पुलंचे ‘ते’ चित्र हवे होते
‘दृष्टीआडची सृष्टी’ या सदरात ११ जून रोजी ‘बोलता बोलता’ सुधीर गाडगीळांनी जे सोनेरी क्षण वेचले ते वाचताना एक आनंद मिळाला. संपूर्ण लेख परत परत वाचवा असा जमलाय. विशेषत: नाटक, सिनेमा, संगीत आणि लेखन अशा सर्व क्षेत्रांत आपला ‘पुलं ठसा’ उमटवणाऱ्या पुलंनी महात्मा गांधींचे चित्र काढले हा किस्सा वाचताना पुलंबाबत असलेला आदर अधिक वाढला. हा चित्र खजिना गाडगीळांच्या संग्रही आहे हे विशेष! लेखामध्ये पुलंचे हे चित्र समाविष्ट व्हावयास होते.
– मधु घारपुरे, सावंतवाडी

रागाची नव्हे जिव्हाळ्याची खुर्ची
रती भोसेकर यांचा शिकू आनंदे.. या सदरातील ‘रागाची खुर्ची’ हा आणखी एक सुंदर लेख (२८ मे) वाचला. मुलांना रूढार्थाने ‘शिस्त लावणं’ लेखिकेला जमलं नाही. मात्र लेखिकेच्या ‘रागाच्या खुर्ची’चा परिणाम इतका झाला होता की एके दिवशी लेखिका ऑफिस कामानिमित्त वर्गात खुर्चीत बसून काम करत असता एका मुलीने येऊन विचारलं, ‘‘बाई , तुम्ही रागाच्या खुर्चीत का बसला आहात? तुम्हाला राग आला आहे का?’’ या प्रसंगामुळे इथे आणखी एक गोष्ट समजते ती म्हणजे रागाच्या खुर्चीमुळेच मुलांमध्ये शिक्षकांबद्दल आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाला होता आणि त्याच भावनेपोटी मुलांनी आपल्या शिक्षिकेची विचारपूस केली होती. शिस्तीबरोबरच नकळत माणुसकीचं दर्शनही दिसत होतं. एका आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे गुरू-शिष्यांमधले अंतरही कमी झाले होते. खरे तर ‘रागाच्या खुर्ची’चे रूपांतर ‘जिव्हाळ्याच्या खुर्ची’मध्ये झाले होते. लेखिकेला कदाचित हेच प्रेरित असेल की प्रत्येक गुरू-शिष्य आणि पालक-पाल्य यांचं अशाच प्रकारचं जिव्हाळ्याचं नातं असणं आणि त्याची जपणूक होणं गरजेचं आहे. लेखिकेला मात्र ही ‘रागाची खुर्ची’ गुरू-शिष्यांमध्ये अनुराग निर्माण करण्यास सापडली हे नक्की!
– रविकांत तावडे, नवी मुंबई.

सामाजिक प्रश्नांची ‘चतुरंग’मुळे जाण
४ जूनच्या अंकामधील रेणू गावस्कर यांचा ‘आम्ही असू लाडके’ या सदरातील ‘अनिकेत नकुल’ हा लेख वाचला आणि टचकन डोळ्यांमध्ये पाणी आले. क्षणभर वाटले की, का करतात लग्न माणसं ऐकमेकांना न समजून घेता आणि त्यांच्या अशा निर्णयामुळे पुढे त्यांना झालेल्या मुलांना किती संकटांना सामोरे जावे लागते. काय चूक असते त्या मुलांची. असे लेख वाचून त्या मुलांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. अर्थात ‘चतुरंग’मुळे सामाजिक प्रश्नांची जाण होते आणि त्यातूनच ही इच्छा निर्माण झाली आहे.
– पोपट कोळेकर, कर्जत (अहमदनगर)

