‘लेखामुळे विचारांमध्ये स्पष्टता आली’
‘डान्स बार एक कटाक्ष’ हा अत्यंत अभ्यासपूर्वक आणि चिंतनशील विचारांनी परिपूर्ण असलेला लेख वाचून अक्षरश: आवाक झालो. या विषयावर अनेकांनी पूर्वीही लिहिले, बोलले आहे, पण इतका अभ्यासपूर्ण लेख वाचनांत आला नव्हता. आपण व्यक्त केलेल्या विचारांशी मी १०० टक्के सहमत आहे. लेखामुळे माझ्या विचारांमध्ये पूर्ण स्पष्टता आली आहे.
मुळातच या विषयाची पाळंमुळं मानवी संस्कृतीत किती खोलवर दडली आहेत याचं आपण केलेलं सोदाहरण विवेचन थक्क करून टाकणारं आहे आणि म्हणूनच ते संपूर्णपणे पटतं. स्त्री-पुरुष नातेसंबंधाचा हा संवेदशील गुंता किती हळुवारपणे सोडविला पाहिजे याची जाणीव समाजात जेवढी प्रखरपणे व्हायला पाहिजे तेवढय़ा प्रमाणात ती होत नाही, हे सत्य आहे. याचे कारण आपल्या शिक्षण पद्धतीत आणि त्यावर निर्णय घेणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांच्या कुवतीत दडलेले आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे लैंगिक शिक्षणाची जर एकाच वेळी सर्वत्र अंमलबजावणी झाली तरच ही परिस्थिती आणखी १२-१५ वर्षांनी बदलेल.
आज वयात आलेल्या शाळा-कॉलेजांतल्या मुला-मुलींच्या वागण्या-बोलण्यात आलेला सहज मोकळेपणा जाणवतो, परंतु तो कायमस्वरूपी आणि सशक्त आहे की नाही याचे उत्तर ठामपणे देता येत नाही. याला कारण प्रत्येकाची वेगवेगळी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक पाश्र्वभूमी असू शकते. फक्त शिक्षण पद्धती नाही! स्वातंत्र्य, मोकळेपणा याला जरूर असलेले जबाबदारीचे अधिष्ठान ‘लग्न’ या व्यवस्थेमुळेच लाभू शकते याचं भान अजूनही दिसत नाही. हे हल्ली फटाफट मोडणाऱ्या लग्नांमुळे अधोरेखित होतंय असं वाटतं. असो.
‘बंदी’ हा कुठल्याही अनिष्ट वाटणाऱ्या गोष्टींवर रामबाण उपाय अशी ठाम मनोधारणा असलेले लोक जोपर्यंत बहुसंख्येने आहेत, तोपर्यंत तरी आपल्यासारख्यांच्या विचारांचे प्रसारण सातत्याने होणे आवश्यक आहे एवढे नक्की.
– प्रदीप अधिकारी

मूलभूत विचार करणारा लेख
‘डान्स बार एक कटाक्ष’ हा लेख वाचला. हा लेख मंगला सामंत यांच्या इतर लेखांप्रमाणेच मूलभूत विचार करणारा आणि ओघवत्या शैलीतला आहे. विशेषत: पुरुष अशा नृत्याचे पोशिंदे का होत आहेत, अशी कोणती त्यांची कामऊर्जेची गरज विवाह संस्था असूनही अपुरी आहे हे प्रथम तपासावं लागेल, हे म्हणणं एकदम पटलं. इतका मूलभूत विचार कोणी करतच नाही. लेखामुळे आदिवासी समाजातल्या स्त्री-पुरुष संबंधांच्या प्रथा, त्यांच्यातही विवाहानंतरच मिळणारे काही सामाजिक अधिकार आणि ‘डान्स बार’ला भेट देणारा पुरुषवर्ग, बारबालांची सुरक्षितता याविषयी अनेक प्रश्न मनात निर्माण झाले.
– विनया खडपेकर

