दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबईत दाखल झाल्यानंतर एक उत्तम दिग्दर्शक होण्याचं स्वप्नं मी पाहिलं होतं, मात्र काही गोष्टी एवढय़ा अकल्पितपणे घडतात की, एका रात्रीत तुमचं आयुष्यच बदलून जातं. गीतलेखनाच्या रूपानं आलेल्या एका वळणवाटेनं काही काळासाठी मला माझ्या मूळ मार्गापासून दूर नेलं. मात्र, मुंबईत माझं अस्तित्व निर्माण झालं ते माझ्यातल्या गीतकारामुळेच. ‘बावरा मन’नं मला माझ्यातला गीतकार अकस्मात गवसला. त्याच वळणानं पुढे जाणं सुरू आहे..

माझे आईवडील म्हणजे चिंतामणी व नीलांबरी किरकिरे. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय आणि माझं बालपण गेलं ते इंदूरसारख्या छोटय़ा, परंतु सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत शहरात! माझ्या आईबाबांनी आणि इंदूरने मला काय नाही दिलं.. आज मी जो काही पल्ला गाठू शकलोय, माझ्यातील कलेचा जो काही आविष्कार आज होत आहे, त्या सगळ्यांची बीजं इंदूरमध्ये रोवली गेल्येत, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आई-बाबांना गाण्याची कमालीची आवड. केवळ आवडच नाही, तर ते दोघंही पंडित कुमार गंधर्वासारख्या दिग्गज गुरूचे चेले. साहजिकच, ते गानसंस्कार माझ्यावरही होत गेले.
एका बाबतीत मात्र माझी आवड काहीशी वेगळी होती. मला गाण्याविषयी असोशी होतीच, मात्र माझा कल नाटकाकडे अधिक. या आवडीला खतपाणी मिळालं ते माझ्या काकामुळे, म्हणजे जीतेंद्र किरकिरे या रंगकर्मीमुळे. तो तेव्हा इंदूरमधील नाटय़वर्तुळात खूपच सक्रिय होता. वयाच्या अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षांपासून मी त्याच्यासोबत त्याच्या नाटकांच्या तालमींना जात असे. मला ते वातावरण खूप आवडलं, फार काही कळण्याचं ते वय नव्हतं. तरीही अभिजात गायकीच्या प्रांतात फारशी न दिसणारी ‘डेमॉक्रसी’ मला नाटकांत आढळली. गाण्याच्या प्रांतात कसे गुरू-शिष्य, अनुभवी-नवखा वगरे प्रकार असतात. त्या क्षेत्राची ती गरजच आहे. नाटकात मात्र सगळे सारखेच. मला ते जास्त अपील झालं. त्यामुळे मी काकाचं बोट धरून तेथे नियमित जाऊ लागलो. हे जाणंही केवळ विरंगुळ्यापोटी नसे, तर स्टेजची लहानसहान कामं कर, कधी प्रॉम्प्टिंग कर असे माझे उद्योग सुरू असत. त्या सर्व मंडळींना माझी तळमळ जाणवली. माझ्या प्रत्येक कामाचं तिथे कौतुक होतं गेलं.
यामुळेच की काय, कळायला लागलं तेव्हा नाटय़ क्षेत्रातच काही तरी करायचं, अशी खूणगाठ मी मनाशी बांधली. तो पल्ला गाठणं सोपं नव्हतंच, तरीही मी माझ्या परीने प्रयत्न करायला सुरुवात केली. नाटय़ क्षेत्रात पुढे यायचं असेल, तर काही तरी ठोस पाया पाहिजे, मार्गदर्शन हवं, याची मला जाणीव होती. यासाठी काय करायला पाहिजे, यावर संशोधन सुरू असताना एनएसडी म्हणजे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’विषयी मला समजलं. बस्स, एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात झोकून द्यायचं, या निर्णयापर्यंत मी आलो. एनएसडीचा अर्ज मी मागवून घेतला. मात्र, माझ्या या निर्णयाला पहिला विरोध घरातूनच झाला. या बेभरवशी व्यवसायाची आईबाबांना धास्ती वाटली. आईने मातृसुलभ भावनेने नाटकाऐवजी नोकरी करण्याचा सल्ला दिला. मी मात्र एनएसडीमध्ये प्रवेश घेण्याची तयारी पूर्ण केली होती. दुर्दैवाने पहिल्या प्रयत्नात मला तेथे प्रवेश घेता आला नाही. तेथे प्रवेश मिळण्यासाठी अनेक निकष होते, त्यात मी बसत नव्हतो. पुढच्या वर्षी नव्याने प्रयत्न करण्याचा निर्णय मी घेतला. दरम्यान, पैसे जमवणं गरजेचं असल्याने अनेक नोकऱ्याही केल्या. यात सहकारी बँकेतील खर्डेघाशी आणि खाजगी नोकरीचाही समावेश होता. माझं मन या कारकुनीत बिलकूल रमत नव्हतं. हे काम आपलं नाही, आपली जागा रंगमंचावरच आहे, याची प्रबळ जाणीव वारंवार होत होती. दुसऱ्या प्रयत्नात मात्र एनएसडीच्या अभ्यासक्रमासाठी माझी निवड झाली आणि स्वर्ग दोन बोटं उरला.
