या  जगरहाटीमध्ये निसर्गाने निर्मिती आणि विनाश या दोन्ही गोष्टींची योजना करून ठेवली आहे. इमारतीची निर्मिती होते तेव्हाच तिच्या नाशाच्या वाटासुद्धा निश्चित होत असतात. त्यातील एक म्हणजे- झाडांच्या मुळाची इमारतीच्या ढाच्यामध्ये घुसखोरी. एकदा का झाडांनी इमारतीवरती आपले बस्तान बसवले, की त्याची मुळे  हळूहळू इमारतीच्या गाभ्यामध्ये प्रवेश करू लागतात व संपूर्ण ढाच्याच निखळून टाकण्याच्या उद्योगाला लागतात. निसर्गामध्ये मोठय़ा मोठय़ा पहाडांच्या खाचींमध्ये झाडांचे रोपण होते व तेथे जेव्हा त्याच्या वाढीला पोषक असे वातावरण मिळते, जसे की- पाणी, जरुरी असलेली खनिजे व पोषक घटक; तेव्हा त्याची वाढ झपाटय़ाने होते व काही काळातच तेथे महाकाय वृक्ष बनून पहाड दुभंगून जातो. काँक्रीटला माणसाने निर्माण केलेला दगड असे संबोधले जाते. जेथे काळ्या दगडाचा पहाड टिकाव धरू शकत नाही, तेथे माणसाने बांधलेल्या इमारतीची काय बिशाद?

या वाढीला व्हेजिटेशन असे म्हणतात. त्यामध्ये निव्वळ झाडे येत नसून गवत, शेवाळे वगैरे प्रकारसुद्धा अंतर्भूत होतात. सुरुवात बीजरोपणापासून होते. इमारतीच्या बाह्य़ पृष्ठभागावर काही नक्षीकाम असते, त्यामुळे तेथे भरपूर खाचा, खोलगट भाग तयार झालेले असतात. अशा ठिकाणी जेव्हा बीज येऊन पडते आणि त्याला वाढीस सोईस्कर अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते वाढीस लागते. हे बीज तेथे पक्ष्यांच्या विष्ठेतून येते किंवा वाऱ्याने उडून तिथपर्यंत पोहोचते. त्यामध्ये मॉस किंवा शेवाळे असू शकते. काही गवत किंवा मोठे वृक्ष जसे वड, पिंपळ अथवा उंबर यांच्या बिया असू शकतात. इतरही काही झाडांच्या बिया असू शकतात. वनस्पती वाढीची इमारतीवरची सुरुवात ही शेवाळापासून होते. आपण जर गच्चीतून सभोवार नजर टाकली, तर आजूबाजूच्या इमारतींवरती आपल्याला काळ्या रंगाच्या पदार्थाची सर्वत्र वाढ झालेली दिसेल. ही वाढ पाण्याच्या टाक्यांपासून सुरू होऊन खाली झिरपत गेलेली दिसेल. हा काळा पदार्थ हे सुप्त अवस्थेतील शेवाळ असते. त्याला पाणी मिळाल्यावर ते जागृत अवस्थेत येते व त्याची वाढ पुन्हा सुरू होते. शेवाळाच्या वाढीला पाण्याची गरज असते. आपण जर या शेवाळाच्या खुणा नीट निरखून पाहिल्या, तर असे दिसून येते की, इमारतीच्या वरच्या भागात त्याची वाढ दाट असते. याचाच अर्थ पाणी इमारतीत मुरणे हे वरच्या भागात जास्त असते व तेथून ते झिरपत खालच्या मजल्यावर पोहोचते. शेवाळ बांधकाम साहित्यात असलेल्या चुना व इतर सामग्रीवर चिवटपणे जगते व वाढते. शेवाळाच्या मुळाशी काही जिवाणूंची वाढ होते. मुळाबरोबर जिवाणू, बुरशी वगैरेंसारख्या गोष्टी वाढत असतात. सर्व जीवित प्राणिजन्याप्रमाणे त्यांचेही जीवनचक्र असते व हे जीवही काही आम्लयुक्त पदार्थ निर्माण करत बाहेर टाकत असतात. हे पदार्थ झाडांना पूरक असेच असतात. बांधकाम साहित्य हे चुनाआधारित असते, त्यामुळे त्यावर आम्लाची रासायनिक क्रिया होऊन तो भाग विरघळून जातो. अर्थात हे काम अतिशय सूक्ष्म अशा स्वरूपात असते; पण त्याचा एकत्रित परिणाम मोठा असतो. चुन्यासारखे पदार्थ विघटित होतात व त्या जागेवर सूक्ष्म छिद्रे व भेगा पडतात, ज्याला सर्वसाधारणपणे हेअरलाइन क्रॅक असे म्हणतात. कणाकणाने तो भाग खाल्ला जातो व त्याचे स्वरूप एखाद्या स्पंजप्रमाणे शोषक भागामध्ये होते. तसेच विटा याही पाणी धरून ठेवणाऱ्या असतात. अशा स्थितीत पाण्याचा साठा वाढत जातो व तो रस्ता मिळेल तसा पॅच, गळती वगैरे स्वरूपात प्रकट होतो. प्रत्येक पावसाळ्यात ही क्रिया पटीमध्ये वाढत असते व तसातसा इमारतीचा पृष्ठभाग हा जास्तीत जास्त शोषक बनत जातो. या आम्ल पदार्थाची इमारतीच्या बांधकाम साहित्याशी रासायनिक क्रिया होऊन, तसेच जेव्हा या शेवाळाची वाढ खाची कोपऱ्यात होते तेव्हा ते मोठय़ा झाडांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करते. याचा आणखी एक परिणाम म्हणून काही इमारतींत प्लास्टर व काँक्रीटची पावडर होण्यास सुरुवात होते.

