मोकाशींना चष्मा नसतानाही सर्व आरपार दिसलं.. मोकाशी संध्याकाळी उद्यानाकडे निघाले तेव्हा त्यांना पत्नी म्हणाल्या होत्या, ‘‘माझा पाय मुरगळला आहे. पप्पूला आज तुम्ही पाळणाघरातून घेऊन या. पाळणाघर चष्म्याच्या दुकानाच्या मागेच आहे. दोन्ही आपल्याच फूटपाथवर आहेत. तुम्हाला रस्ते ओलांडावे लागणार नाहीत.’’ पण..

मी  स्वत:ला समजावत होतो, ‘‘श्री. मोकाशी, स्वत:ला सावरा, शांत राहा. आज तुमचे वय त्र्याऐंशी आहे. तुम्ही अनेक संकटांना तोंड देतच पुढे आला आहात. तुमच्याच चष्म्याची काडी का तुटावी? उद्यानाला संध्याकाळी जाण्याची तुमची वेळ ठरलेली आहे; तरीही अठ्ठावन्न वर्षे, तुमच्याबरोबर संसार करणाऱ्या पत्नीनं, आज तुम्हाला याच वेळेला काम सांगून का नडवावं? तुम्ही काम करण्याचं नाकारून पत्नीवर मात तर केलीच आहे; चष्म्याची काडीही एक दोन दिवसात दुरुस्त होईल. संकटाचे ढग नाहीसे होतील. उद्यानातील १५ ऑगस्टच्या ध्वजस्तंभाप्रमाणे तुम्ही खडे उभे राहाल.’’

स्वत:ला शांत करत, बिनचष्म्याचे मोकाशी, बागेत शिरले. ओक परबांना म्हणाले, ‘‘परब, समोरून मोकाशी येत आहेत. त्यांच्या डोळ्यांवर चष्मा नाही. त्यामुळे मोकाशी वेगळे दिसत आहेत. ’’

मोकाशी लांबून पाहत होते. ओकांचे ओठ हलत आहेत व ते आपल्याबद्दलच बोलत आहेत असा मोकाशींना संशय आला. सत्य जाणून घेण्याकरता, मोकाशींनी विठ्ठलभक्त परबांनाच विचारलं, ‘‘परब, ओक माझ्याविषयीच बोलत होते?’’

सत्यवचनी परब उत्तरले, ‘‘होय.’’

‘‘उच्च मराठीत का संस्कृतमध्ये?’’

‘‘मराठीतच.’’

‘‘संस्कृत काय किंवा मराठी काय, ते वाईटच बोलले असणार, ते चांगलं बोलणारच नाहीत.’’

थेट ओकच संभाषणात उतरले, ‘‘मोकाशी, मी तुमचा बालमित्र आहे, बालशत्रू नाही! मी चांगलंच बोललो. मोकाशी, चष्मा हे तुमचं बलस्थान आहे, चष्मा असला की तुम्ही लढाऊ मोकाशी दिसता!’’

‘‘चष्म्याची काडी मोडली, त्यामुळं तो दुरुस्तीला टाकला आहे. तरीही मी दोन रस्ते चष्म्याशिवाय म्हणजे डोळ्यांशिवाय ओलांडले, उद्यानात येण्याची वेळ चुकवली नाही.’’ मी गर्वानं सांगितलं.

डोळे आकाशाकडे लावत परब म्हणाले, ‘‘डोळिया पाझर, कंठ आला दारी। देई या भेटी, पांडुरंगे॥ एक वेळ माझा धरूनी आठव। तुका म्हणे ये ना न्यावयासी॥’’

मी परबांवर उखडलो, ‘‘परब, तुमचं चोवीस तासांचं विठ्ठलप्रेम मला नापसंत आहे. मी डोळ्यांबाबत काही बोललो की तुम्ही लगेच ‘डोळिया पाझर’ म्हणणार! मी आणि तुकोबा असा हा तुमचा भेंडय़ांचा खेळ मला मान्य नाही. सकाळी उठल्यावर ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हणा, रात्री झोपण्यापूर्वी एकदा म्हणा.’’

चष्म्याची काडी तुटल्यामुळं मी अस्वस्थ आहे हे ओकांच्या व परबांच्या ध्यानी आलं असणार. ओक त्यामुळं धोरणीपणानं, माझ्याकरता, परबांशी बोलले, ‘‘परब, सुखदु:खावर एक छान सुभाषित आहे. सुख किंवा दु:ख, प्रिय वा अप्रिय, काहीतरी घडणारच. दोहोंच्याही आहारी न जाता ते अनुभवावे. ‘सुखम् वा यदि वा दु:खम्, प्रियम् वा यदि वा अप्रियम्। प्राप्तम् प्राप्तम् उपासीत हृदयेन अपराजित:॥ परब, या सुभाषितात, सुखालाही हृदयावर वर्चस्व गाजवू देऊ नका हे सांगितलं आहे. ते मला विशेष वाटतं. सुखाच्या ताब्यात जाऊ नका.

परबांनी मान डोलवली, ‘‘सुभाषित छान आहे. पण ओक, आम्हा विठ्ठलभक्तांना दु:ख नाहीच. दु:खाचंही सुख करण्याची किमया विठ्ठलाकडे आहे.

