ख्रिसमसचे दिवस आलेत म्हणून सहज मुलीला ख्रिसमस कॅरॉलगीते ऐकवत होतो. तेवढय़ात तीच म्हणाली, ‘‘अरे आशु, आपलं ते मिसेस् मार्चचं गाणं असंच आहे ना!’’ आणि मग मला ‘चौघीजणी’मध्ये शांता शेळक्यांनी अप्रतिम अनुवाद केलेलं ते ख्रिस्ताचं प्रार्थनागीत आठवलं-

‘लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही

कुणी न ज्याचे देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही’

आणि मग ते गाणं म्हणताना आपसूक मनात ‘वा!’ उमटत राहिला. किती वेळा ऐकलंय, वाचलंय हे पुस्तक, हे गीत; तरी ‘वा!’ येतोच मनात..मुखात. का येतो? कोण आणतं? आणि ज्यांना हे वाचून ‘वा!’ म्हणता येत नाही, किंवा वाहवा देण्यासारखं काय आहे हे उमगत नाही, त्यांना तसं का वाटत नाही? रसिकता ही उपजत असते की ती साधना असते? वर्षभर पंचवीस लेख लिहिताना आपण हेच तपासत होतो की काय? फास्टर फेणे तुमचा-आमचा का आहे? संभाजी भगतची बंडखोर, फटकारणारी लकेर का लक्ष वेधून घेते? ‘गारवा’ हे गाणं सौमित्र कसा लिहीत गेला असेल? ‘विंचुर्णीचे धडे’सारखं गंभीर पुस्तक वाचताना मधेच गालातल्या गालात हसू का येत राहतं? निर्मितीचं ‘धरण’ आणि ‘गळ’ कसे असतात? इरावती कर्वे यांनी जे लिहिलंय त्यात स्पर्शाचं गाणंच घोळलं गेलंय यार! आणि लंपन-सुमीची ती गोष्ट मुळीच ‘सहजी’ घडणारी नव्हती! कंगना रनावतचा ‘फॅशन’ चित्रपटातला रॅम्प ग्रेसांपर्यंत कसा सहज उंचावत गेलाय..

‘वा म्हणताना’ सदराचा हा आजचा शेवटचा लेख लिहिताना मला सारखा स्मरतो आहे तो तुमच्या-माझ्यातला अदृश्य संवाद! पुष्कळ वाचक मला ई-मेलवर, फेसबुकवर नित्य भेटत राहिले. पण अनेक वाचक असे आहेत, ज्यांना मी कधी पाहिलेलं नाही; ज्यांना मी कधी भेटलेलो नाही. पण माझ्या एखाद्या कार्यक्रमानंतर, मुलाखतीनंतर, भाषणानंतर कुणी वाचक थोडा रेंगाळतो, माझ्याभोवतीची गर्दी ओसरेपर्यंत थांबून राहतो आणि मग नंतर थेट मिठी मारून म्हणतो की, तुमच्या सदराने मला धीर दिला! मला अर्थातच छान वाटतं. पण ते श्रेय मी माझ्याकडे घेत नाही. शब्दांच्या प्रतिभेचे ते एकसे एक धनी- जे या सदरात वर्णी लावून गेले आहेत, त्यांच्याकडे ती दाद मी ‘फॉरवर्ड’ करतो आणि म्हणतो, ‘‘साहेबांनो, धन्यवाद! तुम्ही होतात म्हणून हे सदर उभं होतं ताकदीनं.’’ त्या निर्मितीकडे मी आणि तुम्ही कधी आनंदानं, कधी दिङ्मूढ होत, कधी अभ्यासू संशयानंही बघत होतो.. आणि हे सदर घडत होतं. त्यामुळे सदरासोबत लेखक म्हणून माझं नाव छापून येत असलं वर्षभर; तरी तुम्ही सारेही सह-लेखक होतात या सदराचे! आणि हे मी क्लीअन्थ ब्रुक्सची ‘रीडर रीस्पॉन्स थिअरी’ मला माहितीये म्हणून म्हणत नाहीये; मनापासून म्हणतोय!

