‘लिंगभेदातील बदलत्या इमोजीस’ ११ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला हा रेणुका कड यांचा लेख अतिशय वेगळा व विचारपूर्वक वाटला. बदलत्या स्त्री प्रतिमा ही खरोखरच एक वेगळी सुरुवात आहे. स्त्री पुरुष समानतेचे युग येण्यास सुरुवात झालीच आहे. अजून काही वर्षांनी असे होईलच परंतु अजूनही त्यात बरेच अडथळे आहेत. त्यामध्ये बदलती सामाजिक परिस्थिती तसेच स्त्रीला बंधनातच ठेवण्यासाठीचा विचार व त्यांना प्रोत्साहन देणारे लोक सामील आहेत.

त्याचप्रमाणे करिअर व संसार दोन्ही करतानाची तारेवरची कसरत अनेकांना त्रासदायक वाटते. तरीही शिक्षणाने हुशार झालेली आजची स्त्री अडथळ्यावर मात करण्याची जिद्द ठेवते व त्याप्रमाणे कष्टाची तयारी ठेवून कौटुंबिक विश्वही सांभाळते. जाहिरातीतील स्त्रीसुद्धा बदलत आहे ठरावीक साचेबद्धता मोडून स्वत:च्या विचारांचे प्रतिबिंबही त्यातून दिसते. हे करताना  ही सामंजस्य व सद्भावनासारखी मूल्ये जपण्याचा तिचा प्रयत्नच हे जग अधिक चांगले करणार आहे.

बदलत्या इमोजीस ही एक चांगली सुरुवात आहे असे वाटते. सर्वानीच आवर्जून वाचावा असा हा लेख आहे. अभ्यासपूर्वक केलेले सर्वेक्षण व त्याचे निष्कर्ष  परिस्थितीतही अजूनही  बदल आवश्यक आहेत हेच सांगणारे आहेत.

प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

महाश्वेता देवी आदर्श आई

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष पुरवणीमध्ये डॉ. गणेश देवी यांनी लिहिलेला ‘आई’ हा लेख अतिशय आवडला. एकंदर संपूर्ण पुरवणी वाचनीय आहे. महाराष्ट्रात कणखर आजी म्हणून दुर्गाबाई भागवतांचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे बंगाली आजी म्हणून महाश्वेता देवी डोळ्यांसमोर उभ्या राहतात.

महाश्वेता देवींनी लेखिका, पत्रकार, शिक्षिका, ग्रंथकार, कादंबरीकार म्हणून नाव कमावले होतेच. परंतु समाजातील रंजल्या-गांजलेल्यांचे जतन, पालन, संगोपन अगदी आईप्रमाणे केले. त्यांचे प्रश्न मांडले, त्यांच्यासाठी लढा दिला. सरकारकडे सतत पाठपुरावा करून गाऱ्हाणी, तक्रार, दाद मागून गरिबांच्या समस्येकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळेच त्या आदर्श आई ठरतात.

-कीर्तिकुमार वर्तक, वसई

स्त्री शक्तीचा यथार्थ गौरव

४ मार्चची ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष’ पुरवणी स्त्रीशक्तीचा यथार्थ गौरव करणारी होती. प्रियदर्शनी हिंगे यांच्या ‘डार्क इज ब्युटिफुल’ या लेखातील नंदिता दास यांची चळवळ रंगाच्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी स्त्रियांना मार्गदर्शक ठरावी.

‘गोरी गोरी पान फुलासारखी छान..’ हे सहा दशकांपूर्वीचे भावगीत आज कानावर येत नसले तरी मनात कुठेतरी खोलवर बिंबलेले त्याचे पडसाद आजही कायम आहेत. विठू माझा सावळा म्हणत विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणारे घरी आल्यावर उपवर मुलासाठी अपेक्षा लिहिताना ‘मुलगी सुशिक्षित, सुसंस्कृत व गौरवर्णीय असावी’ असे आवर्जून लिहितात. खरे गोरेपण हे गुणांनी ठरते, रंगाने नाही, हे ज्यांना कळत नाही, त्यांच्या पदरी अखेर क्लेशच असतात.

सूर्यकांत भोसले

प्रेरणा मिळाली

४ मार्चची ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष’ पुरवणी संग्राह्य़ ठेवावी अशीच आहे. माझ्यासारख्या तरुणांसाठी तर प्रत्येक लेख हा प्रेरणादायी आहे. अतिशय सहज, सोप्या भाषेत असणारे हे उत्तम लेख ज्ञानातही भर घालणारे आहेत. असेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतील ही अपेक्षा.

-विशाल तुपे

अत्याचार आणि विद्वेष

आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरवणीत स्त्रियांनी केलेल्या कामगिरीचा आढावा उचितच होता. स्त्रियांवरील अत्याचार हा एक महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे. समस्येकडे दूषित नजरेने बघितले तर उपाययोजनेचा केवळ भ्रम निर्माण होतो. या समस्येचे उघड झालेले आणि दडलेले स्वरूप उलगडून बघितल्याशिवाय त्याची व्याप्ती आणि मूळ कारणे लक्षात येत नाहीत. भारतातील समस्येचे स्वरूप कसे आहे ते परिस्थितीतून, कलाकृतींमधील परिस्थितीच्या प्रतिबिंबातून आणि वर्णनांवरून दिसते. ‘शापित’ चित्रपटात कुलदीप पवार यांनी रंगविलेली व्यक्तिरेखा वेठबिगाराच्या पत्नीवर फसवून बलात्कार करते. यशवंत दत्त आणि मधू कांबीकर यांनी रंगविलेल्या व्यक्तिरेखा हा अत्याचार निमूटपणे आणि वारंवार सहन करतात.

‘शापित’ हा खूप गाजलेला आणि राष्ट्रीय पदक विजेता चित्रपट असल्यामुळे त्याचे उदाहरण दिले आहे. पूर्वीच्या कित्येक मराठी, हिंदी चित्रपटांत, तमाशापटात बडय़ा धेंडांना बळी पडल्याची आणि मूकपणे सहन केल्याची चित्रणे आहेत.  सर्व अत्याचारांचे मूळ पुरुषी मुजोर सत्ता आणि झुंडशाही ही मनोवृत्ती यात आहे, हेच चित्रपट, कथा, कादंबऱ्यांनीही दाखवले.

-राजीव जोशी

कायद्याला प्रबोधनाची जोड हवी

असुंता पारधे यांनी लिहिलेला ११ मार्चच्या पुरवणीतील लेख वाचला. समाजातील आजच्या महिलांच्या परिस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. जागतिक महिला दिन आला की विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या उच्च पदावरील महिलांचा गौरव होताना आपण पाहतो. पण अ‍ॅड. पारधे यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षित विधवेच्या घरात होणाऱ्या बदलाबाबत जाणीव करून दिली आहे.

कायद्याने प्रश्न मिटत नाही, त्याला प्रबोधनाची जोड हवी. आपल्या देशात फार चांगले कायदे आहेत, पण त्याबाबत जनजागृती नाही व प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासन समाज आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन काम करण्याची, सकारात्मक विचार करण्याची आज गरज असून त्यासाठी ‘चेतना महिला विकास केंद्रा’सारख्या अनेक संस्था निर्माण होणे गरजेचे आहे.

-मारुती बनसोडे, नळदुर्ग, ता. तुळजापूर