नीलिमा किराणे यांनी घटस्फोटाच्या उंबरठय़ावर असणाऱ्या जोडप्यांपेक्षाही प्रेयसीची मन:स्थिती सांगणारा लेख लिहिलेला आहे. (१२ नोव्हेंबर) लेख वाचताना लेखिका केवळ एकच बाजू मांडत असल्याचे जाणवते. त्यामुळे तो लेख स्त्रीप्रधान झाल्याचे जाणवते. या कथेत प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यात विभक्तपणाची भिंत उभी राहण्याची कारणे बरीच दिसतात. पहिले कारण म्हणजे लग्नाआधीचे दिवस हे कोणत्याही जबाबदारीची जाणीव करून घेण्याचे भान न राखण्याचे आहेत. मुलाने एकतर्फी प्रेम व्यक्त केल्याचे जाणवते. केवळ नवऱ्याच्या प्रेयसीची प्रत्येक बाब फुलासारखे झेलण्याचा प्रयत्न दिसतो. तिने आपले प्रेम कसे व्यक्त केले याचा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे स्वत:चे केवळ लाड करून घेणे इतपतच मुलीची संसाराबाबतची समजूत झालेली दिसते. त्यामुळे ज्या घरी जायचे त्या घराची राहणी कशी आहे ती आपल्याला जमवून घेता येईल काय या वास्तवाचा विचार केलेला दिसत नाही.

प्रत्येक घरची, कामाची, राहणीची स्वयंपाकाच्या चवीत नेहमीच फरक असतो. जर मुलीने स्वत:ला बदलण्यापेक्षा घरातील सर्वाना बदलायचा हट्ट धरला तर ती गोष्ट अशक्य आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या नवीन मुलीला नवीन कुटुंबात मिसळून जायचे तर आपल्या माहेरचे रंग दाखवण्यापेक्षा सासरच्या रंगात मिसळून जाण्याचा प्रयत्न करणे हेच मुलीच्या सुखी संसाराचे गमक असू शकते. पण स्वत:च्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे भूत जर डोक्यात असेल तर अशा मुलींनी एकत्र कुटुंबात जाण्याचा प्रयोग करणे सर्वथा व्यर्थ आहे. त्यामुळे इतकं प्रेम करणारा व तिला फुलासारखं जपणारा प्रियकर, लग्नानंतर जमवता येणे अवघड आहे हे स्पष्ट सांगण्याचे धाडस करतो व बायको शिवाय तीन वर्षे आई-वडिलांकडेच राहणे पसंत करतो. यात त्याची काही अगतिकता असेल ही गोष्ट मुलीने समजून घेणे गरजेचे आहे.

लग्नानंतरची बदलणारी परिस्थिती जर तिला पचवणे शक्य नसेल तर तिने तीन वर्षे प्रेम करत असताना निरीक्षण करणे आवश्यक होते. शिवाय सासर-माहेरच्या मंडळींनी लग्नास मनापासून परवानगी दिली नसेल तर दोघांचीही जबाबदारी दोनही कुटुंबांप्रति अधिकच वाढते. आपण पाहुणे म्हणून गेलो तरी तिथेसुद्धा आपण त्यांचे नियम पाळण्याचे सौजन्य दाखवले तर आपण तिथले आवडते पाहुणे होतो. एका घरातून दुसऱ्या घरात जायचे तर तेथील सर्वाची मने जिंकून त्या कुटुंबात मुलगी आपले स्थान निर्माण करू शकते. हे शहाण्या मुलीच्या सुखी संसाराचे रहस्य प्रत्येक सासुरवाशिणीने जाणणे गरजेचे आहे.

सासरी घडणाऱ्या गोष्टींच्या प्रत्येक तक्रारी माहेरी सांगायच्या नसतात हे पथ्यही इथे पाळले गेलेले दिसत नाही. साहजिकच अनेक वेळा समेटाचा प्रयत्न होऊनही मुलगी सासरी जाऊ शकली नाही व नवऱ्यालाही परिस्थितीला शरण जाण्यास प्रत्यवाय नसेल तर आलेल्या भोगाला सादर आसणे हेच उचित आहे.

