सपाट, सरळ रस्त्यावरचा प्रवास सोपा असला तरी कंटाळवाणा ठरू शकतो. म्हणून मला कोकणातले रस्ते आवडतात. नागमोडी वळणाचे. घाटातून जाणारे. जे तुम्हाला प्रवासात जागं ठेवतात. तसंच आयुष्याचंही आहे. बरचसं मिळालं तरीही बरंच अजून बाकी आहे. म्हणून सकाळी उठून उत्साहाने कामाला लागता येतं. जगण्यातली गंमत कायम राहते. अजून खूप जगावंसं वाटतं..

लहानपण आठवायचं म्हटलं की माटुंग्याची रिझव्‍‌र्ह बँक कॉलनी आठवते. तिथल्या सार्वजनिक हॉलमध्ये होणाऱ्या लग्नसमारंभात ‘गोल्डस्पॉट’ पिणं ही चैन असायची. त्याचे बिल्ले गोळा करायलाही आम्हा मुलांना आवडायचे. साने गुरुजी कथामालाही तिथे ऐकायला मिळे. माझ्या काकांना इंग्रजी सिनेमे पाहायला आवडत. मलाही ते सोबत नेत. सिनेमा पाहून आल्यावर त्याची गोष्ट रंगवून, पदरचा मीठमसाला लावून सोबत्यांना सांगणं हा माझा आवडता छंद. नाटय़कलेची आवड माझ्यात उपजतच असणार हे आता जाणवतंय. शालेय अभ्यासाचा, विशेषत: गणिताचा मला तिटकारा होता. तसाच पुढे कारकुनी कामांचाही कंटाळा होता. त्यामुळे मी ऑफिसबाबू झालो नाही. नाटक हाच माझा ध्यास होता. शाळेत असताना मी ‘शून्याचा पराभव’ नावाची एकांकिका लिहिली होती. मात्र नंतर हातून फारसं लिखाण झालं नाही हेही तितकंच खरं.
सत्तरच्या दशकाच्या मध्यावरची गोष्ट. मी ‘बेस्ट’मध्ये नोकरी करत होतो. साहजिकच ‘बेस्ट’तर्फे राज्य नाटय़ स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकात मी असावं असं फार फार वाटायचं. दर वर्षी मी निवड प्रक्रियेत भाग घेत असे. परंतु कमी उंचीचं कारण देऊन मला डावललं जाई. एका वर्षी ‘दुसरा पेशवा’ या नाटकात मला एक अगदी लहान भूमिका करण्याची संधी मिळाली. माझं वय बावीस. भूमिका सत्तर वर्षांच्या ब्राह्मणाची. त्या पहिल्याच भूमिकेनं मला उत्तम अभिनयाचं रौप्यपदक मिळवून दिलं आणि त्यानंतरची वाटचाल सुकर झाली. आणि तीच वाट ठरली..
त्या वेळी होणाऱ्या जवळजवळ सर्व एकांकिका स्पर्धामधून दिग्दर्शक व अभिनयात चमकत होतो. ‘कालप्रवाह’, ‘रोपट्रिक’, ‘व्यासांचा कायाकल्प’,‘ होस्ट’, ‘कळसूत्र’,‘ आय कन्फेस’ अशा अनेक एकांकिका केल्या. ख्यातनाम लेखक प्र. ल. मयेकर हेही ‘बेस्ट’मधलेच. त्यांचं लेखन, माझा अभिनय व दिग्दर्शन अशी आमची छान जोडी जमली होती. अशी एकही स्पर्धा नव्हती की जी आम्ही जिंकू शकलो नाही. ‘नाटय़दर्पण’ स्पर्धेचा त्या वेळी दबदबा होता. सलग दोन वर्षे तिथे सवरेत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार पटकावला होता. तो तिसऱ्या वर्षीही मिळवून हॅटट्रिक साधायचीच या विचाराने प्र. ल. मयेकरांची ‘कळसूत्र’ नावाची एकांकिका सादर केली. ती उत्कृष्ट ठरणार यात वाद नव्हता. पण माशी शिंकली. एकांकिका दुसरी आली. परीक्षकही हळहळले. पण चूक आमच्याकडूनच झाली होती. एका उत्साही सहकाऱ्याने, सेटवर ऑपरेशन थिएटरच्या दरवाजावर चालू घडय़ाळ लावलं होतं. दोन तास चालणाऱ्या ऑपरेशनसाठी काळोख होऊन पुन्हा रंगमंच उजळतो तेव्हा घडय़ाळ मिनिटभरानेही पुढे गेलं नव्हतं. एवढी मोठी एक चूक सोडली तर बाकी सर्वच बाबतीत आम्ही सरस होतो. त्यामुळे दुसरे ठरलो. त्याच एकांकिकेत अवघा दोन मिनिटांचा प्रवेश असणारी भूमिका मी केली होती. तरी मी त्या वर्षीचा सवरेत्कृष्ट अभिनेता ठरलो. अशा कडूगोड प्रसंगांची रेलचेलच आयुष्यात गंमत आणत असते. मी त्याचा आस्वाद घेत होतो.
