मेघना जोशी यांनी लिहिलेला २४ जूनच्या अंकात लिहिलेला ‘गुणां’चे अवगुण!’ हा प्रदीर्घ लेख आभ्यासपूर्ण व वास्तववादी वाटला. ‘घोका आणि ओका’ या प्रचलित पद्धतीमुळे बहुतेक विद्यार्थी ‘गुणवान’ होताना तात्पुरते तरी दिसतात. साठच्या दशकात आम्ही जुनी शालांत परीक्षा (अकरावी) ज्या गुणांनी पास झालो, त्या वेळी हुशार (?) म्हणून टेंभा मिरवला होता. आता आमची नातवंडे आमचे गुण पाहून म्हणतात, ‘आजोबा बस्स एवढेच टक्के? पण आजदेखील सत्तरी ओलांडल्यानंतर आम्हाला तेवीसचा पाढा किंवा एकोणतीसचा पाढा तोंडपाठ आहे, तर हल्लीच्या गुणवान(?) विद्यार्थ्यांना कॅलक्युलेटर लागतो. चौथीमध्ये बालकवींची ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ संपूर्ण कविता तशीच्या तशी आठवते. भले आम्हाला ९० टक्के गुण नव्हते मिळाले! या प्रदीर्घ लेखात, आजच्या शिक्षण पद्धतीवर छान प्रकाश टाकला आहे. आपण भारतीय आयोजन करण्यात बहाद्दर आहोत, पण त्याच्या नियोजनात (राबवायच्या) मात्र घोळ होतो. बोर्डाच्या परीक्षेत गुणाचा आलेख उंचावला पण गुणवत्तेचे काय? आमच्या मोलकरणीने सांगितलेली गोष्ट. मुलगा चौथीत गावाला शाळेत शिकतो तर मुलगी मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत सातवीत शिकते. दिवाळीच्या सुट्टीत मुलगा मुंबईत आला, वेळ जात नव्हता म्हणून ताईचे सातवीची पुस्तके घडाघडा वाचू लागला. आई खूष झाली, तिने मुलाचे चौथीचे पुस्तक मुलीला वाचायला दिले, मुलगी अडखळत वाचू लागली. तेव्हा त्या अशिक्षित बाईच्या लक्षात आले दोन्ही शिक्षणाला फरक.

आमच्या ओळखीतला एक मुलगा, आई वडील अशिक्षित, तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातला. सारे पास होतात तसा हा मुलगादेखील पास झाला. बी.कॉम. झाला. कौतुकाचे दिवस सरले. पदवीनंतर दोन र्वष गेले तरी नोकरी लागेना. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या या मुलाला धड चार वाक्य इंग्रजीत बोलता येत नाहीत. आता शेवटी तो हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करतोय. काय उपयोग या शिक्षणाचा. गुण वाढताहेत पण गुणवत्तेचे काय?

प्रफुल्लचंद्र पुरंदरे

 

अप्रतिम लेख

मेघना जोशी यांनी ‘‘गुणां’चे अवगुण!’ हा अप्रतिम लेख लिहिला आहे. मीही धुळ्यात शिक्षक आहे. आपली मते ही सर्वच ठिकाणी लागू होतील अशीच आहेत. आपण माझ्या मनातील भावनांनाच वाट करून दिली आहे असे वाटले. आपण यावर पुढच्या लेखात शासकीय व शालेय स्तरावर व पालक म्हणून काय-काय करता येईल या संदर्भात लिहिल्यास फार बरे होईल. आपण मांडलेल्या व्यथा मलाही जाणवतात, पण कसं बदलावे या विषयी संभ्रम व गोंधळ झाला आहे.

