आम्ही डोंबिवलीत स्टेशनजवळ कायमस्वरूपी भाडय़ाने राहत होतो. जागा तिसऱ्या मजल्यावर दोनच खोल्यांची, पण प्रशस्त होती. बाल्कनीतून दोन पायऱ्या उतरून आम्हाला घरात प्रवेश करता येत असे. त्यानंतर सुमारे दोन-तीन वर्षांनी आमच्या शेजारच्यांनी जागा सोडली तेव्हा त्या दोन खोल्याही आम्ही घेतल्या. बाजूचीच जागा असल्याने, दोन घराच्या मधल्या भिंतीत दार पाडून दोन्ही घरे आतून जोडली; परंतु दोन्ही जागा वेगवेगळ्या वेळी बांधल्या असल्याने, बाजूच्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी दोन पायऱ्या करून घ्याव्या लागल्या. त्यामुळे सलग चार खोल्यांची जागा तयार झाली. जिन्यापासून ही जागा स्वतंत्र होत असल्याने, आम्ही बाल्कनीला लोखंडी जाळीचे दार लावून घेतले. त्यामुळे आमचे घर दोन बाजूंनी मोठय़ा बाल्कनीसहित एकदम स्वतंत्र झाले. चार मोठय़ा मोठय़ा खोल्या, दोन टॉयलेट्स आणि दोन बाथरूम व लांबलचक बाल्कनी असे मोठे घर तयार झाले. सर्व खोल्यांमध्ये भरपूर प्रकाश व हवा यायची. राहती जागा रस्त्यापासून आत असली तरी बाल्कनीच्या समोर थोडी मोकळी जागा असल्याने, रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ दिसायची. बाल्कनीत आम्ही गुलाब, गोकर्ण वगैरे फुलझाडे लावली होती. मोठय़ा प्रशस्त जागेत आम्ही जवळजवळ २०-२२ वर्षे राहिलो. पायऱ्यांमुळे तुमचे घर अगदी गावच्या घरासारखे दिसते आणि पायऱ्यांवर बसून पुस्तक वाचायला किती मजा येईल, असे माझी एक मैत्रीण म्हणाली होती.

मध्यंतरीच्या कालावधीत आम्हाला दोनचार वेळा घराच्या सीलिंगची दुरुस्ती करून घ्यावी लागली, पण आता सीलिंगचे प्लॅस्टर आणि स्लॅबचेही तुकडे सळ्यांसकट पडायला लागल्याने, मी लहानपणापासून डोंबिवलीतच राहिले असल्याने दुसरे घर डोंबिवलीतच व आत्ता आम्ही एवढी वर्षे राहात होतो त्या परिसरातच घेण्याचा निर्णय घेतला. आता जागा घ्यायचीच आहे तर ओनरशिपची घेता येईल का, यासाठी दोन-तीन इस्टेट एजंटांकडून काही जागा बघितल्या. नवीन घरांची चौकशी केली त्या वेळी त्यांचे भाव गगनाला भिडलेले आणि आवाक्याबाहेर असल्यामुळे रिसेलचे, पण सुस्थितीतील व आताच्या घरासारखे भरपूर हवा-उजेड आणि रस्त्याला लागून असलेले घर घ्यायचे होते. पहिले घर तिसऱ्या मजल्यावर होते, परंतु वयोमानानुसार तीन मजले चढायला दमायला होते, तेव्हा ब्लॉक शक्यतो पहिल्या मजल्यावर आणि किमान तीन खोल्यांचा असावा अशी माझी इच्छा होती. तळमजल्यावरील जागेत भिकारी, कुत्रे व उंदीर-घुशी इत्यादींचा त्रास असतो म्हणून तळमजला नको होता. इस्टेट एजंटने दाखविलेला एक ब्लॉक आवडला, पण त्याचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला होते. मिस्टरांच्या मामांनी स्वत:हून वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेल्या मित्राला घर बघायला आणले. त्यांनी वास्तू घ्यायला हरकत नाही, असा सल्ला दिला. आपण काही गोष्टी मानत नसलो तरी घरासारखा मोठा निर्णय घेताना, उगाच मागाहून चुटपुट लागू नये म्हणून आम्ही तो ब्लॉक घेतला नाही. दुसरा ब्लॉग पुढेमागे इमारतीसमोरील रस्ता रुंद केला तर ब्लॉक जाईल म्हणून नाकारला. तीन-चार ब्लॉक बघितल्यानंतर आम्हाला एक हवा तसा इटुकला-पिटुकला, पण छान टाइल्स वगैरे लावलेला, सजावट केलेला सुंदर ब्लॉक दाखवण्यात आला आणि किंमत थोडी जास्त वाटत असली तरी तो आम्ही घेतला.