‘बेस्ट’ने चिं. त्र्यं. खानोलकरांचं ‘होती एक शारदा’ राज्य नाटय़स्पर्धेसाठी निवडलं. त्यात एका षोडशवर्षीय तरुणीची भूमिका आहे. नोकरी करणाऱ्यांमध्ये एवढी लहान दिसणारी मुलगी मिळणं कठीण. म्हणून त्या वेळी ज्या मुलीला ती ‘बेस्ट’मध्ये नसूनही या नाटकात काम करण्याची संधी मिळाली, तीच,अंजलीच पुढे माझी जीवनसाथी झाली. नाटकाचं विश्व, विशेषत: पडद्यामागचं विश्व त्यातील ताण, चुरस, अनियमितता हे सर्व तिने पाहिले असल्याने पुढे वेळोवेळी तिची समंजस सोबत मिळत गेली. या नाटकानेही राज्यात पहिलं येऊन बाकी अनेक पारितोषिकं पटकावलीच, पण मला आयुष्यभर पुरेल असा ठेवाही दिला.
‘वस्त्रहरण’ नाटकाचे दिग्दर्शक रमेश रणदिवे यांचा मी लाडका होतो. प्रलंचं ‘मा अस साबरिन’ हे नाटक स्पर्धेसाठी करण्याचं ठरलं. या नाटकाच्या नायकाचं वर्णन उंच, गोरापान, देखणा वगैरे. या व्याख्येत मी कुठेच बसत नव्हतो. अनेकांनी माझ्या निवडीबद्दल भुवया उंचावल्या. तरीही माझ्या अभिनयकौशल्यावर विश्वास ठेवून ती भूमिका मला दिली गेली. ते नाटक सर्व महाराष्ट्रातून पहिलं आलं. प्राथमिक व अंतिम फेरीत उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदकं मिळाल्यानं माझ्या निवडीचं सार्थक झालं.
पुढे ‘अथ मनुस जगन हं’ हे नाटक बाहेरच्या संस्थेतर्फे करायचं ठरलं. अर्थात तेही अंतिम फेरीत पोहोचलं. तेथेही पहिलं आलं. त्या वेळचा त्या सहकाऱ्यांचा तो जल्लोश, रात्री दोन वाजता ढोलाच्या तालावर बेधुंद नाचणं हे सर्व मला अंतर्मुख करून गेलं. जेव्हा आपण स्पर्धेत अव्वल ठरतो तेव्हा असाच आनंद व्हायला हवा. तो जर होत नसेल तर त्याचा अर्थ ती स्पर्धा आता आपल्यासाठी राहिली नाहीये. हौशी रंगभूमीवर जे जे मानसन्मान मिळवायचे ते मिळाले. आता इथेच थांबून राहण्यात मतलब नाही, मागून येणाऱ्यांना वाट मोकळी करून द्यायला हवी, याचं भान आलं. आणि दुसरी वाट आपसूकच मिळाली.
