वार्धक्य हे दुसरं बालपण मानलं जातं. आयुष्याच्या प्रवासात तावूनसुलाखून सजग, अनुभवी झालेलं मन अनेक सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीही सहज स्वीकारतं तर काही वेळा तेच मन लहान मुलांसारखं अनेक गोष्टींसाठी रुसूनही बसतं. पोक्तपणातली परिपक्वता आणि त्याच वेळी बाल्यावस्थेतला आग्रही हट्टीपणा यांचं विलक्षण मजेदार मिश्रण अनेकदा या वृद्धावस्थेत पाहायला मिळतं. हे आजोबांचं जग, उलगडणार आहे,  आजी-आजोबांच्या गप्पांमधून.  हे ‘वार्धक्य रंग’ दर पंधरवडय़ाने.

आमच्या मुलुंडच्या, चिंतामण देशमुख सार्वजनिक उद्यानात, मुलांकरिता (वय वर्षे ३ ते १०) खेळण्यांचा विभाग आहे. त्यातील घसरगुंडय़ा, रिंगणघोडे, हत्तीला लावलेली लांबलचक शिडी, तरफफळ्या वगैरे खेळणी नादुरुस्त झाली; म्हणून ‘खेळण्यांच्या दुरुस्तीसाठी खेळविभाग बारा आठवडे बंद राहील’ असा फलक लागला होता. त्या फलकाकडे पाहून, गोंधळेकर व मोकाशी हे दोन अतिवयस्क आजोबा ओळीनं तीन दिवस, ‘हं! आता तीन महिने खेळणी नाहीत,’ असं म्हणत उसासे टाकू लागले. ओकांना प्रचंड आश्चर्य वाटलं. तिसरे दिवशी न राहवून ओक म्हणाले, ‘‘म्हातारपण हे दुसरं बालपण आहे, असं म्हणतात हे मला माहीत आहे, म्हणून खेळण्यांचा विभाग बंद झाला यासाठी तुम्हाला उसासे टाकायचं कारण काय? खेळण्यांच्या विभागात जाण्याकरिता वयाची अट आहे, वय वर्षे ३ ते १०. हं, आता आपल्या आयुष्याची उरलेली वर्षे मोजली तर आपण त्या वयात मोडू. तरीही उपयोग नाही. खेळण्यांच्या विभागाकडं जायला चार पायऱ्या उतराव्या लागतात. त्या आपण कोणाच्याही आधाराशिवाय उतरू शकतो  का?’’

‘‘नाही, म्हणून काय झालं? आपण बाजूच्या भिंतीवर बसून खेळणी पाहात होतो. ती आता पाहायला मिळणार नाहीत.’’ गोंधळेकर कष्टी आवाजात म्हणाले.

पुढच्या कोलमडत्या वयात, म्हाताऱ्यांचे देह व त्याहून त्यांची मनं डुगडुगत असतात. त्यांना शब्दांचे आधार देऊन सावरावं लागतं हे ओकांना, ते स्वत:ही चौऱ्याऐंशी वर्षांचे असल्यानं, स्वानुभवातून माहीत होतं. ओकांनी प्रयत्नपूर्वक, वेगळा समजुतीचा आवाज काढला, ‘‘गोंधळेकर, बारा आठवडय़ांचाच तर प्रश्न आहे.’’

‘‘बारा आठवडे? सूचना फलकावर काय लिहिलं आहे त्यावर जाऊ नका. काम चालू होईपर्यंतच बारा आठवडे निघून जातील.’’ मोकाशी ओरडले. ‘‘ठीक आहे, ठीक आहे. बाराच्या ऐवजी वीस आठवडे धरा.’’ ओकांनी आपल्या दोन समवयस्क मित्रांशी जमवून घेतलं.

‘‘अरे वा रे वा, म्हणजे वीस आठवडे आम्हा वृद्धांना आमच्या खेळण्यांपासून दूर ठेवणार?’’ गोंधळेकरांनी पाठिंबा दिला.

