नवीन वर्षांत प्रवेश केल्यापासून वास्तुपुरुष काहीसा हळवा झाला होता. गेल्या वर्षी उपराळकर देवचाराबरोबर सुरू झालेली संतुलित विकासावरची चर्चा आता रंगत चालली होती, कधी कोडय़ात टाकत होती, कधी आशा-निराशेचे हेलकावे घेत होती, विकासाचा सर्वागीण विचार करायला लावत होती. कोकणातील खेडेगावात सुरू झालेला हा संवाद आता एका महानगरापर्यंत पोचला होता. उपराळकराने सांगितलेली आपली जन्मकहाणी त्याला सातत्याने आठवत होती आणि आपण मुक्ततेच्या योग्य मार्गावर आहोत की नाही हा प्रश्न मनात उभा करत होती. नवीन वर्षांत सातत्याने सकारात्मक राहूनच निसर्गस्नेही विकासाकडे वाटचाल करायची हा त्याचा दृढनिश्चय झाला होता. पौष महिना सुरू झाला होता. लवकरच पौर्णिमा आणि पाठोपाठ मकर संक्रांत येऊ घातली आहे. वास्तुपुरुषानेही जुन्या मुंबापुरीतील कृष्णगिरीवरून संक्रमण केलं रायगड जिल्ह्यतील माथेरान गिरिस्थानावर, अगदी तिथल्या ‘पॅनोरमा पॉइंट’वरच.  आता तो मुंबई महानगराच्या सर्वसाधारण मध्यभागावर होता, शिवाय या मध्यावरील डोंगररांगेच्याही मध्यावर होता. उत्तरेला भव्य कडे-कपाऱ्या आणि सुळके, दक्षिणेला अथांग हिरवाई. पूर्वेला सह्य़ाद्रीच्या पाश्र्वभूमीवर नेरळ शहराला वळसा घालून जाणारी उल्हास नदी आणि दूरवर पश्चिमेला नव्या आणि जुन्या मुंबईचा पसारा, अगदी अरबी समुदकिनाऱ्यावर रेललेला.  नुकताच सूर्योदय झालेला, डोंगररांगा प्रकाशलेल्या, पक्षी-फुलपाखरांचं बागडणं सुरू झालेलं. मागील सदाहरित जंगलातून निसर्गदूत शेकरूचा उत्साही हाकारा आला आणि त्याला जोडूनच उपराळकर देवचाराचा पुकार, ‘‘आज अगदी अंजन-कांचन-करवंदीच्या काटेरी देशात घेऊन आलास तू मला वास्तुपुरुषा.  खूप कौतुक वाटतं मला तुझं. जागेची निवडही अचूक, महानगराच्या ‘ब्रह्मस्थानी’!  चला होऊ द्या नांदी, महानगर पर्वाच्या दुसऱ्या अध्यायाची.’’

वास्तुपुरुषाची नजर पश्चिमेकडील शहरीकरणाकडून वळत उत्तरेकडील पर्वतरांगेवरून भिरभिरत पूर्वेकडील सह्य़ाद्री पर्वतराजीवरून ओळंघत खालच्या उल्हास नदीच्या पात्रावर खिळली. नदीला जीवनदयिनी म्हटलं जातं आणि जंगलाला नदीची माता म्हटलं जातं.  तो उपराळकर देवचाराला गंभीरपणे म्हणाला, ‘‘देवा महाराजा, वाल्मीकी रामायणातल्या एका श्लोकाने सुरुवात करू या.’’

‘‘प्रेक्षामि सरितां श्रेष्ठां सन्मान्यसलिलां शिवाम्

देवमानवगंधर्व मृगपन्नगपक्षिणाम् ।।’’

