२७ मे च्या पुरवणीतील संगीता बनगीनवार यांचा ‘भीतीपोटी चुका’ हा लेख वास्तव पुढे आणणारा म्हणून चांगला वाटला. याबाबत, दत्तक मुलांना त्यांचं जन्म-सत्य सांगावं का, असा विचार आजपर्यंत नेहमीच मला सतावत राहिलेला आहे. पाश्चात्त्य देशांतलं जे चांगलं ते घ्यावंच, पण काही वेळेस त्यांचे काही निर्णय हे त्यांच्या समाजव्यवस्थेनुसार, किंवा तेथील परिस्थितीनुसार असतात, ते आपल्या वस्तुस्थितीशी जुळणारे नसतात. म्हणजे बऱ्याचदा गोरे पालक, काळ्या मुलांना दत्तक घेतात, त्यामुळे ते पालक आणि त्यांची दत्तक मुलं, यांच्यामधील वांशिक फरक ओळखू येतो आणि तो पुढे त्या दत्तक बालकांनापण समजू लागतो. शाळेत मित्र-मैत्रिणी कुतूहलाने प्रश्न विचारू लागतात. त्यामुळे दत्तक मुलांना आपले पालक इतके गोरे आणि आपण असे कसे? हा प्रश्न सतावू लागतो. पुढे १० ते १२ वर्षांच्या दरम्यान, आपले जन्म देणारे ते, हे आई-बाबा नाहीत. हे कोणी दुसरेच आहेत, हे कळल्यावर त्यांना मोठा धक्का बसतो. असं होऊ  नये, म्हणून त्यांना त्यांच्या अगदी लहान वयातच, तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून ‘अ‍ॅडॉप्टेड’ हा शब्द आणि ते एक नातं आहे, अशा भावनेची रुजुवात त्या देशात करून दिली जाते. तरीसुद्धा अ‍ॅडॉप्टेड म्हणजे काय? हा प्रश्न मुलांच्या मनात केव्हा न केव्हा तरी उभा राहतोच. शिवाय आपले हे आई-बाबा नाहीत, हे सत्य कोणत्याही वयात कळणं हे धक्कादायकच असतं. हे सत्य कळल्यावर, अशा आई-बाबांचे कितीही उपकार मान्य केले तरी आपल्या जन्मदात्या आईने आपल्याला असं का सोडून दिलं, हा प्रश्न त्या मुला-मुलींना छळत राहतो, अस्वस्थ करतो. आपण अशा किती तरी बातम्या वाचल्यात की, तरुणपणी अशी मुलं भारतात येऊन आपल्या आईचा शोध घेऊन गेली. अर्थात, ही सर्व पाश्चात्त्य देशांतील पाश्र्वभूमी झाली. त्यातून एवढंच समजायचं की, कोणत्याही वयातील मुला-मुलींना, किंबहुना कोणाही माणसाला, आईने आपणास नाकारलं, ही भावना अतीव दु:खाची असते. ‘अ‍ॅडॉप्टेड’ हा शब्द ती जखम भरून काढू शकत नाही. पण युरोप, अमेरिकेत पालक मुलात जिथे वांशिक भेद असतो, तिथे नाइलाज होतो. मात्र भारतात आपल्याच वंशाची मुलं दत्तक घेतली जात असल्यामुळे, तिथे दत्तक मुलांना, ‘तुला संस्थेतून आणलं’, असं सत्य सांगायला पाहिजे असं नाही, असे मला वाटते. जे सत्य सांगण्यामुळे कोणी दु:खी होणार असेल आणि ते दु:ख निवारण्याजोगा आपल्या हातात कोणताच उपाय जर नाही, तर हे सत्य त्यांना कधीच सांगितलं नाही म्हणून काही फरक पडत नाही, असं मला वाटतं. कारण वंशसाधम्र्यामुळे त्यांना आपल्या समाजात कोणी वेगळं समजत नाही आणि तीसुद्धा त्या घरात अगदी चांगली मिसळून जातात. त्यामुळे त्यांना वियोगावस्था येत नाही. म्हणजेच त्यांची आई कोणी दुसरीच होती, ही माहिती त्यांना नाही कळली, तरी त्यात त्यांचं नुकसान काहीच नसतं. अशी काही जोडपी मी पाहिली आहेत की, एकाने २० दिवसांचं बाळ घेतलं. आज तो २५ र्वष वयाचा मुलगा आहे. पण नातेवाईकांपासून, शेजाऱ्यांपर्यंत कोणीही हा विषय कधीच त्याच्या समोर काढला नाही आणि तो मुलगा, तेच आई-वडील समजून यशाच्या शिखरावर आज आनंदाने कार्यरतआहे. आईने आपल्याला सोडून दिलं, ही भावना सर्वसाधारणपणे मुलांना अपमानाची वाटते, लहान वयात ती त्यांना सैरभैर करते आणि त्यातून त्यांचे अनेक मानसिक प्रश्न उभे राहू शकतात. अभ्यासातही लक्ष लागत नाही. अवतीभवती सर्वाचे खरे आई-बाबा आहेत आणि आपली खरी आई कुठे आहे, आता ती काय करीत असेल, अशी काय तिची परिस्थिती होती की तिने मला सोडून द्यावं, आज तिला माझी आठवण येत असेल का वगैरे अनेक प्रश्न त्यांच्या बालवयात त्यांना ग्रासून राहतात. आणि हे प्रश्न अनेक र्वष त्यांचा पिच्छा करीत असतात. मग खरंच आपल्या देशात हे पाश्चात्त्यांचं अनुकरण व्हायला हवं आहे का ? असा प्रश्न मला विचारावासा वाटतो.