इंदूरसारख्या लहान शहरातून हा अभ्यासक्रम करण्यासाठी दिल्लीवारी करणारा मी पहिलाच तरुण होतो. आईच्या नाराजीची कल्पना असल्याने मी तिला म्हटलं, मला केवळ एक संधी दे, तेथे अपयशी झालो तर तू म्हणशील ते करेन. तिने आनंदाने परवानगी दिली आणि १९९३ मध्ये मी देशाच्या राजधानीत दाखल झालो.
एनएसडीने माझा कायापालट केला, माझं विश्वच बदलून टाकलं त्या संस्थेनं! एनएसडीनं मला केवळ दिग्दर्शनाचं प्रशिक्षण दिलं नाही, तर माझं व्यक्तिमत्त्व फुलवण्यात मदत केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून, समाजाच्या सर्व थरांतून आलेल्या विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांसोबत राहताना मला आत्मभान लाभलं. नव्यानं स्वत:ची ओळख पटली; हसत-खेळत, अनेक गोष्टी शिकत तीन र्वष पार पडली. मी यशस्वीपणे तो अभ्यासक्रम पूर्ण केला. एनएसडीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नवकोरं नाटक बसवायचा तेथे प्रघात आहे. या परंपरेत मी भगतसिंगांवर एक नाटक लिहिलं, त्याचं दिग्दर्शनही माझंच होतं. योगायोगाने हा प्रयोग पाहाण्यासाठी दूरदर्शनच्या निर्मात्या मंजू सिंग उपस्थित होत्या. त्यांच्यासह सर्वाना तो प्रयोग आवडला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंजू सिंग त्या वेळी ‘स्वराज’ या मालिकेची जुळवाजुळव करीत होत्या. या मालिकेचं लेखन करशील का, अशी विचारणा त्यांनी मला केली. मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. देशाच्या राजधानीतून आता मी आर्थिक राजधानीत दाखल झालो. माझी राहायची व्यवस्था मंजू सिंग यांनीच केली. त्या मालिकेसाठी मी केलेल्या लेखनाला अनेकांची पसंती लाभली. मात्र, मुंबई ही काय चीज आहे, याचा साक्षात्कार ही मालिका संपल्यानंतर मला झाला. मंजू सिंग यांनी दिलेला आसरा या मालिकेपुरताच असल्याने मालिका संपल्यानंतर मला माझं चंबूगवाळं आवरावं लागलं आणि खऱ्या अर्थाने माझ्या संघर्षांला सुरुवात झाली.
हातात पदवी तर होती, पण काम कसं मिळणार? मुंबईत माझ्यासारख्या नवख्या आणि घरदार सोडून आलेल्या तरुणांची काय कमतरता होती? दररोज सकाळी उठून याला भेट, त्याला भेट असा प्रकार सुरू झाला. सुधीर मिश्रा हे माझे आवडते दिग्दर्शक. त्यांच्यासोबत काम करण्याची अनिवार इच्छा होती. अशाच एका भल्या सकाळी त्यांना दूरध्वनी केला व भेटायला गेलो. माझी पाश्र्वभूमी व माझी क्षमता जाणून घेतल्यानंतर त्यांनी होकार दिला. मात्र, माझ्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यापेक्षा चित्रपटासाठी मला काही तरी कथा वगैरे लिहून दिलीस, तर तुला जास्त पैसे मिळतील, असे त्यांनी मला आपुलकीने सुचविलं; परंतु मला स्वारस्य होतं ते दिग्दर्शनात. लेखनाचं मला वावडं होतं असं नाही; पण होतं काय, की तुम्ही एखादी कथा हातावेगळी केलीत, की तुमचा व त्या प्रोजेक्टचा संबंध संपतो. चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया आणि त्या लेखकाचा संबंध उरत नाही, मला हे नको होतं. विविध टप्पे पार करत एखादी कलाकृती पडद्यावर कशी साकारते, त्या पूर्ण प्रवासाचा मला साक्षीदार व्हायचं होतं, त्याचं ज्ञान मिळवायचं होतं. त्यामुळे मी सुधीरना ठासून सांगितलं, की मला तुमच्याकडे साहाय्यक म्हणूनच काम करायला आवडेल. त्यांनीही होकार दिला आणि माझ्यासाठी एक नवं दालन खुलं झालं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कलकत्ता मेल’ व ‘चमेली’ या चित्रपटांसाठी मी त्यांच्या साहाय्यकाची जबाबदारी पार पाडली. या काळात खूप म्हणजे खूप काही शिकायला मिळालं. आता आपल्याला योग्य वाट सापडल्ये असं वाटत असतानाच ‘ती’ वळणवाट माझ्या आयुष्यात आली आणि एका रात्रीत सगळं बदलून गेलं.
