गणेश विशेषांक ९ सप्टेंबर २०१६ वाचल्यावर ‘गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच का’ या शंकेचे पूर्णपणे निराकरण होत नाही. अन्य संदर्भ चाळले असता मिळालेली माहिती अशी- गणेशाचे अनेक अवतार निरनिराळ्या दिवशी प्रकट झाले असे वर्णन पुराणांमध्ये आहे. पार्वतीने १२ वर्षे तप केल्यावर तिच्या पोटी भाद्रपद शुद्ध चतुर्थी (गणेश पुराण अध्याय ८२)  याच दिवशी वक्रतुंड अवतार झाला (मुद्गल पुराण खंड १)

शिव पार्वतींनी मृत्तिकेची मूर्ती करून गणपतीची उपासना केल्यावर तीच मूर्ती सजीव झाली. तो शंकराचा पुत्र झाला. त्याचा उत्सव वैशाख शुद्ध पोर्णिमेला होतो. (मुद्गल पुराण खंड ३) गणपती ‘विज्ञान गणराज’ या नावाने दत्ताच्या उपासनेसाठी गंगेच्या दक्षिण तीरावर राहिले. तेथेच ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मूर्ती स्थापना झाली (मुद्गल पुराण खंड २ ). दितीने गणेशाची आराधना केली तेंव्हा मूर्तीतून अतितेजस्वी असा गणेश अवतार ‘विघ्नराज’ या नावाने माघ शुद्ध चतुर्थीला प्रकट झाला (मुद्गल पुराण खंड ७).

तथापि भाद्रपदेशु. चतुर्थी या दिवशीच घरोघरी मृत्तिकेची मूर्ती करून गणेश पूजन करण्याचा विधी गणेश पुराणात आहे. आणि त्या दिवसाचे महत्त्वही विशेष आहे. (मुद्गल पुराणखंड ४). म्हणून महाराष्ट्रात भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा उत्सव वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर साजरा करण्याची प्रथा रूढ झाली असे उल्लेख सापडतात. याशिवाय गोलोकवासी श्रीकृष्णाने गणेशावतार धारण करून अनेक लीला केल्या व दुष्टांचा संहार केला. (ब्रह्मवैवर्त पुराण -गणेश खंड) दंभासुराचे नाशार्थ ऋद्धी सिद्धी पती, गुजसुराच्या नाशाकरिता पराशराचे पोटी जन्म, मोहासुराच्या नाशासाठी महोदर, कश्यपाच्या पोटी धुंढीराज, ज्ञानारीन्देत्याचे वधासाठी विष्णू लक्ष्मीपोटी अवतार, कामासुराच्या नाशासाठी विकट अवतार, विघ्नसुराच्या वधाकरिता पाश्र्वमुनींच्या गृही जन्म असे अनेक अवतार पुराणांमध्ये सांगितले आहेत. परंतु कोठेही तिथीचा उल्लेख नाही.
– अनिल ओढेकर, नाशिक.

संग्राह्य़, वाचनीय…
२ सप्टेंबरचा ‘लोकप्रभा’चा अंक मन आणि मेंदू यांना अपूर्वाई वाटावा असाच आहे. ‘राजभवनातील बंकरमागची शक्यता’ हा गणेश साळुंखे यांचा लेख त्यांच्या संशोधनवृत्ती, वैचारिक पात्रता, प्रगल्भता आणि कष्ट इ.चा निदर्शक आहे. गोविंद मडगावकर यांच्या १५० वर्षांपूर्वीच्या ‘मुंबईचं वर्णन’ आणि मोरो वि. शिंगणे यांच्या १२७ वर्षांपूर्वीच्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकाचा उचित, वस्तुनिष्ठ संदर्भ देऊन विनयाने आपले मत मांडले आहे. ‘लेक झाली साजरी’ लेखामधील सेहवागचा शोभा डेना मारलेला बाऊन्सर, ‘सिंधूवर गोल्ड मेडलचे प्रेशर आणू नका. ती तुमची ‘सून नाही’ असं बजावणारे सुज्ञ, ‘जगभरातून ट्विटरवर तुला मिळणारा सपोर्ट पाहून विश्व सिंधू परिषद सुरू आहे असं वाटतेय,’ अशी भावना व्यक्त करणारे, सिंधूच्या खेळात जीव अडकलेले क्रिकेटवेडे प्रेक्षक.. खंडेलवालच्या यशाबद्दलची मिश्कील. वास्तव प्रतिक्रिया, ‘साक्षी को ईश्वर मानते हुए,’ अशी क्रीडामंत्री शपथ यापुढे घेतील ही टिपण्णी, मुली देश बचाओ मिशनवर असे काळीजस्पर्शी कौतुक. वैशाली चिटणीस यांनी अत्यंत उत्कटतेने वास्तव शब्दांकित केलेय. ‘पडोसी’ कथा वाचताना वडिलांना शामने दिलेली प्रतिक्रिया आठवून डोळे भरून येतात. एक पावसाळी दिवस, मॉर्निग वॉकही वाचनीय! बाळाच्या कवच कुंडलाची गोष्ट नवमातांसाठी अत्यावश्यक! माज आलेल्या देशाला धडा शिकविण्याचा थरकाप उडविणारी निरोची कथा.. एकूणच अंक संग्रा.. वाचनीय.. नेहमीसारखाच पुन:पुन्हा वाचावा असा!
– अनुराधा गुरव, कोल्हापूर.