पण या ब्रुक्सवरून थोडं लिहायला सुचतंय ते लिहितो. हे सदर नक्की काय आहे, असा अभ्यासकांपैकी काहींना प्रश्न पडला. काहींनी तो मला विचारला. काहींनी तो मनात ठेवला. आणि काहींनी अनुल्लेखानं टाळू पाहिला! तिसरी कॅटेगरी जाऊ दे; पण पहिल्या दोघांसाठी मला उत्तर द्यायला हवं. जरी सदरात आस्वाद होता, तरी मी समीक्षाच लिहीत होतो. ‘रिव्ह्यू’ तर नाहीच; पण आस्वादक समीक्षाही नाही. सैद्धांतिक समीक्षेचे सारे घटक मी ‘वा म्हणताना’मध्ये वापरले आहेत. फक्त मी परिभाषा आणि क्लिष्ट संज्ञांमध्ये स्वत:ला अडकू दिलं नाही. अरुणा ढेऱ्यांच्या कथेचं मी ‘पोलिटिकल रीडिंग’ करत होतो. पाककृतींच्या पुस्तकांवर लिहिताना मी ठरवून ‘जेंडर’ समीक्षेचा एक महत्त्वाचा घटक पुढे आणत होतो. झुंपा लाहिरीचा ‘बहुसांस्कृतिक डिस्कोर्स’ मी पुढे आणत होतो. आणि ‘यू-मर’ लिहिताना मी अ‍ॅरिस्टॉटलची कॉमेडीची सूत्रं डोक्यात पक्की ठेवलेली होती. पण मला माझ्या पांडित्याचं प्रदर्शन करायचं नव्हतं. आणि वाचकांना त्या जड संज्ञा वापरून ‘इम्प्रेस’ करण्यात मला रस नव्हता. मला ‘शेअर’ करायचा होता मला मिळालेला ‘युनिक’ असा आनंद! अरे यार, काय सचिन कुंडलकर हे प्रवासवर्णन लिहितोय! हे अनेकांना कळत नाहीये, की तो प्रवासवर्णनाची व्याख्याच विस्तारतो आहे. चल आशु, सांग ते वाचकमित्रांना! इरावती कर्वे यांचं स्पर्शाचं गाणं दिसतंय मला लख्ख.. सांगायला हवं हे लहान तोंडी मोठा घास घेऊन! आणि आशु, तुझ्या लाडक्या एलकुंचवारांचा तो लेख वाचताना थरथरतो आहेस तू आणि मागे मनात हसरी ज्युलिया रॉबर्ट्स दिसते आहे ना? मांड रे हे सगळं..

मग एकीकडे मी बुद्धिगम्य समीक्षेची धार धरून उभा राहायचो अन् दुसरीकडे जो आस्वादाचा लोंढा माझ्या मनात वाहत असे तोही वाहू द्यायचो. मग ते सगळं एकवटून मी लिहायचो तेव्हा शेवटी वाटायचं की, आपण केवळ समीक्षा-लेख लिहिला नाही; आपण ही कथाच लिहिलीय, कविताच लिहिलीय! आणि या व्यक्तिगत अनुभवामुळे मला आज समीक्षेची आस्वादक आणि सैद्धांतिक अशी घट्ट, अभेद्य वाटणी जी केली गेली आहे, त्याविषयी मनात प्रश्नचिन्हं आहेत. इंग्रजीत मी अगदी ‘प्रॅग्मॅटिक्स’ वापरून घट्ट सैद्धांतिक वळणाची समीक्षा लिहितानाही मूलत: त्यात आस्वाद घेत ती लिहिली आहे. समीक्षा म्हणजे आस्वादाचा अभ्यास असं मला वाटतं! अभ्यास न करताही उत्तम कविता, गीत तुम्हाला ‘वा!’ म्हणायला लावतं. मग अभ्यासानं त्यामधले बारीक बारीक पैलू दिसू लागतात. आणि ‘वा!’ म्हणण्याच्या शक्यता दुणावतात! दुर्दैवाने अभ्यासामध्येच हरवून गेलं की तो आतला स्वसंवेद्य रसिक मनाच्या तळघरात चिडीचूप निजून जातो. आणि उरतो तो फक्त काथ्याकूट. समीक्षा नाही! अर्थात याचा अर्थ मला या सदरात हे नेहमी साधलं असं मुळीच नाही. ग्रेसांवरील लेखाचे सरळ दोन भाग पडले. आणि अभिराम दीक्षित व उत्पल व. बा. यांच्यावर राजकीय समीक्षा करताना मी अनेक मर्यादा उगाचच माझ्यावर लादून घेतल्या!

