‘लोकप्रभा’ २९ जुलै २०१६ चा ‘पर्यटन विशेषांक’ विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळी काय, कसे पाहावे, वागावे याचे मोलाचे मार्गदर्शन करणारा तर आहेच, पण पर्यटकांनी संग्रही ठेवावा असा हा अंक आहे. लोकप्रभाच्या माजी संपादक वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखही वाचनीय आहेत.

मंदिर पर्यटनाबाबत सांगायचे तर, नुकताच नृसिंहवाडीवरून शिरोळ तालुक्यातील कोपेश्वर मंदिरात जाण्याचा योग आला. शिलाहार स्थापत्य शैलीचे अतिशय देखणे आणि वास्तुशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेले हे मंदिर आहे. पूर्ण मंदिर दगडी असून खांबांवर पौराणिक तसेच पंचतंत्रातील कथांवर आधारित कोरलेली लहान लहान शिल्पे आहेत. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम व देवदेवतांची शिल्पे आहेत. शिल्प पाहत मंदिराभोवती पुन्हा पुन्हा फिरावेसे वाटते. सातव्या शतकाच्या चालुक्य राजवटीत मंदिराची उभारणी झाल्याचे म्हटले जाते. सध्या बाहेरील बरीचशी शिल्पे, दगडी हत्ती हे भग्नावस्थेत पाहून मन विषण्ण होते. मंदिराच्या आवारातील फलकावर ‘हे प्राचीन मंदिर केंद्रशासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे संरक्षित घोषित करण्यात आल्याचे’ म्हटले आहे. राज्य तसेच केंद्राच्या पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक व प्राचीन परंपरेचा वारसा लाभलेल्या ऊन-पावसाचा मारा खात असलेल्या या शिल्पकलेची आणखी वाताहत होऊ नये म्हणून अशा अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रातील मंदिरांकडे विशेष लक्ष देऊन आपला हा प्राचीन ठेवा जतन करावयास हवा.
– मुरलीधर धंबा, डोंबिवली.

मध्यमवर्गीय नेहमीच भरडला जातो
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर ‘लोकप्रभा’च्या १५ जुलैच्या अंकातील सुहास जोशी – डॉ. अभय टिळक यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. मुख्य मुद्दा असा आहे की वेतन आयोगानुसार फक्त वेतनवाढ होते. कामाचे स्वरूप व दर्जा आणि कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता, इच्छाशक्ती, बोकाळलेला भ्रष्टाचार इत्यादी घटकांवर वेतन आयोग काहीच भाष्य करत नाही. कर्मचाऱ्याच्या राहणीमानाचा दर्जा थोडा का होईना उंचावतो. पण त्याच वेळी घरे, शिक्षण, प्रवास, घरभाडे, इत्यादी घटकांवर ही वाढ जिरून जाते. व पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती ३-४ वर्षांत येते.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना गुणवत्ता ही टिकवून ठेवावीच लागते. सरकारी नोकरीत मात्र सामान्य दर्जाचे किंवा कामचुकारसुद्धा निवृत्तीच्या वयापर्यंत नोकरीत राहतात. उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून वरचा दर्जा किंवा खास पगार वाढ देण्याची सोय नियमावलीत राहत नाही.

सध्या बँक, पर्यटन, कुरियर सेवा, ऑनलाइन बाइंग यामुळे जनता सरकारी सेवा घेण्याचे टाळते. सरकारी नोकरीत कॉम्प्युटरच्या वापराने तसेही टेबलावरचे काम कमीच झाले आहे. रेल्वेत तर खाजगी क्षेत्रांना बरीच कामे दिली आहेत.

काहीही असले तरी मध्यमवर्गीय भरडला जातो आहे. सातव्या आयोगाने काय होणार? इंजिनीअरिंग/ मेडिकल कॉलेजची फी (सरकारने मान्य केलेली) परवडतच नाही. मध्यमवर्गीयच या सर्व समस्यांना तोंड देत आपला सन्मान राखण्याच्या प्रयत्नात आयुष्य घालवतो. देशप्रेम, देशसेवा, इमानदारी, सचोटी, कायदा पाळणे, इ. गुणांना तो नेहमीप्रमाणेच चिकटून राहतो. त्याची सहनशक्ती त्यालाच वाढवून घ्यायची गरज भासते. त्यालाच त्रास व अपमान बऱ्याच प्रसंगी सहन करावा लागतो, तो व्यापारी बनू शकत नाही किंवा मंत्री होऊ शकत नाही. त्याचा पिंडच निराळा असतो. असे सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय सगळ्याच देशात असतात. यांची दखल मात्र कोणीच घेत नाही याची खंत वाटते.
– भाऊराव हेडाऊ, नागपूर.

