नुकताच उत्तरायणाचा प्रारंभ झाला, सूर्याचा उत्तर दिशेने भासमान प्रवास सुरू झाला. २१ डिसेंबर म्हणजे वर्षांतला वैशिष्टय़पूर्ण दिवस. रात्र मोठी आणि दिवस लहान. आता पुढील सहा महिने दिवस मोठा होत जाणार. याच मुहुर्तावर हेमंत संपून शिशीर ऋतूलाही सुरुवात झाली. बेंगळुरूची कडाक्याची थंडी मागे ठेवून वास्तुपुरुषाने समुद्री घारींनी दाखवलेल्या दिशेने अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील ऐतिहासिक महानगरात पहाटे पहाटेच प्रवेश केला. वास्तुपुरुषाने ठिकाणही अप्रतिम निवडलं, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ प्रार्थनांनी भारावून गेलेला, अग्निजन्य खडकांत बौद्ध कलाकारांनी निर्मिलेल्या गुंफांचा आणि नसíगक हिरवाईने वेढलेला कृष्णगिरीचा परिसर. कृष्ण पक्षातील पहाट, तारकांनी लखलखणारं नभांगण, खाली दूरवर पश्चिमेकडे शहरातील झगमगाट, सोबत रातव्यांचं ‘चापुक, चापुक’  पाश्र्वसंगीत यात रमलेला वास्तुपुरुष आजुबाजूच्या जंगलातून येणाऱ्या पक्षीगणांच्या भूपाळ्यांनी भानावर आला. सूर्योदय होत होता कृष्णगिरीच्या मागे आणि प्रकाशमान होत होता पश्चिमेकडील, दक्षिणेकडील आसमंत. शहराचा झगमगाट कमी होत चालला आणि दूर समुद्र किनाऱ्यावर सुवर्णरेखा उमटली. आकाशातही गुलाबी, नारंगी, सोनेरी रंगांची पखरण दिसायला लागली. दक्षिणेचं पाचूचं जंगल चमकायला लागलं आणि त्यामध्ये लपलेल्या तीन निळावंती सूर्यप्रकाशात मिरवायला लागल्या. कृष्णगिरी वनाने वेढलेले हे जलाशय- तुळशी, विहार आणि पवई- या महानगराचे आश्रयदाते. इतिहासात रमलेला वास्तुपुरुष अचानक शहारला, डोंगरातून येणाऱ्या शीतल झुळुकांनी आणि उपराळकर देवचाराच्या धीरगंभीर आश्वासक आवाजाने, ‘‘कमाल आहे तुझी वास्तुपुरुषा, काय अप्रतिम परिसर निवडलास आपल्या भेटीसाठी आणि तोही या प्रचंड महानगराच्या मध्यावर! इतिहासातून वर्तमान आणि पुढे भविष्याकडे प्रवास करायचा तुझा विचार मला स्पष्ट दिसतो आहे. मलाही खूप कुतूहल आहे या महानगराच्या उत्क्रांतीचं आणि काळजी वाटते त्याच्या पुढील वाटचालीची. चल सुरुवात कर तुझ्या महानगर पर्वाला, इथल्या महामानवाला- गौतम बुद्धाला प्रणाम करून.’’

