‘लोकप्रभा’चा यंदाचा दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणे वाचनीय होता. वेगवेगळे विषय हाताळत ‘लोकप्रभा’ नेहमीच उत्तम लेखांचा खजिना देत असते. ‘बिग डेटा’ या विषयावरील विज्ञानाशी संबंधित लेखातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. लेखात साधी, सहज भाषा असल्यामुळे तो समजण्यासही अतिशय सोपा होता. आजच्या ऑनलाइनच्या जमान्यातील मुख्य घटक म्हणजे यूटय़ूब. यूटय़ूब चॅनल्सचं पेव सध्या फुटलंय, हे रोजच्या रोज दिसून येतंच आहे. पण, सर्वसामान्य प्रेक्षकांना दिसतात त्या चॅनल्सव्यतिरिक्तही आणखी कोणकोणती चॅनल्स आहेत याविषयीचा यूटय़ूबवरील लेख वाचनीय होता. मालिकांच्या सेटबद्दल प्रेक्षकांना आकर्षण असतं. त्याविषयीचा वर्णनात्मक लेख आवडला. ‘काबूलमधील माझे दिवस’ हा आगळावेगळा लेख वाचून ज्ञानात भर पडली. खूप दिवसांनी असा लेख वाचला. या सगळ्यामध्ये लक्षवेधी ठरलाय तो सर्वेक्षणाचा लेख. ‘रेशनकार्ड ते पासपोर्ट.. बदलत्या कुटुंबाची बदलती गोष्ट’ हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. या लेखाचं शीर्षक वाचूनच लेखाबद्दल उत्सुकता वाटली. कुटुंबाची रचना बदलतेय. पिढय़ांमधील अंतर हा त्यामधील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शहराबाहेर, देशाबाहेर नोकरीसाठी राहणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेय. यामध्ये कुटुंबाचं काय होतं. एकत्र कुटुंबाची व्याख्या तर केव्हाच बदलली आहे. आता त्यातून निर्माण झालेल्या कुटुंबाचीही रचना हळूहळू बदलू पाहतेय. त्यावरील अतिशय महत्त्वाचा लेख सर्वेक्षणाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचला. बदलत्या कुटुंबाच्या रचनेबद्दल बोलणं, त्याविषयी चर्चा करणं खूप गरजेचं होतं. घराघरात याबद्दल चर्चा होत असेल की नाही माहीत नाही पण, त्याविषयीचा हा लेख वाचला नक्की जाईल.

– तेजल सरदेशमुख, पुणे.

अप्रतिम लेख

‘लोकप्रभा’च्या दिवाळी अंकातील ‘बिग डेटा बिग डॅडी’ हा लेख अप्रतिम होता. गुगलने रेल्वेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मोबाइलमध्ये प्रवेश केला आहे. याद्वारे गुगलने जणू भारतीयांच्या सवयी आणि आवडीनिवडी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. गमुगलचा रेल्वेद्वारे वायफाय सोयी सुविधा देण्याच्या योजनेमागे नक्की काय दडले आहे, या विषयावरील लेख ‘लोकप्रभा’मध्ये वाचायला आवडेल.
– धीरज पाटील (ई-मेलवरून)

उत्तम पंचनामा

दि. ११ नोव्हेंबरच्या अंकातील पराग फाटक यांचा ‘बॉलीवूड दिया परदेस’ हा लेख वाचला. यातले सगळे मुद्दे पटले. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेचा खऱ्या अर्थाने पंचनामा या लेखाच्या माध्यमातून झालेला आहे. यामध्ये आणखी दोन मुद्दे वाढवावेसे वाटतात. मालिकेतल्या वहिनीला म्हणजे निशा वहिनीला नोकरी सोडून घरात इतके कट करण्याइतका वेळ मिळतोच कसा? आजच्या नोकरी करणाऱ्या बायकांना स्वत:साठी थोडा वेळ मिळाला तरी पुरेसा असतो. पण, ती तर एकामागे एक कारस्थानं करणारी बाई. दुसरं म्हणजे गौरीचा शांतपणा अतिशय राग आणणारा आहे. ‘मुंबईची मुलगी’ असं ती सतत मिरवीत असते. मग त्याचा इंगा का दाखवत नाही कोण जाणे. तिच्या वहिनीची सगळी नाटकं तिला माहीत असूनही फाड फाड का बोलत नाही याचं आश्चर्य वाटतं. अशाच आणखी काही मालिकांचे पंचनामे वाचायला आवडली.
– सुलभा प्रधान, मुलुंड

