परब उत्तरले, ‘‘पाच वर्षांच्या पोरी अशी शहाणी चिवचिव करतात, याचं सर्व श्रेय त्यांच्या आयांनाच आहे. आया त्यांचे बोल वर्षांनुवर्षे कौतुकानं ऐकतात. म्हणून तर त्यांच्या जिभांवर शब्दांची अशी रंगीबेरंगी फुलं उमलतात. ‘किती चुरुचुरु बोलता? जीभ आहे म्हणून ती उचलायलाच हवी का?’ असं काही आया म्हणाल्या असत्या तर चिमुकल्या जिभांवर शब्दांचे अंकुर फुटलेच नसते.’’

ओक आश्चर्यचकित होत बागेत प्रवेश करत होते. त्यांचे डोळे विस्फारले होते. ते म्हणाले, ‘‘ही छोटी मुले म्हणजे कमाल आहे! गेले कितीतरी दिवस मला छोटी मुले व त्यांच्या आया सकाळ-संध्याकाळ पाहण्याचं भाग्य लाभतं. सकाळी बागेजवळ स्कूलबस उभी राहते ती सकाळच्या शाळेत पाच-सहा वर्षांच्या छोटय़ांना घेऊन जाण्यासाठी. तीच वेळ असते माझी बागेत येण्याची. छोटुकली सहजच दिसतात. संध्याकाळी, दुपारच्या शाळेतील मुलांना घरी सोडण्याकरिता स्कूलबस बागेसमोर थांबते. त्यावेळी मी मुद्दाम किलबिलाट ‘ऐकण्याकरिता’ खाली उतरतो. मजा येते.’’

परबांची उत्सुकता ताणली गेली. ते म्हणाले, ‘‘ओक, पिटुकल्यांच्या गमती सांगा. दुडदुडणारी पोरे म्हणजे विठ्ठलाची बालरूपेच.’’

परबांना सर्वत्र, चराचरात विठ्ठल दिसतो. त्यांना एखादे वेळेस तरी समोर उभ्या असलेल्या माझ्या म्हणजे मोकाशीत, विठ्ठल दिसायला काय हरकत आहे? परबांना माझ्यामध्ये २४ गुणिले ७ असा पूर्ण काळ मोकाशीच का दिसतो? ब्रेकिंग न्यूज किंवा वूज म्हणून माझ्यात परबांना एकदा तरी विठ्ठल दिसावा!

परबांनी ओकांना दिलेलं उत्तेजन म्हणजे खुद्द विठ्ठलाच्या तुकोबांची कृपा! ओक सांगू लागले, ‘‘एक नीना का मीना म्हणाली, ‘ कविता, तुझी पिंटी एकदम स्मार्ट आहे. पिंटी मला खूप आवडते. पिंटे, पण तुझा धाकटा भाऊ, काय गं त्याचं नाव?’ पिंटी म्हणाली, ‘त्याचं नाव अक्षय आहे. मी त्याला लाडानं अक्षू म्हणते.’’ मीना म्हणाली, ‘‘तू हुशार, हसरी आहेस. पण तुझा अक्षू रडका आहे.’’ पिंटू चिडली, ‘‘मावशी माझ्या अक्षूला रडका म्हणायचं नाही. भूक लागली तरच तो रडतो. त्याला अजून बोलता येत नाही. मग तो काय करणार? मी त्याला झोके देते तेव्हा तो माझ्याकडे पाहतो व हसतो. मावशी, तुम्हाला अक्षूप्रमाणे दुपट्टय़ात घट्ट गुंडाळून पाळण्यात ठेवलं तर तुम्ही भूक लागली नसतानाही रडाल! अक्षूला पाळण्यात ठेवून आई मला बसमध्ये पोचवायला खाली आली आहे, अक्षू घरात एकटा आहे. तरी तो घाबरत नाही. समजलं?’’

आता बागेत शिरण्यापूर्वी मी स्कूलबसच्या थांब्याजवळून येत होतो. लाल पिवळी स्कूलबस आलेली नव्हती. तिशीतील नातसुना व त्यांची मुलं बसची वाट पाहात उभ्या होत्या. त्यातील एक मुलगी आईला सांगत होती, ‘‘मॉम, तू आता घरी जा. बस आली की मी आपली आपली बसमध्ये चढेन. माझ्या मैत्रिणी आहेत ना. शिवाय पाच मावश्या आहेत.’’ इतर मुलींच्या आयाही म्हणाल्या, ‘‘सुनंदा, तू जा. आम्ही आद्याला बसमध्ये चढवू.’’ सुनंदा म्हणाली, ‘‘मी थांबते. माझ्या डोळ्यांसमोर आद्या बसमध्ये चढली की मला निवांत वाटतं. दुपारी नाना आद्याला घेऊन जायला खाली येतात, आद्या घरी पोहोचली म्हणून मला ऑफिसात फोन करतात.’’ त्यावर आद्या म्हणाली, ‘‘नाना पणजोबांचं वय आहे नव्वद. तरीही ते मला घ्यायला खाली उतरतात व गेटपाशी येतात. मी बसमधून खाली उतरून ओरडते, नाना रस्ता ओलांडून या बाजूला येऊ नका. वाहने दोन्ही बाजूंना धावतात, तुम्ही पडाल. मी रस्ता ओलांडून तुमच्या बाजूला नीट येते. तुम्ही नुसते न घाबरता पाहा. मी तुम्हाला लिफ्टने वर नेते. घरी गेल्यावर मी आईचा फोन जोडून देते. आद्या सुखरूप पोचली हे तुम्ही आईला सांगा.’’ मॉम तू जा. बाबा आजोबा व आई आजी ऑफिसला गेले असतील. तुला नाना पणजोबांना व पणजी यांना चहा करायचा आहे. डॅड तुझ्यामागे ‘हे पाहिजे, ते पाहिजे’ अशी कटकट लावतोच. तुझं आवरून तू घराबाहेर पडणार केव्हा? तुझी दमछाक होते. तू निघ. मुख्य म्हणजे बाहेर पडताना मॅचिंग लिपस्टिक लाव. तू स्मार्ट दिसशील.’’