‘दु:खाचिये साटी तेथे मिळे सुख। अनाथाची भूक, दैन्य जाय॥ उदाराचा राजा पंढरीस आहे। उभारोनी बाहे पालवितो॥ ओक, दु:ख द्या व त्या बदल्यात सुख घेऊन जा असं पंढरीचा राजा, बाहू उभारून, सांगतो आहे.’’

मोकाशींचे कान मित्रांच्या बोलण्याकडे होते. बिनचष्म्याचे डोळे बागेत येणाऱ्या जाणाऱ्याकडे होते. विस्तीर्ण देशमुख उद्यानाला दोन प्रवेशद्वारे आहेत, एक पूर्वेला व दुसरे पश्चिमेला. उद्यानाच्या बाहेरून, पूर्व-पश्चिम असा, जास्त अंतराचा व वाहनांनी गजबजलेला रस्ता आहे. पण उद्यानातून जाणे येणे सोयीचे पडते. सकाळी ऑफिसला जाणारे व घरी परतणारे उद्यानातील शॉर्टकटचा वापर करतात.

ऑफिसातून घरी परतणाऱ्या सुना-नातसुनांकडे मोकाशी कौतुकाने पाहत होते. ते उद्गारले, ‘‘या पोरींनी उद्यानाचा शॉर्टकट केला आहे.’’

चष्म्याच्या तुटलेल्या काडीच्या महादु:खातून, मोकाशींना बाहेर काढावयाचेच हे ओकांनी पक्के ठरवले होते. ओकांना वाटले की ऑफिसातून परतणाऱ्या पोरीबाळींनी उद्यानातून ये जा करू नये, त्यांनी रस्ता वापरावा असं मोकाशींना वाटतं आहे. मोकाशींना बरं वाटावं म्हणून ओकांनी मनाविरुद्ध मोकाशींना पाठिंबा दिला, ‘‘ऑफिसात नोकरी करणाऱ्या या मुली म्हणजे तसा उपद्रवच झाला आहे. त्यांना उद्यान ही जाण्यायेण्याची वाट नाही, हे कोण सांगणार?’’

मी संतापलो, ‘‘या पोरींविषयी तुम्हाला सहानुभूती कशी नाही? त्यांना उद्यानातून खुशाल ये जा करू दे. आपण म्हातारे कठडय़ावर नुसते बसून तर असतो.’’

ओक व परब सुखावले, ‘‘म्हणजे मोकाशींचे डोळे बिनचष्म्याचे होते, परंतु मनाचे डोळे वत्सल आहेत, त्यांना संसारी मुलीबाळींविषयी प्रेम आहे!’’

तेवढय़ात मोकाशी ओरडले, ‘‘तिकडं, गेटच्या बाजूला पाहा. ती पोरगी दोन्ही हात धरता येणार नाही एवढं सामान एका डाव्या हातात आणि दुसऱ्या उजव्या हातात लहान मूल उचलून धरून चालते आहे. बहुधा सकाळी पाळणाघरात सोडलेलं मूल ती परत घेऊन चालली असावी.’’

ओक व परब यांनी त्या दिशेनं पाहिलं. दोघेही ओरडले, ‘‘मोकाशी, ती तर तुमची श्वेता आहे. तुमच्या डोळ्यावर चष्मा नाही, म्हणून तुम्हाला ओळखू आली नाही.’’

मोकाशींना चष्मा नसतानाही सर्व आरपार दिसलं. मोकाशी संध्याकाळी उद्यानाकडे निघाले तेव्हा त्यांनी पत्नी म्हणाल्या होत्या, ‘‘माझा पाय मुरगळला आहे. पप्पूला आज तुम्ही पाळणाघरातून घेऊन या. पाळणाघर चष्म्याच्या दुकानाच्या मागेच आहे. दोन्ही आपल्याच फूटपाथवर आहेत. तुम्हाला रस्ते ओलांडावे लागणार नाहीत.’’

.. मी म्हणालो होतो, ‘‘संध्याकाळी ही वेळ माझ्या उद्यानप्रवेशाची आहे. सूर्य, चंद्र व मी आमच्या ठरलेल्या वेळा पाळतो.’’

मोकाशींच्या पत्नीनी फोन करून श्वेताला आपली अडचण सांगितली असणार!

पश्चात्ताप पावलेला मी परबांना म्हणालो, ‘‘तुमचा विठ्ठल पातक्यांना आधार देतो का हो?’’ परब म्हणू लागले, ‘‘पाचारिता धावे। ऐसी ठायीची ही सवे।। बोले करुण वचनी। करी कृपा लावे स्तनी॥ मोकाशी, विठ्ठलाला मनापासून हाक मारा. तो तुमच्यासाठी धावणारच. त्याला तशी सवयचआहे.’’

कधी नाही ते, मी मनापासून, डोळे मिटून, ‘विठ्ठल विठ्ठल’ असं म्हणू लागलो. ओकांनी एकाच वेळी, मराठीतून व संस्कृतातून आ वासला.

.. परबांचा विठोबा रुक्मिणीला म्हणाला, ‘‘गेटजवळ मोकाशींची नातसून श्वेता आहे. तिच्यामागून शांताबाई येत आहेत. त्या श्वेताच्या पुढच्याच इमारतीत राहतात. त्यांना श्वेताला हात देण्याची प्रेरणा दे.’’

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com