उपयुक्त लेख

‘लोकप्रभा’च्या ११ नोव्हेंबर अंकातील वैशाली आर्चिक यांचा ‘घराला लुक देताना’ आणि प्राची साटम यांचा ‘आयुष्य वजा एक वर्ष’ हे लेख मनापासून आवडले. प्राची यांच्या लेखाला एक वेगळाच फ्लो आहे. वाढदिवस ही अतिशय साधी-सोपी संकल्पना घेऊन एका वेगळ्याच स्वरूपाचा लेख लिहिला आहे. त्यातलं ‘आपण फक्त मजा करण्यापुरते पैसे कमावतो.. घर चालवण्याइतके नाही’ हे वाक्य पटलं. पंचविशीचा टप्पा प्रत्येकासाठी वेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण असतो, याची पुन्हा एकदा या लेखाने जाणीव करून दिली. तर आर्चिक यांच्या लेखाने घर सजवण्याच्या भरपूर कल्पना दिल्या. छोटय़ा आणि साध्या गोष्टींमधूनही घर सजवण्याचा आनंद मिळू शकतो हे पटलं.

– अनिल माळी, नाशिक.

विशेषांक आवडला

‘रुचकर आणि शॉपिंग’ हा विशेषांक मस्त होता. दिवाळीच्या आधी दोन आठवडे हा अंक मिळाल्यामुळे त्याचा यंदा फायदा झाला. मोबाइल घेण्यात मला नेहमीच रस असतो. पण, त्याविषयीची खात्रीलायक माहिती फारशी कुठे वाचायला मिळत नाही. पण, या वेळी ‘लोकप्रभा’तील प्रशांत जोशी यांच्या लेखामुळे ती माहिती उपलब्ध झाली. पण मोबाइल, टीव्हीसारखंच वॉशिंग मशीन, फ्रीज, अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंविषयी माहिती मिळावी, अशी विनंती आहे. कारण दिवाळी किंवा सणासुदीच्या निमित्ताने अशा वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे त्या विकत घेण्याआधी त्यांच्याबद्दल माहिती वाचायला मिळाली तर ती फायदेशीर ठरेल.

– कुणाल सरोदे, गोरेगाव.

महाभारताचा कालनिर्णय – कौरव-पांडव कधी झाले?

काही महिन्यांपूर्वी महाभारताचा कालखंड ठरवणारा लेख आणि त्यावरची काही पत्रे ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाली. त्या सर्वामध्ये असे प्रतिपादन केले होते की, महाभारत खूप अलीकडे म्हणजे इ.स. चौथ्या-पाचव्या शतकात झाले, पण असे म्हणणे चुकीचे आहे.

विख्यात इतिहासकार चिं. वि. वैद्य यांनी महाभारताचे संपूर्ण मराठी भाषांतर लिहिलेले आहे. या प्रकल्पास बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पाठिंबा दिला व आर्थिक मदतसुद्धा केली. त्या वेळी हे पुस्तक वीस खंडांत प्रसिद्ध झाले व किंमत फक्त पंचवीस रुपये ठेवली. पुढे न. र. फाटक यांनी त्याची साक्षेपी आवृत्ती १९२१ मध्ये काढली. प्रकाशक चिपळूणकर यांनी या महाग्रंथात महाभारत कधी घडले यावर विवेचन केले आहे. महाभारतातील वेगवेगळय़ा प्रसंगांत महिना, तिथी वगैरे लिहून ग्रहताऱ्यांची स्थितीसुद्धा दिलेली आहे. वैद्य यांनी त्याचा अभ्यास करून खगोलशास्त्राच्या आधाराने आकृत्यांसहित असे मांडले आहे, की महाभारतीय युद्ध (कुरुक्षेत्रावरील) इ. स. पूर्व ३१०१ मध्ये झाले. हे विधान त्यांनी १८९२ मध्ये केले असे मानले तर ते ३१०१+१८९२ = ४९९३ वषार्ंपूर्वी झाले, असे मानता येते. हेच आता ३१०१+२०१६ = ५११७ वषार्ंपूर्वी कुरुक्षेत्रातील युद्ध झाले आणि युद्धानंतर लगेच युधिष्ठिर राजा झाला. येथपासून कलियुगास प्रारंभ झाला असे म्हणता येईल युद्धसमाप्तीनंतर अर्जुन सर्व शोकग्रस्त स्त्रियांना घेऊन परत राजधानीकडे निघाला; पण याच वेळी परक्या भूमीतून हजारो अभीर सैनिक आले. अनेक विधवा स्त्रिया स्वखुशीने त्यांच्याबरोबर जाऊ लागल्या. अर्जुनाने अभीरांशी युद्ध करण्यास आपले धनुष्य उचलले, पण काय आश्चर्य!  त्याला ते धनुष्य नुसते उचलणेसुद्धा जमेना. त्याने श्रीकृष्णास विचारले, असे का होत आहे? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले, हे अर्जुना, आता द्वापारयुग संपून कलियुग सुरू होत आहे. म्हणून तुमच्या विवाहित स्त्रिया पतिनिधनानंतर खुशाल परकीय पुरुषांबरोबर निघून जात आहेत. हे नव्या युगाचे – कलियुगाचे वेध सुरू झाले आहेत.

