मी म्हणालो, ‘‘मला पावसाळ्याची रंगत दसपट वाढवणारी, म्हाताऱ्या मनांना तरुण करणारी, हिंदी गाणी तुमच्या कानांवर घालायची होती. उदाहरणार्थ, ‘बरसात की रात’ या चित्रपटातील, पावसात भिजलेल्या मधुबालावर चित्रित केलेलं, महम्मद रफीनं गायलेलं गीत. ‘हाय वो रेशमी झुल्फोसे बरसता पानी। फूलसे गालो पे रुकने को तरसता पानी।’  ‘रोटी कपडा मकान’ या सिनेमातील, झीनत अमानला भिजवणारा पाऊस लताच्या आवाजात बघा, ‘अरे हाय हाय यह मजबुरी।’ ओक, ‘काला बाजार’ सिनेमात वहिदा रेहमान भिजते आहे.’’

‘‘पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे, पण..’’ माझ्या जिभेवरून शब्द घरंगळत होते तोच ओकांनी आपलं तोंड उघडलं, ‘‘मोकाशी, माझ्या मनातील बोललात, पावसाळा म्हणजे पाणी. म्हटलंच आहे की, ‘पृथिव्याम, त्रीणि रत्नानि। जलम्, अन्नम्, सुभाषितम्॥’ खरी रत्नं तीनच; एक पाणी, दुसरं अन्न आणि तिसरं सुभाषित. परंतु, ‘मूढै: पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते॥’ परंतु मूर्ख मंडळी, हिरा-माणिक फक्त याच खनिज तुकडय़ांना डोक्यावर घेऊन रत्न म्हणून नाचतात.’’

‘‘ओक, मध्ये मध्ये बोलायची, संस्कृत प्रीतीची विकृती तुम्ही सोडा. मी म्हणत होतो, ‘पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋ तू आहे, पण.’  मी ‘पण’ म्हणालो याचा अर्थ माझं वाक्य पुरं झालेलं नाही.’’

परब प्रगटले, ‘‘ओक, छान बोललात! माणसाला याहून काय हवं? अन्न, पाणी व तुकोबांची वाणी.’’

मुळात, माझं बोलणं ओकांनी अध्र्यावर तोडलं, त्यानंतर तुकोबांचे चमचे परब मध्ये घुसले! मी माझा संताप तुकोबांवर काढला, ‘‘परब, ओकांनी माझं पावसाळ्यावरचं एक वाक्य पुरं करू दिलं नाही, मध्येच त्यांनी पृथ्वीवरची तीन रत्नं सांगतो म्हणून जल, अन्न व सुभाषितं हीच रत्नं असा भलताच मुद्दा मांडला. तुम्ही काय केलंत? सुभाषितं या शब्दाच्या ठिकाणी तुकोबांची वाणी या शब्दाची पेरणी केलीत.’’ परब म्हणाले, ‘‘मोकाशी, सुभाषित म्हणजे सुंदर वचनं. ती संस्कृतात, मराठी, इंग्रजीत, सर्व भाषांत आहेत. तुकोबांची वचनं तुम्हीसुद्धा ती तुमचीच आहेत अशा पद्धतीनं उच्चारता.’’

‘‘मी? माझ्यावर भलते आरोप करू नका. माझ्या घराण्यात कोणीही वारकरी नव्हता.’’

‘‘मोकाशी, ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे॥’ हे संसाराचा सारांश सांगणारे सत्यवचन तुकोबांचे आहे. ‘नाही निर्मळ जीवन। काय करील साबण॥’ हे साबण कंपन्यांची झोप उडवणारं वचन तुकोबांचं आहे. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा॥’ असे आम्ही आहोत हे सर्व राजकीय नेते म्हणतात. प्रत्यक्षात एकही नेता लंगोटी देऊ शकणार नाही, कारण गडगंज श्रीमंत झालेल्या नेत्यांकडे लंगोटी नसतेच आणि नाठाळांच्या माथ्यांवर काठी कोण हाणणार? नाठाळांच्या हातातच तर काठय़ा आहेत!’’ परबांकडे मी भक्तिभावाने पाहू लागलो. परब हे सर्व एवढय़ा पोटतिडकीने बोलले की त्यांच्या घरातील चार पिढय़ा वारी करतात हे कमीच असून, परबांचा पूर्वज, तुकोबांच्या बाजूने, मंबाजीच्या गुंडटोळीशी लढला असणार असे मला वाटले.

ओकांनी मला गदागदा हलवून विचारले, ‘‘मोकाशी, सुभाषित म्हणजे काय हे समजले का?’’

मी ओरडलो, ‘‘समजले, पण ते परबांच्या तुकोबामुळे, तुमच्या न कळणाऱ्या संस्कृत सुभाषितांमुळे नाही. परबांच्या हृदयात तुकोबा आहेत.’’ माझ्या स्तुतीचा मारा परबांना सहन झाला नाही. परब म्हणाले, ‘‘मोकाशी, माझी कसली भलावण करता? एवढे ज्ञानी तुकोबा, पण ते किती नम्र होते? तुकोबा म्हणतात, ‘काय जाणो वेद। आम्ही आगमाचे भेद॥ एक रुप तुझे ध्यानी। धरुनी राहिलो चिंतनी॥ तुका म्हणे दीना। नुपेक्षावे नारायणा॥’ ते असो, मोकाशी, तुम्ही प्रारंभी ‘पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋ तू आहे, पण..’ म्हणून थांबला होता. ‘पण’ च्या पुढे काय?’