वनवासात परिक्रमा करताना राम म्हणतो, ‘‘देव, मानव, गंधर्व, प्राणी, सरिसृप आणि पक्षी जिला पूज्य मानतात अशी पवित्र जलवाहिनी महानदी मला आता दिसेल.’’ वाल्मीकी मुनी किंवा प्रत्यक्ष रामाने जर इथल्या नद्यांची अवस्था आज पाहिली तर ते दु:खाने अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत. कदाचित या अवस्थेला कारणीभूत मानवाला उद्देशून शापवाणीही उच्चारतील!  पर्वत, जंगलं, नद्या, जलाशय, समुद्र ही पंचमहाभूतांचीच रूपं आहेत. परंतु चुकीची विकासनीती, शहरीकरणाचा प्रचंड आणि स्वार्थी हव्यास, पशाची लालसा यापोटी मानवाने या पवित्र मानचिन्हांनाही विनाशाच्या गत्रेत लोटलं आहे. नियोजनकारांनी तर जाणूनबुजून औद्योगिक वसाहती नद्या आणि समुद्रकिनारी वसवल्या, केवळ यासाठी की या उद्योगांना त्यांच्या प्रदूषित द्रव्यांचा, सांडपाण्याचा निचरा इथे सहजपणे करता यावा!  आपल्या समोरच्या या उल्हास नदीचं किंवा पश्चिमेकडील पाताळगंगेचं उदाहरण घेऊ.  रासायनिक उद्योगांनी प्रदूषित झालेल्या या नद्यांतील मासे, बेडूक, कासवं, इत्यादी जलचर आणि पाणवनस्पती तर नष्ट झाल्याच, पण शिवाय हे विषारी पाणी जमिनीतून झिरपून आजूबाजूच्या खेडय़ांतील, नगरांतील विहिरी, झरेही प्रदूषित झाले. मानवी वसाहतींत रोगराई पसरली, गाई-गुरांचा पाण्याचा आधार नाहीसा झाला. जीवनदायिन्या मृत्यूदायिन्या झाल्या! पर्वत आणि तिथल्या वनराया ही नद्यांची माता. त्या मातेवरही ‘विकासा’च्या नशेत िझगलेल्या मानवाने अत्याचार सुरू केले. प्रचंड प्रमाणात खाणकाम, अमर्यादित उत्खनन, लाकडासाठी आणि कोळशासाठी जंगलतोड यातून सुपीक मातीची धूप सुरू झाली, वनस्पती जीवन आणि त्याचबरोबर वन्यजीवांचाही संहार झाला. आपण उभं असलेल्या माथेरानसारखी काही थोडीथोडकी वनांची एकलकोंडी ‘बेटं’ फक्त शिल्लक रहिली आहेत, याच संहारी मानवाला प्राणवायू पुरवत! समुदकिनाऱ्यांवर, खाडय़ांवर आणि जलाशयांवरही असंच अतिक्रमण आणि अत्याचार.  इथेच अलिबागजवळ खत कारखाना उभारला गेला, मुंबई बंदर किनारी खनिज तेल, खतं उद्योग आणि अणुभट्टय़ा उभ्या रहिल्या, तिवरवनांचा संहार करण्यात आला, खाजण जमिनींवर भर टाकून शहर नियोजन करण्यात आलं.  विकासाचा हव्यास भूप्रदेशाच्या पर्यावरण क्षमतेपलीकडे नेऊन ठेवला गेला. अर्थातच याचे दुष्परिणाम निसर्गापाठोपाठ मानवालाही भोगायला लागणारच. पण स्वार्थी आणि लघुदृष्टीच्या राजकारण्यांना आणि सरकारी व्यवस्थापनाला याची पर्वा नाही, संवेदनक्षमता तर नाहीच नाही. सामान्य माणूस, विशेषत: गरीब शेतकरी, अदिवासी या भयाण ‘विकास झंझावाता’त भरडून निघत आहेत. जिथे मानवी आरोग्याची पर्वा नाही तिथे संस्कृती आणि सांस्कृतिक वारशाची कोणाला काळजी आहे? उल्हास नदीच्या उगमाजवळील पुरातन कोंडाणा गुंफा, जगातील एकमेव असे डोंगर-किल्ले, अर्नाळा-वसई यांसारखे समुद्रदुर्ग, अंबरनाथसारखं पुरातन शिवमंदिर, तुंगारेश्वरसारख्या देवराया.. सर्वाचीच वाताहात होत चालली आहे.  त्यांच्या संरक्षणासाठी काही मोजके आवाज उठतात, त्यांची सहज मुस्कटदाबी केली जाते. लोकआंदोलनं दडपली जातात. पर्यावरण कायद्यामुळे माथेरान, कृष्णगिरी वनासारखे काही वनपरिसर आज सुरक्षित आहेत, पण त्यांवरही स्वार्थी ‘विकासकां’चा डोळा आहे, बेकायदेशीर अतिक्रमणं तर सातत्याने चालू आहेतच.  सर्वात मोठा घाला झाला आहे इथल्या शेतकऱ्यांवर, सुपीक शेतजमिनींवर. गरिबांच्या या जमिनी एकतर गिळंकृत केल्या जातात किंवा लालूच दाखवून ‘विकासा’चं आमिष दाखवून लुटल्या जातात. त्याही पुढे जाऊन सरकारच श्रीमंत उद्योजकांसाठी या जमिनी अल्प किमतीत संपादित करत जातं. हातात खेळणारा थोडासा पका लवकरच संपून जातो आणि बळीराजाचा हताश मजूर होतो. देवा महाराजा, मला तर खात्री आहे की ही वाटचाल अशीच चालू रहिली तर ती या मुंबापुरीला ‘महानगरा’ऐवजी ‘मृत्युनगरी’कडे घेऊन जाईल.‘‘ एक दीर्घ उसासा सोडून वास्तुपुरुष थबकला.