निर्भीड लेखन
‘डान्स बार एक कटाक्ष’ हा मंगला सामंत यांचा लेख वाचला. वास्तवाला सर्वागाने भिडून लेखिकेने या प्रश्नाचे वस्तुनिष्ठ स्वरूप ‘लोकसत्ता’च्या वाचकांसमोर निर्भीडपणे ठेवले आहे. सर्व वाचकांच्या वतीने तुमचे आत्यंतिक आभार.
– अवधूत परळकर

वाचनीय लेख
मंगला सामंत यांचा ‘डान्स बार एक कटाक्ष’ हा ‘लोकसत्ता’मधील लेख खूपच आवडला. माणूस स्पर्शावर जगतो, वाढतो, फुलतो. स्पर्शाविना तो कोमेजतो. छान लिहिले आहे.
– फादर दिब्रिटो

सेक्स एज्युकेशन हवेच
मंगला सामंत यांनी ‘डान्स बार’ची निर्मिती कशी झाली याची मीमांसा ऐतिहासिक दाखले देऊन केली आहे. स्त्री-पुरुष यांच्या सार्वजनिक जीवनात एकत्रित राहण्यात नैतिक बंधने घालण्यात आली. त्याची कारणेही स्त्री उपभोग्य वस्तू म्हणूनच. रस्त्याने मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष बरोबरीने चालताना आजही समाज संशयाने त्यांच्याकडे पाहात असतो. त्यामागे लैंगिक शिक्षणाचा अभाव हेच कारण आहे. संतती नियमनासाठी संपूर्ण आयुष्य वेचून र. धो. कर्वे यांनी समाजकार्य केले. प्रबोधन केले. त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक चालवले. त्याला आज शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला अहे. त्यांनी ‘सेक्स एज्युकेशन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सांगूनही आज त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा ‘समाजस्वास्थ्य’ चांगले राहण्यासाठी समाज लैंगिक गुन्हेगारीतून, डान्स बारमधून मुक्त होण्यासाठी प्रथम पहिलीपासून बारावीपर्यंत शरीरशास्त्र विषयात सेक्स एज्युकेशन क्रमाक्रमाने शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘प्रबोधन आणि शिक्षण’ यातूनच आजचा समाज मुक्त सहजीवन जगू शकेल. तेव्हा सर्वानीच ‘सेक्स’ एज्युकेशनसाठी सरकारकडे आग्रह धरावा.
– विजय पवार, सातारा

आयुष्याकडे निर्मळ भावनेतून बघण्याची गरज
‘डान्स बार एक कटाक्ष’ या लेखामुळे सध्याच्या तरुण पिढीच्या आणि एकूणच सर्वाच्याच मनात नैतिकता, अनैतिकता यांविषयी असणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल यानिमित्ताने होऊ शकेल. मोकळेपणातून निर्माण झालेल्या नात्यांना चारित्र्याच्या दांभिक चौकटीत न बसवता समग्र आयुष्याकडे निर्मळ भावनेतून बघण्याची गरज मंगला सामंत यांनी अधोरेखित केली. माझ्यासारख्या कॉलेजात जाणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पडलेले आहेत. कामवासनेकडे पाहताना प्रेम आणि आकर्षण यातला फरक आमच्या लक्षात येत नाही. आम्हाला मोकळेपणा शाळेतही कधी शिकवण्यात आला नाही. मोकळेपणा म्हणजे स्वैराचार नव्हे हे मी जाणतो. आपण हा समाजमनातील तुंबलेला विषय मांडलात याबद्दल खूप खूप धन्यवाद.
– नवनाथ गुंजाळ

समाज व्यवस्थेला आव्हान
मंगला सामंत यांच्या या लेखात लैंगिक असमानता, नातेसंबंध, लैंगिकता या विषयांवर एकत्रित नजर टाकलेली दिसली. वर्षांनुवर्षांच्या संबंधांवर संशोधनच जणू! पितृसत्ताक समाजामध्ये अशा पद्धतीचे लेख लिहून, या समाज व्यवस्थेला आव्हान देणं आणि आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन देण्याचे काम, तुमचे असे लेख करतात.
– जयश्री बेलवडे

मोकळेपणानं चर्चा व्हावी
‘डान्स बार एक कटाक्ष’ हा लेख वाचला. एक मोठा जटिल समाजशास्त्रीय प्रश्न आपण खूप सोप्या पद्धतीने मांडला आहे. या लेखावर खूप आणि मोकळेपणानं चर्चा झाली पाहिजे. मानसिकता बदलण्याची एक चळवळ यातून उभी राहिली पाहिजे.