असे लेखच जागृती करतील
‘एक सुलक्षणी स्वप्न’ हा अरुंधती जोशी यांनी संवेदनशीलतेने लिहिलेला हा लेख फारच छान आहे. वास्तविक असला लेख पाचवी ते नववीच्या मुलांनी आवर्जून वाचावा किंवा त्यांच्या क्रमिक पुस्तकाचा भाग व्हावा असा लेख आहे. आजच्या काळात हे असे वातावरण गावपातळीवर सर्रास पाहायला मिळते. गावातील मोठय़ा मंडळींचीदेखील मानसिकता अशाच प्रकारची असते. ती असल्या लेखांनी केवळ अधोरेखितच होऊ शकते. ती बदलण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. हे काम कठीण असले तरी एखाद्या सामाजिक संस्थेने हातात घ्यावे. मनुष्यबळ, पैशाचे पाठबळ, अन् सुजाण कार्यकर्ते यासाठी तयार करणे काळाची गरज आहे.
– नरेंद्र देशपांडे, नांदेड.

आनंदाचे गाणे
‘सेलिब्रेशन’ हा नेहा महाजन यांचा लेख फार आवडला. स्वत:लाच उत्तेजन कसं द्यायचं, तणाव न घेता, लहानसहान गोष्टींची उगाचच काळजी न करता, आनंदात कसं जगायचं हे त्यांनी त्यांच्या लेखातून फार छान पद्धतीने सांगितलं आहे. अशा सुंदर लेखाबद्दल नेहा महाजन तसंच ‘लोकप्रभा’ टीमचे मनापासून आभार.
– गौतम कुमार, बेळगाव, कर्नाटक

समकालीन आवडते
‘लोकप्रभा’त दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या ‘समकालीन’ या सदरातून विनायक परब यांचा या विषयातील व्यासंग जाणवतो. विशेष म्हणजे ते हे नवे आविष्कार मोकळ्या मनाने (स्र्ील्ल ्रेल्ल ि) स्वीकारतात आणि वाचकांनाही स्वीकारायला सांगतात. या सुंदर लेखमालेबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद.

तर सुसंवाद शक्य
‘लोकप्रभा’मधील ‘स्वातंत्र्य आणि संवादाचे ओझे’ लेख छान वाटला. प्रत्येकाची समोरच्या व्यक्तीकडून काही ना काही तरी अपेक्षा असते, पण त्याचबरोबर त्याला काही तरी मर्यादापण असू शकते हे तो सोयीस्करपणे विसरलेला असतो. अपेक्षांच्या ओझ्यामुळे एखाद्याचे मन दुखावत असेल तर तो वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात ठरेल. म्हणूनच एकमेकांच्या अपेक्षा आणि स्वातंत्र्य यांचा आदर ठेवला तर सुसंवाद नक्कीच घडू शकतो.
– वैभव बारटक्के, ईमेलवरून.