त्याचं झालं असं, या दोन चित्रपटांनंतर सुधीरनी ‘हजारो ख्वाइशे ऐसी’ करायला घेतला. त्यातही मी त्यांच्यासोबत होतोच. तोपर्यंत मुंबईत बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. अनेक ग्रुपमध्ये माझा वावर होता. या मित्रमंडळींसोबत गप्पागोष्टी करताना मी नेहमी माझं ‘बावरा मन’ हे गीत गात असे.
बावरा मन देखने चला एक सपना
बावरेसे मन की देखों बावरी है बातें
बावरीसी धडकनें है, बावरी है साँसे
बावरीसी करवटोंसे, निंदीयाँ दूर भागे
बावरेंसे नैन चाहे, बावरे झरोकोंसे,
बावरे नजरोंको तकना
बावरा मन देखने चला एक सपना
यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ, त्याची चाल ऐकणाऱ्याला आवडू लागली. एवढी की पुढे-पुढे त्याची फर्माईश होऊ लागली. या गाण्याला चालही मीच लावली होती आणि गायचोही मीच. ‘हजारो ख्वाइशे ऐसी’मध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या के. के. मेननच्या कानावर ते गाणं गेलं. त्यालाही ते कमालीचं भावलं. त्याने लगेचच सुधीरना त्याविषयी सांगितलं. सुधीरनी ते ऐकायची इच्छा व्यक्त केली. मी तर जाता-येता ते म्हणतच होतो, सुधीरनाही ऐकवलं, त्यांनाही ते आवडलं. मला वाटलं, तो प्रकार तिथेच थांबेल, तर सुधीरमधील दिग्दर्शक जागा झाला, त्याने ताबडतोब संगीतकार शंतनू मोईत्राला बोलावलं आणि त्याच्यासमोरही मला ते गाणं गायला लावलं. माझ्या चाहत्यांच्या यादीत आता शंतनूचीही भर पडली. सुधीर आणि शंतनूने ते गाणं थेट चित्रपटात घ्यायचा निर्णय घेऊन टाकला. माझ्यासाठी ते सगळं अनपेक्षित होतं. मला खूपच आनंद झाला. शंतनूने माझ्या चालीवर एका संगीतकाराला अभिप्रेत असलेले संस्कार केले आणि त्या गाण्याची श्रीमंती वाढवली. त्याचा हट्ट हा की, ते गाणं माझ्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलं जावं. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, की बाबा, मी केवळ स्वान्तसुखाय म्हणून ते गात असे. चित्रपटात घेत असाल तर एखाद्या कसलेल्या गायिकेच्या आवाजात ते यायला हवं, परंतु शंतनू
हट्टालाच पेटला होता. म्हणाला, ‘‘हे गाणं तुझ्याच आवाजात रेकॉर्ड होईल, नथिंग डुइंग..’’ झालं, काय बोलणार यावर?
