तिच्या या ब्रेकचं वैशिष्टय़ हे होतं की, या ब्रेकनंतर तिचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे शेवटाकडे जाणारा नव्हता, तर तिने एका नवीन कार्यक्रमाला आणि आयुष्याला सुरुवात केली होती. पण तिच्या या नव्या क्षेत्रात काम करायला लागणारी धडाडी आणि आत्मविश्वास पत्रकारितेत काम करताना तिला तिच्या आयुष्यात पहिल्यांदा मिळवून दिलेला होता तो त्या चॅनलच्या या वास्तूनेच!
आज सकाळपासूनच दीप्तीची धावपळ सुरू होती. ती पूर्वी ज्या न्यूज चॅनलवर अँकर म्हणून काम करत होती, तिथे तिला आज ‘बालसंगोपन’ या विषयावर मुलाखत द्यायला जायचं होतं. टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसून बोलायचं याचं आणि त्यातही एवढय़ा वर्षांनंतर चॅनलची सवय मोडलेली असताना कॅमेऱ्याला सामोरं जायचं, याचंही तिला टेन्शन आलं होतं. शिवाय वेळेत आटोपेल की नाहीयाची धास्तीही वाटत होती. मुलाखतीचं थेट प्रसारण असणार. शिवाय कार्यक्रम फोन-इन असणार. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही कसल्याही प्रकारचा प्रश्न विचारला गेला, तर बोलताना कुठे चूक व्हायला नको, अशी भीती मनात होती. एकेकाळच्या याच चॅनलवरच्या आत्मविश्वासपूर्ण आणि आघाडीची वृत्तनिवेदिका आणि वार्ताहर असलेल्या आपल्याला, स्क्रीनची आणि लाइव्ह कार्यक्रमाची भीती वाटावी, याचं शल्यही मनाला बोचत होतं. पण आज आपण टेबलाच्या दुसऱ्या बाजूला आहोत, त्यामुळे ही भीती वाटतेय, असं समर्थन तिने तिचं तिलाच दिलं आणि भीतीमुळे वाटणाऱ्या लाजेवर समर्पक उत्तर शोधल्याचं समाधान मिळवलं. पूर्वी मुलाखत घेताना, प्रश्न अभ्यासपूर्ण असावेत, त्यातून लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळवून द्यायची आपली जबाबदारी आहे, म्हणून एखाद्या विषयाचा किती अभ्यास करावा लागायचा. तज्ज्ञांसमोर उगाच फजिती व्हायला नको याचं टेन्शन असायचं. तेव्हा वाटायचं किती सोपं असतं, तज्ज्ञ म्हणून समोर बसणं. त्यांना विषयाची सखोल माहिती असल्यामुळे फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचीत की झालं. कित्ती सोप्पं! पण आता वाटतंय की, समोर बसून प्रश्न विचारणंच सोपं असतं. सगळं माहीत असलं आणि विषयाचा अनुभव असला, तरी योग्य वेळी योग्य उत्तर सुचून लोकांना या मुलाखतीतून काही तरी मिळाल्याचं समाधान मिळायला हवं याचं टेन्शन येतंय. दीप्तीच्या मनाची अशी घालमेल सुरू असतानाच हाताने कामं सुरू होती. आईबरोबर जायचंय म्हणून छोटय़ा निहारिकाने धोशा लावला होता. तिचा बाबा- सुनीलही तिला घेऊन यायला आणि स्टुडिओबाहेर तिला सांभाळायला तयार होता. पण शाळा चुकवून चालणार नाही असं तिला दीप्तीने बजावलं. खरं तर पहिलीच्या शाळेतला अभ्यास असा काही एक दिवसाने बुडणार नव्हता. पण दीप्तीने निहारिका आणि सुनील दोघांनाही यायला मनाई केली. सुनीलने मात्र सांगितलं की, आज निहारिका शाळेत जाणार नाही. आम्ही घरी राहूनच मुलाखत बघू. पण उत्तर देताना फजिती झाली आणि कार्यक्रम संपवून स्टुडिओबाहेर गेल्यावर सुनीलने प्रतिक्रिया दिली, तर जुन्या सहकाऱ्यांसमोर उगाच प्रदर्शन नको, याचंही टेन्शन! सुनील असा आततायी स्वभावाचा आणि घे सुरी घाल ऊरी, अशा वृत्तीचा नव्हता. त्याने कदाचित घरी आल्यावरही सांगितलं असतं. पण काहीही बोललं नाही, तरी चेहऱ्यावरची एक्स्प्रेशन्स बोलून जातात. त्यामुळे नकोच, असं तिने दोघांना सांगितलं. मनात असं विचारांचं वादळ सुरू असतानाच अकरा वाजले. मोबाइल खणाणला. चॅनलने पाठवलेल्या गाडीच्या ड्रायव्हरचा फोन होता.
