साहित्य किंवा कोणत्याही कलेचा आस्वाद घेत असताना त्यातलं काहीतरी मनाला आत खोलवर भिडावं लागतं. तसं झालं की आपसूकच ओठांवर शब्द येतात.. ‘वा!’ हे तादात्म्य पावणं वा दाद देणं म्हणजे त्या कलाकृतीची समीक्षाच होय. या पाक्षिक सदरात या आस्वादाचा दरवळ वाचकांना अनुभवायला मिळणार आहे..

फिरायला कुणाला आवडत नाही? आणि जगभरातले लेखक भटकंतीनंतर जे लेखन करतात ते वाचायलाही अनेक वाचकांना आवडतं. सचिन कुंडलकर या सिने-दिग्दर्शक व लेखक असलेल्या उत्साही आणि दुर्मीळ जातकुळीच्या कलाकाराची ही ‘इस्तंबुल डायरी’ मी चौथ्यांदा का पाचव्यांदा वाचतो आहे आणि मनोमन वेळोवेळी दाद देतो आहे. पण म्हणून केवळ त्यावर मी या सदरात आज लिहिणार आहे असं नव्हे! काही कारणं.. निश्चित कारणं त्यामागे आहेत. पहिलं म्हणजे हे कुठल्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेलं लेखन नसून तो एक ‘ब्लॉग’ आहे आणि मग फेसबुकवर तो प्रसृत झाला आहे. आणि समीक्षेने आपली नजर आता केवळ पुस्तक, लेख वगैरेवरून हटवून इथेही टाकायला हवी. बदलत्या काळाची ती गरज आहे. नपेक्षा समीक्षाच कालबा ठरण्याचा धोका आहे. ब्लॉग : एक असं माध्यम- जिथे लेखक आणि वाचकामध्ये दुसरं कुणी नाही. प्रकाशक नाही नि संपादकही नाही. त्याचे फायदे आहेत. तोटेही आहेत. आजच्या लेखात या नव्या माध्यमाकडे नव्या नजरेनं मला बघायचं आहे. दुसरं सबळ कारण असं की, प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराकडे समीक्षक अनेकदा संशयाने बघतात. ते पुरेसं ललित आहे की नाही, हा अनेकांपुढचा प्रश्न असतो. पण खरं तर ‘प्रवासवर्णन’ हा काही एक गठ्ठा नव्हे. ‘ट्रॅव्हल गाइड्स’ आणि ‘ट्रॅव्हल लिटरेचर’ असे दोन प्रकार तर ठळक आहेतच; पण त्या दोहोंची सांगड घालणारं असंही प्रवासवर्णन ललित ठरू शकतं.
सचिन कुंडलकरचा हा ब्लॉग तर केवळ ललित लेखासमान नाही, तर एखादी विशुद्ध कविताच असल्यासारखा आहे. पण तरी त्यातलं प्रवासी संवेदन हरवलेलं नाही. ‘माहिती’ आणि ‘अनुभव’ यांचं अवघड गणित प्रवासवर्णनात लेखकाला साधावं लागतं. ते इथं अचूक साधलं आहे या धमाल लेखकाला! इस्तंबुलमध्ये आठ दिवस अपार्टमेंट भाडय़ाने घेऊन लेखक आणि त्याची मैत्रीण राहतात. ब्लॉगमध्ये त्या अपार्टमेंटचं जिवंत वर्णन आहे. तिथे बॅगमधले कपडे मुळीच कपाटात लावत न बसता लेखक घरभर यथेच्छ पसारा घालतो- आणि तिथेच ‘माहिती’चं ‘अनुभवा’त रूपांतर व्हायला लागतं. सचिन बॉस्फरसच्या खाडीची माहिती आधी देतो. त्या खाडीमुळे इस्तंबुलचा एक भाग आशियात आणि एक युरोपात कसा विभागला गेला आहे हेही समजावून सांगतो. पण जेव्हा पुढे तो विधान करतो की- ‘‘आपण पाश्चिमात्य आहोत की पौर्वात्य आहोत, या संभ्रमात सतत जगणारे हे शहर!’’