मच्छिंद्र कांबळींचं ‘पांडगो इलो रे बा इलो’ हे माझं पहिलं व्यावसायिक दिग्दर्शन. तर सुहास जोशी व डॉ. श्रीराम लागूंसोबत अभिनय करण्याची संधी मिळालेलं ‘अग्निपंख’ हे पहिलं व्यावसायिक नाटक. याच नाटकाच्या दरम्यान तनयाचा, माझ्या मुलीचा जन्म झाला. तिच्या बारशाच्या दिवशी ठाण्याला साडेचारचा प्रयोग होता. माझा स्वभाव इतका भिडस्त होता की मी कोणालाही काही बोललो नाही. प्रयोग पार पडला. ठाण्याहून ग्रँट रोडला गावदेवीला रात्री साडेनऊला बारशाला पोहोचलो. पत्नीनं हसून स्वागत केलं, हाच समंजस पाठिंबा तिनं कायम दाखवला.
सुरुवातीला नोकरी सांभाळून नाटक करत होतो. मग विदाऊट पे लिव्ह सँक्शन करून घेतली. पाहता पाहता पाच र्वष गेली. मग मात्र नोकरी सोडावीच लागली. तोपर्यंत बऱ्यापैकी जम बसला होता. कामं मिळत होती. बक्षिसं, वाहवा मिळत होती. प्रसिद्धी मात्र मुळीच नव्हती. एखाद्याच्या नावावर नाटक चालण्यासाठी जे वलय लागतं ते मला नव्हतं. प्रत्येक भूमिकेतला मी त्या त्या भूमिकेत चपखल बसायचो, त्याचं अरुण नलावडे नावाच्या व्यक्तीशी काही साधम्र्य नसायचं. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षक मला ओळखत नव्हता. ‘चार दिवस प्रेमाचे’ नाटकाचे आम्ही हजारभर प्रयोग केले. त्याचा व्यवस्थापक होता बाळ कोचरेकर. एकदा नाटकानंतर काही प्रेक्षक आत भेटायला आले. मी आणि बाळ शेजारी उभे होतो. बाळशी हस्तांदोलन करून त्यांनी त्याचं कौतुक केलं. ‘वा छानच काम करता हो तुम्ही.’ ते बाळला म्हणाले. आम्ही त्यांचा गैरसमज दूर करायच्या भानगडीत न पडता ती गंमत एन्जॉय केली. असं एकदाच नव्हे तर दोन-तीन वेळा घडलंय.
अनेक नाटकं केली. काही चांगली चालली तर काही पडली. ‘रातराणी’, ‘पाहुणा’, ‘हसतखेळत’, ‘रानभूल’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘वासूची सासू’ अशी अनेक गाजली. पण ‘जन्मसिद्ध’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘सानेचं काही खरं नाही’सारखी नाटकं चांगली असूनही विशेष चालली नाहीत.
‘सवाल अंधाराचा’ या नाटकातला एक फजितीचा किस्सा आठवतोय. अतिशय गंभीर प्रसंग. जवळच्या मित्राच्या मुलीवर झालेल्या अन्यायाने उद्विग्न होऊन मी फोनवर बोलत असतो. फोन ठेवून मी मागे वळलो तर प्रेक्षकांत मोठा हशा पिकला. मी चमकलो. मागं पाहिलं तर धोतराचा काष्टा सुटलेला. सहज परत काचा मारता येण्यासारखा नव्हता. तसाच तो प्रसंग रेटला. त्यानंतर तेव्हापासून धोतरावर नाडी बांधून, पिना लावून, वरून बेल्टही बांधत असे. पुन्हा चुकूनही असा प्रसंग येऊ नये म्हणून मी सावध झालो.

 ‘निखारे’ या नाटकात जयंत सावरकर, अविनाश नारकर आणि अरुण नलावडे. 