वेतन आणि परफॉर्मन्स
दि. १५ जुलै २०१६ च्या लोकप्रभामधील ‘सातवा वेतन आयोग मध्यमवर्गीय मात्र महागाईच्या तोंडी’ हा सुहास जोशी यांचा लेख चांगला आहे.

केंद्र व राज्य सरकार यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस) अधिकाऱ्यांकडून चालविली जाते. सर्व खाती व विभाग हे सूत्रबद्धपणे योग्य रचनात्मक बांधून नियंत्रित ठेवणे हे त्यांनी व्यवस्थित करावे अशीच सर्व शासनकर्त्यांची अपेक्षा असावी.

आज सरकारची सर्व खाती/ विभाग माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या घोषणा करीत आहेत. अशा खात्यांमधून कोणत्याही परिस्थितीत ‘‘आज साहेब नाहीत उद्या या’’ हे वाक्य सांगितले जाणार नाही एवढी खबरदारी घेतली तरी सामान्य जनांना ते पुरेसे वाटू शकेल. त्याचबरोबर ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी नोटीस/ पत्रे पाठवून सामान्यांना विशिष्ट तारखेला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असतील, तेव्हा कार्यालयात उपस्थित होणाऱ्या सामान्यांची/ जनतेची कामे त्याच दिवशी पार पडतील अशी दक्षता संबंधित खात्यांनी घ्यावी. नाही तर होते असे की, नोटीस/ पत्र ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने गेलेले असते त्यांची अनुपस्थिती असली तर नोटीस असली तरी सामान्यांचे काम त्या दिवशी होत नाही. हे टळले पाहिजे. लेखात गुणवत्तेच्याच निकषावर आधारित वेतनवाढ असावी असे नमूद केले आहे. पण त्यासाठी धोरणात्मक निर्णय होण्याची आवश्यकता आहे.

गुणवंत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागातून आगाऊ वेतनवाढी देण्याची पद्धत होती. परंतु, २००६ साली जेव्हा ६ वा वेतन आयोग महाराष्ट्र शासनाने लागू केला तेव्हा आगाऊ वेतनवाढीबाबत कोणताही निर्णय जाहीर न करता ती पद्धत बंद झालेली आहे. शासनाने अधिकारांचे विकेंद्रीकरण केले तर ‘‘मंत्रालयातून आदेश आला तरच काम होऊ शकेल’’ असे अधिकारी सांगू शकणार नाहीत. त्यानंतर परफॉर्मन्स आपोआप येईल.
– मनोहर तारे, पुणे.

पर्यटन आणि सामाजिक जाणीव
लोकप्रभा पर्यटन विशेषांक (२९ जुलै) माहितीपूर्ण होता. मी भरपूर पर्यटन केले आहे. त्या अनुभवातून मला पर्यटकांना सुचवावेसे वाटते, की पर्यटन करताना त्या त्या भागातील अंधांच्या संस्था, आदिवासी आश्रमशाळा, वंचितासाठीच्या संस्था, अपंगांसाठीच्या संस्था, वृद्धाश्रम यांना जरूर भेट द्या. त्यांच्याबरोबर संवाद साधा. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपून घ्या. त्यांना कुणी तरी येऊन आपल्याशी बोलावेसे वाटते. त्यांचे चेहरे आनंदाने फुलून येतात. ते पाहून तुमचे मन कसे समाधानाने भरून येते, हे अनुभवा. तसेच आपले  पर्यटन आपणच आखले तर फारच स्वस्त पडते. आपल्याला हवे तेथे कमी-जास्त वेळ थांबता येते. पर्यटन होते आणि थोडीफार सामाजिक  जाणीवदेखील जपली जाते.
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वेसावे, मुंबई</strong>

शेफ आहेत की लेखक!
‘लोकप्रभा’चा श्रावण विशेष अंक वाचला. त्यातला ‘सह्यानुभूती श्रावणातली’ हा लेख आवडला. त्याचबरोबर विष्णू मनोहर यांचा भुट्टय़ाचा चिवडा आणि इतवारीतला बटाटे वाडा हा लेख विशेषत्वाने आवडला. कारण माझा काही काळ नागपुरात गेलेला आहे व त्यांनी वर्णन केलेला भुट्टय़ाचा चिवडासुद्धा मी खाल्लेला आहे. लेख वाचताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती अशी की विष्णूजीच्या लेखनशैलीत खूप बदल झालेला आहे. मी खूप वर्षांपासून त्यांचे लेख-पुस्तकं वाचते आणि आज मला प्रश्न पडला कीहे शेफ आहेत की लेखक. असेच वेगवेगळ्या विषयातील अंक उत्तरोत्तर काढत राहा, मनापासून धन्यवाद!
– विनिता झाडे, ई-मेलवरून