- तेव्हा ते सारं चित्र सजग, जिवंत होतं. आणि नुसती ‘माहिती’ही लेखक रसाळपणे सांगू शकतोच की! जसं इस्तंबुलच्या खाद्यसंस्कृतीबद्दल लेखक सांगत जातो. ती भाज्या घातलेली ऑम्लेट्स, सलाड्स, कबाब, फिश सँडविच, आइस्क्रीमचे ठेले, चेस्ट्सनट्सची मजा थंडीत घेणारे स्थानिक, हजारो प्रकारच्या तुर्की मिठाया- हे सगळं लेखक चवीनं आपल्यापुढे अशा आत्मीयतेने मांडतो, की खात्री पटावी- सचिन कुंडलकर हे गृहस्थ पुरेसे खवय्ये असावेत! पण लेखकाला जशी केवळ ‘माहिती’ द्यायची नाही, तशीच मुदलात केवळ ती घ्यायचीही नाही. त्याला हवे आहेत जिवंत अनुभव. ‘आया सोफिया’ ही इस्तंबुलची ख्यातनाम मशीद. तिच्यासंदर्भात बोलताना त्यानं म्हटलं आहे- ‘‘माझं असं स्वप्न आहे, की पुन्हा एकदा आया सोफिया पाहायला जावे आणि त्या दिवशी चिटपाखरू नसावे.’’ गर्दी आणि रांगांमुळे पर्यटनादरम्यान रंगाचा बेरंग होतो हा आपलाही अनुभव असतोच. सचिनचं स्वप्न हे सद्य:कालीन पर्यटन-संस्कृतीच्या दुखऱ्या नसेवर बरोबर बोट ठेवतं.
आणि हा प्रवास, हा अनुभव तो एकटा घेत नाहीये! सई ताम्हणकर ही अभिनेत्री आणि तो असे दोघं मित्र-मैत्रीण हा सारा अनुभव एकत्र घेताहेत. त्याने अनुभवांना पाय फुटतात आणि ब्लॉगमध्ये तरुण चैतन्य येतं. कथेसारखं- अभिजात कथेसारखं म्हटलं तर आहे हे सारं! दोन पात्रं आहेत कथेत. निवेदक ‘मी’ आणि त्यांची मैत्रीण सई. मला सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर या दोन व्यक्तींविषयी काही बोलायचं नाहीये; पण ही त्या प्रवासी कथेमधली दोन पात्रं आहेत- त्याविषयी लिहायला हवं. त्या पात्रांमुळे या कथेत गंमत आली आहे. बघा ना, हा निवेदक काय म्हणतोय : ‘‘ती जवळजवळ इथे स्पॅनिश ग्रामीण मुलीसारखी वागते. ट्राममध्ये, समुद्राकाठी, कॅफेमध्ये ती अचानक नाचायला लागते. आणि मी ढिम्म पुणेरी मुलगा अशा वेळी चकित होऊन तिच्याकडे पाहत बसतो!’’ किती प्रसन्न, खेळकर असं संवेदन आहे हे! किंवा मग ‘सईला गब्दुल, सुंदर मांजर आवडत नाही. याचे कारण साहजिक आहे- एका ठिकाणी दोन नटय़ा राहू शकत नाहीत.’’ अशा वाक्यांत एकमेकांची खिल्ली उडवत प्रवास करणारे ते दोन ‘फ्रेंड्स’ आपल्यालाही तरणं करतात. (बाकी- ‘फ्रेंड’ या शब्दाला अशा संदर्भात अचूक मराठी प्रतिशब्द सांगा!)
एकीकडे त्याला ओरहान पामुक या प्रवासात नित्य आठवत असतो. चिंतनशीलता या प्रवासात उत्तुंग शिखरही गाठत असते. पण मधेच ही अशी मस्करीही लागतेच, नाही का! आणि सचिनला ठाऊक असावं, की त्याच्या त्या लाडक्या तुर्की लेखकानं- पामुकनंही म्हटलं नाहीये का? ‘After all, a women who doesn’t love Cats, is never going to make a man happy!’
हे असं मैत्रीचं प्रवास-नातं मराठीत नवखं आहे. ट्राममधली मुलगी लेखकाला ‘‘तुम्ही नवरा-बायको आहात का?’’ असं खाणाखुणांनी विचारते तेव्हा तो संकोचून जातो आणि हसून ‘नाही, नाही’ असं म्हणत बसतो. ती अपार्टमेंटमधला ओटा लख्ख धुते, भांडी साफ करते; आणि तो बाहेरचे ‘प्लॅन्स’ ठरवतो. ती उशिरापर्यंत झोपून राहते; आणि तो पहाटे बाल्कनीत बसून थंडी अनुभवत, कॉफी पिता पिता पेन्सिलीने लेख लिहितो. किती तरल, सुंदर, अभिजात असं मैत्रीचं दृग्गोचर न होणारं, पण ठायी ठायी जाणवणारं नातं सचिन कुंडलकरने या प्रवासी-कथेत फुलवलं आहे!