वास्तुपुरुषाची नजर पश्चिमेकडील गुंफा परिसरावरून भिरभिरत पुढील शहरीकरणाकडे गेली. काळ्याभोर पाषाणात कोरलेल्या पायऱ्यांच्या पायवाटा, जलकुंडं आणि विस्तृत परिसरात पसरलेले विहार वास्तुपुरुषाला खुणावत होते, ‘‘मांड आमच्या कान्हेरीची कहाणी आणि या मुंबापुरीचा इतिहास सर्वासमोर!’’ शहारलेला वास्तुपुरुष मुंबापुरीच्या इतिहासाच्या आठवणींनी रोमांचित झाला. ‘‘अनेक दंडवत, देवा महाराजा! ही जागाच स्फूर्तीदायी आहे, संस्कृतीने आणि निसर्गाने भारावलेली आहे, भविष्याकडे आशादायक नजरेने बघायला लावणारी आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी हा परिसर बौद्ध धर्माच्या शिकवणीने गजबजलेला होता, हे एक सांस्कृतिक विद्यापीठच होतं. इथून आणखी उत्तरेला, उल्हास खाडीच्या पल्याड वसई आणि सोपारा ही अशीच पुरातन वारशाची ठिकाणं आहेत. या साष्टी बेटावर आणखीही बौद्ध आणि िहदू गुंफा आहेत- जोगेश्वरी, महाकाली आणि मंडपेश्वर. शहरीकरणाच्या पसाऱ्यात बकाल अवस्थेत सापडलेला हा वारसा. तर आणखी दक्षिणेला घारापुरी बेटावरील जगप्रसिद्ध िहदू गुंफांना मात्र जागतिक वारशाचा दर्जा मिळाला, त्रिमूर्तीच्या चेहऱ्यावर समाधान फुललं! पुरातन कालापासून ते इतिहासकालात या परिसरात अनेक राजघराण्यांचा वावर होता. पण त्यापूर्वीही अश्मयुगात मानवी वसाहतीचे पुरावे इथून जवळच्याच कांदिवली परिसरात सापडलेले आहेत, बहुधा कोळी समूहाचे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहर राजघराण्यांनी या परिसरात राज्य केलं, सामान्य युगाच्या तीन शतकं आधी ते बाराव्या शतकापर्यंत. पण या मुंबापुरीच्या शहरीकरणाचा खरा मूळ संस्थापक म्हणजे तेराव्या शतकातला राजा भीमदेव. या साष्टी बेटाच्या दक्षिणेकडील मिठी नदीच्या पलीकडील सात बेटांच्या समूहातील एका बेटावर त्याने आपल्या राज्याची राजधानी ‘महिकावती’ स्थापली. हेच आजचं माहीम. मुंबापुरीचा उगम इथेच झाला. १४ व्या शतकापासून पुढे इथे गुजरात सुलतान, बहामनी सुलतान, मोगल, पोर्तुगीज, मराठे आणि शेवटी २०व्या शतकापर्यंत इंग्रजांनी राज्य केलं. याच कालावधीत मुंबापुरीच्या इतिहासाबरोबरच भूगोलही झपाटय़ाने बदलत गेला. इथल्या समुद्र किनाऱ्याचं महत्त्व कळल्याने इथे संरक्षणासाठी किल्ले बांधण्यात आले- अर्नाळा, वसई, घोडबंदर, वांद्रा, माहीम, वरळी, रेवा, शीव, शिवडी आणि इंग्रजांची राजधानी ‘फोर्ट’ ही काही उदाहरणं. याच काळात सात बेटांचं एकत्रीकरण झालं, शहरीकरण झालं, मुंबई बेटांची मुंबई महापालिका झाली. मिठी नदीच्या दक्षिणेकडील हे शहर वाढत वाढत साष्टी बेटावर पसरलं, मुंबई उपनगर म्हणून. शहराची ख्याती देशाची आर्थिक राजधानी म्हणून व्हायला लागली आणि देशभरातून माणसं इथे उपजीविकेसाठी यायला लागली. हळूहळू ही जागाही अपुरी पडायला लागली आणि शहर पूर्वेकडे ठाणे खाडीपलीकडील मुख्य भूप्रदेशाकडे पसरायला लागलं. नवी मुंबई निर्माण झाली, त्यापुढे मग ठाणे, रायगड जिल्ह्यंचा काही भाग एकत्रित होऊन आता हे मुंबई महानगर तयार झालं. इंग्रजांनी इथल्या सुविधांचा आणि व्यवस्थापनाचा पाया घातला. घोडय़ाच्या ट्रॅमपासून सुरुवात होऊन रेल्वेपर्यंत सार्वजनिक वहातूक, तुळसी-विहार-पवई-तानसा-वैतरणा अशा तलावांचं जाळं विणलं गेलं शहरी पाणीपुरवठय़ासाठी, रस्ते आखणी झाली, वीजपुरवठय़ाची सोय झाली. पुढे स्वातंत्र्यानंतरही राज्यकर्त्यांचं लक्ष मुंबईवर राहिलंच, सुधारणा होत रहिल्या; पण त्यात विस्कळीतपणा आला, लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढत गेली आणि शहराला बकालपणा आला. या जुन्या मुंबई शहरातून दहिसर, पोईसर, ओशिवरा, मिठी आणि माहुल अशा पाच नद्या वहातात यावर कोणी विश्वास ठेवणार नाही कारण या सरितांचं रूपांतर आज गटारांत झालं आहे!

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!
Gajkesari Rajyog In Three Rashi On 27th March 2024 Horoscope
२७ मार्चपासून अडीच दिवस ‘या’ ३ राशींची प्रगती कुणी अडवू शकत नाही; दुप्पट शक्तीचा गजकेसरी योग देईल लक्ष्मीकृपा

‘‘वास्तुपुरुषा, ‘महानगर पर्वा’ची सुरुवात छान झाली. सात बेटांचं एकत्रीकरण आणि उपनगरांचा इतिहास कळला, वैशिष्टय़े कळली, बकालपणाचा अंदाज आला. पण त्यापलीकडे विकसित होणाऱ्या महानगराचं काय? तिथलीही पाश्र्वभूमी कळली तर मग पुढील व्यापाचा अंदाज नीट येऊ शकेल.’’ उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाच्या विचारांना वेगळी दिशा दिली.