दुसरा ब्लॉक घ्यायचा म्हणजे ज्यांचा ब्लॉक होता त्यांच्याशी पैसे कसे कसे द्यायचे याबाबत बोलणी झाली. त्यानुसार पैशांची जुळवाजुळव कशी करायची याचा खल झाला. बँकेचे लोन घेण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करायला लागली. आधीच्या घरमालकाला घर सोडत असल्याचे सांगताना दु:ख झाले, पण तो निर्णय घ्यावाच लागला. मग पुढच्या कामासाठी मिस्टरांना सुट्टीच घ्यायला लागली. सरकारी कार्यालयात जाऊन आम्हाला सहय़ा करून रजिस्ट्रेशन करायला लागले. नवीन बिल्डिंगच्या सोसायटीत रजिस्ट्रेशन करायला लागले. नाव बदलताना प्रत्येक ठिकाणी सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) आणायला लागले. गॅसच्या दुकानात जाऊन सिलेंडरसाठी पत्ता बदलण्यासाठी अर्ज भरायला लागला. रेशनकार्ड महत्त्वाच्या कामासाठी सगळीकडे पुरावा म्हणून लागत असल्यामुळे अर्ज भरून त्याचाही पत्ता बदलायला लागला. त्यासाठी एकदा फॉर्म आणायला, तो परत द्यायला व पुन्हा रेशनकार्ड आणण्यासाठी अशा परत-परत फेऱ्या माराव्या लागल्या. इतकेच नाही, तर फॉर्म घ्यायची वेळ वेगळी आणि फॉर्म भरून द्यायची वेळ वेगळी. त्यामुळे आणखी एक जास्त फेरी मारावी लागली. आमच्या नावावरचे लाइटचे मीटर बंद करण्यासाठी बाजारात असलेल्या एम.एस.ई.बी.च्या ऑफिसमध्ये, तर ज्यांचे घर घ्यायचे होते त्यांचे लाइटचे मीटर आमच्या नावावर करण्यासाठी एम.एस.ई.बी.च्या लांबच्या ऑफिसमध्ये जावे लागले, तेदेखील एकदा फॉर्म आणायला व भरून पुन्हा द्यायला. त्यानंतर पुन्हा पैसे भरण्यासाठी तिसरी फेरी. शासकीय कार्यालयातील कुठलेही काम एक-दोन फेऱ्यांमध्ये होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. कॉम्प्युटरच्या नेट कनेक्शनसाठी संबंधितांना पत्ता बदलला आहे याबाबत कळवायला लागले. टी.व्ही.च्या केबल कनेक्शनसाठी नवीन भागाचा दुसरा केबल एजंट असल्याने आधीच्या केबल एजंटाकडून ना-हरकत परवाना प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) घेण्यासाठी दहा वेळा फेऱ्या मारायला लागल्या. बँकेला बदललेला पत्ता कळविण्यासाठी के.वाय.सी.चा फॉर्म भरावा लागला. तसेच पोस्टामध्ये, मिस्टरांच्या ऑफिसमध्ये व इतर सर्व ठिकाणी अर्ज करून, पत्ता बदलला आहे, हे कळवायला लागले. अनेक वेळा पुरावा म्हणून वारंवार वेगवेगळ्या कागदांच्या झेरॉक्स आणि फोटो द्यावे लागले. नवीन घर घेतल्यावर किती सोपस्कार करायला लागतात व अशा गोष्टींत किती वेळ जातो हे मला कळले. नवीन घरासाठी काही फर्निचर व इतर नवीन सामान हौशीने आणले. त्या खरेदीतही बराच वेळ गेला, तसेच नवीन घरात सामान लावायलाही अर्थातच बराच वेळ गेला. घर बदलताना जुन्या सामानाची विल्हेवाट लावताना नाकीनऊ आले. काही सुस्थितीतील सामानदेखील मोडीच्या भावाने द्यायला जिवावर आल्याने जुन्या मोलकरणीला व एका गरजवंताला देऊन टाकले.

खरं म्हणजे दुसरे घर घ्यायचा निर्णय घेतानाच जुने घर सोडायचे म्हणून आम्हाला खूप वाईट वाटत होते; परंतु वारंवार स्लॅब पडत होता, त्यामुळे तो डोक्यात पडायची भीती असल्याने आमचा अगदी नाइलाजच झाला होता. एवढी वर्षे ज्या घरात राहायची आम्हाला चांगलीच सवय झाली होती ते सोडून जायचे म्हणजे अगदी जिवावर आले होते. त्या घरातल्या भिंतीन् भिंती, कानेकोपरे मला जवळचे वाटत होते. मला त्यांची सवय झाली होती. एक प्रकारचा आपुलकीचा आधार वाटत होता. शेजारपाजाऱ्यांचे स्वभाव आम्हाला परिचित झाले होते. जुन्या घरातील सामान बांधताना मुलीच्या लहानपणीच्या काही वस्तू मिळाल्या. माझे मैत्रिणींबरोबरचे लग्नाआधी माथेरानला गेलेले फोटो मिळाले, तसेच इतर काही वस्तू मिळाल्या आणि त्यांच्याशी संबंधित पूर्वीच्या काळाच्या छान आठवणी जागृत झाल्या. नवीन घर जुन्या घराच्या तसे जवळच असल्यामुळे काही दिवस थोडेथोडे हलके सामान तिथे हलविले. नंतर शेवटी टेम्पोतून वजनदार सामान हलविले आणि जुने घर सुनेसुने वाटायला लागले. जुन्या घरातून नवीन घरात जाताना नातेवाईकांना सोडून दुसऱ्या गावाला जातो तेव्हा जसे वाटते तसे वाटले. घरातून पाय निघत नव्हता. जुन्या घरात आम्ही आमचे महत्त्वाचे मधले आयुष्य घालविले. त्यामुळे एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या घराने आम्हाला भरभरून सुख दिले. आता आम्ही त्या घराच्या आशीर्वादासह, नवीन घराचा आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. वास्तू बदलतानाचा असा अनुभव आम्हाला मिळाला आहे.

माधुरी साठे – madhurisathe1@yahoo.com