व्हीआयपी, ऑनलाईन दर्शन सेवा बंद

आषाढी यात्रेच्या पाश्र्वभूमीवर येत्या २५ जूनपासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. या काळात व्हीआयपी,ऑनलाईन दर्शन सेवा बंद ठेवली जाणार असल्याची माहिती, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी दिली. आषाढी एकादशी ४ जुलरोजी आहे.

कोणतेही आमंत्रण नाही,कोणतेही निमंत्रण नाही, तरीदेखील न चुकता पायी वारी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा वारकरी सांप्रदायाने जपली आहे. वारकरी सांप्रदायातील महत्त्वाची आषाढी यात्रा. या यात्रेसाठी लाखो वारकरी उन,वारा,पाऊस,थंडी याची तमा न बाळगता शेकडो मल चालत येतात. या भाविकांना पंढरपूरमध्ये आल्यावर सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. याचा एक भाग म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने २५ जून पासून २४ तास दर्शनाची सोय केली आहे. या काळात देवाला होणारे नित्योपचार बंद राहणार आहेत.भाविकांसाठी २४ तास दर्शन १३ जुलपर्यंत सुरु राहणार आहे.

शेकडो मल पायी चालत आलेल्या भाविकांना सावळ्या विठुरायाचे दर्शन सुलभ घेता यावे म्हणून मंदिर समिती सज्ज झाली आहे. दि. २५ जून ते १३ जुल अखेर व्हीआयपी,ऑनलाईन दर्शन सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दि. २५ जूनपासून श्री विठ्ठलाचे नवरात्र सुरु होते. या काळात देवाचा पलंग काढला जातो. आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकाला दर्शन तात्काळ मिळावे म्हणून देव २४ तास दर्शनासाठी उभा असतो. पुढे प्रक्षाळ पूजेला म्हणजेच १३ जुल रोजी देवाला मीठ, िलबू लावून स्नान घातले जाते आणि पुन्हा देवाचा पलंग ठेवण्याची प्रथा वारकरी सांप्रदायात आहे. असे असले तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांसाठी विठ्ठल २५ जूनपासून आता २४ तास उभा राहणार आहे.

मंदिर समितीने उतरविला अपघात विमा

आषाढी यात्रेत कोणतीही दुर्घटना झाली अथवा अपघात झाला तर मंदिर समितीच्या वतीने विम्याचे संरक्षण मिळणार आहे. जवळपास २,५१,००० रुपयांचा प्रीमियम भरला असून दुर्दैवाने जर २५ भाविक मृत्युमुखी पडले तर प्रत्येकी २ लाख,अपंगत्व आल्यास प्रत्येकी १ लाख आणि जखमी झाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयाचे संरक्षण मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दिली.