सचिन कुंडलकरचा निवेदक ‘मी’ आणि गंगाधर गाडगीळ किंवा पु. लं.च्या प्रवासवर्णनातला ‘मी’ यांत काही महत्त्वाचे भेद आहेत! एकतर बदललेल्या काळाला अनुसरून सचिनचा हा निवेदक सारे अनुभव बिनधास्त मांडत जातो. पूर्वी लेखकाला ते मांडायला सामाजिक अडसर मधे येत असणार. विशेषत: पु. ल. देशपांडे यांचा निवेदक हा ठरवून मध्यमवर्गीय, बावळा, वेंधळा, तत्कालीन वाचकवर्गाला आपल्यातला वाटेल असा आहे. हू नोज- पु. ल. आणि सुनीताबाईंनी असेही नाना अनुभव घेतले असतील- जे ‘अपूर्वाई’ किंवा ‘पूर्वरंग’मध्ये तत्कालीन समाजसंकेत पाळत उतरलेले नसतील. (सुनीताबाई त्यामानानं बिनधास्त असल्यानं त्यांनी ते लिहिले आहेत. माधव आचवल, त्या आणि पु. ल. पॅरिसमध्ये पहाटे तीन-चारला भयाण वस्तीत जाऊन कुठलंसं सूप पितात आणि गप्पा मारत परततात.. हे वर्णन पु. लं.च्या प्रवासवर्णनांत सापडत नाही!) सचिन कुंडलकरचा निवेदक आमच्या पस्तिशी-चाळिशीच्या लेखकपिढीला साजेल असा निखळ आणि बिनधास्त आहे- आणि हे फारच महत्त्वाचं आहे. आणि तो निवेदक हसता हसता एकदम असं काही सांगतो, की आपल्या अंगावर काटे येतात. ‘‘मला वाटले की आपल्या शरीराबाहेर वेगवेगळी शहरे आहेत, तसे एक आपल्या आत आहे. तिथले दिवे पेटलेले राहायला हवेत. मी चालणारं, श्वास घेणारं, जगण्याची धडपड करणारं एक शहरच आहे.’’
किती आशावादी, उभारी देणारे शब्द आहेत हे! आणि तशी त्या इस्तंबुलची आणि ‘आतल्या’ शहराची सुंदर छायाचित्रं त्या ब्लॉगमध्ये आहेत. इथे जसा संपादक नाही, तसाच कुणी बाहेरचा चित्रकारही नाही. सई आणि निवेदकाचा तो अॅब्सर्ड सेल्फी, पेन्सिलला धार दिल्यावर खाली कागदावर पडलेले तुकडे, पानगळ झालेला तो इस्तंबुलमधला रस्ता.. ती छायाचित्रं नुसती सुंदर नाहीत; तर कथनाला योग्य तो वेग ती देतात. कथनाला हवा तेव्हा विरामदेखील ती प्राप्त करून देतात.
तो ब्लॉग, त्यामधली सुंदर छायाचित्रं, ते इस्तंबुल, ती सई आणि तो निवेदक मग अशा व्याकुळ टप्प्यावर येतात, की तिथे ललित-अललित हे भेद पुसले जातात. प्रिया जामकरांची तितक्यात फेसबुकवर शेजारी पडलेली कविता मग या ब्लॉगशीही नातं सांगते..
‘हा सुगंध कसला पसरत आहे बंद घराच्या पाशी/
मी काल पेरली होती काही विदग्ध आपुली गाणी’
संगणकावरच्या एकेक खिडक्या बंद करून तो मालवताना मग ते सुगंधी इस्तंबुल आणि सचिनने पेरलेली ती विदग्ध गाणी मात्र मनात रेंगाळतात आणि न पाहिलेल्या अनेक शहरांची बंद घरं आपल्यासाठी म्हणून उघडी झाल्यासारखी वाटत राहतात!
डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com