युवराज पाटील यांचा २९ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला ‘लग्नमंडपातून.. गेटकेनकडे..’ हा लेख वाचून डोळे उघडले. मी जगत असलेले मध्यमवर्गीय शहरी जीवन व तुम्ही वर्णन केलेले वास्तव वाचून माझ्या जगण्याची लाज वाटली. इतकी पाण्याची हाकाटी, अनिष्ट प्रथा, जगण्याची धडपड एकीकडे, तर दुसरीकडे नाना पाटील, तुकडोजी महाराज वा शरद जोशी यांचे प्रबोधन दुर्लक्षिलेला समाज. खंत वाटते.. अशा वेळी मूक मोर्चे काढून भलतेच प्रश्न पुढे आणणाऱ्या तथाकथित नेत्यांची. स्वप्रबोधन करायला भाग पाडणारे शीतलचे आत्मार्पण त्यांना सुबुद्धी देवो. जाणते राजे व त्यांचे हुजरे काय करत आहेत? एक मात्र नक्की हा लेख वाचून हेलावून गेलो.

श्रीरंग गोखले

तरुणांनी नियम पाळले पाहिजेत

२० मे रोजी प्रसिद्ध झालेला मुक्ता गुंडी आणि सागर अत्रे यांनी ‘आरोग्यम जनसंपदा’ या सदरातील ‘शून्य अपघातांचे ध्येय’ हा लेख खूपच छान. सामाजिक आरोग्याशी हा प्रश्न निगडित केलात, हे अभिनंदनीय. तरुणांना विशेष करून लेनचे नियम, सिग्नल पाळणे.. अर्थात अनेक गोष्टी आहेत, हे जेव्हा गळी उतरेल तो सुदिन.

डॉ. शशांक कुलकर्णी, नाशिक