‘‘मी लोकमान्यांच्याही पुढं जाणारा आहे.. मी टरफलं उचलणार तर नाहीच, पण मी परबांनाही टरफलं उचलू देणार नाही. ज्यानं शेंगा खाल्ल्या त्याचा शोध घ्या, त्याला पकडून आणा व त्यालाच टरफलं उचलायला लावा, हे माझं मत आहे. हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही, माझ्या भूमातेच्या पावित्र्याचा प्रश्न आहे.’’ माझ्या भूमिका घेण्याचा योग्य तो परिणाम साधला गेलाच.

माझे मित्र तुकोबाभक्त परब यांच्यामुळे मुलुंडच्या कै. चिंतामण देशमुख सार्वजनिक उद्यानाचे नुकसान होत आहे. हे माझे स्पष्ट मत, कै. देशमुख यांच्या उद्यानातील अर्धपुतळ्याजवळ मी वेळोवेळी नोंदवून ठेवत असतो. पुतळ्याजवळ का तर उद्यानातील माझे सर्व परिचित परबधार्जिणे आहेत. ‘संत’ परबांविरुद्ध ते एकही शब्द, विशेषत: माझ्याकडून, ऐकून घेत नाहीत. त्यामुळे मला नेहमीच माझे सडेतोड, स्पष्ट व निर्भीड मत चिंतामणरावांच्या पुतळ्याजवळ मांडावे लागते. ते ऐकून घेतात. ते माझ्याच स्वभावाचे होते असे मी ऐकून आहे.

असो. मी मुद्दय़ाकडे येतो. उद्यानात, एका गृहस्थाने प्लॅस्टिकच्या पिशवीतील भेळ मटकावली, मोकळी पिशवी खाली टाकली व ते पुढे गेले. माझे त्यांच्यावर केव्हाचे लक्ष होते. परबांनी खाली पडलेली प्लॅस्टिकची पिशवी उचलली व कोपऱ्यावरच्या पक्ष्याच्या तोंडात (म्हणजे पक्ष्याच्या आकाराच्या कचरापेटीत) टाकली. मी संतापलो, ‘‘परब, खाली पडलेली प्लॅस्टिकची पिशवी तुमची होती? तुम्ही तिला हात का लावलात? उद्यानात साफसफाई करणारे कर्मचारीही तीन तीन दिवस अशा पिशव्यांना हात लावत नाहीत; पिशवी कचराकुंडीत टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?’’

आमचे दुसरे मित्र ओक मध्ये कडमडले, ‘‘मोकाशी, यात चिडण्याजोगं काय आहे? परबांनी एका जागरूक नागरिकाचं काम बजावलं आहे. मोकाशी, खरं तर परबांनी जे पर्यावरणपोषक सत्कृत्य केलं ते तुम्ही करायला हवं होतं. ते तर तुम्ही केलं नाहीतच, वरती तुम्ही परबांना धारेवर धरत आहात! ‘नीच: वदति न कुरुते, वदति न साधु: करोति एव।’ मला, नीच व साधू हे दोन शब्द समजले. ओक मला नीच व परबांना साधू म्हणाले हेही मला अंदाजाने समजले. याचा अर्थ, माझे बालपणापासूनचे मित्र पंचाऐंशी वर्षांचे ओक हे परबांना फितूर झाले आहेत. ठीक आहे, मी तात्त्विक भूमिकेवरून चर्चा करणार होतो. एकटे परब काय किंवा परब व ओक दोघे काय, तत्त्वापुढे मला दोघेही शून्य किंमतीचे होते!

मी ओकांना म्हणालो, ‘‘तुम्ही परबांना सामील व्हा, माझी मुळीच हरकत नाही. मी दोघांचाही फडशा पाडतो. वाघापुढे संघर्षांत एक बकरा काय किंवा दोन बकरे काय? पण संस्कृतात म्हणालात ते मराठीत सांगा. म्हणजे मला तुमच्या विरोधात पूर्ण शक्तिनिशी लढता येईल.’’

‘‘नीच: वद्ति न कुरुते’ म्हणजे हलक्या दर्जाचा माणूस नुसता बोलतो, करत काहीही नाही, ‘वदति न साधु: करोति एव’ म्हणजे सज्जन बोलण्यात वेळ दवडत नाही, काम करून मोकळा होतो. परबांनी कचरा उचलला, न बोलता कुंडीत टाकला; मोकाशी, तुम्ही करणार तर काहीच नाही, वरती परबांना विनाकारण जाब विचारणार! मी मराठीत सांगितलं आहे, आता बोला.’’