नंदकिशोर बागुल, धुळे

 

परीक्षेनंतर अभ्यासअसतो हा विचार रुजावा

१ जुलैच्या ‘मन तरंग’ सदरातील सुहास पेठे यांचा ‘परीक्षेनंतरचा अभ्यास’ लेख वाचला. काही दिवसांपूर्वीच यंदाच्या दहावीच्या निकालात तब्बल १९३ विद्यार्थी १०० पैकी १०० गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याची अभूतपूर्व बातमी वाचली होती. ‘अभ्यासक्रमाव्यतिरिक्त’ अवांतर बाबींसाठी शाळेतून अंतर्गत मिळणाऱ्या गुणांमुळे, आभाळ ठेंगणं वाटायला लावणारा हा भासच म्हणायचा! त्यानंतर लगेचच ४ जुलैच्या लोकसत्ता दैनिकात दहावीला तोंडी परीक्षांच्या गुणाची खिरापत बंद होणार, ही बातमी वाचण्यात आली. हायसं वाटलं. खरं तर दहावी असो की वैद्यकीय प्रवेश परीक्षा असो, यांचे घोळ संपतील ते ‘अच्छे दिन’ म्हणायचे!!

आपल्या पोटी एडिसन, न्यूटन किंवा ज्ञानेश्वर आलेले आहेत,अशी स्वत:ची गैरसमजूत करून घेऊन मुलांकडून अवाजवी अपेक्षा करणारे बरेच पालक असतात. मुलांसाठी काही विशेष कष्ट घ्यावे लागतात, हेही काहींच्या गावीही नसतं. त्यात असे पोतंभर गुण मिळाले की विद्यार्थी आणि पालक दोघांचंही पोटभर समाधान! आधीच्या परीक्षांमुळे असा भ्रम वाढवत नेण्याशिवाय काही साध्य होत नसतं. पण दहावीपर्यंत वर वर उडत जाणारे गॅसचे फुगे बारावीला एकदम फुटतात. त्यावेळी नैराश्येच्या गर्तेत जाऊन स्वत:ला संपवणारे विद्यार्थीही आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या ‘संपण्याला’  नुसतीच अपेक्षा करणारे पालक, विद्यार्थ्यांचे स्वत:बद्दलचे भ्रम वाढवायला मदत करणारी परीक्षा पद्धत, उत्तम निकालाची प्रदर्शनीय जाहिरात-विंडो ड्रेसिंग -करून नाव(कमाई )वाढविण्याचा अट्टहास करणाऱ्या शाळा,  हे सगळेच सारखेच जबाबदार असतात. यासंबंधी डॉ.अरुण हतवळणे यांनी लिहिलेलं ‘यशवंत व्हा !!’ या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावासा  वाटतो. मूल घडविताना पालकांनी किती बारीकसारीक गोष्टी स्वत: केल्या पाहिजेत हे  त्यात वाचावं !! ‘बाप कुणीही होऊ  शकतो, वडील होणं कठीण असतं.’अशा आशयाचा त्यातला  विचार पटतो. मुलांच्या प्रगतीची अपेक्षा करताना ती अवाजवी तर  होत नाही, हा विचार पालकांनी करावाच. प्रत्येकाची एका ठरावीक उंचीवर उडण्याची क्षमता असल्याने मुलांच्या खऱ्या कुवतीचा विचार पालकांनी करून मुलांना वास्तवातील भान पाळायला मदत करणे आवश्यक आहे. निदान ‘परीक्षेनंतरचा अभ्यास’ असतो हा विचार या लेखाने रुजायला हवा.

मनोहर निफाडकर, निगडी

 

पाल्य-पालक संवाद हरवलाय

मेघना जोशी यांनी सत्य परिस्थिती मांडलेली आहे. ‘गुणां’चे अवगुण!’ हा विद्यार्थी, पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे. या इयत्ता १०वीच्या गुणांच्या फुगवटय़ामुळे पुढील ३ ते ४ वर्षांत विद्यार्थी-पालक, शिक्षण व्यवस्था, समाज व्यवस्था यामध्ये निर्माण होणाऱ्या धोक्यांची शक्यता नाकारता येणार नाही. एक समुपदेशक म्हणून

९-१० वर्षांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन करताना वेगवेगळे अनुभव आले. तसेच निवडक विद्यार्थ्यांची केस स्टडीचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, पाल्य व पालक यामधील संवाद हरवत चाललाय. तो संवाद चांगला, नि:स्वार्थी, सहविनय, नम्र असला पाहिजे. घरातील वातावरण आनंदी झाले तरच विद्यार्थ्यांचा चांगला शैक्षणिक विकास व व्यक्तिमत्त्व विकास चागला होईल.

