१ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला संगीता बनगीनवार यांचा ‘दत्तक एकल पालकत्व’ हा लेख वाचला. आजकाल एकल पालकत्व ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. अशा प्रकारे लेखाद्वारे, दत्तक घेऊ  इच्छिणाऱ्या लोकांचे शंकानिरसन झाल्यास चांगलेच आहे. आधीच्या लेखांपेक्षा हा लेख सरस वाटतो. यातील अमिता आणि भूपाली या वेगळी वाट, वेगळ्या पद्धतीने हाताळणाऱ्या व्यक्ती आहेत. दोघींचे अभिनंदन.

व्ही. डी. बुधवंत, पुणे</strong>

सकारात्मकता निर्माण झाली

‘दत्तक एकल पालकत्व’ हा लेखात प्रसिद्ध झालेली दोन्हीही व्यक्तिमत्त्व, भूपाली आणि अमिता  त्या त्या जागी उत्तुंग आहेत. त्यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. परंतु लेखात त्यांचे कर्तृत्व खूप कमी शब्दांत मांडले गेले आहे असे वाटते. सरळ सोप्या भाषेत त्यांनी मांडलेला दीर्घ प्रवास, मुलगी दत्तक घेण्यापासून ते त्याचं आणि सृजनचं नातं असं प्रगल्भ प्रवास पाहून दत्तक प्रक्रियेसाठी पुढे पाऊल टाकायचं धाडस, इच्छुकांना नक्कीच मिळेल. त्यांचा लेख वाचून सकारात्मकता निर्माण झाली आहे.

मूल दत्तक घेण्यासाठी प्रचंड पाठबळ हवे असते. असंख्य प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. पण आज त्यांचा प्रवास दीपस्तंभाचे कार्य करीत आहे. त्यांचे मनापासून कौतुक आहे. आज त्यांचा लेख, त्यांचे विचार, त्यांचे कार्य प्रेरणास्थान बनले आहे.

मुक्ता मोरे

कानमंत्र

‘कान सांभाळा’ हा २५ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला धनश्री लेले यांचा लेख अतिशय सुंदर आहे. दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक माणसे भेटतात, बोलतात, त्यांची मते मांडतात किंवा एक प्रकारे लादण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी इतरांचे मत ऐकून आपण आपले मन दूषित करतो तर कधी दुसऱ्याला दोष देतो. म्हणून आपण किती व काय ऐकावे हे आपल्या हातात आहे व ते ऐकून आपल्या मनाचा तोल ढळू न देता अगदी तटस्थपणे कार्य करणे महत्त्वाचे असते. तसेच आपण बोलतानाही विचारपूर्वक बोलणे आवश्यक आहे असे या लेखातून आपल्याला समजते. सर्वानीच हा लेख वाचून त्यावर चिंतन, मनन करावे व ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा.

अक्षयकुमार शिंदे, विश्रामबाग, सांगली.

क्षण क्षण महत्त्वाचा हे कळले

११ मार्च रोजी प्रसिद्ध झालेले पुरवणीतील सर्वच लेख अर्थपूर्ण, उद्बोधक!  ‘क्षणस्थ’ हा धनश्री लेले लिखित लेख मनाला खूपच भावला. मोक्ष म्हणजे काय? तो कशात दडलाय? प्रत्येक क्षण आपण भरभरून जगायला हवा. शब्द शब्दांनी जशी ओळ तयार होते, एकेक मोत्याने माळ तयार होते तसेच क्षणाक्षणाला, कणकण मिळून कुठली तरी कलाकृती तयार होत असते फक्त नजरेने ती टिपली पाहिजे होय ना? आपल्या वाटेला आलेला प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे कारण कोणास ठाऊक उद्या काय होणे आहे त्या क्षणांचे करून घ्यावे सोने..

– माधुरी लासूरकर, औरंगाबाद</strong>