‘मॅडम, मी आलोय. निघायचं ना?’ त्याने विचारलं.
‘हो, मीही तयार आहेच, पाचच मिनिटांत खाली उतरते,’असं सांगून सगळं आवरून दीप्ती निघाली. घर ते चॅनलचं ऑफिस या गाडीतल्या प्रवासातही विचारचक्र सुरूच होतं. प्रेक्षकांकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांची उजळणी मनात सुरू होती आणि नजर वेगाने मागे सरकणाऱ्या रस्त्याकडे खिळली होती.
इतक्यात, ‘हॅलो मॅडम, कैसी हो?’ या मेन गेटवरच्या सिक्युरिटीवाल्या बद्रिप्रसाद वॉचमनच्या प्रश्नाने दीप्ती भानावर आली. गाडी चॅनलच्या ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारात उभी होती.
‘हा, बद्रीजी मजे में, आप कैसे है?’ दीप्तीने विचारलं.
‘बस्स मॅडम, अपना तो चल रहा है। लेकिन सुना है आप बहुत बडम काम कर रही है। आज तो आप एक्स्पर्ट गेस्ट कर के आयी है। हम यही खडम्े है सालों से, रखवाली करते हुए।’ सरल्या वर्षांमध्ये लोकांच्या नजरेत आपण मोठे आणि मान्यवर झालो आहोत, अशी आपली लोकांच्या मनातली प्रतिमा बघून दीप्ती सुखावली आणि मनातली भीतीची भावना काहीशी कमी होऊन मान्यवर असल्याचा आत्मविश्वास वाढला. गाडी पुढे निघाली तशी दीप्तीची नजर आजूबाजूच्या ओळखीच्या खुणा न्याहाळू लागली. मुख्य प्रवेशद्वारावर असलेली स्टेनलेस स्टीलच्या चकचकीत गोल खांबांवरती अ‍ॅल्युमिनियमचं क्लॅिडग केलेली करडय़ा राखाडी रंगातली कमान आणि त्यावरची चॅनलच्या नावाची स्टेनलेस स्टीलमध्ये कोरलेली चकचकीत अक्षरं बघितल्यावर दीप्तीला अगदी पहिल्यांदा तिथे आल्याची आठवण जागी झाली. नोकरीसाठी मुलाखत द्यायला तेव्हा ती आली होती. या माध्यमसाम्राज्यात आपल्याला प्रवेश मिळावा, लोकांनी आपल्याला रोज टीव्हीवर पाहावं आणि आपण रस्त्याने जाताना, ‘‘ए, ती बघ, टीव्ही सेलेब्रिटी चालली आहे,’’ म्हणून एकमेकांमध्ये कुजबुजावं, असं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या दीप्तीच्या मनात ती कमान ठसली होती. शेजारीच असलेली ही काचेची सिक्युरिटी केबिन बघताना आत जायला मिळेल की हटकलं जाईल, अशी त्या केबिनची एक दरारायुक्त भीती उगाचंच त्या वेळी मनात होती. त्यातच कॉल लेटर सोबत आणायला सांगितलेलं असताना घाईघाईत दीप्ती ते घरी विसरली होती आणि मग कॉल लेटर नाही, म्हणून डय़ुटीवर असलेल्या बद्रीने तिला वर जाऊ द्यायला अडवलं होतं. त्यावर मग एचआरला फोन लावून यादीत आपलं नाव असल्याची खातरजमा आपण बद्रीला कशी करून दिली होती, तेही आठवलं. तेव्हा वर जाऊ न देणारा बद्री, आज मात्र ‘आप बडम्ी हो गयी है,’ असं म्हणतोय आणि एरव्ही नोकरीत असतानाही कधी येता-जाता सलाम न करणारा बद्री आज मात्र, सलाम करून आपल्याला आत सोडतोय तेही रजिस्टरमध्ये एण्ट्री न करून घेता! या व्हीआयपी ट्रीटमेण्टचं कौतुक वाटून दीप्तीला हसू आलं. गाडी पुढे सरकू लागली. आवारातल्या या अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कम्पाऊंडला लागून असलेल्या सदाफुलीने आणि गुलबक्षीने पांढऱ्या आणि किरमिजी रंगाची जणू रांगोळीच घातली होती. मातीत तिरप्या खोवून बसवलेल्या मातकट रंगांच्या