२६ मार्चच्या पुरवणीमधील ‘काठी, वंशाचा दिवा वगरे, वगरे’ हा शर्वरी जोशींचा लेख वाचला. मुलगा कितीही नालायक, कर्तव्यशून्य आणि बेजबाबदार असला तरी, तो आपले नाव पुढे चालवणार आणि आपल्या वंशाचा उद्धार करणार या वेडगळ समजुतीतून अजून अगदी सुशिक्षित वर्गही बाहेर पडलेला नाही; मग अशिक्षितांचे तर विचारूच नका! माझ्या पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे आपल्या आई- वडिलांचा आपली मुले लहान असताना त्यांचं करण्यासाठी व्यवस्थित उपयोग करून घेतला जातो, कारण कितीही पसे मोजले तरी, आजी-आजोबांच्या मायेची सर मोलाने काम करणाऱ्यांच्या कामाला येत नाही. शिवाय पसेही वाचतात आणि मुले मोठी झाली की, आपला वेगळा संसार मांडला जातो. त्यावेळेला वय झाल्यामुळे आई-वडिलांना सोबतीची खरी गरज असते. पण वेगळे झाल्यावरही त्यांच्या इस्टेटीवर मात्र डोळा असतोच!

वंशाच्या असल्या दिव्यांना ‘दिवटे’ का म्हणू नये? काही अपवाद वगळता बहुतेक मुलींची आपल्या आई-वडिलांना मदत करण्याची इच्छा असते पण, अगदी कमावती असली तरी, नवरा आणि सासरच्या सहकार्याशिवाय ते शक्य नसते आणि करायचे म्हटले तर त्यावरून खटके उडू लागतात. आई-वडिलांप्रति असलेल्या आपल्या कर्तव्याचा हिस्सा जेव्हा मुलगी उचलू पाहते, तेव्हा विरोध करणारा नवरा आणि सासरची माणसे त्यांच्या इस्टेटीच्या वाटण्या करते वेळी मात्र समान हिश्शाची मागणी करतात, त्यावेळी हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला असतो.
– उज्ज्वला सु. सूर्यवंशी, ठाणे(पश्चिम)

संस्काराची शिदोरी
अ‍ॅडव्होकेट मनीषा तुळपुळे यांचा ‘दिल्या घरची सुद्धा.’ व शर्वरी जोशी यांचा ‘काठी वंशाचा
दिवा वगैरे’ हे दोन्ही लेख बदलत्या प्रवाहाचे
चित्रण करणारे आणि वाचकांना अंतर्मुख करायला लावणारे आहेत.
ज्या मुली, विशेषत विवाहित मुली आपल्या मातापित्यांना सांभाळत आहेत, त्यांच्या सोबत त्यांचे जोडीदारही आहेत हे कौतुकास्पद आहे. परंतु ज्या मुलांनी आपल्या मात्यापित्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी टाळली आहे, त्यांच्या सोबत त्यांची जोडीदारीण, जी एक मुलगीही आहे तीही जबाबदार आहेच.
दुर्दैवाने आज यासाठी कायदा करावा लागत आहे, सोशल मीडियावरून आवाहन करावे लागत आहे. ही खरंच खेदजनक बाब आहे.
उद्या, सरकारने जे लोक आपल्या मातापित्याचा सांभाळ करतात त्यांना आयकरावर अथवा गृहकर्जावर सूट दिली अथवा एखादी फायदेशीर योजना जाहीर केली तर आज हीच जबाबदारी झटकणारी मुले त्यासाठी मात्र नक्कीच धाव घेतील.
एवढेच म्हणावेसे वाटते की आपली कुटुंब व्यवस्थेतील संस्काराची शिदोरी कुठेतरी कमी पडत आहे आणि हे संस्कार देण्याचे काम कुटुंबातील वृद्ध अनुभवी लोकच चांगले करू शकतात. कुठल्याही डे केअर सेंटर अथवा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एकत्रित कुटुंबाचे संस्कार होऊ शकत नाहीत. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आज मातापित्यांना माणुसकीची वागणूक न देणाऱ्या पिढीला भविष्यात कदाचित यापेक्षाही भयाण अनुभवांना सामोरे जायची वेळ येऊ शकते.