– प्रसाद भावे, सातारा

 

दोलायमान झाले

‘संवादाने रचला पाया’ नीलिमा किराणे यांच्या सदरातील ‘वेगळं (खरंच) व्हायचंय मला?’ हा १२ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला लेख महत्त्वाचा वाटला. दोन्ही बाजू कधी पटतात तर कधी नाही. दोलायमान व्हायला होतं. लग्नाअगोदर काही नवरे मुलगे घरातील काही गोष्टी लपवून ठेवतात. या लेखातील मुलाने आधीच सांगायला हवे की, मी वडिलांना व मोठय़ा भावाला खूप घाबरतो. काही जण मुलगी घरी पहिल्यांदा येणार म्हटल्यावर घर काय आवरून ठेवतात. किचन टापटिप, सर्व कपडे टापटिप, घरात कुठेही धूळ नाही. मी म्हणते, प्रेमविवाहामध्ये कुठल्याही गोष्टी लपविण्याची गरजच काय? लग्न करायचं ठरवलं तर आहे तसं स्वीकारावं, असे दोघांनी ठरवायला हवं. मुलगी सर्व सोडून सासरी येते त्या वेळी तिलाही समजून घ्यायला हवं. या लेखातलं हे वाक्य मात्र पटतं की, ‘एकमेकांशिवाय जगणं अशक्य वाटत

असेल तर अहंकार बाजूला ठेवता येतो. नाही तर जाणारा प्रत्येक दिवस दोघांचीही उमेद खच्ची करतो. वेगळं होण्याच्या दु:खापेक्षाही ते भयंकर असतं.’

– भारती धुरी

 

समतोल महत्त्वाचा

१९ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला मृणालिनी चितळे यांनी लिहिलेला ‘नवऱ्याचे सासू-सासरे’ या लेखात एका चांगल्या विषयाचे सुतोवाच केले आहे. आपण उभ्या केलेल्या जगात आपल्या सत्तास्थानाला धक्का लागला तर माणूस अस्वस्थ होतोच. मग ती अस्वस्थता कोणत्याही दोन माणसांत, कोणत्याही नात्यात असो. आपण मात्र वृद्धांना वृद्धाश्रमाचे पर्याय सुचवायला कायम तयार असतो. या नात्यांमध्येही समतोल साधण्याचा चितळे यांनी दिलेला सल्ला नक्कीच कौतुकास्पद.

– राधा मराठे

 

संवाद साधणारी कॅरिकेचर्स

मी ‘लोकसत्ता’ची नियमित वाचक आहे. ‘चतुरंग’ पुरवणीतील सर्वच लेखकांचे लेख अतिशय उत्कृष्ट व वाचनीय असतात. विशेषत: लेखिका रती भोसेकर यांचे लेख अतिशय छान असतात. १२ नोव्हेंबरच्या ‘स्वयंपाकाचे धडे क्लासेसमध्ये’ हा डॉ. प्रिया आमोद यांचा लेख विशेष आवडला. विशेष कौतुक करावी वाटणारी बाब म्हणजे ‘नीलेश’ यांची कॅरिकेचर्स. ती अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी असतात आणि डोळ्यांबरोबर मनाशीसुद्धा संवाद साधणारी असतात. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक.

– श्रीशा जगताप, कोल्हापूर 

 

नकारात्मक भावना दूर झाल्या

१९ नोव्हेंबर रोजी ‘दृष्टीआडची सृष्टी’ या सदरात प्रसिद्ध झालेला स्वाती साठे यांचा ‘कैद्यातला ‘माणूस’ जगवताना..’ हा लेख वाचून समाजात कैद्यांविषयी असणाऱ्या नकारात्मक भावना दूर होतात. विशेष म्हणजे स्वाती साठे यांचे खूप कष्ट आणि कैद्याकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टी यामुळेच हे शक्य झाले आहे. ‘लोकसत्ता’चे आणि स्वाती साठे यांचे खूप खूप अभिनंदन.

– स्वप्निल पिंगलवाड,  गणेश (अण्णा) मधुकर मुळे पाटील (भांडुप)