लाडक्या विठुरायाचे लोभस रूप डोळ्यात साठवण्यासाठी शेकडो मल चालत वारकरी दरवर्षी येतात. या विठुरायाच्या अंगावर दिसणारा पोशाख आपण पाहतो. त्या पोशाखालाही शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत नामदेव महाराजांनी सावळ्या विठुरायाला पोशाख बनवून दिला होता. ही परंपरा पंढरपुरात आजही निकते घराण्याकडून चालवली जाते. गंमत अशी, की कसलेही मोजमाप किंवा टेप न लावता पंढरपुरातील हे घराणे हे काम आजतागायत करत आहे.

संत नामदेव हे िशपी समाजाचे विठ्ठलाचे निस्सीम भक्त. संत नामदेवांनी पांडुरंगाला पोशाख शिवून दिल्याचा वारकरी सांप्रदात उल्लेख आहे. ही परंपरा आजही जपली जात आहे. पंढरपुरात विठुरायाला पोशाख बनवण्याचे काम निकते घराण्याकडे आहे. या घराण्यातील राजेंद्र निकते यांनी यंदाचा विठुरायाचा पोषाख शिवला आहे.

पांडुरंगाच्या या पोशाखाला पूर्वी बाराकाशी असे म्हणायचे. पुढे बारा-बंदी, अंगरखा म्हणून ओळखला जातो. देवाचे कपडे शिवण्याची कला वंशपरंपरेने सुरू आहे. यासाठी पूर्वी खास रेशमाचे कापड वापरले जात होते. आता मखमल, वेलवेट यांसारखे कापड वापरले जाते. बारा ठिकाणी बंद असलेला हा अंगारखा बनवताना टेप न लावता अंदाजे शिवला जातो. विठ्ठला बरोबर इतर देवांचे पोशाखही हेच घराणे तयार करते. त्याचबरोबर देवाच्या डोक्यावर असलेली पगडी देखील बनवण्याचे काम इथे केले जाते.