लैंगिक शिक्षणाने अनेक गोष्टी साध्य
११ जूनला प्रसिद्ध झालेल्या मंगला सामंत यांचा ‘डान्स बार : एक कटाक्ष’ हा लेख राजे रजवाडे, पूर्वीचे धनिक आदींच्या श्रमपरिहारासाठी ज्या गणिका ठेवलेल्या असत, त्याचे आधुनिक रूप म्हणजे आजचे ‘डान्स बार’ याचा प्रत्यय आणून देतो. त्याकाळीसुद्धा विवाह संस्था असूनही अशा ‘श्रमपरिहाराची’ पुरुषांची गरज या गणिका भागवत असत. अगदी आजच्या आधुनिक काळातही या विषयावर चारचौघांत मोकळेपणे बोलणे, चर्चा करणे हे त्याज्य मानले गेले आहे. त्यामुळेच या विषयाबाबत आपल्या समाजात नको तितका चोरटेपणा आणि लपवाछपवी आढळते. त्याचा व्हायचा तोच परिणाम आपल्या समाजाच्या मानसिकतेवर झाला. जी गोष्ट लपवली जाते, तिच्याबद्दल जास्त उत्सुकता निर्माण होते आणि चोरटेपणाने त्या गोष्टीची माहिती करून घेण्याची इच्छा बळावते; जी विकृतीला जन्म देते. आजच्या संगणकाच्या दुनियेतसुद्धा दोन भिन्न लिंगी व्यक्तींची निखळ मैत्री असू शकते हे आपल्या पचनी त्यामुळेच पडत नाही. मोबाइलच्या आजच्या काळात आजच्या तरुण पिढीला निव्वळ योग्यच नव्हे तर, अनेक अयोग्य गोष्टीही एका क्लिकवर नजरेस पडतात. त्याचा व्यक्तिगणिक होणारा परिणाम आणि प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात, त्याचाच परिणाम म्हणजे वाढते लैंगिक गुन्हे! पूर्वीच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीला नाही म्हटले तरी जास्त मोकळेपणा मिळतो आहे. पण लेखात म्हटल्याप्रमाणे त्याला जबाबदारीच्या भानाचा लगाम असायलाच हवा आणि हे भान विकृत आणि कपोलकल्पित गोष्टींपेक्षा योग्य रीतीने, योग्य वयात मुला-मुलींना दिलेल्या लैंगिक शिक्षणाने साध्य करता येऊ शकेल आणि मानसिकरीत्या सुदृढ समाज निर्माण करण्यास मदत करेल. वासनारूपी वाफेचा निचरा होण्यासाठी डान्स बारसारख्या स्त्रियांचे शोषण करणाऱ्या आणि त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्या गोष्टींची मदत घ्यावी लागण्यापेक्षा अशी वाफ निर्माण होऊच न देणे जास्त श्रेयस्कर नाही का?
– उज्ज्वला सूर्यवंशी, ठाणे.

विचारप्रवर्तक लेख
मंगला सामंत यांचा ‘डान्स बार : एक कटाक्ष’ हा लेख वाचला. अत्यंत विचारप्रवर्तक माहितीपूर्ण सामाजिक लेख, वाचून आनंद झाला. आपण समस्येबाबत केलेले विचारमंथन प्रस्थापित विचारांना, समाजाला, राजकीय व्यवस्थेला त्या समस्येबाबतीत मार्गदर्शक ठरावे.
– विश्वास आठल्ये

पालकांची भूमिका महत्त्वाची
४ जूनचा लोकसत्तामधील ‘तंत्रज्ञानावर उतारा योगशास्त्राचा’ हा अंजली श्रोत्रिय व ‘ऐका या स्मार्ट च्या हाका’ हा संगीता वझे यांचा लेख वाचला. दोन्ही लेखांत परस्पर साधम्र्य जाणवते. दोन्ही लेख मनस्वी आवडले. माहिती तंत्रज्ञानाच्या अमर्याद व अनावश्यक वापरामुळे भावी पिढी शारीरिक व मानसिक रोगाचे भक्ष्य होत आहे. आपला लेख या टेक्नोसॅव्ही पिढीच्या पचनी पडणार नाही. कारण स्वत:चं भलंबुरं त्यांना कळेनासं झालं आहे. येथे महत्त्वाची भूमिका आहे सजग पालकांची. विज्ञान व तंत्रज्ञान हे मानव जातीस गरजेचे नव्हे आवश्यकच आहे. परंतु त्याचा वापर कधी, कसा, कोणी, किती करायचा याचे ज्ञान, भान नसेल तर महाभारतातील ब्रह्मास्त्राप्रमाणेच हे माहिती तंत्रज्ञानाचे अस्त्र भावी पिढीचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाही. आधीच हवा, अन्न, पाणी प्रदूषणाचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत. याव्यतिरिक्त आता अतिरिक्त माहिती तंत्रज्ञानाच्या गरवापराचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. यासाठी लेखात सांगितल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाचा मर्यादित व गरजेपुरता वापर व त्यासोबत आपल्या प्राचीन महान ऋषीमुनींनी दाखविलेल्या योगसाधना, प्राणायाम, सूर्यनमस्कार या मार्गाचे अनुकरण हाच यावरील रामबाण उपाय होऊ शकेल असे वाटते.
– सहदेव कुंभार