आपल्या दोन्ही मित्रांच्या मेंदूत काही गंभीर उलथापालथ झाली आहे याची ओकांना स्पष्ट कल्पना आली. लहान मुलांशी बोलतात त्या गोंजारणाऱ्या सुरात ते म्हणाले, ‘‘हे पाहा, खेळणी मोडली आहेत म्हणजे ती दुरुस्त करायलाच हवीत. घसरगुंडय़ांचे पत्रे फाटले आहेत, स्क्रू वर आले आहेत, घसरणाऱ्या मुलांना खरचटेल, त्यांना जखम होईल. ते तुम्हाला पाहवेल का? हा खेळण्यांचा विभाग बंद आहे; त्यामुळं खरं तर लहान मुलं व त्यांच्या आयांनी इथं हिरमसून बसायला हवं. तुम्ही दोघं एवढे व्याकूळ का? बरं, आपली नातवंडं बावीस, पंचवीस वर्षे वयाची आहेत, ती काही ३ ते १० या वयातील नाहीत. तात्पर्यानं बोलायचं तर तुम्हा दोघांना उदास होण्याचं काहीही कारण नाही.’’

‘‘तात्पर्यानं बोलायचं तर तुम्ही मूर्ख आहात. ओक, तुम्हाला आमचं दु:खच समजलं नाही. काही आठवडे खेळण्यांचा विभाग बंद म्हणजे या विभागात आमची पणतवंडंच जणू अशी लहान बाळं येणार नाहीत, त्यांच्यावर चांदण्याची पण करडी नजर ठेवणाऱ्या त्यांच्या आयाही दिसणार नाहीत. बागेत खेळण्यांच्या विभागासमोरच्या भिंतीवर आम्ही मुक्काम ठोकून का बसतो?’’ मोकाशींनी प्रश्न टाकला.

‘‘का?’’ ओकांनी विचारलं.

‘‘ओक, इथं खेळणारी मुलं ही आमची जीवनदायी, चैतन्य पुरवणारी औषधं आहेत.’’

‘‘ओक, घसरगुंडीवरून कोणी एक छोटुला सात वर्षांचा दादा घसरत खाली येतो, त्याची सानुली तीन वर्षांची बहीण, दादाचा पराक्रम आईच्या खांद्यावरून पाहात असते. ‘दादा, दादा’ म्हणून ती चिमुकल्या हाताने टाळ्या पिटून दाद देते. दादा तिच्याजवळ जातो. ‘पिनू’ म्हणत तिचा फुलासारखा हात आपल्या हातात घेतो, ‘तुला पुन्हा घसरून दाखवतो,’ असं सांगून, दादा घसरगुंडीच्या मागच्या बाजूला शिडीकडे जातो. दादा दिसेनासा झाल्यावर पिनू कासावीस होते, ‘दादा, दादा’ असं ओरडत दादा गेलेल्या दिशेनं दोन्ही हात पसरते, आई समजावते, ‘दादा पुन्हा घसरत येणार आहे, तुला टाळी देणार आहे’, तेवढय़ात पराक्रमी दादा पुन्हा घसरगुंडीवरून खाली घसरत येतो. दादा दिसताच पिनूच्या चेहऱ्यावर हसणं उमलतं. ती ‘दादा, दादा’ म्हणून ओरडते.’’ मोकाशी आजोबांचा चेहरा सांगताना ताजातवाना झालेला असतो. त्यांच्या दाढीचे पांढरे खुंट चांदीसारखे चमकत होते.

ऐकणाऱ्या ओकांचे कानही सुखावले होते, जणू ते झऱ्याच्या झुळझुळ आवाजात न्हात होते.