वनस्पतींची वाढ ही मुख्यत: बाथरूम, किचनच्या पाइप्सच्या जुळणी भागात किंवा पाइपच्या मागे किंवा पिण्याच्या पाण्याच्या पाइपच्या मागे खाचीत वगैरे अडचणीच्या भागांत होते. मोठय़ा झाडांची मुळे  हळूहळू आत खोल अन्नाच्या व पाण्याच्या शोधात शिरू लागतात. वाढीप्रमाणे त्यांच्यात प्रचंड शक्ती निर्माण होऊ  लागते. जर ही मुळे  इमारतीच्या ढाच्यामधील अंतर्गत जोडण्यापर्यंत पोहोचली तर मात्र मोठे नुकसान फार लवकर होऊ  शकते आणि जशी मुळे वाढत जातात तशा भेगा वाढत जातात व तशी इमारतीतील गळती वाढत जाते. अगदी सामान्य दिसणारे झाड वेळीच उखडून न काढल्यास, जर त्याला पोषक वातावरण मिळाले तर एखाद्या राक्षसाप्रमाणे किंवा ऑक्टोपसप्रमाणे आपले विळखे इमारतीभोवती घालून मोठय़ा खर्चाला आमंत्रण देऊ  शकते. खूप वेळा ही झाडे उंचीवर वाढल्यामुळे किंवा काही धार्मिक अथवा अंधश्रद्धेपोटी तशीच राहून जातात; पण जेव्हा त्यांचे स्वरूप उग्र होते तेव्हा नाइलाजास्तव त्यांना उखडण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागतो. झाड नुसते तोडून पुरेसे नसते, तर ते मुळापासून उखडावे लागते व अशा वेळेस इमारतीचा काही भाग तोडून तो परत बांधावा लागतो.

