‘लोकप्रभा’ २ डिसेंबरमधील ‘कल्लोळपर्व -दोन’ हा ’मथितार्थ’ सर्वसामान्यांच्यात माजलेल्या खळबळीला समर्पक शब्दांत मांडणारा वाटला. खरं तर भ्रष्टाचार आणि त्यातून निर्माण होणारा काळा पसा हा जाचक करप्रणालीमुळे होतो हे उघड सत्य आहे. प्रत्यक्ष उत्पन्न कराचे दर विदेशांपेक्षा कमी वा जास्त असले तरी कर न भरण्याची मानसिकता, त्याच वेळी उत्पन्न ठरवण्याची क्लिष्ट पद्धत, सरकारदरबारी कामं करून घेण्यासाठी द्यावं लागणारं ‘मानधन’ जमाखर्चात बसवण्याची कसरत व त्याद्वारे कमीतकमी करदर कोष्टकात उत्पन्न बसवण्याचे प्रयत्न, करविवरणपत्रातील विसंगतींसाठी करनिर्धारण अधिकाऱ्यांची ‘समजूत’ घालण्याचं व्यवस्थापन, हे इथलं वास्तव आहे. तशीच क्लिष्टता आणि ‘आíथक व्यवस्थापन’ यांना इतरही अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत व्यापारी, उद्योजक तसंच सामान्य करदात्यांना सामोरं जावं लागणं या साऱ्यांमुळे जो काळा पसा निर्माण होत राहतो त्याला आहेत त्या चलनी नोटा बदलून त्याच किंवा अधिक मूल्याच्या नोटा चलनात आणून आळा कसा बसणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. त्यासाठी साधीसोपी पारदर्शक, संगणकीकृत करप्रणाली, करदरांची सुटसुटीत रचना हेच आवश्यक आहेत.

स्वतहून उत्पन्न जाहीर करून ४५ टक्के कर भरण्याची योजना ३० सप्टेंबर २०१६ ला बंद केल्यानंतर लगेचच चलनी नोटा रद्द करण्याचं पाऊल उचलल्यानं त्यात भाग न घेतलेल्यांना पश्चात्ताप होऊ शकतो आणि त्यातून दंड वगरे धरून ४५ टक्क्य़ांपेक्षा जास्त कर भरला जाऊ शकतो. पण असे किती असणार? येऊ घातलेली सेवा व वस्तू कररचना जी जास्त क्लिष्ट न करता राबवली गेली, व्यवहार त्या त्या वेळी करनिर्धारणासाठी सादर केले गेले व वेळेतच त्यांचं करनिर्धारण केलं गेलं तर भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसू शकेल.

जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा मिळण्याला होणाऱ्या विलंबामुळे किरकोळ व्यापारी, भाजीवाले तसेच ग्राहक हवालदिल झाले हे खरं. विरोधकांनीही सरकारला ‘वेळ’ न दिल्याबद्दल धारेवर धरलं. पण हाही विचार केला गेला पाहिजे की नोटाबंदीला वेळ देऊन काळा पसा अन् बनावट नोटा बाहेर कशा येणार?

काळा पसा बाळगणारे सत्ताधारी धरून सर्वच पक्षांत असणार हे माहीत असलेल्या पंतप्रधानांनी स्वीकारलेला धोका समजून घेऊन आल्या आíथक प्रसंगाला सामोरं जाण्यातच देशाचं हित आहे असं वाटतं.
– श्रीपाद कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.

विचार न करताच निर्णय?
‘कॅशलेस, अद्यापही परिघाबाहेरच’ आणि ‘पावसानं तारलं -कॅश‘लेस’नं मारलं’ या दोन्ही कव्हर स्टोरी वाचल्या. दोन्ही लेख अभ्यासपूर्ण होते आणि निश्चलनीकरणाच्या पाश्र्वभूमीवर वेगळा दृष्टिकोन देणारे होते. निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या परिघावर दडलेल्या अनेक विषयांचा मोदी सरकारने फारसा साकल्याने विचार केल्याचे दिसत नाही. नोटाबंदीचा निर्णय लोकप्रियतेला अनुसरूनच घेतल्याचे यातून जाणवते. मूलभूत पायाभूत सुविधा नसताना असे पर्याय अवलंबल्यावर काय होऊ शकते हेच यातून दिसून आले. नोटाबंदी करताना सुरुवातीला काळ्या पैशावर हल्लाबोल असे सांगितले, मग बनावट नोटांना अटकाव आणि आता कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जायचे असल्याचे सरकार सांगत आहे. हे सारंच अनाकलनीय आहे. आधी पायाभूत सुविधा विकसित करणे गरजेचे असते, मगच पुढील वाटचाल सुकर होते. पण आपल्याकडे अपरिहार्य परिस्थिती निर्माण केली गेली. त्यातून नवी व्यवस्था विकसित करायचा प्रयत्न सुरू आहे. होणार काय तर केवळ एक अर्धवट, अविकसित अशी कॅशलेस यंत्रणा हाती येणार आणि उद्या रोख चलन हाती येऊ लागले की मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न झाले नाहीत म्हणजे मिळवले. असो.. सध्या तरी या अर्धवट व्यवस्थेतच आपल्याला पुढे जात राहावे लागेल. दुसरे असे की कृषी क्षेत्रावर जगणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे. त्याचा फारसा विचार या सर्वामध्ये झाल्याचे दिसून येत नाही.
– जनार्दन भोसले, नागपूर.

