संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेसाठी चार सुसज्ज रुग्णवाहिका आणि तीन टँकर पुण्यातून मंगळवारी रवाना झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ‘जय गणेश रुग्णसेवा’ अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवीवर्षांनिमित्त पालखी सोहळा समारोपापर्यंत आरोग्यविषयक सेवा विनामूल्य देण्यात येणार आहेत.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, बाळासाहेब सातपुते, ज्ञानेश्वर रासने, विश्वास पलुसकर, विजय चव्हाण, बाळासाहेब रायकर या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदा ३१ वे वर्ष आहे. वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी रवाना झालेल्या रुग्णवाहिकेसोबत डॉ. स्वाती टिकेकर, डॉ. सुरेश जैन, डॉ. बबन राऊत, डॉ. प्रवीण भोई, डॉ. शांताराम पोतदार, डॉ. दिलीप सातव, डॉ. पीयूष पुरोहित यांचा चमू सज्ज झाला आहे. सुनील रासने म्हणाले,की सासवडमाग्रे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत आणि लोणीमाग्रे जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका आणि टँकर असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरित मिळाव्यात, यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.