खूप वेळा झाडे न वाढत निव्वळ शेवाळ्याच्या वाढीमुळेसुद्धा इमारतीचे प्रचंड नुकसान होऊ  शकते. शेवाळाच्या वाढीमुळे खराब झालेला पृष्ठभाग हा प्रत्येक पावसाळ्याच्या ऋतूमध्ये काही पटीत खराब होत असतो व त्यामुळे हा भाग पाण्याचा शोषक बनतो. तो भाग पाणी शोषून घेऊन भिंतीमध्ये तसेच साठवून ठेवतो. पावसाळा संपल्यानंतर हाच पृष्ठभाग ऑक्टोबरच्या उन्हामध्ये प्रचंड तापतो. तेव्हा आतील पाण्याची वाफ होऊन ती दबावाखाली बाहेर येते. हे चक्र वर्षांनुवर्षे चालत असते. बाहेर येणारी वाफ पिनहोल किंवा सूक्ष्म भेगांना (हेअरलाइन क्रॅक) मोठे करते. या भेगा जशा वाढत जातात तसे भिंतीत पाणी जिरण्याचे प्रमाण वाढत जाते. हळूहळू भेगा मोठय़ा होतात व तरीही त्यांची दखल घेऊन त्यांची वाढ थांबवली नाही तर एके दिवशी बिल्डिंगच खाली येते. किती सोपे आहे! दर चार ते पाच वर्षांनी आपण भेगा दुरुस्त केल्या, काही लेप दिले व त्यावर इमारतीला रंग लावला तर इमारतीत पाण्याचे शोषण कमी होईल व त्यापासून होणाऱ्या नुकसानीतून सुटका मिळेल. परात बांधलेली असल्यामुळे हात सर्वत्र पोहोचू शकतात. वनस्पतीची वाढ, गळके पाइप्स, भेगा या सर्वाची नीट दुरुस्ती करता येते व इमारतीचे स्वास्थ्य सांभाळता येते.

अलीकडे नवीन डिझाईन्सच्या इमारती येत आहेत. इथे बाहेरून आणून मोठ मोठी झाडे, गवताचे लॉन्स, पोहण्याचा तलाव अशा गोष्टी प्रत्येक फ्लॅटला पुरवल्या जातात. हे वीस-पंचवीस मजल्यांचे टॉवर असतात व प्रत्येक मजल्यावर प्रत्येक फ्लॅटमध्ये या सोयी पुरवल्या जातात. इथे विकासकाला ‘ब्रिक ब्याट कोबा’ सिस्टम किंवा पाणीरोधक रसायने वापरून त्यावर निव्वळ विसंबून राहून चालणार नाही. अशा बिल्डिंगमध्ये वॉटरप्रूफिंग हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी तीन स्थरांवरून वॉटरप्रूफिंगचे काम करून घेणे इष्ट राहील. जसे इनहाऊस, एक्झेक्युटिन्ग एजन्सी व तिसरी एक्स्पर्ट सुपरवायजिंग इंडिपेन्डन्ट एजन्सी. कारण त्यांना प्रत्येक कोनाचा व कोपऱ्याचा विचार करून थोडीही डुलकी न घेता काम करावे लागेल. थोडीशी चूक मोठा अनर्थ करू शकेल.

वॉटरप्रूफिंगमध्ये ‘रूट पेन्रिटेशन’ हा एक मोठा विषय आहे. कारण मुळे ही सर्वसाधारण अवरोधांना, रसायनांना दाद देत नाहीत. ती मेंब्रेनसारख्या गोष्टींनासुद्धा जुमानत नाहीत. संशोधकांना ‘रूट पेन्रिटेशन’ हा एक आव्हानात्मक विषय आहे. मुळांची वाढ होऊच नये म्हणून डिझाईनपासून काळजी घेऊन बांधकामाच्या वेळेससुद्धा विचारपूर्वक रोधक पदार्थाची निवड व वाढ होऊ  नये यासाठी पाण्यावर नियंत्रण ठेवणारी योजना आखावी लागेल. झाडे काही गटागटा पाणी पित नाहीत. योग्य प्रमाणात पाण्याचे नियोजन व वेळीच झाडांची व मुळांची छाटणी हा बहुधा पुढील काळातील वॉटरप्रूफिंगच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करावा लागणारा विषय असेल.

शैलेश कुडतरकर shaileshkudtarkar81@gmail.com