गोंधळेकर सांगू लागले, ‘‘दुसरा एक आठ वर्षांचा छोटा दादा रिंगणघोडय़ावर बसला होता. दादा जमिनीला पायानं रेटा देऊन रिंगणचक्र जोरानं पळवत होता. दादाची छोटी बहीण बेबी, ‘मला बसायचं, मला बसायचंय’ म्हणून आईच्या खांद्यावरून हातपाय झाडत होती.’’

मोकाशी पुढचा भाग सांगू लागले, ‘‘दादाला बेबीचं दु:ख बघवेना. त्यानं फिरतं रिंगण पाय टेकवून थांबवलं. तो आईला म्हणाला, ‘आई, बेबीला बसव ना घोडय़ावर’ आई म्हणाली, ‘ती कशी बसेल? तिला घोडय़ाचे कान घट्ट थोडेच धरता येतात? ती पडेल’ दादा म्हणाला, ‘बेबी घोडय़ावर बसेल. मी तिला शिकवीन. मी घोडय़ावर बसणार नाही. मी घोडय़ाबरोबर जमिनीवर सावकाश पळेन. एका हातानं बेबीला आधार देईन. आई, तू चक्र हातानं हळू फिरव.’’

गोंधळेकर मध्ये घुसून पुढचं सांगू लागले, ‘‘ओक, गंमत तर पुढंच आहे. बेबी घोडय़ावर बसली. तिचा चेहरा आनंदानं डवरला होता. आई रिंगण हळू फिरवत होती. दादानं प्रेमानं बेबीला छान आधार दिला होता, तेवढय़ातच काय झालं कोणास ठाऊक! जमिनीवरचा दादाच पडला, घोडय़ावरची बेबी सुरक्षित होती! आई दादावर ओरडली. घोडय़ावरून खाली उतरलेली बेबी आईला म्हणाली, ‘‘दादाला रागावू नकोस. त्यानं मला घोडय़ावर बसवलं. माझ्याकरिता तो पडला. तू माझ्यावर रागव, दादावर नको,’’ आईनं दोघांनाही जवळ घेऊन प्रेमानं कवटाळलं.

सांगताना मोकाशींचा कंठ दाटून आला. गोंधळेकर-मोकाशी यांचं संयुक्त निवेदन ओकांच्या मनाला भिजवून गेलं. गोंधळेकर व मोकाशी काळजीपूर्वक, तन्मयतेनं बाळलीला पाहात असतात. ओकांच्या मनात आलं, ‘‘आपण केवढय़ा आनंदाला वर्षांनुवर्षे मुकलो. आपणही भिंतीवर गोंधळेकर व मोकाशी यांच्या जवळ बसतो. आपणही पाहात असतो; पण आपण निर्जीव हत्ती, घोडे पाहात असतो. गोंधळेकर व मोकाशी, निरागस, प्रफुल् लिंत, हसरी, चैतन्यानं निथळणारी मुलं व बाळं पाहात असतात, त्यांचे किलबिलाट ऐकत असतात. आता पुढील बारा-पंधरा आठवडे, खेळण्यांचा हा बालविभाग मुका होणार. गोंधळेकर व मोकाशी यांना गलबलून येणं स्वाभाविक आहे.’’

ओकांनी अपराधी स्वरात कबुलीजबाब दिला, ‘‘मोकाशी, सॉरी हं. तुमची बोच समजायला मला वेळ लागला. काही आठवडे आपणा साऱ्यांना खेळणारी बाळं दिसणार नाहीत. अरेरे!’’

ओकांचा रुमाल त्यांच्या डोळ्यांना चिकटला होता. गोंधळेकर म्हणाले, ‘‘ओक, फक्त काही आठवडय़ांचाच तर प्रश्न आहे. आपण नव्वदीपर्यंत म्हणजे अजून सहा वर्षे सहज जगू. सहा वर्षांतले फक्त थोडे आठवडेच तर कोरडे जाणार!’’

मोकाशींनी ओकांच्या खांद्यांना थोपटलं.

भा.ल. महाबळ