मी प्रारंभ केला, ‘‘परब, ओक तुम्ही ऐका. तुम्ही दोघांनी किती घोडचुका केल्या आहेत ते ऐका. आपण ती प्लॅस्टिकची पिशवी न उचलता, पिशवी टाकणाऱ्या गृहस्थांना हाक मारून, बोलावून ती प्लॅस्टिकची पिशवी त्यांना उचलायला व कचऱ्याच्या पेटीत टाकायला लावायला हवी होती. ज्यानं कचरा केला त्यानंच तो उचलायला हवा. परबांनी परस्पर कचरा उचलावा, बाग स्वच्छ झाली हे चालणार नाही. बागेत कचरा करणाऱ्या प्रत्येकामागे एक एक परब आपण कोठून आणणार? का आणणार? आज या ‘अ’ गृहस्थांनी कचरा केला व तो परबांनी उचलला; उद्या कोणी ‘ब’ कचरा करेल, त्याला आपण खाली टाकलेल्या कचऱ्याबद्दल जाब विचारला तर तोच आपल्याला प्रश्न टाकेल, ‘तुमचे ते परब कोठे आहेत? त्यांना बोलवा. ‘अ’चा कचरा त्यांनी उचलला, माझ्या कचऱ्याचं काय? तोही परबांनीच उचलायला हवा.’ प्लॅस्टिकच्या पिशवीतून ज्या गृहस्थांनी बागेत खाण्यासाठी भेळ आणली त्यांनीच रिकामी पिशवी कचराकुंडीत टाकायला हवी. लोकमान्य टिळक त्यांच्या शिक्षकांना हेच म्हणाले होते, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही.’ मी लोकमान्यांच्या पुढं जाणारा आहे. मी तर टरफलं उचलणारच नाही, मी परबांनाही टरफलं उचलू देणार नाही. ज्यानं शेंगा खाल्ल्या त्याचा शोध घ्या, त्याला पकडून आणा व त्यालाच टरफलं उचलायला लावा, हे माझं मत आहे, वरती वर्षभर त्याच्या शेंगा खाण्यावर बंदी घाला. हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही, माझ्या भूमातेच्या पावित्र्याचा प्रश्न आहे.’’

माझा युक्तिवाद अभेद्य होता, जन्मभूमी ही जननी मी मध्ये आणली होती. ओक पाहतच राहिले. परबांना नेहमीप्रमाणे तुकोबांचा आधार मिळाला, पण तो तसा किरकोळ होता. परब पुटपुटले, ‘‘मोकाशी तुमचं म्हणणं तसं बरोबर आहे. तुकोबा म्हणतात: ‘एकी असे हेवा। येर अनावडी जीवा॥ प्रीतीसाठी भेद। कोणी पूज्य, कोणी निंद्य॥ तुका म्हणे लळा। त्याचा जाणे हा कळवळा॥’ मोकाशी, व्यक्ती तितक्या प्रकृती. तुकोबा सांगतात, एखाद्याला एका गोष्टीचा सोस असतो, दुसऱ्याला ती आवडत नाही. प्रेम असेल तर एखाद्याला एक व्यक्ती वंदनीय वाटेल, प्रेम नसेल तर दुसऱ्याला ती निंद्य वाटेल. मनात ज्याप्रमाणात लळा त्या अनुसार कळवळा. मोकाशी, मी कचरा उचलला, तुम्ही उचलू नका. मी चूक केली असं तुम्हाला वाटलं तर ते बरोबर होईल.’’

ओकांनाही माझं म्हणणं पटलं. ते म्हणाले, ‘‘परब, मोकाशींचा व्यवहारी विचार योग्य आहे. तुमची साधुवृत्ती बाजूला ठेवा. ते पुढचे गृहस्थ कोण आहेत?’’

मी तत्परतेने माहिती दिली, ‘‘त्यांचं नाव गुप्ते आहे. ओक, तुम्ही त्यांना हाक मारा.’’

‘‘गुप्ते, अहो गुप्ते,’’ ओकांनी दणदणीत आवाजात हाक दिली. गुप्ते थांबले व उलट चालत आमच्या जवळ आले. मी म्हणालो, ‘‘गुप्ते, परब काय म्हणतात ते ऐका.’’ परबांच्या संतवृत्तीचा बागेत उगाचच बोलबाला आहे. त्यामुळे, गुप्ते म्हणाले, ‘‘परब, बोला, काय आज्ञा आहे?’’

परब मुळमुळीतपणे म्हणाले, ‘‘गुप्ते, भेळ खाऊन झाल्यावर, प्लॅस्टिकची मोकळी पिशवी चुकून तुमच्या हातून खाली, वाटेत पडली. ती मी उचलली व कचराकुंडीत टाकली. मला जराही त्रास झाला नाही. पण प्रत्येक वेळी, मी थोडाच तुमच्या मागे असणार? तुम्ही स्वत:च मोकळी पिशवी कुंडीत टाका. तुमच्या लौकिकात भर पडेल.’’

खजील झालेले गुप्ते, ‘‘सॉरी, चुकलंच माझं,’’ असं म्हणत खाली मान घालून पुढं गेले.

..बागेत शिरल्या शिरल्या मी गुप्तेंना, ‘‘काय? आज भेळ वाटतं?’’ हा प्रश्न विचारला होता. शिष्टाचार म्हणून गुप्तेंनी, ‘होय. मोकाशी, नमुना, पाहणार का? या, बाकावर बसा’ असं म्हणायला हवं होतं. वयामुळं मी चालता चालता, उभ्यानं खाऊ शकत नाही, मला बाकावर बसावं लागतं. पण असंस्कृत गुप्ते म्हणाले होते, ‘‘होय, भेळ.’’ एवढं बोलून पुढे चालूही लागले! खाऊन खाऊन मी गुप्तेंची चार सहा मुठीच भेळ खाल्ली असती! मनातून मी संतापलो होतो, वरवर शांत राहिलो. माझ्या सुदैवानं गुप्तेंनी मोकळी पिशवी खाली टाकली. मोकाशी म्हणजे काय हे मी गुप्तेंना परबांमार्फत करून दाखवलं. ओक संस्कृतात म्हणाले होते, ‘सज्जन लोक बोलण्यात वेळ दवडत नाहीत, करून दाखवतात.’ माझा ‘सज्जनपणा’ मधल्या मध्ये न बोलता सिद्ध झाला.

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com