‘नात्यातलं सामंजस्य’ हा १९ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला डॉ. सविता पानट यांचा लेख खूप महत्त्वाचा आहे. स्त्रियांमध्ये आणखी एक भीती असते की नवऱ्याला जर शरीरसुख नाही मिळालं तर तो दुसरीकडे भरकटला जाईल आणि त्यासाठी सुद्धा दोषी मलाच समजलं जाईल. या भीतीपोटी देखील खूप जणी मनात नसताना शारीरिक संबंध ठेवतात. स्त्री ही मनाने आधी जवळ जाते, मग शरीराने जवळ येते. कुटुंबात जर अपमानास्पद वागणूक पतीकडून अथवा इतर सदस्यांकडून मिळत असेल आणि पतीने जर तिला योग्य साथ नाही दिली तर तीही मनापासून पतीला साथ देऊ  शकणार नाही. अथवा पतीने ऊठसूट तिचा अपमान करणे, सर्व बाबतीत तिला गृहीत धरणे, तिच्या आनंदाचा विचार न करता केवळ शारीरिक सुखासाठी जवळीक करणे यामुळे ती दुखावते. कधी कौतुकाचा स्पर्श, आधाराचा स्पर्श देण्याचा प्रयत्न केलास का? तू केवळ त्या क्षणासाठी मला नको तर जीवनाच्या प्रत्येक प्रवासात हवा आहेस, अशी तिची मानसिकता असते. तसं झालं तर मग मनाने जवळ आलेली व्यक्ती शरीराने पण खूप जवळ येते. उलट बघता पुरुष काहीही करेना पण स्त्रीने त्याच्यासाठी सज्ज असायलं हवं अशी जबरदस्ती कुटुंबातून केली जाते. केवळ कुटुंब वाचवण्यासाठी काही जणी मन मारायला शिकतात. हे थांबवायला हवं.

– वैजयंती जोशी, सोलापूर

भान देणारे ‘तारुण्यभान’

डॉ. शशांक सामक यांचा १५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. पौगंडावस्थेत पदार्पण करणाऱ्या मुलांना आणि मुलींना त्यांच्या शरीरात नेमका या वयात संप्रेरकांमुळे होणाऱ्या बदलांमुळे होणारा शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक बदल नीट समजून सांगणारे त्यांच्या शिक्षकांच्या बरोबरच पालकांची देखील भूमिका आहे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. ‘तारुण्यभान’ हे तीन दिवसांचे शिबीर सर्च, शोधग्राम, गडचिरोलीच्या संचालिका डॉ. राणी बंग गेले कित्येक वर्षे पौगंडावस्थेत पदार्पण करणाऱ्या युवक युवतींकरिता महाराष्ट्रभर घेत आहेत. २००५ पासून ‘सर्च’ला आदिवासी लोकांच्या शस्त्रक्रिया शिबिरास मार्च आणि सप्टेंबर असे दर वर्षी दोन वेळा मी आणि माझे सहकारी डॉक्टर मंडळी जात आहे. ‘तारुण्यभान’ शिबिर कोल्हापूर आणि आमच्या ग्रामीण भागात मलकापूर तालुका शाहूवाडी येथे आम्ही चार वेळा घेतली.

लैंगिक शिक्षण शिकवताना त्या युवक-युवतींना डॉ. राणी बंग आणि त्यांच्या सोबत सुनंदा खोरगडे, राजेंद्र इसासारे आणि ज्ञानेश्वर पाटील खूप छान शास्त्रीय भाषेत आणि त्या बरोबरच काही सांघिक खेळांच्या रूपाने अत्यंत आवडीच्या आणि संवेदनशील रूपाने सांगतात. सोबत शाळेतील सर्व शिक्षकांना आणि शिक्षिकांना आणि सर्व कर्मचारी वर्गाला देखील सहभागी करून घेतले जाते. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी त्यांच्या पालकांशी या संवेदनशील विषयावर चर्चा केली जाते. मुलांच्या मनातील भावना दुखावल्या न जाता त्यांच्याशी पालकांनी हितगुज करायला हवंय हे पालकांच्या मनात रुजवले जाते. सोबत शाळेतील सर्व शिक्षकवृंद असल्याने हा विषय वर्गात देखील काहीही शंका मनात न ठेवता अगदी दिलखुलास पद्धतीने शिकवला पाहिजे हे त्या शिक्षकांनासुद्धा सांगितले जाते. गावातील ज्येष्ठ नागरिकांना देखील यात सहभागी करून घेतल्याने घरी, शाळेत, समाजात आणि सवंगडय़ात देखील या नाजूक, हळव्या विषयाची शास्त्रीय पद्धतीने चर्चा होत जाते. इंटरनेट, मासिके, कादंबऱ्या आणि चुकीची माहिती अजिबात स्वीकारू नका आणि त्याला बळी देखील पडू नका हे त्या संवेदनशील मनावर खूपच सुंदर रीतीने संस्कार केले जातात.

युवक-युवतींना त्यांच्या मनातील काहूर, समज/गैरसमज लिहून देण्यास सांगितला जातो आणि बरेच जण तसा प्रतिसाद देताना दिसतो देखील. काही शंका असल्यास त्या लिहून  एका बॉक्समध्ये टाकण्यास मुभा देखील मिळते आणि त्या प्रत्येक शंकेचे निरसन डॉ. राणी बंग समजावून करतात. विविध प्रकारचे खेळ अधूनमधून घेतल्याने कुटुंबातील सांघिकता, नेतृत्व, लहान मुलांचे लैंगिक शोषण, समाज ओळखून घेण्याचे कौशल्य, आई वडिलांशी, ज्येष्ठांशी, छोटय़ांशी सुसंवाद साधण्याचे सुसंस्कार ‘तारुण्यभान’ शिबिरात केले जातात. ‘निर्माण’ या त्यांच्या संस्थेतून महाराष्ट्रभर स्वत:ची ओळख आणि सामाजिक चळवळ उभी करून या संवेदनशील विषयाबरोबर सामाजिक बांधीलकीचे संस्कार युवक-युवतींना २००६ पासून सुरू झालेत. पौगंडावस्थेत होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल अशा ‘तारुण्यभान’ शिबिरातून शास्त्रीयदृष्टय़ा शिकवले जातात. पण या शास्त्रीय अभ्यासाकडे शाळेत, महाविद्यालयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय हे ही खरेच आहे.

– डॉ. किरण भिंगार्डे

माहितीपर आणि रंजकही

मुक्ता गुंडी आणि सागर अत्रे यांचे दर पंधरवडय़ाला प्रसिद्ध होणारे ‘आरोग्यम् जनसंपदा’ हे सदर मी नियमित वाचते. माहिती देणारे आणि सुटसुटीत लिहिल्याने मला ते नेहमीच खूप रंजकही वाटतं. मी रुईया कॉलेजमध्ये राज्यशास्त्र शिकवते, त्यामुळे अनेकदा मुलांनाही या लेखांची माहिती देते. मुळातच सामाजिक आरोग्याविषयी आपल्याकडे अनास्था आहे. स्वच्छतेचे साधे साधे नियमही आपल्याकडून पाळले जात नाहीत. या विषयीची जागरूकताही मर्यादित स्वरूपाची, वरवरची असते. त्यामुळे अशा प्रकारचे लेखन अत्यंत अभिनंदनीय आहे.

– गायत्री लेले