सूर्य आता वर चढायला लागला होता, कातळ तापायला सुरुवात झाली होती. वास्तुपुरुष जवळच्याच सदाहरित, शीतल अशोकवनाकडे वळला आणि त्याने सुरुवात केली. ‘‘देवचारा, आता पूर्वेला वाढणारं महानगर म्हणजे ठाणे आणि रायगड जिल्ह्यंचा भाग. अगदी पूर्वेला सह्यपर्वताच्या पायथ्याशी जाऊन भिडणारा, या पर्वताच्या उपरांगाच्या अधूनमधून खेळणारा आणि निसर्गाने नटलेला. या परिसराच्या दक्षिण सीमेकडील खंडाळ्याजवळ उगम पावणारी उल्हास नदी परिसराच्या मध्यभागातून रायगड जिल्ह्यतून उत्तरेकडे ठाणे जिल्ह्यत प्रवेश करते आणि मग पश्चिमेला वळून वसई किल्ल्याच्या दक्षिणेला अरबी समुद्रात विलीन होते. वाटेत तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात तर ठाणे शहराच्या पुढे तिची होते खाडी, तिवरांच्या जंगलांनी सुशोभित किनाऱ्यांची. जुन्या मुंबापुरीचा निसर्गाधार आहे हे इथलं कृष्णगिरी वन तर या महानगर परिसरात आहेत जैवविविधतेने संपन्न टेकडय़ा आणि अभयारण्यं. ठाणे जिल्ह्यत आहे तुंगारेश्वरचं आणि बारवीचं जंगल तर रायगड जिल्ह्यत आहेत माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, उल्हास दरी, कणकेश्वर, सागरगड, द्रोणगिरी, घारापुरी बेट अशी ऐतिहासिक वारसा असलेली वनं. शिवाय या संपूर्ण महानगराचं खास वैशिष्टय़ आहे इथला पश्चिमेकडील समुद्र किनारा आणि लगतच्या तिवर जंगलांनी समृद्ध खाडय़ा. ठाणे खाडी परिसर तर रोहित पक्ष्यांचं नंदनवन झालं आहे. इथला पुरातन आणि ऐतिहासिक वारसाही विस्मयित करून टाकणारा आहे. कोंडाणा, आंबिवली, लोणादसारख्या पुरातन गुंफा. कुलाबा, हिराकोट, खांदेरी-उंदेरी असे समुद्रदुर्ग तर सागरगड, कोथळीगड, प्रबळगड, कर्नाळा, चांदेरी यांसारखे पहाडी किल्ले. शिवाय वास्तुशिल्पकलेच्या सौंदर्याने नटलेली कणकेश्वर, अंबरनाथ, लोणाद अशी मंदिरं. हा परिसर म्हणजे भातशेतीचं आगर, समुद्र किनाऱ्याने नारळ, सुपारी, केळी, आंबे अशा बागायतीने नटलेली गावं आणि डोंगर दऱ्यातील जंगलाच्या आसऱ्याने वसलेले आदिवासी पाडे. हा परिसर आता महानगराच्या वाटेवर आहे. परिसर विकास आराखडे तयार होताहेत, जनता संभ्रमात आहे. निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधता भयचकित आहे, वेगवान शहरीकरणाच्या येऊ घातलेल्या घाल्याने थरकापत आहे. जुन्या मुंबईचा बकालपणा रोखण्यासाठी या महानगराचा निसर्गस्नेही, सर्वागीण आणि संतुलित विकास हा एकच मार्ग आहे.’’

‘‘वास्तुपुरुषा, महानगराचं सुरेख चित्रही उभं केलंस आणि पुढील विकासासाठी धोक्याचा कंदीलही दाखवलास तू. पुढचा मार्ग तूच दाखवायचा आहे आता नववर्षांच्या मुहुर्तावर.’’ उपराळकर देवचाराने आजच्या अध्यायाचा समारोप केला, वास्तुपुरुषाला विचारांची दिशा देऊन.

अशोकवनातील शीतल छायेतून दक्षिणेकडे पहात वास्तुपुरुष उत्साहात उद्गारला, ‘‘ होय, देवा महाराजा, माझा दृढ विश्वास आहे लोकसहभागातून होणाऱ्या विकासनितीवर. इथून जवळच्याच आरे परिसरातील निसर्ग संवर्धनासाठी नुकतंच लोकआंदोलन उभं राहिलं आहे, ‘आरे बचाव’ हा नारा घेऊन. निसर्गविरोधी सरकारी निर्णयांना आव्हान देण्याची आणि रोखण्याची ताकद यापुढे अशा आंदोलनांतूनच उभी राहाणार आहे. पुढच्या नववर्षांच्या भेटीत घेऊया आढावा या महानगराच्या संतुलित विकासाचा.’’ कान्हेरीच्या बौद्ध गुंफा परिसराच्या वर घिरटय़ा घालणाऱ्या सर्पगरुडांच्या शीळसंगीताने स्फूर्ती दिली वास्तुपुरुषाच्या विचारधारेला, नाताळच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छांसह!

ulhasrane@gmail.com