परब समजुतीच्या स्वरात म्हणाले, ‘‘मला वाटतं की आपण सर्वच उमेदवारांना निवडून द्यावं. बिच्चारा एकटा उमेदवार काय काय करेल? एकाला रस्ते, दुसऱ्याकडं फुटपाथ, तिसऱ्यावर नाले व चौथ्याकडं सार्वजनिक बागा अशी विभागणी करा. एकीचे बळ फार मोठं आहे.’’ मी एकाच वेळी उताणा, पालथा, उजवीकडं, डावीकडं असा दहा दिशांना पडलो! परब तुकोबांच्या काळातच जन्माला यायला हवे होते!

‘‘आता महापालिकेच्या निवडणुका आल्यात. कोणाला मत द्यावं याबाबत माझा गोंधळ उडाला आहे.’’ ओक म्हणाले.

‘‘ओक, शिवाजी महाराजांचा पक्ष तो आपला पक्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आपला हिंदू धर्म शाबूत राहिला.’’ मी म्हणालो. मी एवढं म्हणून थांबलो म्हणता काय; मनातल्या मनात मी ‘हिंदू धर्म की जय’ ही घोषणाही दिली. मनातली घोषणा सर्वोच्च न्यायालयाला थोडीच ऐकू येणार आहे?

‘‘मोकाशी, तुमचा हा कॉमनसेन्स माझ्याकडंही आहे. यामुळेच तर माझा गोंधळ उडाला आहे!’’

‘‘म्हणजे?’’

‘‘चार पक्ष म्हणताहेत की शिवाजी महाराज त्यांचे आहेत! या चारांपैकी आपले शिवाजी महाराज कोणते?’’ ओकांनी विचारलं.

ओकांचा मुद्दा मला पटला. परबांनी ओकांना जास्तीचा निकष सुचवला, ‘‘तुकोबा म्हणतात, ‘द्रव्याचिया मागे कळिकाळाचा लाग। म्हणोनिया संग खोटा त्याचा॥’ आपल्याला द्रव्याच्या मागे लागणारा उमेदवार नको. जो उमेदवार अत्यंत गरीब, दारिद्रय़ रेषेच्या जवळचा तो प्रामाणिक, स्वच्छ व निष्कलंक. त्याला मत द्या.’’

उमेदवार गरीब हवा हा मुद्दा आम्हाला पटला. परब पुढे म्हणाले, ‘‘मोकाशी, उमेदवार कोणत्याही पक्षाचा का असेना, आम्हा म्हाताऱ्यांना चालण्याकरता फुटपाथ मोकळे ठेवा, त्यावर न उखडणाऱ्या फरशा बसवा म्हणजे झालं. रस्त्यांवरून चालू लागलो की आपल्याला रिक्षावाल्यांची, रिक्षावाल्यांना आपली भीती वाटते.’’

‘‘परब, उमेदवारानं तुम्हाला पक्के, रुंद फुटपाथ दिले, परंतु रस्त्यांवर प्रशस्त खड्डे ठेवले तर चालेल तुम्हाला?’’ मी विचारलं.

‘‘परब, मोकळे, उत्तम फुटपाथ दिले, पण पावसाळ्यात नाले तुंबले, रस्तेही तुंबले व तुंबलेले पाणी तुमच्या घरात शिरलं तर चालेल?’’ ओकांनी प्रश्न टाकला.

सत्प्रवृत्त परब गांगरले. आपल्या फुटपाथच्या मागणीमुळं असा अनर्थ होईल याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांनी शरणागती पत्करली, ‘‘रस्ते खड्डेमुक्त असणं, नाले न तुंबणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मी फुटपाथची माझी मागणी मागं घेतो.’’

‘‘परब, सार्वजनिक उद्यानाचं काय? आपण सर्व वयानं ज्येष्ठ व प्रकृतीनं कनिष्ठ मंडळी, सकाळी व संध्याकाळी बागेत जमतो, सुखदु:खे वाटून घेतो. बाग उत्तम हवी, बसायची बाकं तुटकी नकोत.’’

परबांना उद्यानाचं महत्त्वही पटलं. परब समजुतीच्या स्वरात म्हणाले, ‘‘मला वाटतं की आपण सर्वच उमेदवारांना निवडून द्यावं. बिच्चारा एकटा उमेदवार काय काय करेल? शिवाजी महाराजांचे नाव घेणारे चार पक्ष आहेत ना? चार उमेदवार निवडा. एकाला रस्ते, दुसऱ्याकडं फुटपाथ, तिसऱ्यावर नाले व चौथ्याकडं सार्वजनिक बागा अशी विभागणी करा. एकीचे बळ फार मोठं आहे. एका पारध्यानं कबुतरं पकडण्याकरता जाळं लावलं, जाळ्यावर धान्य टाकलं. कबुतरं फसली व जाळ्यात अडकली. कबुतरं निराशेनं खचली. त्या कबुतरांपैकी एक शहाणं कबुतर म्हणालं, ‘आपण एकच शक्ती लावून, जाळ्यासकट उडू व दूर जंगलात उतरू. तेथील उंदीर जाळं कुरतडतील व आपल्याला सोडवतील. चार उमेदवार एकत्र आले तर काहीही अवघड नाही. विठ्ठल! विठ्ठल!’’

