मातीत विघटित होणारे व विविध झाडांच्या बियांचा समावेश असलेले चहाचे ग्लास सध्या सुरू असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत वारकऱ्यांमध्ये वाटण्याचा नेम ‘ब्रुक बॉण्ड रेड लेबल’ या चहा कंपनीने हाती घेतला असून, या बियांतून पुढील काळात उगवणाऱ्या झाडांमुळे पंढरीची वाट अनायासेच हिरवी गर्द होणार आहे.

लक्षावधी वारकरी सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वाटेवर आहेत. चालताना येणारा शीण दूर करण्यासाठी चहा हा उत्तम उपाय. वारीच्या वाटेत असलेल्या चहाच्या दुकानांमध्ये वारकऱ्यांचे चहापान नेहमीचेच. या दुकानांमध्ये चहा देण्यासाठी वापरण्यात येणारे ग्लास चहा पिऊन झाल्यानंतर वाटेतच टाकण्यात येतात. ते मातीत विघटित होत नसल्याने पर्यावरणासाठी ते घातक ठरतात. ही बाब लक्षात घेऊन ‘ब्रुक बॉण्ड’ने मातीत विघटित होणारे ग्लास या दुकानांमध्ये वाटले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या ग्लासांमध्ये विविध झाडांच्या बिया आहेत. त्यामुळे रस्त्याच्या बाजूस टाकणारे हे ग्लास मातीत मिसळून जातीलच, शिवाय त्यांतील बियांतून झाडेही उगवतील. आपल्या चहामध्ये आयुर्वेदिक घटक असल्याचे सांगणाऱ्या ‘ब्रुक बॉण्ड’ने त्या दाव्यास साजेसा असाच हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘ब्रुक बॉण्ड’ व वारीची व्यवस्था पाहणारे ‘चोपदार फाऊंडेशन’ यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.