– दीपिका सामंत, डोंबिवली

‘ताट द्यावे, पण पाट देऊ नये’
अ‍ॅड. मनीषा तुळपुळे व शर्वरी जोशी यांचे दोन्ही लेख वाचून मन विषण्ण झाले. मुले शिकली, पण सुसंस्कृत झाली नाहीत असेच म्हणावे लागेल. तुम्ही वृद्धाश्रमास भेट द्या, बहुधा उच्च शिक्षित, परदेशी मोठय़ा पगारावर असणाऱ्या मुलांचे आईवडील वृद्धाश्रमात भेटतील. शेतकऱ्याचे आईवडील तेथे तुम्हाला औषधाला देखील सापडणार नाहीत.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी ‘नटसम्राट’ नाटकात कावेरीच्या तोंडी छान संवाद दिला आहे, ‘ताट द्यावे, पण पाट देऊ नये, तुम्हीतर दोन्ही देऊन बसलात.’ खरोखरच आज जेष्ठ नागरिकांनी लक्षात ठेवावा असा संवाद कुसुमाग्रजांनी चाळीस, पंचेचाळीस वर्षांपूर्वी लिहून ठेवला होता.
शर्वरी जोशींनी अनेक मुलींची व्यथा अचूकपणे शब्दबद्ध केली आहे. भाऊ असूनही अनेक मुली आईवडिलांच्या काळजीपोटी विवाहाशिवाय राहिलेल्या मी पाहिल्या आहेत. तसेच ऐन तारुण्यात पती गेल्यानंतर दुसरा विवाह न करता वृद्ध सासूसासऱ्यांची अखेपर्यंत सेवा करणाऱ्या सुनादेखील पाहिल्या आहेत.
आईवडील सर्व मुलांवर सारखेच संस्कार करतात, मग असे का व्हावे, हे एक कोडेच आहे?
– शिल्पा प्रफुल्लचंद्र पुरंदरे,
वेसावे, मुंबई</p>

 

पालकांनीही याचा विचार करावा

पालकांना विवाहित मुलीकडे पोटगी मागण्याचा हक्क आहे या न्यायालयीन निकालासंबंधीचे लेख वाचले. त्यात स्पष्टपणे न आलेले काही मुद्दे मांडण्याकरता हे पत्र.
१) भावनिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आíथक असे अनेक पदर असलेल्या गुतागुंतीच्या या विषयात कायद्यामुळे समस्या सुटेल की आणखी जटिल होईल हे सांगणे कठीण आहे. मुळात भावनिक/कौटुंबिक पातळीवर ज्या गोष्टी सहज व्हायला हव्यात त्या इतक्या गुंतागुंतीच्या का होतात, त्या तशा होण्यात वृद्ध पालकांचा (आई-वडील म्हणून व सासू-सासरे म्हणूनही) वाटा किती असतो, हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. (वृद्धापकाळातील समस्या निर्माण होण्यापूर्वी पालक आपली मुले, सुना, जावई यांच्याशी कसे वागत होते यातूनही परिस्थिती घडत/बिघडत असते.) विशेषत: सुनेच्या/जावयाच्या संसारात पालकांचे वागणे कसे असावे, त्यांची कर्तव्ये कोणती, काय करावे/करू नये यासंबंधी कायदा नसतो; पण त्याचाच परिपाक म्हणून पुढे मुले/सुना/जावई यांच्याकडून दुर्लक्षित होण्याची वेळ येते तेव्हा मात्र कायदेशीर बाबी पुढे येतात.
२) अशा तऱ्हेने कायद्याच्या स्तरावर गोष्टी दुर्दैवाने गेल्याच तर त्याकडे मुलगा/मुलगी अशा चष्म्यातून बघण्यात अर्थ नसतो. (मालमत्तेचा) अधिकार आणि (सांभाळण्याची) जबाबदारी हातात हात घालून येतील इतकेच पाहणे शिल्लक राहाते. त्यातही अनेक वृद्ध पालक अधिकार एकाला आणि जबाबदारी दुसऱ्यावर असे करताना दिसतात. त्यात योग्य काय यापेक्षा सोयीचे काय आणि ‘मऊ कुठे लागते’ इतकाच स्वार्थी विचार कळत-नकळत असतो, आणि जे अपत्य भिडस्त असेल ते त्यात भरडले जाते.
३) एखादे अपत्य नोकरीच्या ‘निमित्ताने’(!) परगावी/परदेशात असणे आजकाल सर्रास दिसते. अशा वेळी आपल्याच घरात किंवा गावात राहणाऱ्या अपत्याला गृहीत धरले जाते. आपापला नोकरी-धंदा सांभाळून विभक्त कुटुंबपद्धतीत तुटपुंज्या मनुष्यबळातही त्याने/तिने केलेल्या दहा गोष्टी विसरून न केलेली एखादी गोष्ट लक्षात ठेवली जाते. त्याच वेळी दूर राहणाऱ्या अपत्याने केलेली फोनवरची चौकशी किंवा १-२ वर्षांत चक्कर मारून ४-८ दिवस केलेली सोबत यानेच भारावून गेलेले अनेक पालक दिसतात. ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशा या वागण्यामुळेही समस्या निर्माण होतात.
आपण पाहिलेल्या जास्त पावसाळ्यांचा अनुभव वापरून नातेसंबंधांची अशी दलदल निर्माण होऊ न देणे हाच त्यावर खरा उपाय आहे. तशी दलदल एकदा निर्माण झाली की त्यातून बाहेर पडण्याकरता कायद्याच्या आधारे केलेल्या हालचालीमुळे पाय आणखी खोलात जाण्याचीच शक्यता जास्त असेल असे वाटते.
-प्रसाद दीक्षित, ठाणे