भगवान पांडेकर, पुणे

 

गुण असले तरच गुणी

‘गुणांचे अवगुण!’ हा अतिशय चांगला लेख आहे. आजच्या पालकांची एकप्रकारे कानउघाडणीच आहे ही, जी खूप गरजेची आहे. सध्या सीबीएससी/आयसीएससीचं फॅड मुलांना डोईजड जातंय हे पालकांच्या लक्षातच येत नाही. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते, पण दुर्दैवाने चांगलं म्हणजे काय हे त्यांच्या लक्षात येत नाही. भरमसाट पैसे देऊन अशा शाळांमध्ये घातलं जातं, ते कळत नाही मुलांना, जड जातं म्हणून टय़ूशन्सही लावल्या त्यात. अगदी पहिलीची मुलंसुद्धा इंग्रजी, गणित, विज्ञानच्या शिकवणींना जातात. बिचारी मुलं या अभ्यासाच्या ओझ्याखाली निरागस बालपणच विसरतात. मी संगीताचे क्लासेस घेते. तिथेही पालकांचे प्रश्न -परीक्षेला बसवणार ना? किती परीक्षा होतील दहावीपर्यंत? प्रत्येक गोष्ट स्पर्धेत उतरण्यासाठीच असावी असा आग्रह का? स्वत:च्या आनंदासाठी, तणावमुक्त राहण्यासाठी काहीतरी असावं हे नाहीच. बरं, एवढं करून मूल हे छंद दहावीपर्यंतच करू शकेल याची त्यांना नेमकी खात्री. म्हणजे जर त्याला अशा काही कलेत गती असेल आवड असली तरी पुढे तो ते करू शकणार नाही हे पालकच ठरवून मोकळे होतात. म्हणजे गुण असले तरच गुणी, चौफेर व्यक्तिमत्त्व असा समज पालकांनी करून ठेवलाय व त्यांची पाल्यं पुढे हाच वारसा चालवणार, कारण हीच शिकवण सगळीकडून मिळालेली असेल.

स्वानंदी कुलकर्णी

 

गुणांची सूज आहेच

मेघना जोशी यांचा ‘गुणां’चे अवगुण!’लेख वाचला, अभ्यासाबद्दल मी सातत्याने बोलत असले तरी या लेखातले विचार माझेच आहेत असं वाटतंय. मुलांचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. कारण त्यातून जगण्याची ताकद मिळते. यश-अपयश पचवण्याची ताकद मिळते. माझ्या लेखांमधूनही मी ते सांगत असते. व्यवहारज्ञान आणि आत्मसन्मानाचे धडे आम्हाला वडिलांकडून मिळाले. प्रत्येक गोष्टीला सामोर जायचं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं वगैरे गोष्टी त्यांनी शिकवल्या, त्यामुळे भीती हा शब्द आम्हा बहिणींच्या जवळपास फिरकतही नाही. कोणताही दबाव न देता त्यांनी आम्हाला वाढवलं.  हाच प्रयोग मी माझ्या मुलावर करत असते. त्यानं खेळलं पाहिजे यावर मी नेहमीच ठाम होते. क्लास आणि खेळाची वेळ एकच असल्यामुळे द्विधा मन:स्थिती होते पण आम्ही मैदान निवडतो. मुलांमध्ये त्याने मिसळावे व शरीरस्वास्थ्य असे दोन्ही उद्देश साध्य होतात. सध्या तो ९ वीत आहे आणि घरीच अभ्यास करतो. आपल्या लेखाशी सहमत आहे. पण कदाचित गुणांच्या निमित्ताने मुलांच्या इतर गुणांना वाव मिळेल. नाहीतर पालक मुलांना काहीच करू देणार नाहीत. पण तरीही ही गुणांची सूज आहे हे नक्की. माझ्या मुलाला इंग्लिश निबंधामध्ये पूर्ण गुण दिले म्हणून मी त्याच्या सरांना इतके गुण देऊ  नका असे सांगितले होते.

नीमा

 

गुणांचे अवगुण अभियांत्रिकीपर्यंत!

