अनुराधा प्रभुदेसाई यांचा १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला ‘स्वातंत्र्याची किंमत’ हा सैनिकांवरील लेख मन हेलावून गेला. खरंच आपण भारतीय नागरिक किती बेमुर्वत आहोत. आपण ऐशआरामात, बिनधास्त, बेफिकीरपणे ज्यांच्या जिवावर वावरत आहोत त्या सैनिकांना जात, धर्म, राजकारण, छोटय़ा छोटय़ा गोष्टींत आपण एकमेकांच्या उरावर बसत आहोत, हे पाहून किती उद्विग्नता येत असेल. सीमेवर खडतर वातावरणात सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून आपले कर्तव्य बजावतात आणि आम्ही सणांचे ‘खेळ’ करीत वेगवेगळ्या कारणांसाठी भांडत आहोत. आपण आपल्याच धुंदीत जगत आहोत. लेख वाचून खरच लाजेने मान खाली गेली, मला माझीच शरम वाटू लागली आहे.

यावरून एक सुचवावेसे वाटते, प्रत्येक घरातील युवक सैन्यात थोडा काळ तरी सक्तीने भरती होणे आवश्यक आहे. कमीत कमी ज्या चुका आमच्या पिढीने सैन्याबाबत केल्या, त्या येणारी पिढी तरी करणार नाही. अनुराधाताईंना शतश: धन्यवाद! प्रत्येक भारतीयाचा आपल्या सैनिकांकडे आणि भारतदेशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या लेखामुळे नक्कीच बदलेल.

प्रफुल्लचंद्र पुरंदरे

 

संवेदनशील कधी होणार?

अनुराधा प्रभुदेसाई यांचा ‘स्वातंत्र्याची किंमत’ हा लेख वाचला. मी, माझं, माझं स्वातंत्र्य, माझे हक्क यासाठीच भांडणारे आम्ही अन् सैनिक मरण्यासाठीच असतात, असं म्हणणारे निर्लज्ज पुढारी, आम्ही कधी संवेदनशील होणार देव जाणे. आपल्या लेखातले वीरमातेचे पत्र वाचताना अंगावर काटा आला. सलाम त्या वीरमातांना. मला शक्य असेल तिथे तिथे मी सैनिकांना जरूर मदत करीन.

संदीप कोकाटे

 

 डोळ्यात अंजन घालणारा लेख

अनुराधा प्रभुदेसाई यांचा १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला ‘स्वातंत्र्याची किंमत’ हा लेख वाचला. स्वातंत्र्याची किंमत न मोजता ‘स्वातंत्र्य’ यथेच्छपणे उपभोगणाऱ्या पिढीच्या डोळ्यांत अंजन घालणारा लेख आहे. तुमच्या अनुभवाचं गाठोडं आमच्यासाठी अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडणारं आहे. आयुष्यात स्वप्न, करियर यांच्या मागे धावताना जबाबदारी विसरलेली आमची पिढी न जाणो काय भवितव्य घडवेल. लेख मनापासून आवडला इतकंच.

अजिंक्य गोडगे, परांडा, उस्मानाबाद

 

..म्हणून आपल्याला स्वातंत्र्य

‘स्वातंत्र्याची किंमत’ लेख वाचून खरंच डोळ्यात पाणी आले. माझा एक मित्र पुरी सेक्टरमध्ये पोस्टिंगला आहे. दोन महिन्यांपूर्वी तो गावी सुट्टीला आला होता तेव्हा त्याने त्यांना कोणत्या परिस्थितीत काम करावे लागते हे जेव्हा सांगितले तेव्हा खरंच सैनिकांचे जीवन किती खडतर असते याची जाणीव झाली आणि खरंच तुम्ही म्हणताय तसे आपले जवान सीमेवर आहेत म्हणूनच आज आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू शकतोय. जेव्हा जेव्हा सीमेवर जवान शहीद झाल्याची