मी ओकांना म्हणालो, ‘‘म्हणजे सहा वर्षांची आद्या ही पोरटी, नाना पणजोबा ते मॅचिंग लिपस्टिक लावायला विसरणारी मॉम, एवढं सहाजणांचं कुटुंब सांभाळते!’’ ओक सांगू लागले, ‘‘संध्याकाळी मला श्रुती ही चिमणी दिसते. मुकुंदा या मोठय़ा भावाला, स्कूलबसमधून घ्यायला श्रुती व तिची आई मीना बसपाशी येतात.’’

‘‘वय?’’ मी विचारलं.

‘‘अंदाजे, श्रुती ५, मुकुंदा ७ आणि मीना ३०. श्रुती शाळेत जात नाही. प्ले ग्रुप असं काहीतरी आहे, तिथं ती सकाळी दोन-तीन तासांकरिता जाते. पाच वर्षांची श्रुती बसची वाट पाहणाऱ्या मीना या आईला शहाणपण देत असते, ‘‘मॉम, मधून मधून ‘हं, समजलं’ असं काहीतरी म्हणावं. म्हणजे सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याचं लक्ष आहे हे कळतं. तू काहीच म्हणत नाहीस म्हणून डॅड तुझ्यावर चिडतो.’’ मीना हसून, ‘‘हं. समजलं.’’ असं म्हणाली. ‘‘श्रुती तू माझी मुलगी आहेस, मॉम नाहीस. तू मला शिकवतेस?’’ श्रुती म्हणाली, ‘‘होय. पाण्याचं छोटंसं भांडं उंचावर असेल तर त्यातील पाणी कमी उंचीवरच्या भल्या मोठय़ा पातेल्याला घ्यावं लागतं. हे वाक्य तुझंच आहे, हे तू डॅडला ऐकवतेस. डॅडला तुझं हे वाक्य आवडत नाही. डॅड चांगला आहे. तू त्याच्याशी उगाच वाद घालतेस.’’

‘‘ओक, अशी कोणी श्रुती खरंच आहे?’’ मी विचारलं.

परब म्हणाले, ‘‘ओक, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, आद्या, श्रुती ही फुलपाखरं मागील जन्मी कोणत्या तरी विठ्ठलभक्त वारकऱ्यांच्या घरातील असणार. मला या दोघींच्या आयांचं कौतुक वाटतं. ‘बाळ काय जाणे जीवनउपाय। मायबाप वाहे सर्व चिंता॥ तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता। आमुची ते सत्ता तयावरी॥’’

मी उखडलो, ‘‘परब, तुमचा ‘तुका म्हणे’ येथे गैरलागू आहे. आद्या व श्रुती चुणचुणीत आहेत. तुम्ही त्यांच्या आयांचं काय कौतुक करताय?’’

परब उत्तरले, ‘‘पाच वर्षांच्या पोरी अशी शहाणी चिवचिव करतात, याचं सर्व श्रेय त्यांच्या आयांनाच आहे. आया त्यांचे बोल वर्षांनुवर्षे कौतुकानं ऐकतात. म्हणून तर त्यांच्या जिभांवर शब्दांची अशी रंगीबेरंगी फुलं उमलतात. ‘किती चुरुचुरु बोलता? जीभ आहे म्हणून ती उचलायलाच हवी का?’ असं काही आया म्हणाल्या असत्या तर चिमुकल्या जिभांवर शब्दांचे अंकुर फुटलेच नसते. तुकोबा म्हणतात, ‘विठ्ठल माझा जनिता, तरी मीच त्याच्यावर सत्ता गाजवितो’ आद्या व श्रुती त्यांच्या मातांवर तशीच सत्ता गाजवीत आहेत.’’

ओकांनी मान डोलवली, ‘‘अशा चमकदार कन्या सांभाळणाऱ्या नातसुनाच श्रेष्ठ आहेत.’’

chaturang@expressindia.com