समर्पित वृत्तीने काम करणाऱ्यांची गरज
सुवर्णा गोखले यांचे अभिनंदन. ‘समानतेच्या नावाने चांगभलं!’, ‘समर्थ मी’ या लेखांतून त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवांचे सम्यक वर्णन वाचकांपुढे आले आहे. अभिनंदन आणि कौतुकसुद्धा; अशासाठी की, त्या माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. सुवर्णा गोखले यांनी सुरुवातीच्या काळात शिवरायांच्या मावळ्यांनी घोडय़ावरून दौड मारावी, तशा प्रकारे शिवगंगा खोरे, कच्च्या रस्त्यांवरून, दऱ्याडोंगरातून स्कूटरवरून अक्षरश: पिंजून काढले. त्यापायी त्यांना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागला. सुवर्णाताईंनी बचतगटांच्या माध्यमातून त्या भागातील शेकडो महिलांना संघटित केले आहे. महिलांचे सबलीकरण, त्यांच्या अस्तित्वाची; त्यांना जाणीव-जागृती त्यांनी ज्या निरलसपणे केली त्यामुळे आजच्या घडीला पंधरा ते साठ वयोगटातील महिला त्यांच्याभोवती कायमस्वरूपी जोडल्या गेल्या आहेत. आज त्यांच्यापैकी बऱ्याच जणी स्वत:चे बँकांचे व्यवहार सांभाळतात; काही अगदी डावा अंगठा उठवून! बचतगटातून कर्ज घेऊन छोटेमोठे व्यवसाय करतात, स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती त्यांना आहे. हे सर्व मी बघितले आहे, अनुभवले आहे. याचा अर्थ असा नव्हे की, काम पूर्ण झाले आहे. त्या स्वत: म्हणतात त्याप्रमाणे लोकशाहीचे आधारभूत मूल्य ‘समानता शिकवणं’ ही अनुभवांशी संबंधित गोष्ट आहे; परंतु असे म्हणावेसे वाटते की, त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभरणी झाली आहे. अनेक वर्षांची सकारात्मक पाश्र्वभूमी, वीस वर्षांचे अथक प्रयत्न, त्यांचे दिसून येत असलेले सुदृढ परिणाम या गोष्टींचे महत्त्व कमी नाही. पुढच्या पिढय़ा अधिक धीट आहेत, परिस्थितीचे वास्तव भान त्यांना आहे. हे आशादायी चित्र उमेद वाढवणारे आहे. गरज आहे ती समर्पित वृत्तीने काम करणाऱ्यांची.
– सिंधू जोशी, ठाणे

मुलाखतीचेही क्षेत्रही निवडायला हवं
११ जूनच्या पुरवणीमधला ‘दृष्टिआडची सृष्टी’ या सदरातला सुधीर गाडगीळांचा लेख अतिशय वाचनीय होता. ‘सुधीर गाडगीळ’ या नावाभोवती नक्कीच एक वलय निर्माण झालेलं आहे. अर्थात त्यांची चिकाटी, मेहनत, वर्तणूक, हजरजबाबीपणा, सखोल अभ्यास या गोष्टी आहेत म्हणूनच ते अनेक र्वष या क्षेत्रात टिकून आहेत.
आजच्या तरुणाईला अ‍ॅक्टिंग, मॉडेलिंग ही क्षेत्रे खुणावत असतात. डॉक्टर, इंजिनीयर होण्याचं ध्येय असतं. (अर्थात त्यांचीही देशाला गरज आहेच.) पण हे आव्हानात्मक, जनसंपर्क वाढून वेगवेगळ्या व्यक्ती- विविध क्षेत्रांतल्या त्यांच्या स्वभावातले कंगोरे, वैशिष्टय़ जाणून घेण्यात एक वेगळीच गंमत आहे. असं हे वेगळं क्षेत्र, माध्यम आजच्या तरुणाईला निवड करायला काय हरकत आहे, असं वाटून गेलं.
महाराष्ट्राची लाडकी दैवतं- लता मंगेशकर, आशा भोसले, पु.ल. देशपांडे,बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती रंगतदार, अभ्यासपूर्ण, रंजक करण्यात सुधीर गाडगीळांचा मोठाच वाटा आहे, कारण राजकारणी म्हटला की अगदी रूक्ष व्यक्ती आणि कलाकार म्हणजे लहरी अशा आपल्या कल्पना असतात, पण त्यांच्यातील अनोखे पैलू आपल्यासमोर उलगडण्याचे कौशल्य सुधीर गाडगीळांचेच आहे.
राष्ट्रपती ते रस्त्यावरच्या भंगारवालीपर्यंत सर्व स्तरांतल्या व्यक्तींना त्यांनी जीवनक्रमातून बोलकं केलेलं आहे ते आपण आणि त्यांच्यातील मोठा दुवा बनून. यावरूनच त्यांचे अनुभवविश्व किती समृद्ध आहे हे कळतं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की, त्यांच्याइतकी श्रीमंत व्यक्ती आज दुसरी नाही.
– प्रणीता रानडे, ठाणे</p>