पण तुम्ही होतात, ते लेखक होते, आणि मग हे सदर रंगत गेलं. आता जाणवतंय की, त्यात माझ्या व्यक्तिगत जगण्यातले कितीतरी धागे कधी बोलत, गप्पा मारत, तर कधी अगदी अदृश्यपणे विणले गेले आहेत. लोकांना ‘मुळारंभ’मधला ओम म्हणजे मी वाटतो. ते मर्यादेतच खरं. फारच मर्यादेत. (ओम हे खरं तर माझं लाँगिंग् असावं!) पण ‘वा म्हणताना’चा घाट समीक्षेचा असूनही त्यात मी आहे; आणि कदाचित त्यानेही सदराला जिवंतपणा आला असावा. पण तो जिवंतपणा यायचं खरं कारण तुम्ही वाचक आहात. फेसबुकवरचे माझे वाचकमित्र तर अक्षरश: माझ्यासोबत या सदराची पायवाट चालत आले आहेत! उपेंद्र जोशी, विद्याधर जोशी आणिही अनेक मित्रांनी नुसत्या पोस्ट शेअर केल्या नाहीत, तर त्यावर मार्मिक टिपण्ण्यादेखील केल्या आणि मला दिशा दिली, कधी अस्वस्थता दिली आणि कधी दिलासेही दिले! वाचकमित्रांनो, मनापासून आभार. आणि तसेच हृदयापासून धन्यवाद ‘लोकसत्ता’चे! आणि शेवटचं थँक यू माझ्या एका मित्राला. त्याला त्याचं नाव सांगितलेलं रुचणार नाही म्हणून ते लिहीत नाही. पण एखाद्या लेखावरच्या त्याच्या जाणत्या प्रतिक्रिया मला पुढचा लेख लिहायला उद्युक्त करायच्या; कधी त्या प्रतिक्रियाही पुढच्या लेखात उतरायच्या!

आणि हा निरोप! आणि तो कधीच सोपा नसतो! परवा मुलीला शाळेत घ्यायला गेलो तेव्हा क्रीडास्पर्धा सुरू होत्या तिसरीतल्या पोरांच्या. शर्यत संपली, पट्टा ओलांडला तरी एक गोड पोरगा त्याच्या नादात पळतच राहिला पुढे! सदर संपलं असलं तरी माझं आणि तुमचं ‘वा!’ म्हणणं थांबवायचं नाहीये.. थांबणार नाहीच! रसिकता आणि निर्मिती ही वर्धित होणारी गोष्ट असते-नाही? हा मागून शंकर महादेवन फार आतून गातोय.. ‘मनमंदिरा, तेजाने उजळून घेऽऽ साधका!’ खरंच की! मनाचं मंदिर तेजाने उजळून घ्यायचं असेल तर साधक व्हायला हवं! रसिकतेची साधना करायला हवी. निर्मिती होईल आपोआप! मन निवळ करायला हवं. पूर्वग्रह दूर ठेवायला हवेत. मागच्या लेखात विजया राजाध्यक्ष म्हणाल्या तसं उद्वेग व उद्रेक हे तात्कालिक विक्षेप मानायला हवेत. मग जो मुखातून, देहातून, प्राणातून ‘वा!’ उमटेल तो ओंकारासमान लखलखता असेल! ‘वा म्हणताना’ हे सदर त्या साधनेचं पहिलं पाऊल होतं. आणि अजून पुष्कळ प्रवास मला तुमच्या जोडीनं करायचा आहे. मधे थोडासा विराम विश्रांतीसाठी.. पुन्हा शक्ती मिळवण्यासाठी, इतकंच!

डॉ. आशुतोष जावडेकर ashudentist@gmail.com  (समाप्त)