‘गुणां’चे अवगुण!’ हा लेख खरंच एका मोठय़ा समस्येवर भाष्य करतो. हा लेख वाचून मला आलेले अनुभव इथे लिहावे असे मनापासून वाटले. बारावीचा आणि सीईटीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांची आणि पालकांची पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची तयारी सुरू आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक या हुद्दय़ावर काम करत असताना अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याची हल्ली रोजच संधी मिळते आहे. असा संवाद होताना मेघना जोशींना आलेल्या अनुभवासारखाच अनुभव (किंबहुना त्यांच्या अनुभावाचे एक्स्टेंशन) येत असल्याचं जाणवलं. प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून सगळ्यात जास्त विचारण्यात येणारे प्रश्न असतात ते म्हणजे ‘अभियांत्रिकीनंतर प्लेसमेंटचं काय? अभियांत्रिकीनंतर किती पॅकेज मिळेल? किंवा इथल्या (या महाविद्यालयामधल्या) मुलांना जास्तीतजास्त किती पॅकेज मिळाले आहे?’ दहावीत सुरू असलेल्या गुणांची स्पर्धा ही आता पॅकेजमध्ये रूपांतरित झाल्याचं जाणवू लागलं आहे. एखादी गोष्ट शिकण्याआधीच त्यातून आपल्याला किती जास्त पैसा  मिळणार, कोणत्या महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यावर आपल्याला जास्तीतजास्त पैसा मिळणार यावर बऱ्याच जणांचा भर दिसून येतोय. पॅकेजबद्दल, मुलांच्या करिअरबद्दल जागरूक असण्यात काहीच चूक नाही, पण एखाद्या अभ्यासक्रमानंतर मिळणाऱ्या पॅकेजबद्दल पालक जेवढे जागरूक असतात तेवढेच ते त्या अभ्यासक्रमासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीबद्दल, त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल जागरूक व्हायला हवेत. कोणत्या शाखेला आजकाल किती स्कोप आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्या पाल्याचा कल कोणत्या शाखेकडे आहे याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे. गुण आणि पॅकेजच्या स्पर्धेत धावत असताना आपण आयुष्याचा खरा आनंद घेणं विसरत तर नाही ना? आयुष्याच्या शर्यतीत धावताना मी दुसऱ्याच्या किती पुढे आहे याचा विचार करण्यापेक्षा मी माझे आयुष्य किती समृद्ध करतोय, इतरांना किती आनंद देतोय याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे. शिक्षणाचा उपयोग फक्त पॅकेज, पैसा मिळवण्यासाठी नसतो तर शिक्षणाने माणूस संवेदनशील बनला पाहिजे. सुशिक्षित लोक जर दुसऱ्याचे दु:ख, समस्या दूर करण्यापेक्षा स्वत:च्याच तथाकथित करिअरमध्येच व्यस्त असतील तर ही शिक्षणाचीच हार नाही का? भरपूर गुण, पैसा मिळविल्यानंतर होणारा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या जवळची माणसं कमावण्याची कला ही कोणत्याही क्लासला जाऊन येत नाही त्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना वेळ आणि भावनिक आधारच द्यावा लागतो. आयुष्यात उदरनिर्वाहाचे साधन नक्की शोधलं पाहिजे ते तुम्हाला जगण्यासाठी मदतीचं आहेच, पण एखादा छंद, जिवाभावाची माणसं ही त्याहून महत्त्वाचे आहेत कारण ते तुम्हाला का आणि कसं जगावं हे शिकवतील.

प्रा. सुशांत जाधव

 

गुणांच्या खैरातीचे दुष्परिणाम

‘गुणां’चे अवगुण’ हा मेघना जोशी यांचा लेख वाचला आणि मला आठवण झाली की माझ्या एका मैत्रिणीचा हुशार मुलगा बोर्डाची परीक्षा झाल्यावर वैतागून म्हणाला होता की, जर सगळेच पेपर्स सगळ्यांनाच सोपे जाणार असतील तर अभ्यास करायचा कशाला? खऱ्या हुशार विद्यार्थ्यांना उद्वेग वाटावा, असा बोर्डाच्या पेपरचा दर्जा असतो. त्यामुळे निकाल लागल्यावर उत्सव साजरे करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते.