बातमी येते तेव्हा क्षणभर मन सुन्न होऊन जाते आणि पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागतो, पण तुम्ही जे काम करताय ते खरंच माझ्यासारख्या असंख्य तरुणांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे मला वाटते, जेणेकरून देशातील या खऱ्या ‘हिरों’चे कार्य, कष्ट, देशभक्ती, त्यागाची माहिती प्रत्येकाला होईल. आपल्या या महान कार्यात माझ्यासारख्या तरुणांना कशा प्रकारे सहभागी होता येईल यासंदर्भातही मार्गदर्शन करावे.

महेंद्र एरंडे

 

नवरोजींनी साथीदाराच्याच भूमिकेत असावे

१९ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध झालेले डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘नवरा : स्वामी की साथीदार?’आणि डॉ. सविता पानट यांचा ‘नात्यातलं सामंजस्य’ हे दोन्ही लेख वाचनीय आहेत. पूर्वी स्त्रिया चूल व मूल एवढेच सांभाळायच्या त्यावेळी नवरा हा स्वामींच्या भूमिकेत होता, पण आता स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अप्रतिम यश मिळावीत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, तेव्हा आता नवरोजींनी साथीदाराच्याच भूमिकेत राहिले पाहिजे. संसाररथ यशस्वीपणे चालवायचा तर महिला व पुरुष ही एकाच रथाची दोन चाके असून ती एकमेकांच्या शंभर टक्के सहकार्यानेच चालली पाहिजेत तरच संसाररथ आनंदाचे पैलतीरी पोहोचणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. ‘लोकसत्ता’ने स्त्री आणि पुरुष यांच्या वैवाहिक संबंधासाठीही मनोविकारतज्ज्ञ, डॉक्टर, विवाह समुपदेशक, विवाह मंडळांचे निमंत्रक यांचे परिसंवाद आयोजित करणे समाजाची खरी गरज आहे.

प्रदीप करमरकर, ठाणे

 

सैनिक जवळून कळला

‘स्वातंत्र्याची किंमत’ हा लेख वाचताना अक्षरश: डोळ्यात पाणी आले. तसे मी दररोज रात्री देवाला प्रार्थना करत असतो की आज कुठला पण वाईट प्रसंग आपल्या सैनिकांवर आणू नकोस म्हणून पण ती माझी भावना असते. लेख वाचला आणि सैनिक जरा जास्त जवळून कळाला. तसेच अनुराधा प्रभुदेसाई यांचे बँकेमध्ये आलेल्या सैनिकांना लवकर कामे करून देण्याचे सहकार्य, हे सर्व आपण सामान्य जनतेला जर कळवू शकलो तर सर्व ठिकाणी त्याची मदत होईल. हीच सैनिकांसाठी आपल्याकडून मदत होऊ शकते.

प्रवीण तोरंबेकर, लातूर

 

तक्रार काय साधणार?

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘नवरा : स्वामी की साथीदार?’ लेख वाचला. शीर्षकावरून लेखात मुख्यत: विवाहांतर्गत बलात्काराबद्दल चर्चा अपेक्षित होती. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबतचा निर्णय कायद्याशी पूर्णपणे सुसंगत असाच आहे. भारतीय दंड संहिता कलम ३७५खालील बलात्काराच्या व्याख्येतून विवाहांतर्गत बलात्कार स्पष्टपणे वगळला आहे. तो त्या व्याख्येत समाविष्ट करून काय साध्य होणार? एकतर असा बलात्कार न्यायालयात सिद्ध करणे अत्यंत कठीण. सिद्ध झाला तर नवऱ्याला तुरुंगवास. संसार धुळीला मिळणार. मुलांच्या आयुष्याची धूळधाण. यातून फक्त सुडाच्या समाधानाखेरीज अन्य काहीच साध्य होणार नाही. शिवाय याचाही दुरुपयोग होण्याचीच शक्यता जास्त. यापेक्षा सध्याच्या कौटुंबिक हिंसाचार कायदा तसेच विविध विवाह कायद्यांखालील कौटुंबिक न्यायालयात उपलब्ध असलेले दिलासे जास्त अर्थपूर्ण व पीडित स्त्रीला परिपूर्ण न्याय देणारे आहेत. त्याचबरोबर मुलांचेही हित जपणारे आहेत.