कायद्याचा पुनर्विचार करणे गरजेचे
‘विवाहाच्या अटी’ हा ४ जून रोजी अर्चना मोरे यांचा मुला मुलींची निवड करताना कसकशा अटी व कायदे बदलत गेले त्याचा आढावा घेतलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. तो वाचल्यानंतर ज्ञानात भर पडली तसेच तो विचार प्रवर्तकही वाटला. विशेषत: समारोप करताना त्यांनी या गोष्टींची योग्य नोंद घेतली की विवाह कायद्यामध्ये गरजेनुसार व परिस्थितीनुसार बदल होत गेले आणि तसे ते व्हायलाही पाहिजेत. परंतु सध्याच्या बदलत्या परिस्थितीत जसे की कुमारी मातांचा प्रश्न, मुलामुलींची नको त्या वयातील शारीरिक जवळीक पाहता कायद्याने मुलीचे वय १८ झाल्याशिवाय लग्न न करण्याच्या कायद्याचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले आहे काय याचा विचार करणे गरजेचे आहे.
– प्रसाद भावे, सातारा
समाजव्यवस्था बदलायला हवी
साधारणपणे ५० वर्षांपूर्वीचा काळ बघितला तर समाजात अर्निबध व्यसनाधिनता नव्हती. समाज बंदिस्त होता. लहान मुलगा अथवा मुलगी गैर वागताना दिसला की समाजातले (फक्त कुटुंबातले नव्हे) वडिलधारे त्याला तिथेच हटकत असत. घरच्यांना ते गैर वाटत नसे. व्यसनाला प्रतिष्ठा नव्हती. मागच्या काही वर्षांत समाज मनात फरक पडला. समाज एककल्ली झाला. कुटुंबं बंदिस्त झाली. घरात वडीलधारे राहिले नाहीत, त्यांच्या बरोबर त्यांचा वचकही गेला. ढासळत्या मूल्य व्यवस्थेत व्यसनं कधी प्रतिष्ठित झाली ते कळलेच नाही. त्यामुळे ही ‘सैराट व्यसनाधिनता’(२८ मे) नुसत्या प्रबोधनाने आटोक्यात येणार नाही. त्यासाठी समाजात योग्य ती व्यवस्था तयार करावी लागेल.
– रामचंद्र महाडिक, सातारा

बीज अंकुरे अंकुरे
‘‘उद्योजकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सुरू केलेल्या ग्राहक पेठ, कन्झुमर शॉपी आदी प्रदर्शनांतून खूप उद्योजिकाही घडल्या.. घडत आहेत. त्यातूनच स्त्रियांचं आर्थिक स्वतंत्र होत जाणं, स्वत:ला सिद्ध करणं मोलाचं ठरत गेलं.. उद्योगाच्या बीजातून वटवृक्ष उभा राहतो आहे.. पण ते करत असताना अनेकदा कसोटीचे प्रसंग आले, जिवलगांच्या मृत्यूंचेही प्रसंग घडले, पण ‘शो मस्ट गो ऑन’ हा मंत्र मनात घट्ट रुजवला असल्याने आत्तापर्यंतच प्रवास आनंददायी ठरला आहे..’’