विद्यार्थ्यांनी सजग व्हावे
२२ जुलैच्या अंकातील ‘रॅगिंगमध्ये वाढ पण तक्रारी कमी’ हा लेख वाचला. रॅगिंग करणाऱ्यांची दादागिरी, शैक्षणिक संस्था रॅगिंग मुळासकट उखडून टाकण्याबाबत उदासीनता, रॅगिंगचे बळी ठरलेल्यांना मानसिक-शारीरिक आधार देणारे कुणीही नसणे, र्निबध, सुव्यवस्था नसणे या समस्या गंभीर वाटत नाहीत ही रॅगिंग वाढण्यामागची कारणं आहेत. विद्यार्थी आहेत, मग हे चालणारच हा अनेकांचा दृष्टिकोन आहे. असे सगळे असल्यानंतर रॅगिंगमुळे अपमानित झालेल्यांची, रॅगिंगला बळी पडलेल्यांची काय हिंमत आहे घरात किंवा कुठेही तक्रार करण्याची! देशाची, समाजाची स्थिती काय आहे याबद्दल संपूर्ण विद्यार्थीजगत अनभिज्ञ आहे. अवांतर वाचन नाही. त्यामुळे परिपक्वता नाही. लैंगिक शिव्या खुलेआम दिल्या जातात. विशेष म्हणजे कुणीही त्यांना अडवत नाही. त्यामुळे याचा प्रसार वेगाने किंवा ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने होतो आहे, असं म्हटले तरी चालेल. विद्यार्थ्यांनी किमान सावरकर-आंबेडकर वाचायलाच हवे. आपल्याला देशासाठी-समाजासाठी काम करायचे आहे ही जाणीव रॅगिंग नष्ट करू शकते.
– सूर्यकांत शानबाग, बेळगाव

वाचनीय व उद्बोधक लेख
मी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाचा पूर्वीपासून वाचक आहे. हे फार उपयुक्त माहितीचे साप्ताहिक आहे. मी ५ ऑगस्टचा अंक वाचला. या अंकात ‘ऑलिम्पिक खेळ विजेते’ याबाबत फार उपयुक्त माहिती मिळाली. आज जगात भारताची लोकसंख्या १६ टक्के आहे. मात्र ऑलििंम्पक खेळात यशस्वी फक्त अर्धा टक्का आहे. हे वाढवण्याची गरज आहे. या अंकातील होमरुल लीग आणि स्वराज्य हे लेखही वाचनीय व उद्बोधक आहेत. टिळकांनी आपल्यात ज्वलंत जनजागृती केली व स्वातंत्र्य मिळण्यास हातभार लावला. स्वातंत्र्य मिळाले, परंतु सध्याचे राज्यकर्ते स्वराज्याचा गैरफायदा घेत आहेत. सर्व क्षेत्रात घोटाळे, लाचखोरी, अफरातफर याला ऊत आला आहे. त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
-माधव पाटील, जळगाव.

आपण वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढता. सर्व महानगरांना भेडसावणारी शहरी कचरा, ड्रेनेज पाणी, केमिकलचे दूषित पाणी, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा, पाण्याचा पुनर्वापर या विषयावर विशेषांक काढावा.
– अनंत घाणेकर, कल्याण.

‘लोकप्रभा’चा गणेश विशेषांक आवडला. याच विषयावर आणखी पुस्तकं समजली तर ती वाचायला नक्की आवडतील.
– सचिन वाघ (ई-मेलवरून)

‘लोकप्रभा’तील ‘महाभारताची कालनिश्चिती’ (१५ एप्रिल) हा लेख आवडला.
– प्रसाद देशमुख (ई-मेलवरून)

पारंपरिकता जपणारा अंक
श्रावण रुचकर विशेषांकातून (१२ ऑगस्ट) मेजवानीचं परिपूर्ण ताटच ‘लोकप्रभा’ने वाचकांसमोर सादर केलं. त्यामुळे श्रावणाचा आनंद द्विगुणित झाला. सध्या पास्ता, पिझ्झा, बर्गर या पदार्थाची तरुणवर्गाला तसंच लहान मुलांना चटक लागलेली आहे. त्या पाश्र्वभूमीवर ‘लोकप्रभा’ने हा विशेषांक काढून महाराष्ट्राची पारंपरिक खाद्यसंस्कृती जागृत ठेवण्याची मोलाची कामगिरी केली आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भ, इथल्या पारंपरिक खाद्यपदार्थाच्या कृती वाचूनसुद्धा तोंडाला पाणी सुटत होतं. इतक्या त्या अप्रतिम आहेत. त्या कृती देणाऱ्या सर्वाना धन्यवाद. कारण त्यांच्या लिखाणातून आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हीच भावना व्यक्त होते. या विशेषांकाने श्रावणातील हिरवाई, सणवार व्रतवैकल्यांच्या आनंद, ऊन पावसाचा लपंडाव हे सारं अनुभवलेल्या आमच्या आठवणींना उजाळा मिळाला.
– प्रणिता रानडे, ठाणे.