जान्हवी नवरे

 

सुविधा वाढवायला हव्यात

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘नवरा : स्वामी की साथीदार?’ हा लेख वाचला. लेखातील मुद्दे खरोखरच समाजमनाला भिडणारे वास्तवदर्शी आहे. देशातील ४७ टक्के मुलींचे लग्न अठरा वर्षांच्या आत होते ही बाब खेदजनक तर आहेत मात्र त्यापेक्षाही १८ टक्के मुलींचे लग्न १५ व्या वर्षीच होते हे पण झोंबणारे सत्य आहे. या विषयाचा सखोल अभ्यास करावयाचा झाल्यास देशातील मुलींच्या शिक्षणाबाबत असलेल्या अपुऱ्या सुविधा. साध्या शौचालयाची सुविधा नसणाऱ्या कितीतरी शाळा या देशात आहेत. सोबतच मुलींच्या ये-जा करण्याचा प्रश्नही मोठय़ा प्रमाणात आहे. आठवी ते दहावीर्पयच्या मुलींसाठी खास शाळा पंचक्रोशी परिसरात भारत सरकारने सुरू कराव्यात या शाळेत येणाऱ्या मुलींसाठी खास बससेवा सुरू करून मुलींचे शैक्षणिक सक्षमीकरण केल्यास आपोआपच कमी वयात लग्न हा मुद्दा संपेल.

संतोष मुसळे, जालना

 

शहिदांच्या मातापित्यांची अवस्था समजली

‘स्वातंत्र्याची किंमत’ हा अंत:करणाचा ठाव घेणारा हृदयस्पर्शी लेख वाचला. कॅप्टन अनुज नय्यर, कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन शौर्य यांसारखे अनेक वीर या भारत भूमीवरील मात्यापित्यांच्या उदरी जन्मले म्हणूनच आम्ही आज सुरक्षित नव्हे जिवंत आहोत. पण लोकशाहीच्या नावाखाली घटनादत्त हक्क प्राप्त झाल्यामुळे उन्मादाने मुजोर, कर्तव्यहीन, असंवेदनशील, स्वैराचारी, मोकाट स्वातंत्र्याचा उपभोग घेत. हक्क मिळाले कर्तव्याचे काय? स्वत:चे घरदार, आप्त, कुटुंबीय, जन्मदाते मायबाप यांच्यापासून दूर सीमारेषेवर आपल्या प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या, आपल्या प्राणांची आहुती देऊन आमचे रक्षण करणाऱ्या, शूरवीरांच्या बलिदानाची किंमत ना राजकारण्यांना ना इथल्या व्यवस्थेला, असे सखेद नमूद करावेसे वाटते. युद्धात पोटचा पोर गमावल्यावर काय अवस्था होते त्या मात्यापित्यांची याचे समाजाला आपण आपल्या लेखातून दर्शन घडवले. आपल्याच शब्दात ‘सैनिकांच्या जीवनातील कित्येक दालने उघडायची बाकी आहेत आणि मनातली आंदोलनेही.’ गेल्या चौदा वर्षांत फौजींच्या सहवासातून जे अनुभवाचे गाठोडे आपण तयार केलं आहे ते फेकून देण्याइतके किंवा माळ्यावरच्या अडगळीत टाकण्यांइतके क्षुल्लक नाही. प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयाच्या कप्प्यात सदैव जतन करून ठेवण्यासारखा हा तो एक अमूल्य ठेवा आहे.

मेघश्याम राऊळ, वसई