‘चांगल्या कामाचे कौतुक करा’ हे लेखिका गीता ग्रामोपाध्ये यांनी शाळेत लिहिलेल्या पाटीवरील संदेशावरून एका चांगल्या विचारांचा वसा घेतला. इतकेच नव्हे तर वाचकांशी लेखाद्वारे संवाद साधून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे.
तसा मी कोकणस्थी संस्कारात वाढलेला असल्याने आमच्याकडील मानसबागेतील झाडाला ‘स्तुती सुमने’ क्वचितच उमलत असत. पण मला सासुरवाडी सारस्वत मिळाली. दोघांच्या घरातील संस्कारांत व वागण्यात बराच फरक. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची भरभरून स्तुती करायची पद्धत. त्यांच्या या पद्धतीचेच कौतुक म्हणून मी तो गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला व त्याचा चांगला परिणामही दिसून येऊ लागला. स्तुती करावी हे जसे बरोबर आहे तसेच ती करताना त्यातून दुसऱ्या कोणावर अनावधानाने का होईना टीका होणार नाही हेही पाहणे गरजेचे आहे. अशी स्तुती करताना शब्दरचना तोलूनमापून करणे गरजेचे आहे. काही वेळेला चांगले काम नसले तरी कामात सुधारणा केली जाण्यासाठीसुद्धा माफक केलेले कौतुक उत्तेजनासाठी उपयोगी पडते. थोडक्यात कौतुक करणे म्हणजे चांगल्या शब्दांचा वापर करून केलेली स्तुती. ते करताना कौतुक अंगलट येणार नाही याचीही दखल घेणे गरजेचे आहे.
– प्रसाद भावे, सातारा.

चांगली माहिती मिळाली
‘चतुरंग’ पुरवणीत विचारांना चालना देणारे लेखन असते. २८ मेच्या अंकात वैद्य हरीश पाटणकर यांनी ‘मीठ’ या विषयावर दिलेली माहिती आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक आहे. या पुढे आंबट, गोड, तिखट, तुरट व कडू या रसामुळे तब्येतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल यापुढे माहिती मिळाल्यास बरे होईल. नवोदित लेखकांना पुरवणीत अजून जास्त जागा मिळाली तर बरे होईल.
– सां.रा. वाठारकर, चिंचवड (पुणे)

स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला
मी एक पुरुष वाचक असून देखील मी ‘चतुरंग’ची चातकासारखी वाट पाहात असतो. या पुरवणीने ज्ञानात सर्वागीण भर पडते. शिवाय माझा पत्नी किंबहुना स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकच व्यापक झाला. अनेक प्रश्न कळाले. आमच्या पती-पत्नीच्या नात्यात आपल्या पुरवणीमुळे खूप मोठा बदल झाला. मी अनेक चतुरंग पुरवणींचा संग्रह करून ठेवला आहे. सर्वच सदरे वाचनीय, दर्जेदार असतात.
– महेश खरात