खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

पंढरपूरच्या वारीला जागतिक अमूर्त वारसा हक्क मिळावा, अशी मागणी खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी इंदापूर ते सराटी वारी मध्ये  सहभाग नोंदवताना केली. देहू ते पंढरपूर तुकाराम महाराजांच्या पालखी  सोहळ्यात छत्रपती शिवराय व छत्रपती शाहूचे वंशज छत्रपती संभाजीराजे हे  इंदापूर येथे सहभागी झाले. तुकाराम महाराजांच्या पालखीला हार घालून त्यांनी इंदापूर येथून पायी वारीला सुरुवात केली.

वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची जुनी परंपरा असून  वारीमध्ये येऊन आपल्याला आनंद झाला, असा उल्लेख करून ते म्हणाले , मणिपूरचे हरिकिर्तनम,  योगा यासह  देशातील सात ते आठ  परंपरांना  अमूर्त जागतिक वारसा हक्क यादीत स्थान मिळाले आहे. वारी ही जुनी परंपरा असून दरवर्षी महाराष्ट्रातील २० ते ३० लाख वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. जागतिक पर्यटक या वारीकडे आकर्षक झाला पाहिजे व याची नोंद युनेस्कोनी घेतली पाहिजे. यासाठी  अमूर्त जागतिक वारसा हक्क यादीत वारीला  स्थान मिळणे आवश्यक आहे.  हे स्थान मिळवण्यासाठी   प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे  म्हणाले.

वारीचा वारसा छत्रपतींचा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर, छत्रपती संभाजी महाराज यांनी तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांना वारीमध्ये अडचणी आल्या होत्या तेव्हा आíथक आणि परकीयांपासून सरंक्षण दिले होते. अशी परंपरा छत्रपती घराणे व वारकऱ्यांची आहे . त्याचे स्मरण करीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती घराण्यातील संभाजीराजे यांनी  वारीमध्ये सहभाग नोंदवत  परंपरा पुढे कायम ठेवली.  उपस्थित वारकऱ्यांनी संभाजीराजे यांचे उत्साहात  स्वागत केले.