* आमच्या सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर खिडकीवर बाहेरच्या बाजूस जो सज्जा असतो तेथपर्यंत हॉलचे बांधकाम वाढवले असून, त्याबाहेर लोखंडी ग्रिल बसवले आहेत. तशाच पद्धतीने बेडरूमदेखील वाढवली आहे. याबाबत सदनिकाधारकाने संस्थेला काहीही कळवलेले नाही किंवा संस्थेची परवानगीदेखील घेतलेली नाही, अशा वेळी संस्थेने काय करावे?
– मनोज जडे

* कोणत्याही सदस्याला कोणताही बदल बांधकामामध्ये करायचा असेल, तर केवळ संस्थेची परवानगी घेऊन भागत नाही. तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची (मुंबई, ठाणे, कल्याण महानगरपालिका इ.)देखील परवानगी घ्यावी लागते व आराखडय़ातील (सँक्शन प्लॅन) बदलदेखील मंजूर करून घ्यावे लागतात. आपल्या माहितीनुसार सदस्याने यातील काहीही केलेले नाही. तेव्हा संस्थेने त्याला एक पत्र देऊन सदर बांधकाम बेकायदेशीर आहे असे आम्हाला वाटते; तेव्हा आपण अधिकृत परवानगी वगैरे घेतली असल्यास संस्थेला त्याची प्रत देण्यास सांगावे. अशा प्रकारे पत्राला काही उत्तर अथवा परवानगीची प्रत न दिल्यास संस्थेने सदर अनधिकृत बांधकाम तोडण्याविषयी कायदेशीर नोटीस द्यावी व तरीही त्याने ते बांधकाम न तोडल्यास आपण महानगरपालिका आयुक्तांकडे सदर अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यासाठीचा अर्ज व सोबत नोटिशीची प्रत द्यावी व त्याची पोचपावती घ्यावी. अनधिकृत बांधकाम तोडण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते.

* आमची गृहनिर्माण संस्था ही मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची आहे. त्या ठिकाणी अनेक बेकायदेशीर गोष्टी होत आहेत, त्या पुढीलप्रमाणे – १) संस्थेचे पदाधिकारी उपविधीप्रमाणे काम करीत नाहीत. (२) सभेचा इतिवृत्तान्त नीट लिहिला जात नाही. (३) संस्थेचे हिशोब नीट ठेवले जात नाहीत. काही खर्च हे जमाखर्चात दाखवले जात नाहीत. (४) महानगरपालिकेची परवानगी न घेताच सदनिकांचे हस्तांतरण संस्थेचे पदाधिकारी करून देत आहेत. (५) संस्थेचे इतिवृत्त वाचायला देत नाहीत आणि अन्य बरेच काही.
 अनिल गुडेकर, अंधेरी, मुंबई.

* वरील सर्व प्रश्न व अन्य दिलेली माहिती वाचल्यावर असे लक्षात येते की, आपल्या जवळपास सर्व तक्रारी या संस्थेच्या कार्यकारी मंडळाबद्दल आहेत. त्यासाठी आपण त्यांना वरील सर्व गोष्टी लेखी स्वरूपात कळवाव्यात. संस्थेच्या इतिवृत्तांची मागणी करावी. संस्थेचे कच्चे इतिवृत्त वाचण्यासाठी देत नाहीत हे लेखी कळवावे. अशा प्रकारे संस्थेशी लेखी पोचपावती घेऊन पत्रव्यवहार करावा, त्याला जर त्यांनी दाद दिली नाही तर आपल्या संबंधित रजिस्ट्रारकडे तक्रार करावी. तेथेही आपल्या तक्रारीची तड न लागल्यास कोकण भवन, बेलापूर येथील अपिलेट अ‍ॅथॉरिटीकडे तक्रार करावी. याच क्रमाने सहकार आयुक्तांपर्यंत तक्रारी करूनही दाद न लागल्यास सहकारी न्यायालयात दाद मागावी. त्यासाठी कुणा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा, हे उत्तम.

* आमच्या दिवंगत वडिलांच्या नावावर मुंबईत एक ब्लॉकवजा भाडय़ाची जागा घेतली होती. आमच्या वडिलांनी दोन लग्ने केली होती. त्यांच्या पश्चात सदर जागा माझ्या सावत्र आईच्या नावावर झाली. मला एक सख्खी बहीण व एक सावत्र भाऊ आहे. मी सध्या सदर जागेत राहत नाही. आता सदर इमारत पुनर्विकासासाठी जाणार आहे व तेथील भाडेकरूंना ओनरशिप तत्त्वावर जागा मिळणार आहेत. तर त्या जागेवर आमचा काही हक्क लागेल का? आम्ही दोन्ही भावंडांनी वेगळ्या जागा घेऊन वेगळे झालेले आहोत, तर याबाबत काही मार्गदर्शन व्हावे.
– एक वाचक, मुंबई.