विटांच्या तुकडय़ांची किनार त्याला उठाव देत होती. गाडी उजव्या बाजूला दिमाखात वळली आणि चॅनलच्या इमारतीच्या पोर्चमध्ये काचेच्या ऑटोमॅटिक उघडणाऱ्या दरवाजांसमोर जाऊन उभी राहिली. दरवाजाबाहेरच पाहुण्यांना ऑफिसात घेऊन यायची जबाबदारी सोपवलेला ट्रेनी रिपोर्टर सुजय उभा होता. ‘या मॅडम,’ असं म्हणत त्याने तोंडभर हसून दीप्तीचं स्वागत केलं. कधी तरी आपणही ट्रेिनगच्या काळात असंच अनेक पाहुण्यांचं केलेलं स्वागत दीप्तीला आठवलं. त्या वेळी तिच्याबरोबर असाच दुसरा एक ट्रेनी रिपोर्टर होता. तो एक महिना आधी जॉइन झाला होता. तो नेहमी सांगायचा, रोज पाहुणे येईपर्यंत ते येत आहेत की नाही, याचं टेन्शन, ते आलेत की, त्यांना बसवून त्यांची खातीरदारी व्यवस्थित त्यांच्या मानापमानानुसार होतेय की नाही आणि मेकअप करून त्यांना स्टुडिओत नेऊन सोडेपर्यंतचं टेन्शन. मग कार्यक्रम संपल्यावर एकदा का गाडीत बसून पाहुणे गेले, की या सगळ्या ताणामधून सुटकेचा नि:श्वास! हे सगळं आठवून दीप्तीला जाणवलं की याच्या मनावरचा ताण कमी करायला हवा. मग तिने त्याचं टेन्शन कमी करण्यासाठी आपणही तुझ्याचसारखं गेस्ट कॉ-ऑर्डिनेशनचं काम केलं आहे. तेव्हा नो फॉर्मॅलिटीज, असं सांगितल्यावर त्याच्या मनावरचा भार कमी झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. बोलता बोलता लिफ्टवर आली. लिफ्टमधून बाहेर येताच रिसेप्शनमधल्या सुझीने दीप्तीला विचारलं, ‘काय म्हणू तुला, तू की, तुम्ही? सुझी, कायम जॉली..’ सुझीचं स्वागत स्वीकारून दीप्ती आत गेली. तिला सुजयने गेस्टरूममध्ये बसवलं आणि तो कॉफीची ऑर्डर देऊन गेस्ट आल्याची वर्दी निवेदिकेला आणि कार्यक्रमाच्या प्रोडय़ुसरला देण्यासाठी गेला. एरव्ही कधी नीट निरीक्षण करायला न मिळालेली गेस्टरूम आज दीप्ती नीट निरखून बघत होती. काळसर ग्रे रंगाची कव्हर्स असलेला मोठा मऊमऊ सोफा. त्याच्या बाजूला नव्वद अंशात तशाच दोन सोफासेटमधल्या खुच्र्या अशी इंग्रजी ‘सी’च्या आकारातली बठक व्यवस्था. त्यावर टेकण्यासाठी लोकरीत विणलेल्या पांढऱ्या रंगातली झालरीसारखी सोडलेली अर्धवर्तुळाकार बॅक फíनिशग्ज. समोर मोठय़ा आकारातलं काचेचं सेंटर टेबल आणि त्यावर आघाडीची मराठी-इंग्रजी मासिकं आणि वर्तमानपत्रं असा सगळा जामानिमा. पण त्याहीपेक्षा प्रेक्षणीय आणि नयनमनोहर असं दृश्य सोफ्यासमोरच्या फ्रेंचविण्डोमधून दिसत होतं. जवळजवळ भिंतीच्या उंचीची काचेची भिंतच असलेल्या या खिडकीतून समोर पाहिल्यावर या दहाव्या मजल्यावरून मुंबईचं दर्शन घडत होतं. एकीकडे उंचच उंच टॉवर्स. त्यांच्या पायाशी ज्या हायवेवरून आता गाडी आली तो रस्ता इवलासा दिसत होता आणि त्यावर खेळातल्या गाडय़ांप्रमाणे दिसणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गाडय़ा भराभरा उगाचच लगबगीने इकडून तिकडे धावत होत्यात. दूऽऽर लांबवर जिथे सगळ्या इमारती संपत होत्या, तिथे क्षितिजावर कुठल्याशा हिरव्या डोंगररांगा दिसत होत्या. हे सगळं पाहण्यात दंग असलेली दीप्ती, तिच्या पुढय़ात ठेवलेल्या कॉफीच्या कपाने भानावर आली.