यानंतर काही वर्षांनी परीक्षित साप चावून मेल्यावर त्याचा मुलगा जनमेजय याने सर्पसत्र केले. हजारो सापांस मारून टाकल्याने प्रजा नाराज झाली व जनमेजयास पश्चात्ताप होऊन तो रानोमाळ हिंडू लागला. या वेळी कलियुगाचे परिणाम दिसू लागले. नंतर पांडवांच्या वंशजांचे राज्य संपले व पुढे मगध देशाचे राजे सार्वभौम झाले ते थेट चंद्रगुप्त मौर्यापर्यंत. असा कलियुग प्रारंभाचा इतिहास सांगितला जातो.
– घनश्याम कवी, पुणे-३०.

न्यूनगंडाचे बळी

दि. २३ सप्टेंबरच्या ‘लोकप्रभा’तील ‘प्रतिसाद’ सदरात विजय मराठे यांचे लिखाण ‘सर्वच भाषा संस्कृतोद्भव?’ वास्तवाला धरून व उद्बोधक आहे. मोगलांचे सातशे-आठशे वर्षे व ब्रिटिशांचे १५० वर्षांच्या राजवटीमुळे येथील काही जणांची मानसिकता न्यूनगंडात्मक बनली व विदेशातून येते तेवढेच खरे असे मानू लागली. वेद, त्याची भाषा संस्कृत व संस्कृतची लिपी देवनागरी हे प्राचीन आहेत; मात्र यावर शंका उपस्थित करणारे, वर म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांच्या कूटनीतीचे शिकार आहेत! बायबलमध्ये प्रभू येशू म्हणतात की, ‘‘ते काही नवीन सांगायला आलेले नाही, तर ते जे प्राचीन आहे तेच पुन्हा सांगत आहे!’’ प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन म्हणतात, ‘‘अमर्याद परमात्मा स्वत:ला थोडेसेच व्यक्त करतो आणि तेवढेच आमच्या तोकडय़ा, अशक्त मनाला कळू शकते!’’ जगात मानवांची उत्पत्ती केल्यानंतर, त्यांच्यासाठी घटना म्हणून वेदरूपी ज्ञान दिले गेले; ते किती प्राचीन आहे याचा अंदाज लावणे अवघड आहे. लोकमान्य टिळकांसारखे विद्वानही वेदांची उत्पत्ती फार तर पाच-साडेपाच हजार वर्षेच मागे नेतात, हे दुर्दैवी आहे!

मुळात ब्रह्म हा शब्द पुढे अब्राहम व इब्राहिम झाला, हे बरोबरच आहे! बृह म्हणजे विस्तार; ईश्वराने सृष्टी निर्माण केली म्हणून त्याला ब्रह्मदेव म्हणतात. असेच एक युरोपीय लेखक इमर्सन यांनी १८५७ मध्ये ‘अ‍ॅटलांटिक मंथली’मध्ये ‘ब्रह्मा’नामक काव्य प्रसिद्ध केले. त्यावर अनेकांनी आश्चर्य प्रकट केले. तेव्हा इमर्सन हसून म्हणाले होते, ‘‘त्यांना सांगा की, ‘ब्रह्मा’च्या ऐवजी ‘जेहोवा’ हा शब्द घाला, म्हणजे मग तुमचा गोंधळ उडणार नाही.’’ ‘‘एकोऽहि सत्, विप्रा: बहुधा वदन्ति-’’ हे यामागील स्पष्टीकरण आहे.
– श्यामसुंदर गंधे, पुणे