२३ सप्टेंबरच्या वर्धापन दिनाच्या पुरवणीतील नीरजा यांचा कुसुमाग्रजांचा स्त्रियांवरील कवितांवरील लेख ‘चिराच होईन इथे चिऱ्यातील’ वाचला. ‘आम्ही सारे’ ही कविता छानच आहे आणि तरीही कुसुमाग्रजांच्या ‘या रस्त्याला’ आणि ‘फक्त वगैरे’ या कवितांच्या उल्लेखावाचून हा लेख अगदीच अपूर्ण वाटला. कुसुमाग्रजांच्या संपूर्ण काव्याचा धांडोळा एका लेखात घेणे केवळ अशक्य आहे आणि तरीही या दोन कवितांमधून त्यांनी मांडलेले स्त्रियांबद्दलचे विचार हे त्यांच्या स्त्रीविषयक भाष्याचे अटळ हुंकार आहेत. म्हणूनच या कवितांचा उल्लेख अपरिहार्य!

कोणतेही नाव असो, कोणतेही गाव असो, कोणत्याही गुणावगुणांचे कोंदण असो नसो हे सारे काही पुसले जाणे हीच स्त्रीत्वाची नियती आहे आणि स्त्रीत्व या सर्वापलीकडे दशांगुळे उरणारे आहे हे अतिशय दाहक शब्दांत त्यांनी ‘या रस्त्याला’ या कवितेत म्हटले आहे ते असे,

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

या रस्त्याला फांदीवरती

लागुनिया धस चिरून पडले

नाव तुझे

या वाटेवर कुण्या नदीने

नेले वस्त्रापरी ओढुनि

गाव तुझे

या मुलुखातिल पंचभुतांनी

ओरबडोनी सर्व तोडले

मखर तुझे

म्हणून येथिल जगात स्त्रीपण

अंबरगत ज्वालेपरि उरले

प्रखर तुझे

अंबरगत ज्वालेपरि उरणारे प्रखर स्त्रीपण ही खास कुसुमाग्रजांची शब्दकळा. कविराजांचा मिडास टच!

‘फक्त वगैरे’ ही कविता तर भलतीच पारदर्शक आहे. माता, पत्नी, प्रेयसी अशा विविध रूपांतून सामोरी येणारी स्त्री ही आकळायला केवळ अवघडच नाही तर तिची ही वेगवेगळी रूपे वेळोवेळी भुलवतात, ओढून घेतात आणि तरीही त्यापलीकडे उरलेल्या स्त्रीची जाणीव होते तेव्हा साऱ्याच शब्दांचे अर्थ धूसर होऊ  लागतात. तिच्यासाठी योजलेल्या विशेषणांची निर्थकताच फक्त जाणवत राहते. (आणि एका फुटकळ कोटीपलीकडे आपली झेप जात नाही.) कुसुमाग्रजांनी फार सुरेख शब्दांत शब्दांच्या या निरुपयोगी धुक्याचे वर्णन ‘फक्त वगैरे’ या कवितेत केले आहे..

कधी तुझ्यास्तव मनात भरते

मेघ पिणारे चांदल नाते

दवात जे घर बांधुन राही

पण ते नाही-प्रेम वगैरे

तव शरीरातुन कधी पेटती

लाल किरमिजी हजार ज्योती

त्यात मिळाया पतंग होतो

परी नसे तो – काम वगैरे

कधी शिवालय पांघरुनि तू

समोर येता विरती हेतु

मनात उरते मात्र समर्पण

मी नसतो पण -भक्त वगैरे

रंगित असले धुके धराया

सार्थ शब्द हे अपरे वाया

त्यापलिकडचा एक जरासा

दिसे बरासा – फक्त वगैरे

कुसुमाग्रजांचे स्त्रीभाष्य कळायला या दोन कवितांचे उल्लेख नक्कीच अपरिहार्य वाटतात. म्हणून हा पत्रप्रपंच.