बहारदार लग्न विशेषांक
‘लोकप्रभा’चे सर्वच विशेषांक उत्कृष्ट असतात. १६ डिसेंबरचा लग्नसराई विशेषांक आवडला. अंकाचा बाज सेलिब्रेशनचा असला तरी एकंदरीतच नव्या पिढीचं प्रतिबिंब त्यातून जाणवलं. व्हच्र्युअल कांदेपोहे, स्पिन्स्टर पार्टी, सेलिब्रेशनचे नवे फंडे हे लेख विशेष आवडले. आजची पिढी लग्न या विषयाकडे कसे पाहते हेच त्यातून दिसून आले. प्रांतोप्रांतीची लग्ने हा विभाग तर धम्मालच होता. भारताच्या विविधतेची एक सुंदर झलक पाहायला मिळाली. समुपदेशकांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं गेलं हे उत्तम.
– आकांक्षा माने, सोलापूर.

झगमगाटाचे कौतुक
आपल्याकडे सेलिब्रेटी म्हटलं की जणू काही देवच भेटल्यासारखे वाटते. त्यामुळे ज्यातत्यात सेलिब्रेटी असलाच पाहिजे असा नियम करून ठेवला आहे आपण. त्याचेच प्रत्यंतर आपल्या लग्नसराई विशेषांकात दिसून येते. अगदी मुखपृष्ठापासून. लग्न हा वैयक्तिक पण सामाजिक असा सोहळा. पण त्यातदेखील सेलिब्रेटी फोकस आवडला नाही. असो. आम्ही ते सोडून बाकी सर्व वाचले. उत्तम होते.
– नंदिनी काळे, पुणे.

येता जावळी, जाता गोवळी
‘लोकप्रभा’च्या ९ डिसेंबर २०१६ च्या अंकातील ‘येता जावळी, जाता गोवळी’ हा साईप्रसाद बेलसरे यांचा लेख चांगला आहे. पण त्यांनी प्रवास कसा कसा झाला याचा नकाशा जोडला असता तर ज्यांची असाच प्रवास करण्याची इच्छा आहे त्यांना उपयोग झाला असता. एकंदर पहाता आपल्याकडची प्रवास वर्णने / ट्रेकिंग वरचे लेख/ यामध्ये नकाशा का नसतो, ते कळत नाही.
– सुनील सरंजामे, चेंबुर, मुंबई.

‘लोकप्रभाच्या ९ डिसेंबरच्या अंकातील पलटवार, अमृततुल्य चहा, कार्पोरेट कथा हे लेख आवडले.   – प्रकाश पिराळे, बेळगाव.

‘कॉर्पोरेट कथा या सदरातील प्रशांत दांडेकर यांनी लिहिलेला पलटवार हा लेख आवडला.   – अशोक वर्देकर

कॅरम आवडला
क्रीडा म्हटले की क्रिकेट हे समीकरण ‘लोकप्रभा’ बऱ्यापैकी तोडताना दिसते. इतर क्रीडा प्रकारांना आपण चांगलीच प्रसिद्धी देता त्याबद्दल अभिनंदन. ९ डिसेंबरच्या अंकातील कॅरम विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील भारताच्या यशाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाचे प्रशिक्षक अरुण केदारे यांची मुलाखत मुद्दाम वाचली. मुलाखतीत काही त्रुटी असल्या तरी या खेळाची आपण दखल घेतली हे विशेष. असेच लेख प्रकाशित करावेत.
– सुनील वालावलकर, ठाणे.

वेगळी दृष्टी
रुपाली पारखे यांच्या ‘आसमंतातून’ या सदरामुळे नेहमीच्याच पाहण्यातला आसमंत वेगळ्या दृष्टीने उलगडला जात आहे. २५ नोव्हेंबरच्या अंकातील गाढव, रानडुक्कर आणि कुत्रा या प्राण्यांवरील लेख खरे तर आश्चर्याचा धक्काच होता. या प्राण्यांवर केवळ टिकात्मक बातम्या किंवा हेटाळणीच्या शब्दांमध्ये वापर इतपतच महत्त्व दिले जाते. या लेखामुळे या प्रजातींच्या मुळापर्यंत जाता आले. एकच खटकले. शिकारी कुत्रे हेदेखील जंगलाचाच घटक आहेत हे मान्य पण त्यांची वाढती संख्या ही जंगलाचे भूषण म्हणता येत नाही. पेंच (म.प्र.) मध्ये सध्या या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.
– अचला खाडिलकर, पुणे.

स्मार्ट सिटीतील प्रदूषणाचे वास्तव!
विद्यमान केंद्र सरकार नवनवीन योजना राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता स्मार्ट सिटी योजना आली आहे. देशभरातून काही निकषांच्या आधारावर मोजकी शहरे स्मार्ट सिटी म्हणून निवडायची व त्यांचा मूलभूत सर्वागीण विकास करायचा अशी ही योजना आहे. दि. १८ नोव्हेंबर २०१६ च्या ‘लोकप्रभा’च्या अंकात हा विषय वाचनात आला. तोंडाला रुमाल बांधून प्रदूषणापासून रस्त्याने फिरणारे स्मार्ट सिटीतील नागरिक असे मुखपृष्ठावरील चित्र बरेच काही सांगून जाते. सध्या दिल्ली वा देशाच्या राजधानीत प्रदूषणाची भीषण समस्या उद्भवली आहे. हे प्रदूषण पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहे व स्मार्ट सिटीचे खरे वास्तव सांगत आहे; पण प्रदूषणाची समस्या आता फक्त दिल्लीपुरती मर्यादित नाही, तर पुणे, सोलापूरसारख्या स्मार्ट सिटीत निवड झालेल्या शहरांतही उग्र रूप धारण करत आहे. मानवाची ही चूक आहे.
– शैलेंद्र चौधरी-पाटील, सोलापूर.