मी एकाच वेळी उताणा, पालथा, उजवीकडं, डावीकडं असा दहा दिशांना पडलो! परब तुकोबांच्या काळातच जन्माला यायला हवे होते! परबांना निवडणूक म्हणजे काय हे आता समजावून द्यायला हवं. मी म्हणालो, ‘‘परब, चार पक्षांचे उमेदवार परस्परविरुद्ध निवडणूक लढवतात. प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्रपणे, इतर उमेदवारांना भागीदार करून न घेता. एकटय़ानं चारही कामं करावयाची आहेत. एकाच वेळी चारांना निवडता येत नाही. एकोप्यानं वागणाऱ्या कबुतरांची गोष्ट माणसांना कशी लागू पडेल?’’

भांबावलेले परब तुकोबांच्या काळातून व कबुतरांच्या जाळ्यातून, वर्तमानात आले. ते म्हणाले, ‘‘उमेदवार कसा आहे हे पाहूच नका. उमेदवाराच्या पक्षाकडे पाहा. शेवटी पक्षाचा वचननामा महत्त्वाचा.’’

ओक म्हणाले, ‘‘मोकाशी, पक्षांच्या वचननाम्याबद्दल तुम्हीच अधिकारवाणीनं बोलू शकाल. उलटसुलट बोलण्यात, तुमचं कोणीही तोंड धरू शकणार नाही. वचननाम्यातील पक्षाचं धोरण व प्रत्यक्ष त्यांचं वागणं यात काहीही ताळमेळ नसतो.’’

ओकांनी माझी भलावण केलेली नाही, माझी निंदाच केली आहे हे माझ्या सहज ध्यानी आलं. त्याचबरोबर, ओकांनी माझा अधिकार मान्य केला हेही काही कमी घडलेलं नव्हतं! मी म्हणालो, ‘‘परब, शेतकऱ्यांना, खेडय़ापाडय़ातील गरीब जनतेला स्वस्त वीज व तीही चोवीस तास मिळावी असं मला वाटतं, सर्व पक्षांनाही वाटतं. पण वीजनिर्मितीच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन, विजेचे खांब उभे करण्यासाठी जमिनीचा पट्टा, त्यांच्या मर्जीविरुद्ध घेण्याच्या विरोधात सर्व पक्ष आहेत. सर्व पक्षांना कारखाने हवे आहेत, त्याचबरोबर कारखान्यांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, जंगलतोड एकाही पक्षाला मान्य नाही. पक्षांना उज्ज्वल परंपरा, सर्वधर्मसमभाव व पराकोटीचा प्रामाणिकपणा आवडतो, पण त्यांच्या पुढाऱ्यांनी केलेले आर्थिक घोटाळे सर्वच्या सर्व पक्षांना मंजूर नसतात. तात्पर्य, सर्व पक्षांना ब्रह्मचर्याचा, जबाबदारी नसण्याचा लाभ हवा आहे, त्याचबरोबर तिसरा ‘काम’ हा पुरुषार्थ मिळवण्यासाठी संसारही करावयाचा आहे.’’

मला थांबवून ओक मध्ये घुसले, ‘‘परब, आजकाल सर्व पक्षांचं तुरुंगातील व्यवस्था, सुखसोयी याकडे लक्ष आहे. गुन्हेगारांना स्वस्थता मिळावी, पॅरोलवर व रोगांवर उपचार घेण्यासाठी वारंवार हॉस्पिटलात जाता यावं, त्यांना सुधारण्यासाठी संधी द्यावी अशा प्रगत व उदार मताचे सर्वच्या सर्व पक्ष आहेत, याला कोणाचाही विरोध नाही.’’ परब आनंदी स्वरात उद्गारले, ‘‘छान! उत्तम! गुन्हेगार सुधारायला हवेत. ज्ञानोबा माऊली म्हणते, ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भूता परस्परे जडो। मैत्र जीवाचे॥’ दुष्ट नाहीसे करू नका, दुष्टातील वाकडेपणा जाईल व त्यांना सत्कर्म करण्याची इच्छा व्हावी हे पहा. रावणाला मारू नका, त्याच्यातील रावणपण नाहीसं होईल हे पहा. रस्ते, नाले, फुटपाथ अर्धवट ठेवा, चालेल, पण गुन्हेगारांना सुधारा. तुरुंगात सोयीसवलती वाढवा.’’

ओक ओरडले, ‘‘परब तुमची ही दयाबुद्धी आवरा,’’ मी उपरोधाने बोलत होतो. सर्व पक्षांतील घोटाळेबाजांना आज ना उद्या, तुरुंगात जावं लागणार आहे. दूरदर्शीपणानं, सर्व पक्ष तुरुंगात सुखसोयी निर्माण करून ठेवत आहेत!’’

परब ओशाळवाणे हसले व ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत राहिले.

मला, साहित्यिक परिसंवादाप्रमाणे, चर्चा भरकटलेली आवडत नाही. मी माझ्या मित्रांना तातडीच्या मूळ मुद्दय़ाकडं आणलं, ‘‘निवडणुका जवळ आल्या आहेत. मत कोणत्या पक्षाला द्यावं याबाबत गोंधळ उडाला आहे. त्याबाबत बोला.’’

परब म्हणाले, ‘‘मला हा प्रश्न कधीही पडत नाही. मी मुलासुनेला विचारतो. त्यांचा पक्ष हाच माझा पक्ष. या वयात, माझं औषधपाणी तेच सांभाळतात, सर्व प्रकारे माझी काळजी तेच घेतात. ते सांगतील त्यांना मी मत देणार. शेवटी, सर्व पक्षांचे उमेदवार हे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत! तुकोबा म्हणतात, ‘नर, नारी, बाळे अवघा नारायण.’’

परबांनी त्यांच्याच नव्हे तर आम्हा सर्व वृद्धांचा प्रश्न सोडवला. उतरत्या वयात, मुलासुनेचा पक्ष तोच आमचा पक्ष!