खरे तर कोणताही पेपर हा पास व्हायला आणि स्कोअर करायला अवघड असायला पाहिजे. इथे पेपर पास व्हायला इतका सोपा असतो की अक्षरश: नापास होण्यासाठी ‘प्रयत्न’ करायला लागावेत. तेही एकवेळ चालेल पण सर्वाना सरसकट भरघोस गुण दिल्याने स्वत:च्या बुद्धिमत्तेचा खरा दर्जा विद्यार्थ्यांला आणि त्याच्या पालकांना समजत नाही. त्यामुळे काय तोटे होतात ते बघू.

१) आधीच आपल्या देशात श्रमप्रतिष्ठा नाही. त्यात असे भरघोस गुण मिळाल्याने कोणालाच हाताने करण्याची कामे करण्याची इच्छा राहणार नाही. जो उठला त्याला महाविद्यालयात जायचे असते. सगळ्यांनाच एसीत बसून काम करायचे असते. वायरमन, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर यासारखी कामे करायला कोणीच तयार नसतो.

२) कित्येक गरीब विद्यार्थी आणि त्यांचे पालक गुणांमुळे फसून उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहतात आणि शेवटी वैफल्यग्रस्त होतात.

३) या ‘गुणातिरेका’मुळे खासगी क्लासेसचे मात्र चांगलेच फावते. सगळेच स्वत:ला हुशार समजायला लागल्याने कॉमर्सला जाणाऱ्या सगळ्यांनाच सीए किंवा सीएस व्हायचे असते. सायन्सला जाणारे आयआयटी आणि मेडिकलची स्वप्ने पाहतात तर आर्ट्सवाल्यांना स्पर्धा परीक्षांना बसायचं असतं. त्यासाठी महागडे क्लासेस लावणे ओघानेच आले. माझ्या माहितीतील एका साध्या सिक्युरिटी गार्डने असेच मुलाच्या दहावीच्या गुणांना फसून मुलाला महागडय़ा क्लासला घालण्यासाठी दोन लाख रुपये कर्ज काढले. क्लासवाल्यांनीही आम्ही तुमच्या मुलाला आयआयटी प्रवेशपरीक्षेसाठी तयार करतो सांगून भरमसाट फी उकळली. त्याला जेईईत फक्त २६ गुण मिळाले आणि (म्हणे त्याने जेईईत लक्ष केंद्रित केल्याने) सीईटीत फक्त ८६ गुण मिळाले. आता तरीही मुलगा इंजिनीयिरगलाच जायचे म्हणून हट्ट करीत आहे. आणि आपला मुलगा हुशार आहे पण जेईईत लक्ष केंद्रित केल्याने त्याच्या गुणांवर परिणाम झाला अशी बापाची खात्री असल्याने खासगी कॉलेजात इंजिनीयिरगला प्रवेश घेण्यासाठी पुन्हा नवे कर्ज काढण्याच्या तयारीत आहे.

४) या विद्यार्थ्यांना नोकरीस ठेवणाऱ्या कंपन्यांचीही पंचाईत होते. कारण कुठल्याच पातळीवर या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे खरे, योग्य मूल्यमापन झालेले नसते. पण पगाराविषयीच्या अपेक्षा मात्र आभाळाला टेकलेल्या असतात. कित्येक छोटय़ा कंपन्यांना अशा मुलांना सुरुवातीचे काही दिवस अगदी नगण्य पगारावर काम करायला लावून त्यांची आपल्या परीने परीक्षा घ्यावी लागते. मग स्वत:ला हुशार समजणारे विद्यार्थी एवढय़ा कमी पगाराची ऑफर आल्यावर खचूनच जातात.

५) गुणांची खैरात सगळ्याच विद्यार्थ्यांवर सारखीच होत असल्याने तुलनात्मकदृष्टय़ा

सगळे आपापल्या जागीच राहात असल्याने या भरघोस गुणांचा चांगल्या महाविद्यालयात किंवा हव्या त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काहीच उपयोग होत नाही.

उज्ज्वला रानडे