* खरे तर एवढय़ा अपुऱ्या माहितीवर उत्तर देणे धाडसाचेच ठरेल. सर्वसाधारणपणे राहत्या व्यक्तींनाच नवीन इमारतीत जागा मिळते. ही इमारत उपकर लागू असणारी इमारत आहे का? आपण तिथे राहत असल्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत का? या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावरच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. तरीसुद्धा आपण संबंधित घरमालक, तुमची आई, विकासक, इमारत उपकर लागू असणारी असेल तर म्हाडा या साऱ्या ठिकाणी पत्रव्यवहार करून आम्ही यांचे वारस आहोत व आई या ठिकाणी राहत असल्यामुळे त्याला आमची हरकत नाही, परंतु आम्ही आमचा वारसा हक्क सोडत नाही, अशा अर्थाचा रजिस्टर ए.डी.ने पत्रव्यवहार करून ठेवावा व संबंधितांशी संपर्कात राहावे.
* मी माझ्या दिवंगत आजीसोबत तिच्या नावे असलेल्या घरात १० वर्षे राहत आहे. सदर इमारत ही साधारणपणे ९ वर्षांपूर्वी विकसित झालेली आहे. आजीला माझे वडील धरून २ मुले व ६ मुली असे ८ जण वारस आहेत. आतादेखील मी त्याच ठिकाणी राहत आहे. सध्या माझा काका व २ आत्या मिळून सदर सदनिका विकण्याचे ठरवत आहेत. इतर चार आत्यांचा मला राहण्यासाठी पाठिंबा आहे, तर माझा काका व २ आत्या या मला घर खाली करण्यासाठीचा तगादा लावत आहेत. याबाबत आपण मला मार्गदर्शन केल्यास बरे होईल.
– जयेश जी., वांद्रे.

* आपण दिलेल्या माहितीवरून असे वाटते की, अद्याप आपल्या इमारतीला बांधून १० वर्षे झालेली नसावीत. त्यामुळे तसेही सदर सदनिका लगेच विकता येणे कठीण आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपणाला आपल्या आजीच्या जागी तिच्या सर्व कायदेशीर वारसांची नावे लावून घेणे आवश्यक आहे. ती लावल्यावर आपल्या सर्व कायदेशीर वारसांत एकवाक्यता झाल्यासच सदर सदनिका आपणास विकता येणे शक्य होईल, अन्यथा सदर सदनिका विकणे कठीणच होईल. म्हणून आपण सर्व वारसांची नावे सदर सदनिकेला लागली असल्याची खात्री करून घ्यावी. सदर सदनिकेचा ताबा सोडू नये. गृहनिर्माण संस्था स्थापन झालेली असल्यास आपण येथे राहत आहोत व मृत आजीला एवढे वारस आहेत तेव्हा आमच्या लेखी परवानगीशिवाय सदर सदनिका विकण्यास परवानगी देऊ नये, असे कळवून ठेवावे. आमच्या मते, आपल्या काकाला आणि दोन आत्यांना आपण राहत असलेली सदनिका विकता येईल असे वाटत नाही.
* माझ्या आजीला ३ मुले आहेत (२ मुलगे आणि १ मुलगी). माझी आत्या हयात नाही. आजीची एक पागडीवरील राहती जागा आहे. सदर जागेची भाडेपावती अद्याप आजीच्याच नावावर आहे. माझे वडील मोठे असून माझा काका लहान आहे. माझा काका सध्या तिथे राहत आहे. सदर इमारत आता पुनर्विकासाच्या प्रक्रियेत आहे. बिल्डरने माझ्या काकाकडून ना-हरकत पत्र घेतले आहे. माझ्या आजीचे मृत्युपत्र केलेले नाही. तर सदर जागा दोघांच्या नावे करता येईल का?
– सचिन मेस्त्री

* साधारणपणे जी व्यक्ती राहते तिलाच नवीन इमारतीत जागा मिळण्याची जास्त शक्यता असते. आपल्या वडिलांनी आणि काकांनी समझोत्याने जर दोघांची नावे लावायची ठरवले तर ते उत्तम होईल. आपली जागा ज्या इमारतीत आहे ती इमारत सेस लागू होणारी इमारत आहे का? आपल्या वडिलांचे सदर जागेत राहत असल्याचे पुरावे आहेत का? या साऱ्या गोष्टी समजल्यावरच याबाबत योग्य सल्ला देता येईल. तेथपर्यंत आपण वारस असल्याचे व आपणदेखील एक लाभार्थी आहोत अशा अर्थाचा पत्रव्यवहार म्हाडा, घरमालक, बिल्डर यांच्याशी करून त्याची पोचपावती घेऊन ठेवणे इष्ट होईल.
ghaisas_asso@yahoo.com