ग्राम विकास, महिला व बाल कल्याण मंत्री

१२ मार्चला प्रसिद्ध झालेला रेश्मा भुजबळ यांचा ‘आजचं मरण उद्यावर’ हा लेख वाचून मन अस्वस्थ झालो. ज्या बीड जिल्ह्यचे आपण नेतृत्व करता त्या बीड जिल्ह्यातील गावांतील तरुणींवर लग्न न करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. या बातमीकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हा पत्र प्रपंच.
सध्या आपण सर्वत्र स्त्री शक्तीचा गौरव करत आहोत. स्त्रियांना प्रोत्साहन देऊन निरनिराळ्या फायदेशीर योजना विशेषत: बचतगट, महिला सक्षमीकरण योजना याद्वारे महिलांच्या र्सवकष प्रगतीकरिता प्रयत्न करीत आहोत, पण हे सर्व प्रयत्न, या चळवळी फक्त काही मोजक्या ठरावीक शहरी भागांत केंद्रित झाल्यासारखे वाटते. लेखामध्ये ज्या गावाचा उल्लेख आहे त्या माजलगाव, गेवराईजवळील तालखेड येथील वरोळा तांडा वस्तीमधील भीषण परिस्थिती, तेथे राहणाऱ्या गरिबांचे जीवनमान, त्यांच्या अडचणी यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाश टाकला आहे.
या गावात जायला रस्ते नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहे नाहीत. याच गावातील तरुणींनी लग्न न करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामागची वस्तुस्थिती विदारक आहे. ही एक प्रातिनिधिक कहाणी आहे. अशा कितीतरी खेडेगावात हेच वास्तव असेल. यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकाल काय?
१. या गावांच्या आसपासच्या शहरांतील बिनसरकारी सामाजिक संस्था (एनजीओ), निरनिराळे न्यास, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा अभ्यास व्हावा.
२. निरनिराळ्या जातींतील विशेषत: तरुणांना हुंडा, आर्थिक देवाणघेवाण याबाबत समुपदेशन करून त्यांना या अनिष्ट प्रवृत्तीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करावे.
३. कमीत कमी खर्चातील सामुदायिक विवाह जास्तीत जास्त ठिकाणी आयोजित करण्यावर भर द्यावा.
४. प्रत्येक गोष्टी सरकारवर न टाकता सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांना या कार्यात सामावून घ्यावे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, ज्या समाजातून आपण वाढलो, पुढे आलो, त्याच समाजातील इतरांना, जे या संधीपासून वंचित आहेत, त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा जाणीवपूर्वक व निष्ठेने प्रयत्न व्हावा. तसेच या गावांतील उपवर मुलींच्या लग्नाची आपण जबाबदारी घेऊन ती निभावावी ही विनंती.

– विनायक वत्सराज, पनवेल<br />स्त्री आजही उपभोग्य वस्तू?
‘‘हनुमान टेकडीवर एका महाविद्यालयीन तरुणीवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाने बलात्कार केला, एका आयटीमधल्या तरुणीला तिच्या मित्रानेच फ्लॅटवर नेलं, तिला गुंगीचं औषध पाजलं आणि आणखी काही मित्रांसमवेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, पिसोळीला नवऱ्याच्या बॉसनेच घरी येऊन बायकोवर बलात्कार कला.’’ या गेल्या तीन-चार आठवडय़ांतल्या पुण्यातल्या घटना. या मालिकेची सुरुवात झाली व्हॅलेंटाइन डेपासून. अशा बातम्या वाचल्यावर जिवाचा थरकाप होतो. पुणं आता सुरक्षित राहिलं नाही असं वाटायला लागतं. कुणाकुणापासून स्वत:ला जपायचं? बाहेरच्या गुंडांपासून भीती आहे म्हणावं तर मित्र म्हणवणारेही फसवतात. बलात्कार करणारे केवळ अल्पशिक्षित, झोपडपट्टीतलेच असतात असं नाही तर नोकरीतले उच्चपदस्थ, राजकारणात सत्ता गाजवणारे, पैशाचा माज असलेले, समाजाच्या सर्व थरांतले असू शकतात. थोडक्यात आपलं कोण काय वाकडं करणार आहे या गुर्मीतून अशा घटना घडतात. यात तरुणींबरोबरच अल्पवयीन मुली, वयस्कर स्त्रियाही सुटत नाहीत. अशा अनेक घटना आपल्यासमोर येत नाहीत आणि अनेक वेळा त्या दडपल्याही जातात.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांची दखल केवळ स्त्री संघटनानी घेऊन भागणार नाही, शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, त्यांचं व्यवस्थापन, कार्यालयं, कर्मचाऱ्यांच्या संघटना, इतर सामाजिक संस्था यांनीही विचारविनिमय करून यावर उपाय शोधायला हवेत, ‘‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ-प्रतिबंधक कायद्याची’’ अंमलबजावणी कसोशीने व्हायला हवी. अशा दुर्घटनांची झळ आपल्याही घरापर्यंत येऊ शकते या दृष्टिकोनातून आता या वाढत चाललेल्या विकृतीचा सामना करायलासुद्धा समाजातल्या समंजस पुरुषांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी ‘भारतीय स्त्री जागरण’ या स्त्री संघटनेने स्त्रीसुरक्षेचा १६ दिवसांचा जागर केला, त्यात पुरुषांच्या सहभागाचा आग्रह धरला होता तो योग्यच होता. कारण स्त्रीने आत्मसंरक्षणासाठी कराटे वगैरे शिकावं हे ठीकच आहे, पण ‘कितीही सुधारली तरी स्त्री ही उपभोग्य वस्तूच आहे’ या विकृत विचाराला समाजात एकमुखाने विशेषत: पुरुषांकडून विरोध व्हायला हवा, त्यासाठी तरुणांसाठी लिंगसमभाव कार्यशाळांचं आयोजन करता येईल.
साधारणपणे याबाबतीत पालकांची मतं मुलींना जुनाट, बुरसटलेली वाटतात, त्यामुळे त्यांच्यातला संवाद अनेकदा हरवलेला असतो. पण शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते याबाबतीत सजगता दाखवू शकतात. यामध्ये माध्यमांचा सहभाग फारच महत्त्वाचा आहे. पुणे महापालिकेने निर्भया ग्रुप स्थापन करून एक चांगली सुरुवात केली आहे. अशा घटना घडतात म्हणून मुलींना घरातच धाकात ठेवणं हा उपाय अर्थातच योग्य नाही, कारण घरातही लैंगिक छळाच्या घटना घडू शकतात. यासाठी पोलिसांचा धाक, शिक्षा, दंड याखेरीज दुष्कृत्य करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्यांवर सामाजिक दबाव यायला हवा. स्त्री-पुरुषांची मैत्री निखळ असायला हवी, त्यात विकृती आली तर त्या स्त्रीच्या इतर मित्रांनी विरोध केला तर हे टळू शकेल. सगळ्या क्षेत्रातल्या पुरुषांनी हे मनावर घेतलं तर स्त्री सुरक्षित तर होईलच शिवाय तिचं कर्तृत्व आणखी बहरेल.
– वसुंधरा पर्वते