‘‘वास्तुपुरुषा, ‘महानगर’ ते ‘मृत्युनगरी’चं विदारक चित्र तर तू मांडलंस. पटते तुझी व्यथा. पण मला एक सांग, इंग्रजांच्या काळात जेव्हा सात बेटांचं एकत्रीकरण झालं, मुंबईचं गिरणगाव झालं, मुंबई बंदर जगभराशी संपर्क साधू लागलं, लक्षावधी लोकांना रोजगार देऊ लागलं तोही असाच विकास होता. मग त्या वेळेत आणि आता असा काय फरक आहे की हा विकास विनाशाच्या वाटेने चालला आहे? कदाचित आपला विचारच तर निराशाजनक नाही ना?’’ उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाला महाकठीण कोडय़ात टाकलं.

विदारक विचारांनी भणभणलेल्या वास्तुपुरुषाने सदाहरित अंजन वृक्षराजीतून जाणारी पायवाट जवळ केली आणि आपल्या विचारांच्या सूतोवाचाला सुरुवात केली, ‘‘देवचारा, खरंच हे खूप गहन कोडं आहे.  मी खूप विचार केला आहे या समस्यांवर आणि त्यातून संतुलित विकासाची एक विचारधारा तयार झाली आहे. या मुंबापुरीच्या सम्यक विकासासाठी ती कशी लागू करायची हे विवेचन करू आपण आता या पंधरवडय़ानंतर.  त्यातूनच सर्वच शहरांना, नगरांना आणि खेडय़ांना लागू होणारा सर्वागीण विकासाचा मार्गही दिसू शकेल याची खात्री आहे मला. मुंबई महानगराच्या समस्या इतक्या क्लिष्ट आहेत की जे मुंबापुरीला शक्य आहे ते इतरत्र सहज साध्य होऊ शकेल.’’

उपराळकर देवचाराचं कुतूहल आता खुलंलं, ‘‘वास्तुपुरुषा, मलाही खात्री आहे की तुझ्याकडे या गहन समस्यांवर पर्याय निघेलच आणि तोच तुला मुक्ततेकडे नेणारा मार्ग असेल.  मला असंही वाटतं की हा मार्ग नुसता नियोजनाचा नसून समर्पक व्यवस्थापनाचाही असेल, लोकसहभागाचा तर असेलच. आजच्या जागतिक संसद दिनी निर्धार करूया की पुढे येऊ घातलेल्या प्रजासत्ताक दिनासाठी एक नवीन्यपूर्ण संतुलित विकासाची दिशा आपण समाजाला देऊ.’’ उपराळकर देवचाराने ‘महानगरपर्वा’च्या दुसऱ्या अध्यायाचा समारोप केला, वास्तुपुरुषाला चालना देऊन.  माथेरानची हिरवाईही गहिवरली या समारोपाने आणि प्रफुल्लित झाली निसर्गसंवर्धनाच्या आशेने!

उल्हास राणे ulhasrane@gmail.com