तुकोबांच्या अमृतवाणी ऐकवणाऱ्या परबांचा प्रेमभाव माझ्या मनाला भिडला. ‘पण’च्या पुढं मलाकाय म्हणायचं आहे हे परबांना ऐकायचं होतं. धन्य ते परब व धन्य ते परबांचे तुकोबा व धन्य तो तुकोबांचा विठ्ठल! आणि धिक्कार असो माझ्या बालशत्रू ओकांचा! असो. ‘पण’ नंतरचे माझे ‘सुविचार’ परबांपुढे मांडायची हिंमत मला होईना. मी, ‘विस्मरण’ या वयानुसार प्राप्त होणाऱ्या हुकमी सिद्धीचा, वापर केला, ‘‘पण हा शब्द मी उच्चारलाच नव्हता. ‘पावसाळा हा माझा अत्यंत आवडीचा ऋ तू आहे, पूर्णविराम’. वाक्य पूर्ण झालं होतं. एवढं म्हणून मी थांबलो होतो.’’

‘‘मोकाशी, खोटं बोलू नका. पण हा शब्द तुम्ही उच्चारला होता, आता तुम्ही माघार घेत आहात, कारण मनातील अभद्र विचार बोलायची तुमची हिंमत नाही. तुम्ही डरपोक आहात.’’ ओकांचं तोंड बडबडलं. मी संतापलो. मी चिडून म्हणालो, ‘‘फक्त चारसहा पावसाळी मधुर गाणी मला आठवली. ‘पण’ नंतर मला पावसाळ्याची रंगत दसपट वाढवणारी, म्हाताऱ्या मनांना तरुण करणारी, हिंदी गाणी तुमच्या कानांवर घालायची होती. उदाहरणार्थ, ‘बरसात की रात’ या चित्रपटातील, पावसात भिजलेल्या मधुबालावर चित्रित केलेलं, महम्मद रफीनं गायलेलं गीत. ‘जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात.’ त्या गीतातील, ‘हाय वो रेशमी झुल्फोसे बरसता पानी। फूलसे गालो पे रुकने को तरसता पानी।’ या ओळी आठवा. मधुबालाच्या रेशमी केसांतून निथळणारं आणि तिच्या फुलांसारख्या गालांवर मुक्काम करायला मिळावा म्हणून हट्ट धरणारं पाणी. ओक, पुन्हा एकदा मधुबालाच भिजते आहे. चित्रपट, ‘चलतीका नाम गाडी.’ गायक किशोरकुमार. ओळी आठवा. ‘तन भीगा, सर गीला है, उसका कोई पेच भी ढीला! चलती, झुकती, चलती रुकती, निकली अंधेरी रात मे॥’ परब, मी खात्रीने सांगतो, मधुबाला पावसात भिजली नाही, मधुबालाची संगत मिळावी म्हणून पाऊस आकाशातून धरणीवर उतरला! ओक, ‘रोटी कपडा मकान’ या सिनेमातील, झीनत अमानला भिजवणारा पाऊस लताच्या आवाजात बघा. ‘अरे हाय हाय यह मजबुरी। यह मौसम और यह दूरी। मुझे पल पल हाय तडपाए। तेरी दो टकियोकी नौकरी मे मेरा लाखोका सावन जाए॥’ ओक, ‘काला बाजार’ सिनेमात वहिदा रेहमान भिजते आहे.’’

ओक शांतपणे म्हणाले, ‘‘मोकाशी तुम्हाला पावसाळा आठवायचा नाही, तुम्हाला सुमधुर हिंदी गाणीही ऐकवायची नाहीत. तुमच्या मनाच्या आरशात, भिजलेल्या मधुबाला, पद्मिनी, हेमा मालिनी, लीना चंदावरकर या अभिनेत्री आहेत. परब, तुम्ही मोकाशींचं खरं रूप समजून घ्या.’’

ओकांनी माझं विद्रूप परबांना दाखवलं. ओक माझ्याच वर्गातील आहेत. नाहीतर त्यांनी मी न उच्चारलेल्या पावसातल्या, पद्मिनी (जिस देश में गंगा बहती है) हेमा मालिनी (क्रांती), लीना चंदावरकर (हमजोली) या कशा बरं आठवल्या? मी बोलून उघडा पडलो होतो. ओकांनी माझा पडलेला चेहरा परबांपुढे आणला.

तेवढय़ात परब म्हणाले, ‘‘या पोरींच्या भूमिकात तसं वावगं काय आहे? या सर्व पोरी म्हणजे विठ्ठलाची रूपे आहेत. सारी बाळे पांडुरंगाची, तरीही देव सर्वाना सारखी वागणूक देत नाही यासाठी खुद्द तुकोबाच विठ्ठलाला जाब विचारतात, ‘अवघी तुज बाळें सारिखीं नाहीं ते। नवल वाटते पांडुरंगा॥ म्हणतां लाज नाही सकळांची माऊली। जवळी धरिलीं एकें, दुजे दुरी॥ तुकया बंधु म्हणे नावडती त्यांस। कासया व्यालास नारायणा॥’’

परबांच्या आश्वासक शब्दांच्या शिंपणीने, निर्माल्य झालेले मन उमलले. वा! म्हणजे पावसात भिजणारी जी रूपे मी आठवत होतो ती विठ्ठलाची होती? म्हणजे मी विठ्ठल आठवत होतो तर?

भा.. महाबळ

chaturang@expressindia.com