– मंगला सामंत

 

अनुभव अविस्मरणीय

‘नर्मदेने दिलेले स्मरणीय क्षण’ हा विमला पाटील यांचा २० मे रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला.

गो. नी. दांडेकरांनी केलेलं नर्मदेचं वर्णन, नर्मदेचं उगमस्थान, मार्बल रॉक्स, नर्मदाकाठावरची अनेक स्थळं हे वाचताना आपण प्रत्यक्ष नर्मदाकिनारीच आहोत असं वाटत होतं. लेखात वापरलेला फोटोही खूप छान आहे. मलाही नर्मदेची खूप ओढ आहे. जगन्नाथ कुंटे यांचं ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक तसंच, उष:प्रभा पागे यांचे नर्मदा परिक्रमेबाबतचे लेख आजही पुन:पुन्हा वाचायला आवडतात. यापूर्वी ‘लोकसत्ता’नेच भारती ठाकूर यांच्या ‘नर्मदालय’ या संस्थेच्या कामाबद्दलची माहिती प्रसिद्ध केली होती. विमला पाटील यांनी लिहिल्याप्रमाणे खरंच नर्मदेचे अनुभव अविस्मरणीय आहेत. त्यांनी लेखात, देशातल्या सात महत्त्वाच्या नद्या आणि त्यांची माहिती देणारा दृक्-श्राव्य कार्यक्रम याबद्दल लिहिलं आहे. त्याची सविस्तर माहिती मिळाल्यास आनंद होईल.