श्रीकांतजींच्या विविध पैलूंचं दर्शन
प्रत्येक माणसाचे काही तरी वेगळेपण असतेच हेच उत्तरा केळकर यांनी ‘उत्तररंग’मध्ये श्रीकांतजींबद्दल लिहिले व वाचकांना माहिती नसलेल्या गोष्टींचे आकलन झाले. ते संगीतकार म्हणून मोठे होतेच, पण त्यांचे उर्दूवर प्रभुत्व होते. ते उर्दूमध्ये लिहीत असत व नंतर त्याचे ते हिंदीमध्येसुद्धा भाषांतर करीत. त्यांचा होमिओपॅथीचा चांगला अभ्यास होता. त्यांचे असे खास विश्व असे, ज्यामध्ये ते स्वत:ला नेहमी कार्यरत ठेवीत. अशा सर्वगुणसंपन्न संगीतकाराचे व गुरूचे अंतरंग वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम उत्तराताईंनी केले आहे. एक गुणसंपन्न माणूस गेल्यामुळे (कुटुंबाचे) समाजाचे व त्यांच्या हाताखाली शिकणाऱ्यांचे फारच नुकसान होते व ते कधीच भरून निघत नाही.
– किशोर श्रीवर्धनकर, नवी मुंबई</p>

लेख मनोमन पटला
‘अपेक्षांचा अडसर’ हा नीलिमा किराणे यांचा लेख मनोमन पटला. संसारात एकमेकांना समजून घेणे हाच खरा मार्ग असतो. ‘तू जी ले जरा’ हा प्रज्ञा ओक यांचा लेख खूप काही शिकवून गेला. ‘मनातलं कागदावर’ या सदरात दोन लेख आले आहेत, तेही खूपच चांगले आहेत. ‘आपलाची संवाद आपुल्याशी’ या सदरात माधवी गोखले यांचा ‘एकाकीपणाकडून एकांताकडे’ हा लेख एकटय़ा राहणाऱ्या महिलांनी आपल्या स्वत:ला कसं गुंतवून घ्यावं, हेच सांगणारा होता. ‘एकला चलो रे’ हे वासंती वर्तक यांचे सदर नेहमीच स्फूर्ती देणारे असते. ‘दृष्टिआडची सृष्टी’मध्ये सुधीर गाडगीळ यांचे आत्मवृत्त वाचनीय आहे. एकंदर संपूर्ण पुरवणी अतिउत्कृष्ट आहे.
– माधवी जोशी, ठाणे (प)