अर्थात आपण कितीही सावधगिरी बाळगली तरी नशीब म्हणून काही असतं, याचा प्रत्यय मला ‘आम्ही बिघडलो’ या नाटकाच्या निमित्ताने आला. या नाटकाचा दौरा नगर जिल्ह्य़ात जाणार होता. इतर काही कार्यक्रमांच्या तारखा आड आल्याने मी जाऊ शकलो नाही. माझ्याऐवजी दुसरा हंगामी कलाकार उभा केला गेला. दौरा आटोपून परत येत असताना बसला भीषण अपघात झाला. नाटकाच्या निर्मात्यांचा तरुण मुलगा सहज गंमत म्हणून दौऱ्यात सहभागी झाला होता. तो जागच्या जागी ठार झाला. बसमध्ये माझ्या नेहमीच्या झोपायच्या जागेवर हेमंत भालेकर झोपला होता. तो जबर जखमी झाला. एक डोळा कायमचा गमावलेला त्याचा चेहरा ओळखू न येण्याइतका बदलून गेला होता. मी त्या जागी असतो तर.. हा प्रश्न अजूनही मला छळतो.
काही तुरळक अपवाद सोडले तर ‘दूरदर्शन’पासून मी दूरच होतो. मग इतर चॅनेल्स आली. प्रभात चॅनेलने ‘गंमतजंमत’ आणि ‘शू! कुठे बोलायचं नाही’ ही नाटकं इतक्या वेळा प्रक्षेपित केली की मी घराघरांत पोहोचलो. विनय आपटे माझ्या अभिनयाचा सच्चा चाहता होता. ‘रथचंदेरी’, ‘रानमाणूस’, ‘नातीगोती’ या त्याच्या मालिकांमध्ये त्यानं मला संधी दिली. मंदार देवस्थळीच्या दिग्दर्शनात ‘एक धागा सुखाचा’, ‘वसुधा’, ‘अवघाची संसार’, अशा अनेक मालिका मी नंतर केल्या. पण ‘वादळवाट’ने खरी प्रसिद्धी मिळवून दिली. ती मालिका, त्याचं शीर्षकगीत, त्यातली पात्रं आणि त्यातले ‘आबा चौधरी’ म्हणजे मी, यांच्यावर लोकांनी भरभरून प्रेम केलं.
चित्रपटात काम करावं असं वाटत होतं, पण कोणी आपणहून मला विचारलं नाही आणि कोणाकडे काम मागायचा माझा स्वभाव नव्हता. संदीप सावंत माझा आतेभाऊ लागतो. तो काही लिहीत असे. गो. नी. दांडेकरांच्या ‘रुमाली रहस्य’ या कादंबरीवर मालिका करण्यासाठी त्यानं मला घेऊन एक पायलट एपिसोड केला होता. त्याच दरम्यान ई-टीव्ही चॅनेलवर एक तासांची टेलिफिल्म करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले. ‘श्वास’च्या कथेवर शॉर्टफिल्म करूया म्हणून आम्ही जमवाजमव केली. ते पेपर सबमिट करायला गेलो तर कळलं की ती योजना बंद करण्यात आली आहे. खूप निराश झालो. इतक्यात एक धाडसी विचार चोरपावलांनी मनात शिरला. यावर चित्रपट केला तर? खूप धडपड करून, अनेक उंबरठे झिजवून कसेबसे पैसे उभे करून चित्रपट केला. तो उत्तम झाला. यशस्वी ठरला. ‘श्वास’ हा चित्रपट आणि ‘वादळवाट’ या दोन्ही कलाकृतींनी २००४ सालात माझ्यावर मानसन्मानांची खैरात केली. लोक ओळखायला लागले. चित्रपटात कामं मिळायला लागली. गेल्या दहा वर्षांत तब्बल सत्तरेक चित्रपटांतून मी काम केलंय.
    ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकात सुहास जोशींमवेत अरुण नलावडे.

