अनेक  वर्ष सातत्याने ऊन, थंडी, वारा, पाऊस यांचे तडाखे सोसत उभी असलेली इमारत हळूहळू म्हातारपणाकडे झुकू लागते. माणसाच्या म्हातारपणी जसं त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरतं, तसं इमारतीच्या पृष्ठभागावर आणि बीम-कॉलमवरही अनेकदा भेगा किंवा तडे यांचं जाळं पसरलेलं दिसतं. कधी कधी मात्र इमारतीच्या पृष्ठभागावर पाच-सहा वर्षांतच अशा भेगा किंवा तडे गेलेले दिसतात. इमारतीच्या बांधकामाचा किंवा ती बांधताना वापरलेल्या बांधकाम साहित्याचा दर्जा जर खराब असेल, तरी अशा भेगा किंवा तडे आढळून येतात. या भेगा कधी कधी एकटय़ादुकटय़ा असतात, तर कधी इमारतीच्या बाहेरच्या पृष्ठभागावर बारीक भेगांचं जाळंच पाहायला मिळतं. हे नेमकं कशामुळे घडतं, हे जाणून घ्यायचं असेल तर या भेगांच्या माध्यमातून इमारत आपल्याला जे काही सांगू पाहाते आहे, ती तिची भाषा आपण जाणून घेतली पाहिजे. बोलता न येणारं लहान मूल भूक लागली तरी रडतं आणि कुठे दुखतखुपत असलं तरी रडतं. परंतु नेमकं कुठलं रडू कुठल्या कारणासाठी आहे, हे जसं त्याच्या आईला समजतं, तसंच इमारतीची ही भाषा अभियंत्यांना अवगत असते. कुठल्या भेगा कुठल्या कारणांनी पडल्या आहेत ते कळू शकतं. एकदा याबाबतचं निदान झालं की मग आपण त्यावर उपाय शोधू शकतो.
इमारतीच्या भेगांचे वयोमानानुसार विविध प्रकार खालील तक्त्यात दाखवले आहेत-
ws05

भेगांचे निरीक्षण करून त्या कुठल्या कारणांमुळे आहेत ते स्थापत्य अभियंता सांगू शकतो. भेगा या इमारतीच्या अनेक तक्रारींचं मूळ असल्यामुळे भेगा दिसल्यावर त्या एखाद्या तज्ज्ञाला दाखवून घेऊन त्यावर वेळीच योग्य ते उपाय केले, तर पुढले धोके टळू शकतात. या भेगांची कारणे आणि त्यावरील काही उपाय हे खालीलप्रमाणे आहेत –
१) सच्छिद्र काँक्रीटमुळे आत पाणी मुरून सळ्या गंजल्यामुळे तडे आणि भेगा पडतात. मुरणारे पाणी थांबवण्यासाठी वॉटरप्रूिफग करून घेणे गरजेचे असते.
ws06
२) दिवसा वाढलेल्या तापमानामुळे काँक्रीट प्रसरण पावते, तर रात्री तापमानात घट झाल्यामुळे ते आकुंचन पावते. याकरता इमारतीचे दोन भाग जिथे जोडलेले असतात अशा जागी एक्सपान्शन जॉईंट तयार केले जातात. यामुळे दोन भागांमधलं काँक्रीट प्रसरण पावताना तिला प्रसरण पावण्याकरता जागा मिळते. त्यामुळे तडे जात नाहीत.
३) सळ्या गंजल्यामुळे जर तडे गेले असतील, तर त्यावरचा गंज काढून टाकून गंजविरोधी रसायन लावून पुन्हा प्लास्टर करणे आवश्यक असते.
तडे आणि भेगांची कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे असते. ल्ल ल्ल
मनोज अणावकर – anaokarm@yahoo.co.in