व्यसनाधीनता एक रोग
‘सैराट व्यसनाधीनता’ हा डॉ. सायली कुलकर्णी यांचा लेख वाचला. या लेखात त्यांनी व्यसनाधीनतेची लिंगनिष्ठ वर्गवारी, तुलना केली आहे. वास्तविक पाहाता व्यसनाधीनता हा एक रोग असून त्यांचा लिंगाशी कोणताही संबंध नाही असे वैद्यकशास्त्र मानते. आजपावेतो चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांमधील व्यसनाधीनता ही दृश्यस्वरूपात दिसत नव्हती. आज एका स्त्री वर्गाला आधुनिकतेची, स्वातंत्र्याची जोड मिळाली म्हणून त्यांची व्यसनाधीनता दृश्यस्वरूपात दिसू लागली. म्हणजे ती अमुक टक्क्यांनी वाढली म्हणणे हास्यास्पद आहे.
तात्पर्य, सदर लेखात लिहिल्याप्रमाणे, तंबाखू सेवनाच्या प्रकारातील मिसरी- भाजलेली तंबाखू पूड दातांवर घासून निकोटिन शरीरात शोषून घेणे या प्रकारातील व्यसनाधीनता भारतातील सर्वच भागांतील स्त्री-पुरुषांमध्ये खोलवर रुजलेली आहे. कदाचित आकडेवारी करताना याची नोंद खरीखुरी मिळणे कठीण असल्याने ती दृश्यस्वरूपात दिसत नाही. बाकी लेख माहितीपूर्ण होता.
– हेमंत पराडकर, मुंबई

मुलांची जबाबदारी पित्याचीही
‘मुक्ती आईपणाच्या ओझ्यातून’ हा लेख वाचनीय व अंतर्मुख करणारा आहे. पूर्वी बायका फारशा शिकलेल्या नसत. त्यामुळे करिअरचा प्रश्न नसे. त्या फक्त गृहिणी होत्या. पुरुषांच्या व समाजाच्या दृष्टीने ‘बायकांची अक्कल चुलीपुरतीच’ असाच समज होता. कर्त्यां पुरुषांचा धाक बायको, मुलांपासून साऱ्यांनाच असे.
काळ बदलला, स्त्री शिकली, करिअर करून स्वत:ला सिद्ध करू लागली; पण त्याबरोबर संसार, मुलं, सासू-सासरे यांना सांभाळून, आपल्या कर्तव्यात कसूर होऊ नये म्हणून ती नोकरी व संसार अशी कसरत करू लागली; पण पुरुषांची मानसिकता बदलली नाही. घर-मुलं हे पत्नीनेच सांभाळायचे या विचाराशी ते ठाम! त्यामुळे मुलं चांगली निघाली तर ‘ती माझी मुलं’, पण बिघडली, अगदी परीक्षेत कमी गुण मिळाले तरी त्याला जबाबदार स्त्रीलाच धरले जाते. ती संसारासाठी धरलेली नोकरी सोडूही शकत नाही. या सगळ्यात तिची मानसिक किती ओढाताण होत असेल, तीही एक माणूस आहे याची जाणीवच कोणाला नसते. तिच्या मनावरचे ओझे दूर व्हायचे असेल तर पुरुषांची मानसिकता बदलायला हवी. बायको हीसुद्धा एक माणूस आहे. मुलांची जबाबदारी आईबरोबर पित्याचीही आहे. याची त्याला जाणीव व्हायला हवी.
– स्मिता भलमे, पुणे</p>

माझं क्षितिज.. माझी चित्रं!
चित्रातली लावण्यनीती चित्राच्या संरचनेपासून, रंगसंगतीपासून एकजिनसी अभिव्यक्ती ठरेपर्यंत कार्यान्वित झाल्याचा अनुभव प्रथम चित्रकारास यावयास हवा आणि नंतर इतरांना.. हे महत्त्वाचं! हे सारं माझ्यात नकळतपणे जमा होत राहिलं, ते माझ्या भारतीय संगीताबद्दलच्या खोलवर पोहोचलेल्या आस्थेमुळं. ही गोष्ट माझ्या लक्षात आली, माझं कलाशिक्षण १९५७ मध्ये पार पडल्यानंतर वर्षभरातच.. एका नराश्यपूर्ण क्षणी केलेल्या चाळ्यातून! कुंचल्याच्या साहाय्याने विविध आकार रेषाबद्ध करण्यात मी गढून गेलो आणि याच प्रयत्नांत मला सापडलं माझ्या चित्रशैलीचं बीज!