‘श्वास’साठी जमा झालेला ‘ऑस्कर फंड’ ही लोकांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाची, दाखवलेल्या विश्वासाची एक पावती! त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून बँकेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या माझ्या पत्नीनं-अंजलीनं त्याचा हिशेब चोख ठेवला. फंडात शिल्लक राहिलेले साठ लाख रुपये सेवाभावी सामाजिक संस्थांना कृतज्ञपणे परत केले. राज्य सरकारतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांत काही अधिक पुरस्कार ‘श्वास ऑस्कर फंडा’तर्फे दिले जावेत यासाठी निधी सरकारकडे सुपूर्द केला.
त्यानंतर मी ‘बाईमाणूस’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. यासाठी मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून स्क्रीन अ‍ॅवॉर्ड मिळालं, पण हा अजून प्रदर्शित झाला नाहीये, याची खंत आहे. ‘वारसा’ नावाचा चित्रपटही असाच पूर्ण तयार आहे. त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. हिंदी मालिकांच्या बाबतीत, ‘यह दुनिया है रंगीन’ नावाची हिंदी मालिका सब टीव्हीवर केली. ‘स्माइल प्लीज’ या मालिकेसाठी स्टार टीव्हीने माझ्याशी खास करार केला. दुर्दैवाने दोन्ही मालिका फार काळ चालल्या नाहीत.
या वर्षी आणखी थोडे धाडस करून मी, माझ्या पत्नीच्या सहकार्यानं ‘हाक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूमी अधिग्रहण हा विषय असलेल्या ‘हाक’ची पटकथा व दिग्दर्शन माझा मित्र रमेश मोरे याची आहे. कोकणाच्या निसर्गरम्य पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या, एकाच कुटुंबातील तीन भिन्न स्वभावांच्या व्यक्तिरेखांमध्ये घडणारी ही गोष्ट. आमच्या या प्रोजेक्टकडून खूप अपेक्षा आहेत. अभिनय आणि दिग्दर्शन हे माझे प्रांत आहेत. जाहिरात, वितरण, मार्केटिंग हे माझं विश्व नाही. हे वारंवार जाणवतं. पण त्याशिवाय पर्याय नाही. प्रयत्न करत राहायचं. कधी न कधी यश मिळेलच, यावर माझा ठाम विश्वास आहे. सध्या ‘का रे दुरावा’चे केतकर काका जोमात आहेत. निर्मिती सावंतबरोबर ‘श्री बाई समर्थ’ हे नाटक गर्दी खेचतंय. तसंच यश ‘हाक’ या चित्रपटालाही मिळावं यासाठी आपल्या सर्वाच्या सदिच्छा असतील हा विश्वास आहे.
या सर्व प्रवासात मला अनेकांची मदत झाली. त्या सर्वाचा मी ऋणी आहे. आयुष्य हे नेहमी चढ-उतारांनी भरलेलं असतं. अनघड वळणाच्या वाटा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. तशाच त्या माझ्याही आयुष्यात आल्या. सपाट, सरळ रस्त्यावरचा प्रवास सोपा असला तरी कंटाळवाणा ठरू शकतो. म्हणून मला कोकणातले रस्ते आवडतात. नागमोडी वळणाचे. घाटातून जाणारे. जे तुम्हाला प्रवासात जागं ठेवतात. तसंच आयुष्याचंही आहे. बरचसं मिळालं तरीही बरंच अजून बाकी आहे. म्हणून सकाळी उठून उत्साहाने कामाला लागता येतं. जगण्यातली गंमत कायम राहते. अजून खूप जगावंसं वाटतं. स्वत:साठी आणि इतरांसाठीही!..

जेव्हा आपण स्पर्धेत अव्वल ठरतो तेव्हा आनंद धुमधडाक्यात साजरा व्हायला हवा. तो जर होत नसेल तर त्याचा अर्थ ती स्पर्धा आता आपल्यासाठी राहिली नाहीये. हौशी रंगभूमीवर जे जे मानसन्मान मिळवायचे ते मिळाले. आता इथेच थांबून राहण्यात मतलब नाही, मागून येणाऱ्यांना वाट मोकळी करून द्यायला हवी, याचं भान आलं. आणि दुसरी वाट आपसूकच मिळाली..

arunnalavade268@gmail.com