-मनीषा जोशी, कल्याण</strong>

 

स्त्रीरूपाची ही काव्यसृष्टी

प्रसिद्ध कवींच्या स्त्रीरूपी काव्य प्रतिभेवरची भेट खूप आवडली. सर्व लेखकांचे आभार. कविवर्य विंदा करंदीकरांच्या मनातली स्त्रीविषयक आत्मीयता, कुसुमाग्रजांच्या मनातली साधी स्त्री किंवा कवी मंगेश पाडगावकरांची अंतर्मुख करणारी स्त्री प्रतिमा असो, सर्व लेखकांनी ती अतिशय सोप्या शब्दात व्यक्त केली आहे. कवी ग्रेस यांच्या कविता काहीशा समजण्यास अवघड, पण त्या येथे सोप्या करून सांगितल्या आहेत. कवी सुरेश भटांची भिन्न भिन्न स्वरूपातल्या स्त्रीची अनेक रूपे आपण त्यांच्या कविता, गझलांतून पाहिली आहेत. कवी बा. भ. बोरकरांच्या प्रतिभेनं घडविलेल्या मुशीतून बाहेर पडलेली स्त्री एकदम वास्तववादी. कवी नारायण सुर्वे यांची सांसारिक स्त्री, कवी पु. शि. रेग्यांची स्त्रीभोवती रुंजी घालणारी कविता, कवी अरुण कोलटकरांची एकाकी पण सोशीक स्त्री व कवी नामदेव ढसाळांच्या कवितेतील समस्त बाई जातीची व्यथा कवितेतून व्यक्त केली गेली आहे. सर्व कवींच्या कवितेतल्या स्त्रीरूपाची ही काव्यसृष्टी वाचकांपर्यंत पोहोचविल्याबद्दल धन्यवाद.

– क्षमा एरंडे, पुणे</strong>

 

संग्रा अन् वाचनीय

‘साहित्याचं देणं’ ही मराठी कवितांमधल्या स्त्री रूपांचं वैविध्यपूर्ण दर्शन घडविणारी कवितांवरची चतुरंग पुरवणी केवळ अप्रतिम. कायम संग्रही ठेवण्याइतकी सुंदर.

कुसुमाग्रजांपासून ते नामदेव ढसाळांपर्यंत स्त्रियांच्या सुखाच्या, दु:खाच्या, भोगाच्या, त्यागाच्या, सहनशीलतेच्या ‘कथा’च सगळ्या कविवर्यानी आपापल्या कवितेतून ज्या ताकदीने मांडल्या आहेत त्या कधी कल्पनारम्यतेच्या अवगुंठनांत लपलेल्या तर कधी उघडय़ावाघडय़ा कठोर वास्तवतेच्या रूपांत समोर येतात आणि ज्या तऱ्हेने त्या आपल्या समोर येतात ते आपल्या मराठी कवींच्या काव्य प्रतिभांचं निव्वळ शब्दवैभव न राहाता विशेषत: पुरुष वाचकांना अंतर्मुख करायला लावणारं चिंतन आहे असं वाटतं. कारण काव्यांतून व्यक्त झालेली ‘स्त्री’ ची कथा पुरुषांच्या अदृश्य कोषांत लपेटली गेलेली आहे तिच्या मनोव्यापारांचे, भावभावनांचे आणि शरीरभोगाचे सर्व धागे शेवटी पुरुषी समाजव्यवस्थेशी गुंतलेले दिसतात; किंबहुना काव्यातून व्यक्त झालेली तिची विविध रूपं, व्यथा, भोग ही पुरुषांमुळेच तिला प्राप्त झाली आहेत हे वास्तव नजरेआड करता येत नाही. या साऱ्या कविता कमीतकमी २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. तरीही स्त्रियांच्या सुखदु:खाच्या स्वरूपांत आजही त्यांत फारसा फरक पडलेला नाही.