– श्याम पाठक, पुणे

शाळाबाह्य़ मुलांचाही विचार हवा
‘डान्स बार एक कटाक्ष’ हा मंगला सामंत यांचा लेख खूप सविस्तर असून अभ्यासपूर्ण मांडणी केलेला आहे. लैंगिक शिक्षण देऊन नव्या पिढीस मोकळेपणा मिळेल, परंतु शाळा- कॉलेज सोडलेल्या तरुणांचा कोंडमारा होत आहे. त्यासाठी काय करता येईल.
– महेश निनाळे, औरंगाबाद

सर्वानाच मार्गदर्शक लेख
‘डान्स बार एक कटाक्ष’ हा अत्यंत विचारप्रवर्तक माहितीपूर्ण सामाजिक लेख, वाचून आनंद झाला. आपण समस्येबाबत केलेले विचारमंथन प्रस्थापित विचारांना, समाजाला, राजकीय व्यवस्थेला त्या समस्येबाबतीत मार्गदर्शक ठरावे, ही अपेक्षा!
– विश्वास आठल्ये

बदलासाठी वाट पाहावी लागेल
‘डान्स बार एक कटाक्ष’ लेख फारच आवडला. आपण लेखात लिहिल्याप्रमाणे आताची पिढी त्या दिशेने वाटचाल करतेय, मुलामुलींमधला मोकळेपणा लिंगभेदापलीकडे गेलाय असे जाणवते. ही गोष्ट चांगली आहे. त्यातून त्यांच्यामध्ये निखळ नाते स्थापन होते असे वाटते. एकमेकांमध्ये विश्वास आणि निखळ मैत्री होणे अपरिहार्य आहे. शिवाय ही पिढी प्रगल्भपण आहे असे मला वाटते. एकूण बदल होत चाललेत, परंतु काही काळ वाट पाहावी लागेल. कदाचित अजून एक-दोन पिढय़ा जाव्या लागतील, पण जरूर बदल घडेल एवढे नक्की!
– मोहन सकपाळ

नव्या पिढीसाठीही उपयुक्त माहिती
‘चतुरंग’ पुरवणी ही नेहमीच बुद्धीला खाद्य देणारी असते. १८ जूनच्या पुरवणीतील डॉ. कमलाबाई सोहनी याच्या कार्याचा विस्तृत आढावा घेणारा मधुवंती सप्रे याचा वाचनीय लेख, तसेच विक्रम गायकवाड यांच्यावरील शब्दांकन केलेला माधुरी ताम्हणे
यांचा लेख, सर्वच सुंदर. ‘उत्तररंग’ वाचनीय, मननीयही अशी पुरवणी. कमलाबाई सोहनींसारख्या
शास्त्रज्ञांची ओळख नव्या पिढीसाठी तर उपयुक्तच आहे. नेहमीच ‘चतुरंग’मध्ये नवीन माहिती वाचायला मिळते. वैद्य हरीश पाटणकर सोप्या भाषेत आरोग्य जागृती करत असतात.
– अरुणा ठोसर

शास्त्र व संस्कृतीचा फायदा सर्वानाच
‘आयुर्वेदाच्या स्मृती’तून या सदरात वैद्य हरीश पाटणकर यांनी दिलेली माहिती उपयुक्त व महत्त्वाची तर आहेच, पण वेगळी नि चांगलीही आहे. शास्त्र व संस्कृती या बाबी नीट समजून घेतल्या तर सर्वानाच लाभ होईल. ही वैचारिकता आधी जपली जायला हवी. आपण या प्रकारची लेखमाला कायम सुरू ठेवल्यास अनेकांना ती उपयुक्त होईल हे नक्की!
– माधव घुले, डोंबिवली