नशीब म्हणा किंवा आणखी काही, त्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी दिग्दर्शक प्रदीप सरकार स्टुडिओत उपस्थित होते. त्यांनी त्या गाण्याविषयी कोणाकडून माहिती घेतली ते समजलं नाही, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा मला दूरध्वनी आला.. ‘हाय, मी ‘परिणीता’ नावाचा सिनेमा बनवतोय आणि त्यासाठी गीतकार म्हणून मला तू हवा आहेस. प्रेमळ धमकीच होती ती. मी रूढ अर्थाने गीतकार नाही. माझं उद्दिष्ट वेगळं आहे वगैरे वगैरे सांगायची संधीही त्यांनी दिली नाही. म्हटलं, चला, हेही करून बघू या. तर, २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिणीता’च्या गाण्यांनी काय धुमाकूळ घातला, हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. मुंबईतल्या चित्रपटसृष्टीला सतत काही तरी नवीन हवं असतं. ‘परिणीता’मुळे चित्रपटसृष्टीला नवा गीतकार गवसला. ‘परिणीता’चे निर्माता विधू विनोद चोप्रा त्या वेळी ‘एकलव्य’ या चित्रपटाची जुळवाजुळव करीत होते, दुसरीकडे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’वरही त्यांचं काम सुरू होतं. ‘परिणीता’मधली गाणी ऐकून या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांनी मला गीतकार म्हणून करारबद्ध केलं. हे सगळं एवढं झपाटय़ानं घडत होतं की, आपण या प्रवाहासह पुढे निघालो आहोत, हे कळत होतं, पण वळत नव्हतं. माझ्यावर बसलेला गीतकाराचा शिक्का दिवसेंदिवस गडद होत होता. अर्थात, त्यात कमीपणा नव्हताच, ही जबाबदारीही मी आनंदाने पेलत होतो. ‘परिणीता’मधल्या ‘पियू बोले’ या गाण्याला फिल्मफेअरचं सवरेत्कृष्ट गीतकाराचं नामांकन मिळालं, तर ‘बंदे मे था दम’ (लगे रहो मुन्नाभाई) आणि ‘बहती हवासा था वो’ (थ्री इडियट्स) या गाण्यांवर राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटली.
त्यानंतर माझ्यातला गीतकार लिहीतच आहे. या गीतकाराने मला काय दिलं? तर एक ओळख, एक अस्तित्व दिलं. मुंबईत उमेदवारी करणाऱ्या कलाकाराला काय हवं ते विचारून पाहा. त्याचं उत्तर ‘आयडेंटिटी’ असंच असेल, कारण पैसा, प्रतिष्ठा हे कितीही महत्त्वाचं असलं तरी जोपर्यंत तुमची स्वत:ची ओळख निर्माण होतं नाही, तोपर्यंत तुमच्या कामाची दखल कोणी घेत नाही. एकदा तुम्ही तुमचा ब्रँड तयार केला की कामं, पैसा, प्रतिष्ठा आपोआप मिळत जातं. या अनुभवांतून मी गेलोय.
आधी म्हटल्याप्रमाणे मी कसलेला गीतकार कधीच नव्हतो. मात्र गीतलेखनाचं अंग नव्हतं, असंही नाही. माझ्या दोन्ही आजी कविता करत असत, तसंच इंदूरमध्ये असताना श्रवणभक्ती सतत चालूच असे. कुमारजींच्या चीजा असोत किंवा अन्य गायकांचं गाणं असो, त्या-त्या रचनांचे संस्कार झालेले होतेच. त्यामुळे ‘परिणीता’ असो किंवा ‘बालगंधर्व’, ‘देऊळ’सारखे मराठी चित्रपट असोत, गाणी लिहिताना माझा कधीच हात अडला नाही. तुझ्या गाण्यात काही शब्द सर्वस्वी वेगळे किंवा अनोखे असतात, असं मला अनेक जण अनेकदा सांगतात. हे वेगळेपण माझ्या इंदूरचं आहे. अभिजात गायकीतील हजारो चीजांची एवढी पारायणं झाल्येत की, त्यातले ते वेगळे शब्द कधी उसळी मारून वर येतात, ते मलाही कळत नाही. गीतलेखनाच्या वळणवाटेमुळे मी माझ्या मूळ मार्गापासून काहीसा दूर झालो असेनही, मात्र त्याचा विसर पडलेला नाही. लेखन, दिग्दर्शनाची ऊर्मी आजही कायम आहे. नजीकच्या भविष्यात दिग्दर्शक स्वानंद किरकिरे तुमच्या भेटीला आला, तर ते आश्चर्याचं नसेल.
गेल्या दोन वर्षांत तर अभिनयाच्याही ऑफर्स मला येतायत. जाहिरातीही केल्या. त्यामुळे कलेच्या अनेक आघाडय़ांवर एकाच वेळी विहरणं मला कमालीचं आवडतं. मुंबईत मी आता स्थिरावलोय, माझे आई-बाबा माझ्यासोबतच राहतात. कलाप्रांतातील माझ्या मुशाफिरीवर ते खूश आहेत. आतापर्यंत, आयुष्याच्या बोटाला धरून मी वाटचाल केल्येय, आता मी आयुष्याला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे..
तेवढा पल्ला मी निश्चितच गाठला आहे! ल्ल
शब्दांकन : अनिरुद्ध भातखंडे
aniruddha.bhatkhande@expressindia.com