सापांविषयी सुंदर माहिती
‘वैज्ञानिक नागपंचमी’ हा १२ जुलैच्या अंकातील रुपाली पारखे-देशिंगकर यांचा लेख वाचला. लेख फार सुंदर आणि सापांविषयी अनेकानेक गैरसमज दूर करणारा आहे. या लेखाच्या निमित्ताने सापांविषयी उपयोगी माहिती मिळाली. लहानपणी आम्ही काही दोस्त मंडळी ‘अहो तुमच्या घरात साप शिरताना दिसला होता’ असे खोटे सांगून एखाद्याला त्रास देऊन गंमत पाहायचो आणि नंतर खरी गोष्ट समजल्यावर वडिलांनी दिलेला खरपूस प्रसाद खाल्ल्याचे पण स्मरते. असो. असेच लोकोपयोगी लेख ‘लोकप्रभा’मध्ये यावेत.
– चंद्रकांत लेले, भोपाळ, मध्य प्रदेश

चांगली अभिनेत्री, उत्तम लेखिका
‘लोकप्रभा’तील नेहा महाजनचे सदर नियमित वाचतो. तिने तिच्या लेखनातून मांडलेली निरीक्षणे मनाला स्पर्शून गेली. साधीसोपी पण मनाला भिडणारी तिची भाषा वाचून असे जाणवले की ती चांगली अभिनेत्री तर आहेच, त्याचबरोबर उत्तम लेखिकाही आहे. अभिनयाच्या क्षेत्रात असून इतके मर्मस्पर्शी लिखाण करणारे निदान माझ्या पाहण्यात तरी कुणी नाही. तिने लिहिलेले तिच्या बालपणाबद्दलचे, परदेशातील शिक्षणाबद्दलचे लेख मला अतिशय आवडले. तिने असेच नियमित लेखन करावे ही इच्छा.
– विशाल कुलकर्णी, ई-मेलवरून.

मालिकावाल्यांचं लक्ष कुठे ?
कलर्स मराठीचं मंबाजीला महत्त्व देणे चालूच आहे. तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत  बुडविल्या म्हणून तो फुगडी खेळला हाही तपशील दाखविला आहे. सध्या तीन दिवस झाले, तुकाराम इंद्रायणीकाठी उपवास करीत बसला आहे. मग तीन दिवसांनंतरही त्याची दाढी गुळगुळीत कशी? रोज त्याची दाढी कोण करून जातो? एरवी मालिकावाले फालतू तपशील दाखवितात पण उपासाला बसलेल्या तुकारामाची दाढी वाढेल हे त्यांच्या लक्षात येत नाही?
सुरेश देवळालकर

शर्करावगुंठित मात्रा
मालिकांच्या सादरीकरणातला बटबटीतपणा या विषयावर नव्याने लिहिण्यासारखे काही नाही. पण काही गोष्टी मात्र नव्या पिढीने विचार करण्यासारख्या नक्की आढळतात. उदाहरणार्थ काही मालिका-

पसंत आहे मुलगी – पंतसचिवांचा हेकटपणा आणि धार्मिकतेचा पोरकट अतिरेक यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारून घरातून बाहेर पडणं ऊर्मीला सहज शक्य होतं. पण असा आततायीपणा न करता नवऱ्याच्या घराला, माणसांना आपलंसं करून त्यांचं मन वळवण्याचा कठीण मार्ग तिने निवडलाय. मी आणि माझा नवरा-मुलं इतक्या छोटय़ा जगात रमणाऱ्या मुलींनी याचा जरूर विचार करावा. नांदा सौख्यभरे – सासूचा नीचपणा नवऱ्याला सांगून तिचा पाणउतारा करणं स्वानंदीच्या हातचा खेळ आहे. तिचा दीर-जाऊ तिच्या बाजूने आहेत. तिच्याजवळ भक्कम पुरावेसुद्धा आहेत. पण ती तसं करीत नाही. जाता-येता नवऱ्याच्या कानाशी लागून सासूच्या तक्रारी सांगणाऱ्या आणि एक दिवस नवऱ्याला घेऊन वेगळं घर करणाऱ्या आजच्या तरुण मुलींना हे जमेल?

ऊर्मीने बंडाचा झेंडा उभारून किंवा स्वानंदीने सासूचं पितळ उघडं पाडून मालिका संपली नसती, वेगळा ट्रॅक घेऊन सुरूच राहिली असती. पण या काही गोष्टी दाखवून मालिकेच्या निर्मात्यांनी आणि वाहिनीनेसुद्धा तरुण पिढीला एक शर्करावगुंठित (ूंस्र्२४’ं३ी)ि मात्राच दिली आहे.
– राधा मराठे