सुजयही पाठोपाठ आत आला. ‘मॅडम कॉफी घ्या ना. कार्यक्रमाच्या अँकर मेकअप करून येतच आहेत.’ इतक्यात एक गृहस्थ आत आले.
‘नमस्कार मॅडम, मी दीपक टावरे. तुमच्या कार्यक्रमाचा प्रोडय़ुसर. तुम्ही पूर्वी इथेच होता असं ऐकलंय, म्हणजे कम्फर्टेबल असणार कॅमेऱ्याला! तुम्हाला काही सूचना करायची गरज नाही. घरचंच वातावरण आहे.’ निवेदिका असतानाच्या जुन्या सवयीप्रमाणे मनातली भीती चेहऱ्यावर न आणता दीप्ती हसून म्हणाली ‘हो ना, एकदम रिलॅक्सड वाटतंय.’
‘म्हणजे मग आम्हालाही रिलॅक्सड व्हायला हरकत नाही. नाही तर आधी गेस्टबरोबर बोलून त्याची भीती आम्हाला घालवून त्यांना रिलॅक्सड करावं लागतं. कार्यक्रम लाइव्ह आहे ना, म्हणून हो! अर्थात, तुम्हाला हे माहीत असणारच म्हणा, तुम्हाला हे सगळं काय सांगतोय. ’ इतक्यात, दीप्तीची जुनी सहकारी मत्रीण असलेली निवेदिका मंजिरी गेस्टरूममध्ये आली.
‘चला, मी येतो, तुम्ही बोलून घ्या मुलाखतीच्या विषयाबद्दल,’ असं म्हणून प्रोडय़ुसर निघतात. मग दोघींची गळाभेट होऊन थोडय़ाशा गप्पा होतात. मग नंतर सविस्तर बोलू असं म्हणून विषयाबद्दल आणि संभावित प्रश्नांबद्दल चर्चा झाली.
मग दीप्तीला मंजिरीने मेकअप रूममध्ये नेलं. पूर्वी प्रत्येक बातमीपत्राआधी किंवा कार्यक्रमाआधी मेकअपचा टचअप होत असल्यामुळे त्याचं फारसं काही अप्रूप वाटायचं नाही. पण आज दहा वर्षांनी पुन्हा मेकअपच्या खुर्चीत बसल्यानंतर मेकअप रूममधल्या त्या झगझगीत दिव्यांनी जुन्या आठवणींवर प्रकाश टाकला. गाजलेली बातमीपत्रं आणि त्यात घेतलेल्या थोरामोठय़ांच्या मुलाखती क्षणार्धात नजरेसमोरून गेल्या. शिवानी मेकअप करायला आली, बोलता बोलता आणि शिवानीबरोबर गप्पा मारता मारता कधी मेकअप झाला कळलंच नाही. दीप्ती आणि मंजिरी मग स्टुडिओत गेल्या. त्या वेळी स्टुडिओत काळोख होता. फक्त कार्यक्रमाच्या सेटवरचे काही दिवे लागले होते. दोघीजणी आपापल्या खुच्र्यावर बसल्यात. लाइटमनने आवश्यक ते एकेक दिवे लावले आणि स्टुडिओ डोळे दीपवणाऱ्या झगमगत्या प्रकाशाने उजळून निघाला. एव्हाना प्रोडय़ुसर त्यांच्या टीमसह कंट्रोलरूममध्ये विराजमान झाले होते. त्यांच्या समोरच्या वेगवेगळ्या टीव्ही मॉनिटर्सच्या स्क्रीनवर तीन कॅमेऱ्यांमधून तीन अँगल्सनी स्टुडिओचे वेगवेगळे तपशील दिसत होते. एकात दीप्तीचा क्लोजअप, दुसऱ्या मॉनिटरमध्ये मंजिरीचा क्लोजअप, दोघींना एकाच वेळी कव्हर करणारा तिसरा कॅमेरा लाँगशॉट दाखवत होता. दोघींच्या ऑडिओ टेस्ट होऊन ऑडिओ लेव्हल आणि आवाजाची क्वॉलिटी तपासण्यात आली. फ्लोअर मॅनेजरनी त्यांच्या कानाला लावलेल्या हेडफोनमधून आलेला प्रोडय़ुसर कमांडचा निरोप स्टुडिओत दिला.. ‘रेडी स्टुडिओ.. सायलेन्स ऑन फ्लोअर.. मोन्ताज ऑन..’ असं म्हटल्यावर समोरच्या स्टुडिओतल्या मॉनिटरवर कार्यक्रमाचं शीर्षक संगीत आणि ग्राफिक्स सुरू झालं.. हे सगळं सुरू असताना पुन्हा एकदा दीप्तीला आलेलं थेट प्रसारणाचं टेन्शन आणि मनात दाटलेल्या जुन्या आठवणींनी हरवून गेलेला चेहरा प्रोडय़ुसरना दिसला. त्यांनी मंजिरीच्या ईअरफोनमध्ये दीप्तीला बकअप करायचे निर्देश दिले.. मंजिरीने टेबलाखालूनच दीप्तीला पायावर थोपटलं आणि चीअर्सचा अंगठा दाखवला. क्षणार्धात, फ्लोअर मॅनेजरने रोऽऽल, अशी आरोळी ठोकली आणि कॅमेरा मंजिरीवर स्थिरावला.. तिने मग हसतमुखाने कार्यक्रमात प्रेक्षकांचं स्वागत केलं आणि ‘एका चॅनेलची वृत्तनिवेदिका आणि पत्रकार ते बालसंगोपन क्षेत्रातल्या तज्ज्ञ असा प्रवास असलेल्या दीप्ती बेहरे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत,’ असं म्हणून ‘नमस्कार दीप्तीताई.. ’असं म्हटल्यावर कॅमेरा दीप्तीवर स्थिरावला मात्र, तिच्यात पूर्वीची धडाडीची आणि आत्मविश्वासपूर्ण दीप्ती संचारली. एखादा सराईत क्रिकेटपटू जशी मदानावर उतरल्यावर चौफेर फटकेबाजी करतो, तशी मग प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना कधी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारे तिचे अनुभव सांगून, तर कधी हलकाफुलका विनोदी प्रसंग सांगून संपूर्ण मुलाखतीत दीप्तीने रंगत आणली.
मुलाखत संपवून बाहेर आल्यावर तिच्या जुन्या पत्रकार-वार्ताहर मित्रमत्रिणींनी तिला गराडा घातला. तिची विचारपूस केली. गप्पागोष्टी झाल्या आणि दीप्ती घरी जायला निघाली. सुजय तिला गाडीत बसवून देण्यासाठी गाडीपर्यंत बरोबर आला. ‘मॅडम, पाहुणे रोजच येतात. पण खरं सांगतो मनापासून, आज खरोखरच मुलाखत चांगली झाली, मजा आली.’
निरोप घेऊन दीप्ती घराच्या दिशेने निघाली होती. तिला आता सुनील आणि निहारिकाला भेटायचं होतं. त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. मोबाइल ऑन केल्यावर अभिनंदनाचे फोन आणि मेसेजेस आले. लग्नानंतर कोणीही सांगितलेलं नसताना कुटुंबासाठी वेळ देता यावा म्हणून चॅनलच्या करिअरमध्ये ब्रेक घेऊन निहारिका थोडी मोठी झाल्यावर तिला वेळ देता येईल, असं नवीनच करिअर क्षेत्र निवडलेल्या दीप्तीला काही काळ कॅमेऱ्यापासून लांब गेल्यावर रुखरुख वाटत होती. चाइल्डकेअरचा कोर्स करून ट्रेनिंग वर्कशॉप्स घ्यायलाही तिने सुरुवात केली होती. एरव्ही भेटू या ब्रेकनंतर थोडय़ाच वेळात असं म्हणून बातमीपत्रात किंवा कार्यक्रमात ब्रेक घेणाऱ्या दीप्तीचा कार्यक्रम ब्रेकनंतर अवघ्या काही वेळातच संपायचा. पण लग्नानंतर मधल्या काळात आपण काही गमावलं आहे, अशी खंत कुठे तरी वाटत असलेल्या दीप्तीला आज मात्र ब्रेकनंतर परत चॅनलवर गेल्यानंतर आपण खूप काही कमावलंय याची जाणीव तिला झाली. कारण तिच्या या ब्रेकचं वैशिष्टय़ हे होतं की, या ब्रेकनंतर तिचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे शेवटाकडे जाणारा नव्हता, तर तिने एका नवीन कार्यक्रमाला आणि आयुष्याला सुरुवात केली होती. पण तिच्या या नव्या क्षेत्रात काम करायला लागणारी धडाडी आणि आत्मविश्वास पत्रकारितेत काम करताना तिला तिच्या आयुष्यात पहिल्यांदा मिळवून दिलेला होता तो त्या चॅनलच्या या वास्तूनेच! म्हणूनच या वास्तूचे शतश: आभार मानून दीप्ती घराकडे जायला निघाली..
मनोज अणावकर – anaokarm@yahoo.co.in