आणि नकळत अश्रूही येतात. ग्रामीण कुटुंबाचं वास्तवही कळतं.

गणेश तारळेकर, कोल्हापूर

 

ज्ञानाच्या सहनिर्मितीची दुसरी बाजू

वसुधा कामत यांचा ‘ज्ञानाची सहनिर्मिती’ हा ‘न- व्याख्यान’ – कृतीयुक्त ज्ञानावर आधारित लेख वाचला. यामध्ये विद्यार्थ्यांचा ‘ज्ञान’ या प्रक्रियेत कृतिशील सहभाग कसा असावा व विद्यार्थ्यांची पारंपरिक शिक्षण प्रक्रियेतून कशी मुक्तता करणे आवश्यक आहे याबद्दल त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.

आपल्या येथे गुणवत्ता किंवा कर्तृत्वापेक्षा श्रेणीपद्धतीला अधिक महत्त्व दिले जाते. मग ते क्षेत्र कोणतेही असो. अशा कार्यपद्धतीमुळे ज्या व्यक्ती गुणवत्ताधारक आहेत, पण श्रेणीपद्धतीत त्या मागे आहेत त्यांना एक तर त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे संधी मिळत नाही किंवा मिळाली तर त्यांचे पाय ओढण्यातच आनंद किंवा आपले कर्तृत्व मानले जाते. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही. ज्ञानाच्या सहनिर्मितीत पालक, विद्यार्थी, व्यवस्थापन या तिन्हींचा कृतिशील सहभाग असणे अपेक्षित असावे.

ईशा वेलदे, डोंबिवली

 

रुखरुख वाटत राहील

राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या ३ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेला ‘..आणि कादंबरी डेक्कन क्वीनमधेच राहिली’ या लेखातून एका वेगळ्याच अनुभूतीचे दर्शन झाले. माजगावकरांचा लेख मनाला भावला. पंडित जीतेंद्र अभिषेकी हे गोव्याच्या भूमीने रसिकांना दिलेली देणगी. शास्त्रीय संगीतातील दिग्गज ही उपाधी सार्थ करीत असतानाच त्यांच्यात लपलेल्या कथाकाराचे आणि कादंबरीकाराचे दर्शन माजगावकरांच्या लेखातून झाले. पंडितजींचा रियाझ, गाण्याच्या मैफिली, शिकवण्या यांतून तानसेनसारख्या थोर गायकाच्या जीवनावरील कादंबरी लिहून होऊ शकली नाही आणि वाचक एका चांगल्या विषयावरील अनुभवाला मुकले याची रुखरुख निश्चितपणे वाटत राहील.

सुरेश पटवर्धन, कल्याण

 

समृद्ध प्रवास-प्रेरणादायी

रती भोसेकर या नेहमीच खूप छान व प्रवाही लिहितात. त्यांच्या शैक्षणिक लिखाणात त्यांचा अनुभव असतो, हे विशेष! त्यांनी विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता शाळेत जे जे प्रयोग केले, कष्ट घेतले त्याची माहिती त्या एवढय़ा क्रमबद्धपणे लिहितात की ते वाचत असताना आपण ते प्रत्यक्ष अनुभवत आहोत, असे वाचकांना वाटायला लागते.

डॉ. कांतीलाल संचेती यांचेवरील ‘दिशा देणारे टर्निग पॉइंट’ हा सायली परांजपे यांनी शब्दांकित केलेला लेख उत्तम! अपार कष्ट आणि जोखीम पत्करण्याची तयारी असली की माणसं कुठल्या कुठे जातात हे डॉ. संचेती यांच्या कार्यातून  बघायला मिळते. एवढी प्रचंड मेहनत आणि हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्द आणि जोखीम पत्करण्याची तयारी! वाचताना बापरे म्हणण्याची वेळ आली.

वसंत खडेकर, बल्लारपूर (जि. चंद्रपूर)

 

अंतर्मनापासूनही दूर चाललोय

अंजली श्रोत्रिय यांचा ‘जगण्याला पॉज’ १७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचनात आला. लेखिकेने अतिशय समर्पकपणे ध्यानात आणून दिलेय की, या आजच्या सो कॉल्ड बिझी शेडय़ुल्डच्या जीवनात आपण धुंद होऊन न जाता, थोडे थांबून स्वत:ला निसर्गाच्या म्हणजे आपल्या प्रकृतीकडे बघू शकतो. खरंच केवढा विरोधाभास आहे, की आपणच आपले स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व विसरत चाललो आहोत. भौतिक वस्तूंच्या मायावी दुनियेत अडकून आपण आपल्या आंतरिक स्वत्त्वाच्या पार दूर चाललोय. आपण मानवाच्या दैनंदिन दिनचर्येच्या खूप दूर चाललो आहोतच पण सोबत आपल्या अंतर्मनापासून देखील! लेखिकेने सदर लेखाद्वारे जगण्याला पॉज द्यायचे सुचवले आहे, त्याबद्दल  त्यांचे मनापासून धन्यवाद.

अदिती पाटील, जळगाव

 

संचेती यांचे कार्य प्रेरणादायी

१० डिसेंबरच्या पुरवणीतील ‘दृष्टी आड सृष्टी’ या सदरातील डॉ. कांतिलाल संचेती यांचे ‘सृष्टीज्ञान’ वाचून थक्क झालो.

डॉ. संचेती यांचे जीवनकार्य सर्वाना प्रेरणा व स्फूर्ती देणारे आहे. त्यांच्या जीवनातील आयुष्याला दिशा देणारे सर्व टर्निग पॉइंटस तरुण पिढीला दीपस्तंभासारखे आहेत. मध्यमवर्गातील पुण्याच्या या तरुणाने किमान शैक्षणिक पात्रता असतानाही जे गुण आपल्यात आहेत त्यांचा अवलंब करून व मार्गदर्शकाच्या प्रतिकूल शेऱ्याची भीती न बाळगता व त्यांना दिलेल्या वचनाची आयुष्यभर केलेली पूर्ती अचंबित आहे. स्वत: अद्ययावत व आशिया खंडातील तिसऱ्या नंबरचे हॉस्पिटल उभे करणे ही खरोखर नवलाई आहे. त्यांचे ‘टर्निग पॉइंटस’ समाजाला अत्यावश्यक व गरजेचे आहेत व ते अनुकरणीय आहेत.

नारायण खरे, पुणे