 -प्रदीप अधिकारी, मुंबई</strong>

 

तरुणांनीही वाचायला हवेत

२३ सप्टेंबरची चतुरंग म्हणजे साहित्यिक मेजवानीच आहे. कवींबद्दल लिहिलेले सर्वच लेख अप्रतिम आहेत. सेवानिवृत्तीनंतर फारसे कोठे येणे जाणे घडत नसलेल्या वयात असे काही वाचायला मिळणे परम आनंदाचे आहे. त्या निमित्ताने पूर्वी वाचलेले ते कवितासंग्रह त्यावर मैत्रिणींबरोबर केलेल्या चर्चा ‘वाङ्मय’ मंडळे हे सगळे आठवले. नव्या पिढीतील तरुणांनी हे लेख वाचायला हवेत. जुन्या जमान्यात फेरफटका घडवून आणल्याबद्दल धन्यवाद!

-शर्मिला पिटकर, कांदिवली 

 

स्तुत्य अन् संस्मरणीय उपक्रम

‘साहित्याचं देणं’ हा दहा विशेष लेखांचा समुच्चय अथ-इति संग्रा अन् वाचनीय झाला आहे. विंदा करंदीकरांच्या जन्मशताब्दीचं औचित्य म्हणून त्यांच्या समकालीन कवींचा अभ्यासपूर्ण परामर्श घेणारे लेख एकत्रित करून प्रकाशित करणं हा आपला उपक्रम खरोखरच स्तुत्य अन् संस्मरणीय आहे. सगळ्या समीक्षकांनी आपापल्या परीनं संबंधित कवींच्या ‘प्रतिभेच्या पाताळघरा’चा अगदी नेमकेपणानं ठाव घेतलाय. सगळेच लेख सारख्या तोलामोलाचे झाले आहेत. मधुवंती सप्रे यांनी विंदांच्या स्त्री परकायाप्रवेशाचं मर्म उलगडलं. कुसुमाग्रजांची ‘आम्ही सारे’ ही कविता निवडून नीरजांनी केलेलं स्त्रीच्या असहायपणावरचं भाष्य प्रत्ययकारी वाटलं. संगीता जोशींनी सुरेश भटांच्या कविता, गझला अन् भावगीतांमधून स्त्री प्रतिमांचा घेतलेला शोध लक्षणीय आहे. वास्तववादी नेपथ्यातली जीवनसन्मुख स्त्री मंगेश पाडगावकरांनी कशी रेखाटली हे नीलिमा गुंडी यथार्थपणे दाखवतात तर बा.भ.बोरकर वास्तवात न आढळणारी मयसभेतली स्त्री कशी साकारतात, हे अरुणा ढेरे यांनी

विशद केलं आहे. नारायण कुलकर्णी-कवठेकरांनी ग्रेसच्या कवितेतल्या आयाबायांच्या विश्वाकडे लक्ष वेधलं आहे. कामगार जगतातल्या आयाबाया नारायण सुर्वे यांचा आस्थाविषय कसा होता हे प्रज्ञा पवार उलगडतात. वसंत आबाजी डहाके यांनी अरुण कोलटकरांच्या कवितांच्या निमित्तानं जागतिक लोककथा अन् पुराणकथांचा घेतलेला वेध थक्क करणारा आहे. रूढी, समाजसंकेतांची पुटं न चढलेल्या पु.शि. रेगे यांच्या नायिकांचं दर्शन वंदना बोकील- कुलकर्णीनी घडवलं आहे. प्रभा गणोरकरांनी नामदेव ढसाळांच्या कवितेतल्या समस्त बाई जातीच्या दुखण्याचं विदारक चित्रण केलं. (दहाही लेखांमधल्या अंत:सूत्रांचं विवेचन हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) असो, चतुरंगला साजेशी संग्रा, दर्जेदार पुरवणी सादर केल्याबद्दल धन्यवाद अन् अभिनंदन.

– विजय काचरे, पुणे