नवीन वर्षांची चतुरंग पुरवणी हातात पडली आणि नवीन लेखमालांची उत्सुकता आणि जुनी सदरे संपल्याची रुखरुख, अशा संमिश्र भावनांची मनात दाटी झाली. आमच्या परिचयाचे अनेक जण फक्त शनिवारच्या ‘चतुरंग’ आणि रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीसाठी आवर्जून ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्राची वाट पाहात असतात. या वर्षीच्या नवीन सदरांचे स्वागत. लगेचच भावलेला लेख म्हणजे आजोबांची खेळणी. आम्ही त्या भूमिकेतून जात असल्यामुळे लेख मनाला एकदम पटून गेला. खरेच अशा प्रकारच्या बागा, उद्याने किंवा मदाने या ठिकाणी बालचमूंच्या बाललीला बघताना वेळ कसा निघून जातो कळत नाही. परदेशस्थ काय किंवा दूर असणाऱ्या नातवंड- पतवंडांना या मुलांमधून शोधणे हा एक विरंगुळा तर असतोच शिवाय आठवणीचे पदर पण उलगडत जातात. शुभा प्रभू साटम यांनी लिहिलेल्या ‘चाकोरीपलीकडे’ या लेखामध्ये वेगळ्या वाटा शोधणाऱ्या तरुणींची वेगळीच ओळख आपल्याला झाली. ‘खाऊ आनंदे’मधील ‘जेवणानुभव’ हा आरती कदम यांचा लेख तर फारच उबदार! अगदी थंडीच्या मोसमात सुरू झाल्यामुळे अजूनच रुचकर वाटला. संपूर्ण पुरवणी सुंदर. नेहमीप्रमाणे आतुरतेने वाट पाहायला लावणाऱ्या ‘चतुरंग’ पुरवणीला खूप खूप शुभेच्छा!!!

क्षमा एरंडे, पुणे</strong>

स्वत्त्वाचे उत्तर

‘स्वत्त्व! धनश्री लेले यांचा लेख मनाला विचार करायला लावणारा आहे. जो आपल्या अनुभवातून, जे वेचतो, शोषून घेतो, ते म्हणजे स्वत्त्व का? गहन प्रश्न आहे. आई-वडील आपल्या सर्व मुलांवर सारखेच संस्कार करताय, मग फक्त  एकच मुलगा अथवा मुलगीच का बरे त्यांचा वृद्ध झाल्यावर सांभाळ करतात? बाकीचे त्यांना वाऱ्यावर सोडून देतात? मला वाटते यातच स्वत्त्वाचे उत्तर दडले आहे. माणूस स्पंजसारखे जे काही बरे-वाईट शोषून घेतो, तसेच त्याचे अथवा तिचे व्यक्तिमत्त्व घडते.

प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वेसावे

नवीन चतुरंगचे स्वागत

नवीन ‘चतुरंग’चे स्वागत आहे.  ७ जानेवारीच्या अंकातील सर्वच लेख चांगले आहेत ‘वार्धक्यरंग’ भा. ल. महाबळ या सदरातील ‘आजोबांची खेळणी’ हा लेख खूप आवडला. वार्धक्यातही मोकाशी व गोंधळेकर बालपणीच्या आठवणीतही किती आवडीने रमतात, त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे घालवतात. एखाद्याच्या घरात जर ताणतणाव असेल तर अशा वेळी त्यांचे दोन तास उद्यानात आनंदात जाऊ शकतात. ‘अनवट अक्षरवाटा’ या सदरातील डॉ. मीना वैशंपायन यांचा मागोवा हा लेख बोध घेणारा वाटला, पण आज बाहेर जरी स्त्रीला मान दिला जातो तो काही ठिकाणी घरात दिला जातो का, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच आहे.

बोधीवृक्ष या सदरातील ‘जीवनावर विश्वास’ या लेखातले ज्यांचा स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे, ज्यांचा जीवनावर विश्वास आहे, प्रकृतीवर विश्वास आहे तेच लोक सखोल विश्वासाच्या आधारावर आपला स्वत:चा मार्ग निवडू शकतात. हे वाक्य उद्बोधक वाटले.

चित्रा पालेकर यांनी लिहिलेला ‘शीर्षकाची गोष्ट’ व त्यांनी सुचविलेले ‘लगोरी’ हे नाव खूप आवडले. लहानपणीच्या आठवणी जागवल्या. पूर्वी लगोरी खेळताना ती फोडण्यात जो काही आनंद व्हायचा त्याला तोड नसे. ते पूर्वीचे दिवस आठवले.

डॉ. स्वानंदी राजे यांनी लिहिलेल्या ‘सक्षम ती समर्थ ती’ मधून शासनाच्या विविध योजना कळल्या. गावाला नदी आणि घरात मुलगी असायला हवी हे वाक्य सर्वाना पटायला हवे.

– भारती धुरी, मुंबई</strong>