– महेश जहागीरदार, जळगाव</strong>

 

मनातील प्रश्नांची उत्तरे देणारा लेख

‘ऋण’ हा विचार पारंब्या सदरातील १३ मे रोजी प्रसिद्ध झालेला चैतन्यप्रेम यांचा लेख वाचला. तो अतिशय साध्या शब्दांत परमार्थ समजून सांगणारा अन् मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा वाटला. परमार्थाबद्दल पूर्वीपासूनच एक गूढता आहे. साधुसंतांनी ‘हाती काम मुखी नाम’ असा सोपा मार्ग दिला होता. पण अलीकडे मात्र परमार्थ अवघड कर्म आहे अशी समजूत होत आहे. अनेक प्रकारची मते, वाद, तसेच नवनवीन पुस्तके वाचून तर मनाचा अधिकच गोंधळ होतो. विद्वानांच्या चर्चामधून सर्वसामान्यांना काय मिळते? सद्य परिस्थितीत साधी माणुसकीही दुर्मीळ होत चालली आहे. तेव्हा नीतिमूल्ये जोपासणे, मानवता जपणे, एकमेकांना मदत करण्याची भावना जरी जपली तरी परमार्थ जगल्यासारखे होईल.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

 

निसर्गाचे आरोग्य आपल्याच हाती

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ३ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकातील वर्षां गजेंद्रगडकर यांचा लेख वाचला. क्षत्र बलाकासारखे पर्यावरण स्वच्छ करणारे पक्षी दुर्मीळ होत चाललेले आहेत, ही खरोखरच गंभीर बाब आहे. संपूर्ण जगातील जैवविविधता नष्ट होत चालली आहे हे आता मान्यच करावे लागेल. त्यामागची कारणे शोधल्यास लक्षात येईल की अमानुष वृक्षतोड आणि झपाटय़ाने वाढणारी सिमेंट काँक्रिटची जंगले हेच मुख्य कारण आहे. ते कमी करणे आपल्याच हातात आहे. निसर्गाचे आरोग्य जर आपण टिकवून धरले तरच निसर्गाच्या आधाराने प्रत्येकाला जगता येणार आहे.

– कीर्तिकुमार वर्तक, वसई

 

लिंगभेदापलीकडचे मातृत्व

नम्रता भिंगार्डे यांचा ‘अनोखं मातृत्व’ हा लेख चाकोरीपलीकडचा वाटला. मातृत्वाच्या संदर्भात आजपर्यंत खूप काही वाचण्यात आले पण ‘अनोखं मातृत्व’ हा लेख या संदर्भात एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. तृतीयपंथी असलेल्या गौरी सावंत यांना मिळालेलं हे मातृत्व उभे करताना नम्रता भिंगार्डे यांची लेखणीही अभिनिवेश विरहित होते. मातृत्वाची भावना ही लिंगभेदापलीकडची असते अन् स्त्री प्रमाणे एखाद्या पुरुषालाही मातृत्वाचा अनुभव येतो यास आम्हीही अपवाद नाही, ही गायत्रीची आई झालेल्या तृतीयपंथी असलेल्या गौरी सावंताची भावना अधोरेखित करावी अशीच आहे.

– देवीदास फुलारी, नांदेड</strong>

 

कर हा अजूनही नाही करी

‘हरवलेल्या मुलांचं वास्तव’ हा २७ मे रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचा लेख वाचून मन विषण्ण झालं. आपल्या भोवतीचं भीषण सत्य पचवणं कठीणच होतं, मात्र त्याच अंकातील चैतन्यप्रेम यांच्या विचार पारंब्यांनी आणि डॉ. यश वेलणकर यांच्या ‘ताणावर ध्यानाने मात’ या लेखांनी मन शांत झालं. जयश्री कुलकर्णी यांचा ‘कर हा करी’ हा लेख वाचला आणि आमच्या अनुभवांच्या आठवणीही जाग्या झाल्या. हातात हात धरून चालणे खरोखरच लोकांच्या विशेष पचनी पडत नाही. हातात हात घेऊन चालणं तर लांबच, बरोबर चालणंही नव्हतंच अशी गंमत. पण अजूनही गरज असल्याशिवाय हातात हात घेतलाही जात नाही आणि तो असताना अवघडलेपणाची सूक्ष्मशी जाणीवही त्यात असते हेही जाणवतंच, सवयीचा परिणाम दुसरं काय!

– साधना ताम्हणे, मुंबई